Showing posts with label मिलिंद बोकील. Show all posts
Showing posts with label मिलिंद बोकील. Show all posts

Thursday, March 20

'समुद्रापारचे समाज' विषयी

विकासाच्या आणि समृद्धीच्या पारंपारिक कल्पना, जागतिकीकरण, जातीभेद अशा अनेक विषयांबाबतचे आपले पूर्वग्रह अतिशय बळकट असतात त्यामुळे काही गोष्टी दिसत असूनही आपण न पाहिल्यासारखे करतो तर कधीकधी 'मोडेन पण वाकणार नाही' अशा दुराग्रही निगरगट्टपणाने त्यांचे समर्थन करत राहतो. कारण कोणीतरी आपल्या पूर्वग्रहांना गदगदा हालवावे, विचार करण्याची पद्धतच बदलवून टाकावी असे शक्यतो होत नाही. बोकीलांचे 'समुद्रापारचे समाज' हे पुस्तक वाचले आणि एक नवी दृष्टी लाभल्यासारखे झाले. मनाची जळमटलेली कवाडे खुली होऊन मोकळा श्वास घेता येत आहे असे वाटू लागले.

'समुद्रापारचे समाज' विषयी खूप वाचले होते. मात्र बरेच दिवस ते पुस्तक मिळाले नाही. पुण्यातील एका दुकानदाराने तर ते ’मुंबईच्या प्रकाशनाचे पुस्तक आहे. आणि आम्ही त्यांची पुस्तके विकत नाही.’ असे सांगून मला वाटेला लावले होते. पण शेवटी एका प्रदर्शनात ते गावलेच. ;)

पुस्तकाविषयी काही सांगण्याआधी बोकीलांविषयी थोडेसे सांगणे आवश्यक आहे. बोकील यांचे शिक्षण मुळात इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनीअरिंग या विषयातले. असे असले तरी तरूणवयात काही आंदोलनांशी संबंध आल्यावर त्यांना समाजशास्त्राचा आणि मानववंशशास्त्राचा विद्यापीठीय चौकटीत अभ्यास करण्याची प्रेरणा निर्माण झाली. या अभ्यासाने त्यांच्या एकूणच लेखनाला प्रगल्भ आणि शास्त्रीय समज प्राप्त झाली आहे. याचबरोबर त्यांची जडणघडण वैचारिक आंदोलनांमध्ये झालेली असल्याने त्यांच्या कोणत्याच लेखनात केवळ शास्त्रीय कोरडेपणा नसतो तर त्या प्रश्नाची मुळापासून आस्था असल्याने त्या प्रश्नाशी असलेली त्यांची बांधीलकी त्या लेखामध्ये जाणवत राहते.

या पुस्तकात बोकील यांनी दुर्लक्षित परदेशीय समाजांच्या जीवनाबद्दल वेगवेगळ्या दिवाळी अंकात लिहिलेले लेख संकलित केलेले आहेत. दिवाळी अंकात येणार्‍या नेहमीच्या पद्धतीच्या लेखांपेक्षा हे लेख अतिशय वेगळ्या प्रकारचे आहेत. बोकीलांची समाजजीवनाकडे, समृद्धीकडे, भौतिक प्रगतीकडे पाहण्याची वेगळी दृष्टी, त्याला पूरक असा त्यांचा मानववंशशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि अतिशय सुंदर भाषाशैली यामुळे हे लेख अभ्यासपूर्ण असले तरी बोजड नाहीत.

फिलिपीन्सच्या उत्तरेकडच्या इफूगाओ प्रांतातले आदिवासी , समाजकार्य करणारा बैरॉईटमधील एक समूह, अमेरिकेच्या वळचणीला वसलेला लहानसा कोस्टा रिका, ऍमस्टरडॅम आणि थायलंडमधील देहविक्री करणारे व्यावसायिक, वर्णभेदाने दुभंगलेला झिम्बाब्वे आणि जपानमधले दलित. अशी लेखांच्या विषयात विविधता असली तरी प्रत्येक लेखातून एक समाजशास्त्रीय समान तत्त्व काढण्याच्या उद्देशाने त्यांनी त्या त्या प्रदेशातील परिस्थितीची तुलना भारतातील परिस्थितीशीही केली आहे. त्यामुळे हे लेख समजायला सोपे तर जातातच शिवाय ते मनाला भिडतातही.

पुस्तकातील काही लेखांमधून आदिवासी समजल्या जाणार्‍या समूहांच्या जीवनशैलीशी ओळख होऊ लागते. आपण ज्यांना आदिवासी किंवा तथाकथित मागास समजतो अशा समूहांची जगभरातील जीवनपद्धती किती समृद्ध आहे. हवा-पाणी-जमीन यांवर कमीतकमी अत्याचार होतील अशा पद्धतीने एकमेकांस मदत करून सुसंस्कृत जीवन जगण्याची त्यांची धडपड चालूच आहे. बाहेरच्या जीवघेण्या स्पर्धेला, त्यांच्यावर होणार्‍या सांस्कृतिक आक्रमणाला तोंड देतानाही या समूहांनी शांततामय जीवनाचा मार्ग सोडलेला नाही. या पार्श्वभूमीवर ज्याला आपण प्रगत समाज म्हणतो अशा समाजातील असंस्कृतपणा, ओरबाडून घेण्याची वृत्ती, स्वार्थीपणा ह्या गोष्टी बटबटीतपणे पुढे येऊ लागतात.

पुस्तकातील ऍमस्टरडॅम आणि अमेझिंग थायलंड या लेखांमधून लैंगिक व्यवसायांसाठी प्रसिद्ध असणार्‍या या पर्यटनस्थळांमध्ये चाललेल्या लैंगिक शोषणाबद्दल बोकीलांनी लिहिले आहे. या व्यवसायात एकूणच जीवनव्यवहाराचा प्रत्येक भाग असलेली गोष्ट 'खरेदी-विक्री करून पैका करण्याची वस्तू' मानणे. मानवी शरीराला पशूपेक्षाही हीन पातळीवर उभे करून या सर्व गोष्टींचा बाजार 'आधुनिक समाज' या नावाखाली चालवणे या गोष्टी पाहून बोकील अस्वस्थ होतात.

कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय समाज अशी वर्णभेदी व्यवस्था हे खरे तर युरोपियन वसाहतवादाचे फळ. अगदी कालपरवा प्रसिद्ध झालेल्या नॅशनल जिओग्राफिकच्या लेखामध्येही हेच अधोरेखित केले आहे. 'झिम्बाब्वे काळा की गोरा' आणि 'जपानमधील दलित' या लेखांमध्ये हीन समजल्या जाणार्‍या समाजघटकांबद्दल बोकीलांनी लिहिले आहे. कोणताही घटक समाजव्यवस्थेमध्ये हीन कसा ठरत जातो हे उलगडून सांगतानाच ही हीन ठरवण्याची पद्धत स्थल-काल-संस्कृतीनिरपेक्ष - अगदी सर्वत्र - सारखीच कशी आहे हेदेखील बोकील अधोरेखित करतात. एकदा एखाद्या समूहाला हीन ठरवले की नंतर त्या समूहाच्या प्रगतीच्या वाटा बंद करण्याच्या पद्धतीही सर्वत्र कशा सारख्याच आहेत हे देखील बोकील विस्ताराने समजावून सांगतात.

प्रत्येक लेख त्या त्या विषयाचा बोकीलांनी केलेल्या अभ्यासाची खात्री तर पटवतोच पण वाचकालाही अस्वस्थ करून सोडतो. 'मानवी समाजातील प्रकृती आणि विकृतीच्या कल्पना बदलत असतात' अशी बोकीलांची मार्मिक निरीक्षणे दाद घेऊन जातात. पुस्तकातील लेखन केवळ प्रवासवर्णनात्मक किंवा मनोरंजनात्मक उद्देशाने केलेले नाही. ह्या प्रवासात बोकीलांना आलेले अनुभव सांगतानाच त्या अनुभवांमागची कारणे मानववंशशास्त्रीय शोधण्याचाही बोकीलांचा प्रयत्न असतो.

वसंत पळशीकर यांची पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना हा तर एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना या ऋणनिर्देश, अर्पणपत्रिकेची पुरवणी पत्रिका इतक्याच मर्यादेत जातात, किंवा त्याचा उपयोग प्रस्तावना लिहिणारे लेखक समीक्षकी भाषेत त्यांचे ज्ञान 'मी कित्ती हुश्शार' पद्धतीने स्वतःभोवती आरती ओवाळण्यासाठी वापरतात. या पुस्तकाची प्रस्तावना मात्र लेखांप्रमाणेच वारंवार वाचावी, समजून घ्यावी अशी आहे.

शेवटी प्रस्तावनेतील काही भाग:

"ज्या व्यवस्थेत माणसाचा आत्मसन्मान,, त्याची प्रतिष्ठा या गोष्टी राखल्या जातात, माणुसकी जपली व संवर्धित केली जाते, स्त्री पुरुष हा भेद विषमतेसाठी, शोषणासाठी केला जात नाही, जेथे व्यक्ती स्वतंत्र व समान आहे, जेथे पृथ्वीच्या पर्यावरणीय व्यवस्थेचा आदर केला जातो, पर्यावरणाची जपणूक व संवर्धन केले जाते, जेथे मानवी लोकसमूहांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली व संस्कृतींना सन्मानपूर्वक अवकाश राहिलेला असेल आणि जेथे माणसांमाणसांमधली नाती ही बंधुभावाची, आत्मीयतेची, एकमेका साह्य करण्याची असतील अशा एका नवसमाजाच्या निर्माणाचे ध्येय बोकील बाळगतात.हा त्यांचा पक्ष आहे. या अर्थाने आर्थिक विकास, प्रगती, आधुनिकता, समृद्धी यांची आज जी शिष्टमान्य प्रतिमाने वा धारणा आहेत त्यांना विकल्प शोधण्याच्या, निर्माण करण्याच्या, हे विकल्प रुजविण्याच्या पक्षातले ते आहेत. आर्थिक विकास, प्रगती, आधुनिकता, समृद्धी या सगळ्यांच्या परिणामी माणसांचे काय होते, जास्त सुसंस्कृत, प्रेमळ, नि:स्वार्थी, स्वस्थ, माणुसकीसंपन्न बनून एकमेकांशी ती नाती जोडतात की नाही हीच खरी मापनकसोटी आहे ही त्यांची धारणा असल्याचे लेखांमधून प्रकट होत राहते.

वाचकाचे मनोविश्व तसेच विचारविश्व समृद्ध व सखोल बनविणारे हे लेख ही वैचारिक साहित्यात एक मोलाची भर आहे."

Thursday, May 10

वाचलेच पाहिजे असे काही

मराठी वाचक नक्की कुठली पुस्तकं वाचतात हा एक प्रश्न पडला आहे.

काही दिवसांपूर्वी "मराठी पुस्तकांना सुगीचे दिवस" अशी बातमी पेपरात वाचली तेव्हा एक लहानसा आनंद झाला होता. म्हणजे मराठीसाठी तळमळ वगैरे सध्याची "इन थिंग" असलेल्या भावना असल्या तरी काही वर्षांपूर्वी वाचलेली आणि आता मराठी पुस्तकांचे मराठी दुकानदार तुसडेपणाने "औट ऑफ प्रिंट आहे" असं वाक्य आपल्या तोंडावर नेहमी फेकत असलेली जीए, गौरी देशपांडे, नेमाडे यांची पुस्तके कुत्र्याच्या कानासारखी पाने दुमडलेल्या अवस्थेत नाही तर नवीन कोरा प्रसन्न वास असलेल्या अवस्थेत परत वाचायला मिळतील. वाचून झाल्यावर मस्तपैकी कपाटात ठेवून देता येतील आणि आपल्याकडे इतकी भारी (किंमतीनं सुद्धा!) पुस्तकं आहेत याचा अभिमान वाटण्याची एक दुर्मिळ संधी मिळेल असं वाटलं होतं. (त्या दिवशी सिग्नलवर हिरवा दिवा होईपर्यंत मी चक्क वाट पाहिली!)

पण कसलं काय?

रविवारी दुसरी बातमी वाचली. मिलिंद बोकील यांच्या "कातकरी: विकास की विस्थापन?" या पुस्तकाच्या गेल्या वर्षभरात १००० प्रतीसुद्धा विकल्या गेल्या नाहीत. मराठी वाचकांची चॉईस पाहून धन्य वाटलं! खरं तर हे पुस्तक मराठीतील भयानक सुंदर पुस्तकांपैकी एक म्हणावं असं आहे. एकदम आउटस्टॅंडिंग!

मराठीत सामाजिक विषयांवरचे लेखन कमी आहे असे नाही. अगदी मराठी ब्लॉग लिहिणार्‍यांचा सॅंपल डेटा घेतला तरी एखाद्या मस्त कात-तंबाखू टाकून जमवलेल्या पानाप्रमाणे जमलेल्या लेखावर जर सामाजिक जाणीवेच्या चुन्याची दांडी धरली नाही तर मायबाप वगैरे वाचकांच्या प्रतिसादाच्या पिचकार्‍या कमी पडतात हे कोणाच्याही लक्षात येईल!

मिलिंद बोकील त्यांच्या स्वत:च्या लेखनाची भूमिका मांडताना म्हणतात:

...अलीकडच्या काळात काही पत्रकारांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिशय माहितीपूर्ण व वाचनीय लिखाण केलेले आहे. एरवी समाजासमोर न येणारे प्रश्न मांडून त्यांनी मोठीच सामाजिक कामगिरी बजावली आहे. मात्र एकदा तशी जाणीव-जागृती निर्माण झाली की मग त्याच्या पुढचा टप्पा आपण गाठायला हवा. केवळ प्रश्न वा समस्यांची मांडणी करुन पुरेसे नाही तर ते सामाजिक प्रश्न असल्याने त्यामागचे समाजशास्त्रही उलगडून दाखवणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रकियेमागचे शास्त्रीय रूप का तपासायचे, तर त्यातून 'समानतत्त्व' काढता यावे म्हणून, तसेच इतरांना त्याचा पडताळा पाहता यावा म्हणून. जर असा तत्त्वबोध जर जिवंत माणसांच्या अभ्यासातून झाला तर तो अधिक स्मरणीय होतो....

शिवाय हे लेखन मराठीत करण्याचेही मोठे सुंदर कारण त्यांनी दिले आहे.

...कारण आपल्या समाजासाठी लिहितो तेव्हा ते त्याच्याच भाषेतून लिहिणे आवश्यक असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मातृभाषेचे पांग फेडणे हे कोणत्याही लेखकाचे कर्तव्य असते; मग त्या भाषेला मान्यता असो वा नसो, त्या भाषेत त्याची कदर होवो ना होवो. सुदैवाने असा तत्त्वविचार मांडण्याची ताकद मराठी भाषेमध्ये आहे. किंबहुना गंभीर तत्त्वविचार हेच मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहे. व्यावसायिक आवश्यकतेपोटी ह्यातील बरेचसे लेखन मी इंग्रजीतही प्रसिद्ध केलेले आहे. मात्र त्या गोष्टीचे मल तेवढे अप्रूप वाटत नाही. हे ज्ञान फक्त मराठीतच आहे आणि म्हणून आपण मराठीकडेच गेले पाहिजे असे लोकांना जाणवले तरच मराठीचे महत्त्व वाढू शकेल....


"कातकरी: विकास की विस्थापन?" या पुस्तकात बोकीलांनी गेल्या काही वर्षात कोकणात आलेल्या औद्योगिकीकरणाच्या - आधुनिकीकरणाच्या लाटेचे होणारे सामाजिक आणि आर्थिक परिणाम. आणि या परिणामांचा कातकर्‍यांसारख्या दुर्लक्षित समाजावर पडणारा प्रभाव या विषयावर केलेल्या संशोधन प्रक्रियेबाबत समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून लेखन केले आहे.

पुण्या-मुंबईतच नव्हे तर राज्याच्या कोणत्याही शहरी-निमशहरी भागात राहणार्‍या माणसाला कातकरी हे आदिवासी लोक एवढेच ऐकून माहिती असते. मात्र हे कातकरी नक्की कोण आहेत? "आपला" आणि "त्यांचा" संबंध समाजशास्त्रीय दृष्टीने कितपत जवळचा आहे, कातकर्‍यांच्या गुलामगिरीची सुरुवात, कातकरी ते कोळसाकरी ते वीटमजूर असा त्यांचा प्रवास, जमिनीचा प्रश्न, कातकरी संस्कृती या सर्व मुद्द्यांना पुस्तकात अतिशय विस्ताराने स्पर्श केला आहे.

कातकर्‍यांसारख्या उपेक्षित समूहाला काही भवितव्य आहे का? त्यांच्या सभोवतालचे जग इतके वेगवान, स्पर्धेचे, स्वकेंद्रित होत असताना या आदिवासी समूहाला त्यात काही स्थान राहिले आहे का? कातकर्‍यांशी समांतर म्हणाव्यात अशा महादेव कोळी व ठाकर जमातींमध्ये शिक्षणाचा (तुलनेने) चांगला प्रसार झाला असताना गरीब-अल्पसंख्य अशा कातकरी समाजाला विकासाच्या समान संधी खरंच उपलब्ध होत आहेत का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित करतानाच औद्योगिकीकरणामुळे पारंपारिक उपजीविकेवर परिणाम होत असला तरी कातकर्‍यांच्या आजूबाजूच्या वातावरणात आधुनिकतेचे वारे खेळू लागल्यामुळे पारंपारिक अन्यायाचे प्रमाणही तुलनेने कमी होत आहे. वातावरणातील खुलेपणामुळे या वर्षानुवर्षे दबून राहिलेल्या समाजाला मोकळेपणाने श्वास घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आश्वासक वाटाव्यात अशा या गोष्टीही बोकील अधोरेखित करतात.

कातकरी समाजाच्या लाभलेल्या सहवासाचे ऋण व्यक्त करताना बोकील म्हणतात,

...आपण शहरी, मध्यमवर्गीय माणसे स्वत:ला प्रगत म्हणवतो आणि कातकर्‍यांसारखे समूह आपल्यापेक्षा मागास आहेत असे समजतो. भौतिक बाबतीत ते खरे असेलही, पण इतर अनेक बाबतीत शंकेला जागा आहे. एकेकाळी आपण सगळेच आदिवासी होतो. तथाकथित प्रगतीची कास धरुन शहरी, औद्योगिक व्यवस्थेत अग्रभागी आलो. ह्या प्रवासात आपण पुष्कळ काही कमावले, पण पुष्कळ काही गमावलेसुद्धा.

आपण काय गमावले याचे भान कातकर्‍यांसारख्या समूहाशी संबंध येतो तेव्हा येते. शहरी, मध्यमवर्गीय जीवन पुढारले तेव्हा त्यात क्षुद्रपणाची, संकुचितपणाची आणि असंस्कृतपणाची वाढ झाली. स्पर्धा, स्वार्थ, हेवेदावे वाढले. लहानसहान गोष्टींतूनही आपला क्षुद्रपणा समोर येत राहतो. आपण रांगेत घुसाघुशी करतो. दुसर्‍याशी उर्मटपणे वागतो. सदैव आपलंच खरं मानतो आणि स्वार्थ साधायची एकही संधी सोडत नाही. आपल्या सगळ्या जीवनात उच्च - नीचता, धूर्तपणा, असभ्यपणा काठोकाठ भरुन राहिला आहे. अशा प्रकारची उर्मट, हिणकस, असभ्य वृत्ती मला कातकरी समाजात कधीही दिसली नाही. कातकरी समाज अज्ञानी, अशिक्षित असला तरी शहरी, मध्यमवर्गीय जीवनात जी दांभिकता, कर्कशता, चढाओढ आहे तिचा त्यांच्यामध्ये मागमूसही नाही. हे सगळे लोक एका अबोल सोशिकतेने, अलिप्तपणाने, शांतपणाने जीवन जगतात. वैयक्तिक लोभ, मत्सर कुणालाही सुटलेले नाहीत. स्वार्थ प्रत्येक माणसामध्ये असतो. पण कातकर्‍यांच्या वागण्या-बोलण्यात एक अबोल सभ्यता आहे. दुसर्‍याला लुबाडून आपली तुंबडी भरावी, धूर्तपणाने दुसर्‍याचा काटा काढावा, मिळेल तेवढे फुकटात लाटावे ह्या प्रवृत्ती त्यांच्यामध्ये दिसत नाहीत. त्यांच्या वाड्यावर हिंडताना हे सतत जाणवत राहायचे. या जाणिवेतून जो विश्राम मनाला यायचा, तो फार आल्हाददायक असायचा...

कातकर्‍यांची ही अबोल सभ्यता समजून घेता आली तर निश्चितच आपले जीवन अधिक चांगले होईल असा विश्वास व्यक्त करणारे हे पुस्तक गेल्या वर्षामध्ये इतर मराठी वाचकांना फारसं आवडलं नसलं तरी मला मात्र खूप आवडलं.



अवांतर: मिलिंद बोकील यांच्याबद्दल माझे आवडते ब्लॉगर सन्जोप सरांनी लिहिलेला लेखही जरुर वाचा