Showing posts with label एबीसी. Show all posts
Showing posts with label एबीसी. Show all posts

Wednesday, April 2

दिल्ले दान... घेतले दान...

आमचा लाडका वगैरे सुपरष्टार शेतकरी असल्याचे जाहीर झाले आणि 'सत्यमेव जयते' नुसार अखेर सत्याचा विजय झाला. (कोण रे तो भिखू म्हात्रेचा सत्या म्हणतोय? सुपरष्टारच्या कलागुणांची कदर नाही त्याला! ठेचा साल्याला!)

डोक्याला मुंडासे बांधून सुपरष्टार बैल हाकणार. जयावैनी डोईवर भाकरी न भाजी घेऊन मळ्यावर येणार, नाजूक लाडकी ऐशू उन्हातान्हात पिकाचं राखण करणार, गोफण घेऊन अभिषेक दगडं मारणार आणि पाखरांना बुजवण्यासाठी अमरसिंगजी बुजगावणं म्हणून शेतात उभं राहणार या विचारांनी कंठ अवरुद्ध झाला आणि श्वास घेता येईनासे झाले. टाय सैल केला तेव्हा कुठे बरे वाटले!

चित्रपट पाहणार्‍या अवघ्या देशाचा 'आयकॉन' असलेले अमितशेठ आता शेतकर्‍यांचेही आयकॉन होणार आणि अमिताभचं खत, अमिताभचं बेणं बियाणं, अमिताभची कीटकनाशकं यांचा खप सर्वत्र वाढणार याची खात्रीही झाली. गेला बाजार आत्महत्या करण्यासाठी तरी शेतकरी 'रीड अँड टेलर' चे सूत वापरलेले दोरखंड वापरतील आणि त्यांच्या जीवनाचा नाही तर निदान मृत्यूचा दर्जा तरी उंचावेल या विचाराने समाधान पावलो.

एखाद्या सकाळची वेळ - किंवा मंगलप्रभात म्हणूया - होती. कोंबड्याने तिसरी बांग दिली आणि वेळेबरहुकूम भारनियमन सुरू व्हावे त्याप्रमाणे आकाशातल्या चांदण्या विझल्या आणि काजळी साचलेल्या कंदिलातील प्रकाशाप्रमाणे लालसर पिवळा प्रकाश पूर्वेकडे दिसू लागला. परसाकडे गेलेले अमितशेठ अजूनही घरी न आल्याने जयावैनींना काळजी वाटू लागली होती. वयोमानानुसार अमितजींना वेळेवर 'होत' नसे. थोडा जास्तच वेळ लागत असे. आणि 'इसबगोल' घ्या म्हटलं तर डाबरच्या उत्पादनांची जाहिरात करतो आणि इसबगोल घेतलं तर व्यावसायिक नीतीमत्तेचं काय होईल असं काहीसं अमितशेठ बोलून गेले होते. आयुष्यभर पर्वा न केलेल्या नैतिकतेचं गळू अमितशेठना आताच कसं झालं या काळजीनं जयावैनींना पोखरलं होतं. नाहीतरी उतारवयात विस्मरण होतंच म्हणा. फिल्मी आयुष्य आणि खरे आयुष्य यात गल्लत होतेच. चित्रपटातील संवाद चुकून बोलून गेले असतील या भावनेनं त्यांना काडीचा आधार दिला. मात्र हे शेतकर्‍याचं जीवन जगताना त्या पुरत्या वैतागल्या होत्या.

अंबाड्याच्या भाजीला ऐशूने टाकलेल्या लसणीच्या फोडणीचा चर्र असा आवाज झाला आणि जयावैनी तंद्रीतून जाग्या झाल्या. कोनाड्याजवळ अभिषेक उभा होता. सकाळपासून तीन वेळा दाढी करण्याच्या प्रयत्नात कापून घेतल्यामुळे त्याने 'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्त असू द्यावे समाधानी' या उक्तीनुसार दाढी करण्याचा नाद आता सोडून दिला होता. त्याऐवजी दाढी खाजवण्याचे काम सुरु झाले होते. मात्र आपण उजव्या हाताने दाढी खाजवत आहोत आणि बाप तर डावखरा आहे हे त्याच्या अचानक ध्यानात आले आणि कोणाचे लक्ष नाही असे वाटून त्याने झटकन हात बदलला. तरी ऐशूने हे पाहिलेच आणि नाराजीने नाक मुरडले. बिच्चारा अभिषेक खजील झाला!

सुपरष्टार 'काम' आटोपून घराकडे येताना दिसत होते. मागोमाग हातात लोटा घेऊन अमरसिंगजीही होते. अंगणात आल्यावर अमरसिंगजींनी बंबाची राख घेऊन (स्वतःचे) हात खसाखसा धुतले आणि सुपरष्टारच्या पायावर पाणी ओतले. सुपरष्टार आत आल्याआल्या जयावैनी सुरू झाल्या.

'काय हे मानूस म्हनायचं का सोंग? पुरता वैताग आला मला आता.'
'अगं.'
'चला बगू परत 'जलसा' ला इथं मला जमत नाही. चुलीच्या धुरानं डोळ्याचा धबधबा झाला पार!'
'अगं पन.'
'ते काही नाही. चला म्हंते ना!'
'तू जरासंक ऐक तरी!'
'काय जगनं म्हनायचं का काय हे. सकाळी उठल्यावर शेनाने सारवून घ्या. बंब पेटवा. दुपारच्याला टकुर्‍यावर टोपली घेऊन उन्हातान्हात शेतात जा.'
'अगं जरा समजून घे.'
'शेती करन्यासाठी आपल्याकडं साधनं तरी हायेत का? बैल पन एकच आहे.'
ऐशूने चमकून अभिषेककडे पाहिलं. नेहमीप्रमाणे त्याच्या बथ्थड डोक्याला काही समजलंच नाही.
’आता, बैल मागवलेत की तिकडून. आनी बैलांस्नी म्हराटी यायला पायजेल असं कोनी म्हनू बी शकत न्हाई ना.’
’अहो पर मानसान्ला कुठेबी राहायची परवानगी अस्ते. पन बैलान्ला असते असं बैलांच्या बद्दल राज्यघटनेत लिव्हलेलं हाये का?’
'हे बघा कारभारनी. तुमच्या डोक्यात अक्कल कमी असं आम्ही म्हनून गेलोय ते काही खोटं नाही.'
'ऑ? आता काय झालं. चांगला मुंबईतला बंगला सोडून हितं घानीत राहायचं दळभद्री लक्षन तुम्हास्नी सुचलं तर तुम्ही शहाने आनी आम्हाला अक्कल न्हाई व्हय.'
'अहो, आता कसं सांगू.'
'काय ते'
'थोडं गप्प बसाल तर आम्ही बोलनार ना.'
'बोला की. म्या काय त्वांड धरलंय काय तुमचं!'
'अगं, सरकारनं शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्याली हाये. आता आपन बी शेतकरी न्हाई का? मग? अभिषेकच्या लग्नाचा सम्दा खर्च आता हिकडून वसूल करता येईल बग. अमरसिंगजी काहीतरी इल्लम काढतीलच. काय अमरसिंगजी?'
'व्हय तर.'
'हांग्गाश्शी. मातुर येच्यासाठी आपल्याला थोडी कळ काढायला लागंल. घुसलं का आता टकुर्‍यात!'
’आता गं बया! व्हय व्हय. आता कुठं समजलं’

बापाच्या अचाट बुद्धीची ही युक्ती ऐकून अभिषेक अवाक झाला आणि आश्चर्याने तोंडात घातलेले बोट उजव्याच हाताचे आहे याचे त्याला भानही राहिले नाही!

व्यंगचित्र सौजन्य desicartoonist.blogspot.com

Monday, February 4

शाळा

आमच्या सुपरष्टारला कोणीही (स्टुलावर उभे राहून) टपली मारावी आणि त्याचे केस विस्कटवून टाकावे याला काय म्हणावे?

राजसाहेबांनी केलेल्या वक्तव्याने आमचे मन इतके दुखावले तर सुपरष्टार साहेबांचे किती दुखावले असेल याची कल्पनाच करवत नाही. आम्ही तडक 'बंगल्या' वर पोचलो. जयावैनी फोनवरून डायलॉग लिहून घेत होत्या. मात्र आम्हाला पाहून गडबडीने फोन खाली ठेवून "या या" म्हणाल्या.

आम्ही अचंबित!

"बसा, बसा. थोडा चहा टाकते.", जयावैनी.

"चहा तर टाकाच. थोडं आलंही टाका. ठेचून! काय थंडी आहे. हू हू हू हू.". फुकट मिळते तर सोडायचे कशाला अशी आमची (सुपरष्टारप्रमाणेच) पॉलिसी आहे.

"आलं? कोण आलं?" जयावैनी घाबरल्या. त्यांना वाटलं 'कार्यकर्ते' आले की काय!

"अहो. कोणी आलं नाही. आलं म्हणजे जिंजर! अहो, अद्रक अद्रक! बंदर क्या जाने अद्रक का स्वाद असं तुम्ही म्हणता ना! आम्हाला आवडतो बाबा त्याचा स्वाद! विशेषत: अशा थंडीत चहा काय मस्त लागतो."

"छ्या. ही काय थंडी आहे! थंडीची खरी मजा तर आमच्या उत्तर प्रदेशात." आजूबाजूला 'कार्यकर्ते' नाहीत हे पाहून जयावैनींनी मनातली गोष्ट सांगितली.

"हे बाकी खरं बोललात! 'पुनर्जन्म हो मेरा तो हो गंगा के तटपर!' असं कुणीसं म्हटलंच आहे. असो. चहाला उकळी आली असेल. उतू जाईल. बाकी 'शिक्षणमहर्षी अमितजी' कुठे दिसत नाहीत?", आम्ही.

"बाराबंकीला गेलेत. विटांची डिलीव्हरी यायची होती. लवकरात लवकर काम पुरं करावं म्हणते. गुढीपाडव्याला झालं तर सोन्याहून पिवळं. तेवढंच विरोधकांचं तोंड बंद राहील.", जयावैनी.

"त्याचीच युक्ती सांगायला आलो होतो ना! म्हटलं विटांचा एखादा ट्रक महाराष्ट्रातून न्या. नंतर उगीच बोंबाबोंब नको.", आम्ही.

जयावैनी चहा आणायला आत गेल्या. आम्ही फोनजवळ जाऊन कोणत्या चित्रपटाचे डायलॉग आहेत ते पाहू लागलो. वडील, भाऊ असे काहीतरी लिहिले होते. बहुधा चित्रपट कौटुंबिक असावा.

चहा घेऊन घरी आलो आणि संध्याकाळी टीव्हीवरच्या बातम्या पाहू लागलो तर काय चमत्कार!

आम्ही फोनजवळ वाचलेले डायलॉग जयावैनी पत्रकारांसमोर मारत होत्या!!

ही नवीनच शाळा म्हणायची.

आम्हाला इतुके दिवस फक्त 'मातोश्री' माहिती होत्या. शाळेत न जाता तातश्री आणि दादोश्री हे देखील शिकलो.

असो.

Wednesday, June 6

अमितजींना प्रशिक्षक करा!

बीसीसीआय क्रिकेट संघाचा नवीन प्रशिक्षक शोधण्यासाठीची मोहीम पाहिली की "काखेत कळसा अन् गावाला वळसा" ह्या म्हणीची हटकून आठवण होते. डेव्ह व्हॉटमोर, अर्जुन रणतुंगा, डंकन फ्लेचर ह्यांपैकी एकाला "मेन इन ब्लू" चे प्रशिक्षक म्हणून निवडण्याची आयडिया ही बीसीसीआयची वैचारिक दिवाळखोरीच दाखवत नाही का?


अमिताभ बच्चनसारखे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व अद्यापि असताना इतर कोणाचा या महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या पदासाठी विचारच कसा काय होऊ शकतो?






अमितजींना संघाचे प्रशिक्षक करण्याचे अनेक फायदे आहेत.



१. अमितजींइतका खेळाचा (किंवा कोणत्याच गोष्टीचा) मोठा ब्रॅंड ऍम्बॅसेडर दुसरा होणे नाही! अमितजींना एकदा प्रशिक्षक केले की अगदी अमेरिकेपासून जपानपर्यंत क्रिकेटचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल.


२. अमितजींना जाहिरातींमध्ये काम करण्याचा पुष्कळ अनुभव आहे. विशेषत: आपले प्रमुख खेळाडू ज्या रंगीत पेयाची वारंवार जाहिरात करताना दिसतात त्या पेयाच्या जाहिरातीतले एक बुजुर्ग व्यक्तिमत्व म्हणजे अमितजी. त्यामुळे संघातील ज्येष्ठ खेळाडूंशी त्यांचे संबंध आधीच सलोख्याचे व प्रेमाचे असतील. इगो प्रॉब्लेम होण्याचा फारसा धोका नाही.


३. नाहीतरी आपले खेळाडू व प्रशिक्षक हे नीट खेळण्यापेक्षा खेळल्याचा (व हरल्यानंतर दु:खी दिसण्याचा) अभिनय करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. इथे अभिनयाच्या बाबतीत अमितजींना चॅलेंजच नाही हे तर शाहरुख खान पण मान्य करील.

४. क्रिकेट = मनोरंजन; अमितजी = मनोरंजन.

५. अमितजी संपूर्णपणे देशी आहेत. (Exhibit: पुनर्जन्म हो मेरा गंगा के तटपर) त्यामुळे परदेशी प्रशिक्षकांची ऍलर्जी असणार्‍या गावस्कर वगैरे मंडळींना याबाबतीत काहीही अडचण नसेल.

६. आता राहता राहिली मामुली गोष्ट ती खेळाच्या अनुभवाची. अमितजींना खेळाचा अनुभव असावा कारण डाबर च्यवनप्राशच्या जाहिरातीत "दद्दूचे" काम करताना ते फूटबॉल अशा आवेशाने खेळतात की ज्याचं नाव ते. आणि अनुभव नसला तरी बाराबंकी व मावळमध्ये जमीन खरेदी करताना ज्याप्रकारे त्यांनी शेतकरी असल्याचे सिद्ध केले तसेच खेळाचा अनुभव असल्याचेही सिद्ध करणे अमितजींना सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये अवघड असले तरी अशक्य नक्कीच नाही.


तेव्हा शरदचंद्ररावजी पवारसाहेब, आपल्या महाराष्ट्रातल्या या माणसाला येकदा चान्स देऊन बघा तर खरं. आपल्या संघाचा आळशी ब्लू रंग कसा पालटवतात ते.

Wednesday, May 16

एक रात्र तंतरलेली

प्रसंग पहिला:

"ए... इकडं ये ना."

"हूं... कॅय काम आहे"

"रोज ग्लासात मस्त दूध आणतेस मग आज कोकम सरबत? गुस्सा आहेस का?"

"अमरसिंगजींनी आज दूध तापवलंच नाही. नासून गेलंय सगळं. छी!"

"Ok... पण तुला एवढं चिडायला काय झालं?"

"चिडू नको तर काय करु ऑं? कित्तीदा सांगितलं... तुम्ही आता एक आपलं ते बीयसपी जॉईन करा बघू."

"अगं पण, डॅडी अमरसिंगजींचे मित्र आहेत ना, त्यांना सोडून कसं चालेल?"

"किती दिवस मामंजींची कॉपी करणार म्हणते मी. जरा स्वतःचं करा की.. वेगळं. आधीच बीयसपी जॉईन केली असती तर आज एवढ्या शिव्या नसत्या खायला लागल्या मला. आता ती करीना पण मला अवगुणी वगैरे म्हणते. येन इल्ला. ते काही नाही म्हणते मी. तुम्ही आता मामंजींची कॉपी करणं सोडा."

"म्हणजे नक्की काय करु?"

"पहिलं दाढी करा. सल्लू बघा मस्त तुळतुळीत दाढी करुन यायचा. अंगावर पण केस ठेवत नव्हता. नाहीतर तुम्ही... लग्नात पण दाढी तशीच. माणूस आहे का अस्वल."

"चिडू नकोस... एक गाणं म्हणतो तुझ्यासाठी"

सुहाग रात है... घूंघट उठा रहा हू मै.

"शी.. इथं पण मामंजींची नक्कल. जरा तरी सुधरा म्हणते मी."




प्रसंग दुसरा:

"नमस्कार पंडितजी, मै अमिताभ बच्चन बोल रहा हू।"

"कौन बनेगा करोडपती से का?"

"नाही नाही, घरूनच बोलतोय. तुम्हाला मुहूर्त विचारल्याशिवाय मी चहातली साखर सुद्धा ढवळत नाही, परस्पर तिकडे कसा जाईन.. ऑय?"

"तेच म्हटलं!"

"मी तुमच्यावर भरोसा ठेवला पण हे काय भलतंच व्हायला लागलंय? एक तर अमरसिंगजींचं सरकार गेलं. नंतर मायावतींनी बाराबंकीची फाईल उघडण्याचे आदेश दिलेत. आणि आता पवना डॅम जवळच्या जमिनीचा पण वाद उभा राहणार असं दिसतंय. डॅम इट! आपलं ऑय!"

"असे गुस्सा होऊ नका अमितजी. थोडा धीर धरला तर सगळं ठीक होईल. सध्या तुम्हाला होणार्‍या त्रासाचे मुख्य कारण म्हणजे मंगळाचा कुंभ राशीत होणारा प्रवेश. ज्या लोकांच्या पत्रिकेत कुंभलग्न आहे आणि ज्यांच्या लग्नात मंगळ येत आहे. त्यांना येणारे थोडे दिवस त्रासाचे असणारच आहेत."

"बापरे मग याला उपाय कॉय?"

"सध्या तरी उपाय समजत नाही. तुम्ही स्वत: केबीसी खेळत आहात आणि सगळ्या लाईफलाईन्स आधीच वापरुन झाल्या आहेत असं समजा. काय?"

"ठीक आहे. वृक्ष हो भले खडे, हो घने हो बडे, एक पत्र छांह की, मांग मत मांग मत मांग मत"

"अग्नीपथ अग्नीपथ अग्नीपथ!"

Sunday, April 1

लगीन ठरलंया!

लग्नाची तारीख ठरल्याची बातमी पाहून अगदी राहवेना.

ढाकुम टुकुम असं नाचत, गुणगुणत आम्ही थेट 'जलसा' वर पोचलो.

गेट उघडून आत बागेत गेलो. तर करोडपती साहेब आरशात बघून दाढीतले काळे केस उपटून बाहेर टाकत होते. (डोक्यावरचे काळे, मात्र दाढीतले सगळे केस पांढरे ठेवण्याचा काय हा खटाटोप!)

ह्या केसांना गोळा करुन जर लिलाव केला तर आपणही करोडपती होऊ या आशेने आम्ही एकदोन केस उचलण्याचा प्रयत्न केला तर बच्चन साहेबांनी डोक्यावर टपली मारोन आम्हास हटकले.

"नमस्ते बच्चनजी", आम्ही.

"तुम अंदर कैसे आये, ऑय? ", बच्चनजी.

"चलके" आम्ही एक विनोदाचा प्रयत्न केला!

"गुरखा, अगली बारसे दरवाजेको लॉक किया जाय! बोला, काय काम होतं?"

"नाही असंच आलो होतो... लग्नाची तारीख कळली. म्हटलं अभिनंदन करावं."

"तारीख नही तिथी कहो. ऑय... आणि झालं ना अभिनंदन... आता फुटा."

"सॉरी सॉरी... तिथी.... एनडीटीव्हीवर कळली." आम्ही योग्य त्या शब्दावर जोर दिला.

"एनडीटीव्ही?"

"नाही म्हणजे आम्ही आता ष्टार प्लस बघत नाही... एनडीटीव्ही बघतो. ताईंचा कार्यक्रम तिथं असतो ना. ष्टार वर आमच्या आवडीचा ष्टार नसल्यामुळं काही मजा नाही आता." आम्ही थोडा गूळ काढला.

"चाय पिओगे?" बच्चनजी थोडे खुलले.

"ठीक आहे. जैसी आपकी मर्जी. काही दुसरा ऑप्शन नाही का?", खरं म्हणजे आम्हाला कुठं नेण्याची लायकी नाही.

"ऑप्शन देनेके लिए हे काय कौन बनेगा करोडपती आहे का, ऑय?"

"चालेल चालेल... चाय पण चालेल."

"कुर्सी पर बैठो."

आम्ही खुर्चीकडे पाहिलं. या खुर्चीवर चढून बसण्यासाठी दुसरा एक स्टूल आवश्यक होता. बरोबर आहे. घरातली दोन माणसं नारळाच्या झाडाइतकी उंच असल्यावर खुर्च्या इतक्या उंच लागणारच. (जयावैनी खुर्चीवर कसं बसतात?)

थोडा प्रयत्न करुन खुर्चीवर बसलो.

इतक्यात आमचे तोंड गोड करण्यासाठी लाडू आले.

"ये लो. मिठाई खाओ." बच्चनजींनी बॉक्स पुढे केला.

"थॅंक्यू. आमच्या पिशवीत ठेवून द्या ना." आम्ही पिशवी पुढे केली.

"अरे सब नही... एक ले लो." बच्चनजी.

मग (स्वत:च्या) पार्श्वभागी हात पुसोन एक लाडू उचलला.

चहा येईपर्यंत काही तरी बोलणे भाग होते. आजूबाजूला कुठे अमरसिंग(जी) दिसत नाहीयेत ना हे पाहून घेतले. मागच्या वेळी असाच चहाटळपणा केला तर बच्चनजींनी अमरसिंगजींना बोलावले होते. त्यांचा चेहरा पाहून दोन दिवस झोप आली नाही! (याबाबतीत कधी नाही तो शाहरुखला आमचा पाठिंबा. )

"लग्न कुठे करणार ते अजून कळलं नाही! म्हणजे जलसावरच की गंगा के तट पे?"

"ते अजून ठरलं नाहीये. सगळ्याच बातम्या आत्ता दिल्या तर नंतर काय सांगणार? परत रिपोर्टर लोक आत्तापासूनच लग्नाच्या ठिकाणी फिल्डींग लावून बसतील."

"बरोबर आहे.. खरं म्हणजे त्यासाठीच आलो होतो."

एवढ्यात चहा आला.

"ताजमहाल चहा वाटतं... फुर्र" आमची धाव कुंपणापर्यंतच!

"ओरिजिनल दार्जिलिंग टी है. हम छोटामोटा चाय नही पिते. अमरसिंगजीने लाया है दार्जिलिंगसे."

नाव ऐकून परत आमचा ठोका चुकला.

"खरं म्हणजे आम्ही वेगळ्या कारणासाठी आलो होतो."

"हमें यकीन था. काही तरी कामधंद्याची गोष्ट करण्यासाठी आला असाल."

"नाही म्हणजे... गुस्ताखी माफ बच्चनजी पण... "

"अरे बोलो बोलो... "

"आता आपल्या मेन इन ब्लू नी तोंड काळं करुन आणल्यामुळं सेट मॅक्स ची वाट लागली आहे नाही का?"

"तो फिर?"

"मंदिरादीदीचा फोन आला होता! आता खरं म्हणजे काही लोक चॅनेल बघतात ते तिच्यामुळेच."

"मग?"

"तर तिचं म्हणणं होतं की लग्नाच्या (आणि लग्नानंतरच्या) कार्यक्रमाच्या प्रसारणाचे हक्क सेट मॅक्सला मिळावेत. म्हणजे त्यांचा इथं झालेला लॉस भरुन निघेल आणि तुमचाही लग्नाचा खर्च...."

"अमरसिंगजी... जरा बाहर आयेंगे.."

हे ऐकून मात्र आम्ही धूम ठोकली. मंदिरादीदीला सॉरी कसं सांगावं हा एक प्रश्न आहे.

Wednesday, February 14

वॉव

आम्ही सुरु केलेल्या एबीसी चॅनेलचे भवितव्य उज्ज्वल आहे.

समाजवादी पक्षाने नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाचे नाव सुचवले आहे ते पहा. :)


सही रे...

Monday, February 12

एबीसी

अलीकडे अनेक दूरचित्रवाहिन्या अमिताभ कुटुंबियांच्या बातम्या पूर्ण वेळ न दाखवता कावेरी प्रश्न, खड्ड्यात पडलेला अमित, वाढणारी महागाई यांच्या बातम्याही अधूनमधून दाखवत असल्यामुळे आम्हाला अतीव दु:ख होत आहे.

श्री. बच्चन यांचे नवीन काय चालले आहे फक्त हेच जाणून घेण्यासाठी आमच्याप्रमाणेच इतरही अनेक लोक उत्सुक आहेत हे जाणून व्हॅलेन्टाईन दिवसाच्या शुभमुहूर्तावर आम्ही सादर करत आहोत एबीसी.
म्हणजेच अमिताभ/अभिषेक/ऐश्वर्या बच्चन चॅनेल. *

चॅनेलवर सादर होणारे ठळक कार्यक्रम खालीलप्रमाणे.

१. पूजाअर्चा: सिद्धिविनायक/विंध्यवासिनी देवी/सत्यसाईबाबा यांची अमिताभच्या हस्ते आरती.
(आरती दोन तास चालेल, यात सिद्धिविनायकासमोरील उंदराशी कानगोष्टींचा समावेश केलेला आहे. पुढील काळात त्या त्या वेळी सुचविण्यात येणारे देव/देवता यांचा अमरसिंगजींच्या परवानगीने वरच्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल.)

२. भविष्य: केवळ अमरसिंग, मुलायमसिंग व बच्चन कुटुंबियांच्या राशींचेच भविष्य सांगितले जाईल. सोबत मंगळदोष निवारणासाठीचे उपाय तज्ज्ञ ज्योतिषांच्या मदतीने सुचविले जातील.

३. राजकारण: सकाळी ११ वाजता, उत्तरप्रदेश एक नयी लगन या गाण्यावर आधारित चर्चा. सहभागी विचारवंत श्री. अमरसिंग, श्री अमिताभ बच्चन, श्री मुलायमसिंग व सौ. जया बच्चन. चर्चेचे सूत्रसंचालन ऐश्वर्या बच्चन करतील.

४. द कार शो: बच्चन कुटुंबियांकडे नव्यानेच आलेल्या व येणार्‍या गाडयांची शास्त्रीय माहिती. यात बेन्टले, रोल्स रॉईस वगैरे गाड्यांवर विशेष सदर पाहता येईल.

५. मंगळाची चंगळ: हा फोन-इन कार्यक्रम आहे. ऐश्वर्या-अभिषेक दांम्पत्याला खरंच मंगळ आहे का यावर वादविवाद. तुम्ही आपले मत फोन वर सांगू शकता.

६. मूवी ऑफ द मंथ: अर्थात या महिन्याचा महासिनेमा:- मंगल पांडे (हा चित्रपट पाहिल्यानंतर मंगळदोष निवारण होईल.)

७. पर्यावरण विशेष: ऐश्वर्याने लग्नापूर्वी पिंपळाच्या झाडाशी पाट लावावा की केळ्याच्या? ह्या मौलिक प्रश्नावर अनेक पर्यावरण व शेतीतज्ज्ञ आपले मतप्रदर्शन करतील. तुम्हीही आपले मत एसएमएस द्वारे पाठवू शकता.

८. जाहिराती: खालील वस्तूंच्याच जाहिराती केल्या जातील.
१. डाबर च्यवनप्राश, अनारदाना इ.
२. पेप्सी
३. आयसीआयसीआय बॅंक
४. इंडिया पॉइज्ड
५. कॅडबरी डेअरीमिल्क (पप्पू पास हो गया वगैरे)
६. मोटोरोला
७. अमेरिकन एक्सप्रेस कार्ड
इ.

चॅनेलच्या यशस्वितेबद्दल आम्हाला शंका नाही. लवकरच ही वाहिनी उत्तरप्रदेशाची अधिकृत वाहिनी म्हणून मान्यताही मिळवेल असाही आमचा विश्वास आहे.

तुम्हीही आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा.

*
१. चॅनेलच्या Forward Compatibility साठी अभिषेक ने आपल्या मुलाचे नाव अ वरुनच ठेवावे.
२. ही वाहिनी अमरसिंग-मुलायमसिंग यांच्या कृपेने सध्या उत्तरप्रदेशात करमुक्त आहे.

Thursday, January 25

आम्हीही आता भक्त

(चित्र पुढारी डॉट कॉम वरून घेतले आहे.)

अमिताभने सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर थोड्याच दिवसात अभिषेकचे लग्न ठरणे (आणि सगळ्या दूरदर्शनवाल्यांनी सारखी ती बातमी दाखवत राहणे) हे पाहून आमच्या आयुष्यातील एका मोठ्याच प्रश्नाचे बरेच दिवस शोधत असलेले उत्तर मिळाल्याचे आम्हाला वाटत आहे. सिद्धपुरुष आणि अधिकारी लोक (सब टीव्ही वाले अधिकारी नव्हेत) यालाच साक्षात्कार असे म्हणतात.


मुली पटविण्याचे आमचे (आणि काही वर्षांपूर्वी करिश्मा कपूरला पटविण्याचे अभिषेक बच्चनचे) असंख्य प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर अमिताभने एका आदर्श(!) पित्याप्रमाणे रीतसर लग्नाची पत्रिका जुळवणे आणि सिद्धीविनायकाचे पायी चालत जाऊन दर्शन घेणे आणि त्याचेच फळ म्हणून की काय थोड्याच दिवसात ऐश्वर्याने अभिषेकला लग्नासाठी चक्क होकार देणे यात काहीतरी संबंध नक्कीच असावा असे आमच्या मनाला राहून राहून वाटत आहे.

खरेतर देवाच्या अस्तित्वाबाबत इतके दिवस आम्ही थोडेसे संशयीच होतो. (मनाने अजूनही पुणेकर असलेली काही मंडळी रमेश देव, कपिल देव वगैरे भूतलावर असलेल्या देव-लोकांची उदाहरणे तात्काळ स्वत:च्या ब्लॉगवर फेकून आम्हाला निरुत्तर करू पाहतील. मात्र येथे आम्ही आकाशातल्या देवांबद्दल बोलत आहोत हे विनम्रपणाने त्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो.) मात्र इतके दिवस आमचा हाच पाखंडीपणा आम्हाला आयुष्यातील सर्वात मोठ्या यशापासून वंचित करत होता हे आम्हास आता कळून चुकले आहे. अमिताभने आपल्या कृतीने एक मोठेच उदाहरण आमच्या समोर ठेवले आहे.

अर्थात आम्ही मुंबईत राहत नसल्यामुळे मुंबईनिवासी सिद्धीविनायकाचे दर्शन घेणे आम्हाला तूर्तास शक्य नाही. त्यामुळे चिंचवडनिवासी मोरया गोसावी मंदिराच्या फेर्‍या गेले काही दिवस आम्ही करत आहोत. मात्र कालच मंदिराच्या कमानीसमोरील भेळवाल्याकडे भेळ खात असताना त्याने त्याच्या व्यवसायबंधूला "आजकाल मंदिरात कसलेही लोक येतात" असा त्याच्या भेळेप्रमाणेच कुजकट शेरा मारल्यामुळे, आम्ही आता त्याच्यासमोरच असलेल्या रसवाल्याकडे उसाचा रस पिणार आहोत. शिवाय रसवाल्याने "देशबंधूंनो देशाचा विचार करा, चहापेक्षा रस बरा!" वगैरे फलक लावल्यामुळे इतके दिवस न झालेली देशाचीही थोडीशी सेवा (आणि थोडासा विचार) आता आमच्याकडून होईल असे वाटते.

अमिताभ गुरुवायूर येथील मंदिराला एक सोन्याचा हत्तीदेखील भेट देणार आहे हे वाचून आता काय करावे हे नक्की न समजल्यामुळे मात्र आम्ही थोडे हबकलो होतो. मात्र येथे एक तांत्रिक पळवाट आम्हाला सुचली आहे. आमचा प्रिय मित्र सोन्या यास मोरया मंदिरासमोरीलच एका खेळण्याच्या दुकानातून एक प्लॅस्टिकचा हत्ती आम्ही विकत घेण्यास सांगितले आहे. हा 'सोन्याचा हत्ती' आम्हीही कुठेतरी लवकरच अर्पण करू व अमिताभच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करू.

हे सर्व करण्याची आकाशातला देव आम्हाला शक्ती देवो हीच त्याच्याचरणी प्रार्थना.

आमेन!