Showing posts with label रेडिओ मिरची. Show all posts
Showing posts with label रेडिओ मिरची. Show all posts

Thursday, April 24

रेडिओ मिरची आणि संत तुकाराम

रेडिओ सिटी सुरू झाल्यामुळे आता रेडिओ मिरचीचे खंग्री बूच लागले आहे. वैतागलेला श्रोतावर्ग टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी त्यांची कंबर कसून प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे 'मराठी' गाणी ऐकवणे हा!

खरं म्हणजे रेडिओ मिरचीवर मराठी गाणी सुरू झाल्याचे मित्राकडून ऐकल्यावर मी बेशुद्ध पडलो होतो. पण चप्पल हुंगवणे, नाकाला कांदा लावणे वगैरे प्रकारांऐवजी रेडिओ मिरची मला ऐकवल्यावर परत शुद्धीवर आलो. नंतर आत्मक्लेश सहन करून एक पूर्ण दिवस रेडिओ मिरचीची गाणी ऐकली पण त्यात मराठी गाणं कुठंच ऐकायला मिळालं नाही.

थोडं खोदून खोदून चौकशी केल्यावर कळलं की सकाळी ५ ते ७ या वेळात 'काही' मराठी गाणी ऐकवली जाणार आहेत. अधिक खोलात गेल्यावर असंही कळलं की रेडिओ मिरचीची आधीची योजना ही रात्री १ ते ३ किंवा रात्री ३ ते पहाटे ५ या वेळात मराठी गाणी प्रसारित करण्याची होती. पण या वेळामध्ये काही गुरखे, रात्रपाळीवरचे कामगार वगैरे जागे असतात. मात्र पहाटे ५ ते ७ या साखरझोपेच्या काळात एकही माणूस जागा असणार नाही याची त्यांनी खात्री करून घेतली. विशेषत: इतक्या उन्हाळ्यात पहाटे जरा गार हवा असल्यावर चांगली झोप लागते तेव्हा ५ ते ७ ही ओळ गाण्यांच्या प्रसारणासाठी उत्तम.

असो.

भणभण गाणी, उबगवाण्या संतापजनक जाहिराती आणि तोंडशिंदळीचे निवेदक असल्यावर रेडिओ मिरची स्वत:हून ऐकणार्‍यांबद्दल काही ठेवणीतले शब्द वापरता येतील. पण मराठीच्या टवाळ्या करून हिंदीच्या चोळ्या धुणार्‍या या तुंग्रुस रेडिओ मिरचीवाल्यांबद्दल आमच्या तुकोबांनी एक अभंग आधीच लिहून ठेवला आहे. आम्हाला तो अभंग फार्फार आवडतो.


संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥
संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥

वा!

खरं तर गुटखासंप्रदायी थुंकसैनिकांनी एखादे निषेधात्मक पाणीदार आंदोलन जाहीर करायला पाहिजे.

Sunday, June 17

माहितीचा अधिकार

कोणाला माहितीच्या अधिकाराविषयी काही माहिती आहे का?

म्हणजे उदाहरणार्थ स्थानिक भाषा व संस्कृतीशी जवळीक असणार्‍या कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यासाठी परवाना घेतलेल्या (License for localized programming) रेडिओ मिरची सारख्या एफएम वाहिनीने आतापर्यंत किती मराठी गाणी पुण्यातल्या स्थानिक जनतेला ऐकवली आहेत याची माहिती हवी असेल तर ती देणे रेडिओ मिरचीवर बंधनकारक आहे का?

कोणत्याही प्रसारमाध्यमाकडून अशी माहिती मिळवण्याची काय पद्धत असते?