विकासाच्या आणि समृद्धीच्या पारंपारिक कल्पना, जागतिकीकरण, जातीभेद अशा अनेक विषयांबाबतचे आपले पूर्वग्रह अतिशय बळकट असतात त्यामुळे काही गोष्टी दिसत असूनही आपण न पाहिल्यासारखे करतो तर कधीकधी 'मोडेन पण वाकणार नाही' अशा दुराग्रही निगरगट्टपणाने त्यांचे समर्थन करत राहतो. कारण कोणीतरी आपल्या पूर्वग्रहांना गदगदा हालवावे, विचार करण्याची पद्धतच बदलवून टाकावी असे शक्यतो होत नाही. बोकीलांचे 'समुद्रापारचे समाज' हे पुस्तक वाचले आणि एक नवी दृष्टी लाभल्यासारखे झाले. मनाची जळमटलेली कवाडे खुली होऊन मोकळा श्वास घेता येत आहे असे वाटू लागले.
'समुद्रापारचे समाज' विषयी खूप वाचले होते. मात्र बरेच दिवस ते पुस्तक मिळाले नाही. पुण्यातील एका दुकानदाराने तर ते ’मुंबईच्या प्रकाशनाचे पुस्तक आहे. आणि आम्ही त्यांची पुस्तके विकत नाही.’ असे सांगून मला वाटेला लावले होते. पण शेवटी एका प्रदर्शनात ते गावलेच. ;)
पुस्तकाविषयी काही सांगण्याआधी बोकीलांविषयी थोडेसे सांगणे आवश्यक आहे. बोकील यांचे शिक्षण मुळात इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनीअरिंग या विषयातले. असे असले तरी तरूणवयात काही आंदोलनांशी संबंध आल्यावर त्यांना समाजशास्त्राचा आणि मानववंशशास्त्राचा विद्यापीठीय चौकटीत अभ्यास करण्याची प्रेरणा निर्माण झाली. या अभ्यासाने त्यांच्या एकूणच लेखनाला प्रगल्भ आणि शास्त्रीय समज प्राप्त झाली आहे. याचबरोबर त्यांची जडणघडण वैचारिक आंदोलनांमध्ये झालेली असल्याने त्यांच्या कोणत्याच लेखनात केवळ शास्त्रीय कोरडेपणा नसतो तर त्या प्रश्नाची मुळापासून आस्था असल्याने त्या प्रश्नाशी असलेली त्यांची बांधीलकी त्या लेखामध्ये जाणवत राहते.
या पुस्तकात बोकील यांनी दुर्लक्षित परदेशीय समाजांच्या जीवनाबद्दल वेगवेगळ्या दिवाळी अंकात लिहिलेले लेख संकलित केलेले आहेत. दिवाळी अंकात येणार्या नेहमीच्या पद्धतीच्या लेखांपेक्षा हे लेख अतिशय वेगळ्या प्रकारचे आहेत. बोकीलांची समाजजीवनाकडे, समृद्धीकडे, भौतिक प्रगतीकडे पाहण्याची वेगळी दृष्टी, त्याला पूरक असा त्यांचा मानववंशशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि अतिशय सुंदर भाषाशैली यामुळे हे लेख अभ्यासपूर्ण असले तरी बोजड नाहीत.
फिलिपीन्सच्या उत्तरेकडच्या इफूगाओ प्रांतातले आदिवासी , समाजकार्य करणारा बैरॉईटमधील एक समूह, अमेरिकेच्या वळचणीला वसलेला लहानसा कोस्टा रिका, ऍमस्टरडॅम आणि थायलंडमधील देहविक्री करणारे व्यावसायिक, वर्णभेदाने दुभंगलेला झिम्बाब्वे आणि जपानमधले दलित. अशी लेखांच्या विषयात विविधता असली तरी प्रत्येक लेखातून एक समाजशास्त्रीय समान तत्त्व काढण्याच्या उद्देशाने त्यांनी त्या त्या प्रदेशातील परिस्थितीची तुलना भारतातील परिस्थितीशीही केली आहे. त्यामुळे हे लेख समजायला सोपे तर जातातच शिवाय ते मनाला भिडतातही.
पुस्तकातील काही लेखांमधून आदिवासी समजल्या जाणार्या समूहांच्या जीवनशैलीशी ओळख होऊ लागते. आपण ज्यांना आदिवासी किंवा तथाकथित मागास समजतो अशा समूहांची जगभरातील जीवनपद्धती किती समृद्ध आहे. हवा-पाणी-जमीन यांवर कमीतकमी अत्याचार होतील अशा पद्धतीने एकमेकांस मदत करून सुसंस्कृत जीवन जगण्याची त्यांची धडपड चालूच आहे. बाहेरच्या जीवघेण्या स्पर्धेला, त्यांच्यावर होणार्या सांस्कृतिक आक्रमणाला तोंड देतानाही या समूहांनी शांततामय जीवनाचा मार्ग सोडलेला नाही. या पार्श्वभूमीवर ज्याला आपण प्रगत समाज म्हणतो अशा समाजातील असंस्कृतपणा, ओरबाडून घेण्याची वृत्ती, स्वार्थीपणा ह्या गोष्टी बटबटीतपणे पुढे येऊ लागतात.
पुस्तकातील ऍमस्टरडॅम आणि अमेझिंग थायलंड या लेखांमधून लैंगिक व्यवसायांसाठी प्रसिद्ध असणार्या या पर्यटनस्थळांमध्ये चाललेल्या लैंगिक शोषणाबद्दल बोकीलांनी लिहिले आहे. या व्यवसायात एकूणच जीवनव्यवहाराचा प्रत्येक भाग असलेली गोष्ट 'खरेदी-विक्री करून पैका करण्याची वस्तू' मानणे. मानवी शरीराला पशूपेक्षाही हीन पातळीवर उभे करून या सर्व गोष्टींचा बाजार 'आधुनिक समाज' या नावाखाली चालवणे या गोष्टी पाहून बोकील अस्वस्थ होतात.
कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय समाज अशी वर्णभेदी व्यवस्था हे खरे तर युरोपियन वसाहतवादाचे फळ. अगदी कालपरवा प्रसिद्ध झालेल्या नॅशनल जिओग्राफिकच्या लेखामध्येही हेच अधोरेखित केले आहे. 'झिम्बाब्वे काळा की गोरा' आणि 'जपानमधील दलित' या लेखांमध्ये हीन समजल्या जाणार्या समाजघटकांबद्दल बोकीलांनी लिहिले आहे. कोणताही घटक समाजव्यवस्थेमध्ये हीन कसा ठरत जातो हे उलगडून सांगतानाच ही हीन ठरवण्याची पद्धत स्थल-काल-संस्कृतीनिरपेक्ष - अगदी सर्वत्र - सारखीच कशी आहे हेदेखील बोकील अधोरेखित करतात. एकदा एखाद्या समूहाला हीन ठरवले की नंतर त्या समूहाच्या प्रगतीच्या वाटा बंद करण्याच्या पद्धतीही सर्वत्र कशा सारख्याच आहेत हे देखील बोकील विस्ताराने समजावून सांगतात.
प्रत्येक लेख त्या त्या विषयाचा बोकीलांनी केलेल्या अभ्यासाची खात्री तर पटवतोच पण वाचकालाही अस्वस्थ करून सोडतो. 'मानवी समाजातील प्रकृती आणि विकृतीच्या कल्पना बदलत असतात' अशी बोकीलांची मार्मिक निरीक्षणे दाद घेऊन जातात. पुस्तकातील लेखन केवळ प्रवासवर्णनात्मक किंवा मनोरंजनात्मक उद्देशाने केलेले नाही. ह्या प्रवासात बोकीलांना आलेले अनुभव सांगतानाच त्या अनुभवांमागची कारणे मानववंशशास्त्रीय शोधण्याचाही बोकीलांचा प्रयत्न असतो.
वसंत पळशीकर यांची पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना हा तर एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना या ऋणनिर्देश, अर्पणपत्रिकेची पुरवणी पत्रिका इतक्याच मर्यादेत जातात, किंवा त्याचा उपयोग प्रस्तावना लिहिणारे लेखक समीक्षकी भाषेत त्यांचे ज्ञान 'मी कित्ती हुश्शार' पद्धतीने स्वतःभोवती आरती ओवाळण्यासाठी वापरतात. या पुस्तकाची प्रस्तावना मात्र लेखांप्रमाणेच वारंवार वाचावी, समजून घ्यावी अशी आहे.
शेवटी प्रस्तावनेतील काही भाग:
"ज्या व्यवस्थेत माणसाचा आत्मसन्मान,, त्याची प्रतिष्ठा या गोष्टी राखल्या जातात, माणुसकी जपली व संवर्धित केली जाते, स्त्री पुरुष हा भेद विषमतेसाठी, शोषणासाठी केला जात नाही, जेथे व्यक्ती स्वतंत्र व समान आहे, जेथे पृथ्वीच्या पर्यावरणीय व्यवस्थेचा आदर केला जातो, पर्यावरणाची जपणूक व संवर्धन केले जाते, जेथे मानवी लोकसमूहांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली व संस्कृतींना सन्मानपूर्वक अवकाश राहिलेला असेल आणि जेथे माणसांमाणसांमधली नाती ही बंधुभावाची, आत्मीयतेची, एकमेका साह्य करण्याची असतील अशा एका नवसमाजाच्या निर्माणाचे ध्येय बोकील बाळगतात.हा त्यांचा पक्ष आहे. या अर्थाने आर्थिक विकास, प्रगती, आधुनिकता, समृद्धी यांची आज जी शिष्टमान्य प्रतिमाने वा धारणा आहेत त्यांना विकल्प शोधण्याच्या, निर्माण करण्याच्या, हे विकल्प रुजविण्याच्या पक्षातले ते आहेत. आर्थिक विकास, प्रगती, आधुनिकता, समृद्धी या सगळ्यांच्या परिणामी माणसांचे काय होते, जास्त सुसंस्कृत, प्रेमळ, नि:स्वार्थी, स्वस्थ, माणुसकीसंपन्न बनून एकमेकांशी ती नाती जोडतात की नाही हीच खरी मापनकसोटी आहे ही त्यांची धारणा असल्याचे लेखांमधून प्रकट होत राहते.
वाचकाचे मनोविश्व तसेच विचारविश्व समृद्ध व सखोल बनविणारे हे लेख ही वैचारिक साहित्यात एक मोलाची भर आहे."
