Saturday, November 29

नाही चिरा नाही पणती

अतिप्रिय च्यानेलांनो,

मुंबईमध्ये झालेल्या घृणास्पद दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय सैनिक, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यापेक्षाही जास्त शौर्य कोणी दाखवले असेल तर ते तुमच्या वेगवेगळ्या व्यवसायनिष्ठ वाहिन्यांनी. क्रिकेट कॉमेंट्रीप्रमाणे किती विकेटी पडल्या याचे थेट प्रक्षेपण आणि रनिंग कमेंट्री , प्रत्येक मिनिटाला काय घडत आहे हे दाखवण्याची तळमळ, या दहशतवादी हल्ल्यांच्या 'विश्लेषणा'मुळे आणि एकंदर कव्हरेजमुळे हा हल्ला जितका होता त्यापेक्षा खूप मोठा करून दाखवण्याची कामगिरी, आणि या सर्व प्रकारामुळे एकंदर भारतीयांची हतबल आणि हतधैर्य अशी अवस्था करण्याचे मोठे श्रेय या तुमचेच नाही का... आणि तुम्ही हे सर्व कोणासाठी केले? टीव्हीसमोर बसून फक्त आपले बूड उबवणाऱ्या आमच्यासारख्या प्रेक्षकांसाठीच ना? ही माहिती न मिळते तर आम्हाला घास गोड लागला असता का? आणि हे सर्व दाखवले नाही तर आम्ही काय बघणार? (सास भी कभी बहू थी सुद्धा बंद झालं आहे... आता जमाना रिऍलिटी टीव्हीचा आहे भाऊ). "अगं ए जरा आमटी वाढ थोडी" असं म्हणताना तुमच्या बातम्यांची चटणी तोंडी लावायला बरी असते..

ता. क. शिवाय दुसऱ्या दिवशी मुंबईत न झालेल्या गोळीबाराची बातमी दाखवून तुम्ही प्रेक्षकांची किती काळजी आहे हे देखील सिद्ध केले आहे त्याबद्दल विशेष अभिनंदन. हेमंत करकरे आणि अशोक कामठे यांच्या अंत्यसंस्कारांपासूनही आम्हाला वंचित ठेवले नाही हेदेखील उल्लेखनीय आहे.

तुमची कर्तव्यनिष्ठा, गोळीबार आणि स्फोटांची पर्वा न करता बाईट घेण्यातले अतुलनीय शौर्य, तुमच्या बातम्यांचा प्रेक्षकांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याचा विचार न करण्याची स्थितप्रज्ञता हे सर्व विसरून जाऊ नये अशीच माझी इच्छा आहे. म्हणून हे पत्र लिहीत आहे.

-तुमचाच एक चाहता.

Thursday, November 27

The Ukimwi Road

The Ukimwi Road ह्या पुस्तकाविषयी लिहिण्यापूर्वी मनामध्ये विचार येऊन गेला की मराठीत अशा प्रकारचे लेखन कोणी केले आहे. अनिल अवचटांचे 'पूर्णिया' आणि नंतर सामाजिक प्रश्नांबाबत केलेल्या प्रवासांची वर्णने हे ठळकपणे आठवणारे उदाहरण. दि.बा.मोकाशी यांची 'अठरा लक्ष पावले' आणि 'पालखी', मिलिंद बोकील यांचे 'समुद्रापारचे समाज' ही मला आणखी आठवणारी उदाहरणे . हे लेखन वगळता ज्याला - दुसरा बरा शब्द आठवत नसल्याने - तळागाळातल्या लोकांना भेटण्याची, त्यांची आयुष्ये जवळून बघण्याची आणि त्यावर लिहिण्याची उर्मी असलेले लेखक मराठीत फारच कमी आहेत. अर्थात या पुस्तकांच्या वाचकांची संख्याही इतर साचेबद्ध प्रवासवर्णनांच्या मानाने फारच कमी आहे हेदेखील दुर्लक्षित करता येणार नाही. असो.

The Ukimwi Road हे Dervla Murphy यांचे पुस्तक केनिया-युगांडा-टांझानिया-मालावी-झांबिया-झिंबाब्वे ह्या आफ्रिकेतील देशांत ३००० मैलांच्या सायकलप्रवासाचे वर्णन. मर्फी यांनी १९६४ पासून त्यांच्या जगावेगळ्या -सायकलवरून किंवा पायी केलेल्या - प्रवासांच्या हकीकती पुस्तकांच्या माध्यमातून सांगितल्या आहेत. याव्यतिरिक्त उत्तर आयर्लंडमधील प्रश्न, ब्रिटनमधील वंशवाद, अणुऊर्जा या विषयांवरही लेखन केले आहे. त्यांच्या इतर प्रवासांपेक्षा या प्रवासाचे कारण थोडे वेगळे आहे. जानेवारी १९९२ मध्ये त्यांना थोडासा एकटेपणा हवासा वाटत होता. थोडी विश्रांती घ्यावी असे वाटत होते. अर्थात त्यांची विश्रांतीची कल्पना ही केनिया ते झिंबाब्वे हा प्रदेश सायकलप्रवास करून 'निष्काळजीपणाने भटकणे' अशी आहे! विशेषतः 'संपर्काच्या साधनांचा अभाव असलेल्या या देशांमध्ये हवा तो निवांतपणा मिळेल आणि भटकणेही होईल' हे त्यामागचे एक कारण. याआधी त्यांनी आफ्रिकेतील इथिओपिया, मादागास्कर, कॅमेरून वगैरे देशांना या अगोदर (सायकलवर!) भेट दिली होती. आता विश्रांतीच्या निमित्ताने बाकीच्या देशांनाही भेट देण्यासाठी लेखिकेने वयाच्या साठाव्या वर्षी हा प्रवास केला. (नंतर पुढे वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी सैबेरियात सायकलप्रवासाचा प्रयत्न केला! तिथे अपघात झाल्याने सायकलऐवजी इतर वाहनांनी प्रवास करावा लागला!)

"जगातील इतर मोठे देश चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत- आणि आम्ही अद्याप आमच्याच देशातील गावांपर्यंतही पोचू शकलेलो नाही. काही देश चंद्रापर्यंत जाऊन परतही आले आहेत आणि आता इतर ग्रहांवर प्रवास करण्याच्या योजना करत आहेत. मात्र आम्ही अजूनही गावांपर्यंत पोचण्याचे प्रयत्न करत आहोत. (दिवसेंदिवस बाकीचे जग जवळ येत आहे आणि) आफ्रिकेतील गावे दूर दूर जात आहेत." पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखिकेने हे टांझानियाच्या संस्थापकांचे हे अवतरण दिले आहे. फक्त दळणवळणाच्याच नाही तर संपर्काच्या सर्वच साधनांचा बोजवारा उडालेल्या देशांत एका गोऱ्या-परदेशी, इंग्लिशशिवाय दुसरी भाषा न येणाऱ्या, आजीबाईने पॅंट-शर्ट घालून सायकलप्रवास करणे ही फार धोकादायक गोष्ट आहे असे अनेकांनी प्रवासापूर्वी आणि प्रवासातही बजावले. विशेषतः सायकलवर खाकी रंगाची पॅंटशर्ट घालून जाणारी व्यक्ती ही स्त्री आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. कदाचित परदेशी सैनिक समजून कोणीतरी हल्लाही करील किंवा जिथे थोडीफार वस्ती आहे तिथे सायकल गायब होईल (आणि जिथे कमी वस्ती आहे किंवा अजिबात नाही तिथे सायकलस्वारही कायमचा गायब होण्याची शक्यता आहे) असेही इशारे मिळाले. अर्थातच बाईंनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.

प्रवासाच्या पहिल्याच दिवशी नैरोबीमध्ये प्रचंड दुष्काळ आणि एका स्थानिक आंदोलनाशी लेखिकेची ओळख होते. आंदोलनाचे पुढे दंगलीत रूपांतर होते आणि त्या गडबडीत त्यांनाही थोडा मार लागतो. पुढे बिअर पिण्यासाठी एका गावात थांबल्यावर तिथे आफ्रिकेतील एड्सचे पहिले दर्शन होते आणि देश-संस्कृती कसलेही बंधन न बाळगता या रोगाने सगळा प्रदेश कसा पोखरून काढला आहे याचे विदारक दर्शन होत राहते. प्रवासात भेटलेल्या जवळपास प्रत्येकाचेच नातेवाईक, जवळचे मित्र एड्सने मृत्युमुखी पडलेले आहेत. आफ्रिकेतील लोकांच्या जीवनशैलीला जुळणारी उत्तरे शोधण्याऐवजी केलेल्या पाश्चात्य मलमपट्टीमुळे ही जखम अधिकच चिघळत चालली आहे. आफ्रिकेतील समाजात असलेल्या श्रद्धा-अंधश्रद्धा यांमुळे एड्ससारख्या प्रश्नाने विक्राळ स्वरूप धारण केले आहे. त्यांना प्रवासात भेटलेल्या आफ्रिकेतील काही लोकांच्या मते हा रोग ही आफ्रिकेत छावणी करून राहिलेल्या ब्रिटिश सैनिकांची या भागाला मिळालेली 'देणगी' आहे. तर काहींच्या मते पाश्चात्यांना आफ्रिकी लोकांची भीती वाटत असल्याने त्यांनी केलेल्या जादूटोण्याचा हा एक प्रकार आहे. युरोप अमेरिकेत या रोगावर उपाय मिळाला आहे, मात्र ते लोक मनापासून आफ्रिकेचा द्वेष करत असल्याने ही औषधे आफ्रिकेत येऊ देत नाहीत अशीही काहींची समजूत आहे. ह्या राजकीय-सामाजिक मतमतांतराबरोबरच पारंपरिक अंधश्रद्धांमुळे हा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. पौगंडावस्थेतून बाहेर पडलेल्या पुरुषाने जर लैंगिक संबंध ठेवले नाहीत आणि वापर झाला नाही तर लिंग गळून पडते किंवा खराब होते. तसेच स्त्रियांनी लैंगिक संबंध ठेवले नाहीत तर योनीमार्ग वापराअभावी आपोआप बंद होतो ही समजूत आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर आहे.आफ्रिकेतील मोडकळीस आलेल्या समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेवर टिप्पणी करताना लेखिकेने साम्राज्यवादाला थेट जबाबदार ठरवले आहे. युरोपिअन वसाहतवादामुळे या भागाचे मोठ्या प्रमाणावर झालेले शोषण, स्वतःची वेगळी समृद्ध जीवनपद्धती असणाऱ्या केनियातल्या मसाईसारख्या टोळ्यांनी गोऱ्या आक्रमणाला विरोध केल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले शिरकाण, मसाईंसारख्या शक्तिशाली टोळ्या वरचढ होऊ नयेत म्हणून संख्येने कमी असणाऱ्या टोळ्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे दिल्याने या भागाचा बिघडलेला सामाजिक तोल, विविध टोळ्यांमधील भांडणांचा स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी फायदा करून घेणाऱ्या युरोपियन राष्ट्रांनी उभे केलेले इदि अमीनसारखे भस्मासुर या सर्व घटनांचे संदर्भ पुस्तकात वारंवार येत राहतात. "आफ्रिकेमध्ये संहारक शस्त्रांची निर्मिती होत नाही. जर पाश्चात्यांना आमचा खरंच इतका कळवळा असेल तर तेथील कंपन्यांकडून येणारी विध्वंसक अस्त्रे बंद होण्यासाठी ते प्रयत्न का करत नाहीत. आमचे धनुष्यबाण विषारी असले तरी त्यामुळे होणाऱ्या संहाराला मर्यादा आहे. मात्र या आयात होणाऱ्या आधुनिक हत्यारांमुळे प्रचंड संहार होत आहे." हा एका वृद्धाचा प्रश्न मोठा बोलका आहे.या सर्व प्रकारात पारंपरिक जीवनपद्धतीवर आक्रमण झाल्याने नव्या युगात रूढ अर्थाने जगण्याला नालायक ठरलेल्या या टोळ्यांतील पुरुषांना पोटापाण्यासाठी स्थलांतरे करावी लागली. जोडीदार सोबत नसल्याने दुसरे लैंगिक सोबती शोधावे लागले आणि त्यातून एड्सचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. त्यात भर म्हणजे जनजागृतीसाठी आणि पाश्चिमात्य धर्तीच्या शिक्षणप्रसारासाठी आलेल्या मिशनरी लोकांनी धर्मप्रसार करताना ख्रिश्चन धर्माची काही अत्यंत जुनाट आणि आफ्रिकी जीवनशैलीच्या अगदी उफराटी तत्त्वे येथे रुजवली आहेत. निरोध किंवा तत्सम वस्तूंचा वापर करण्याला प्रतिबंध ही त्यातलीच एक घातक पद्धत. मुले ही देवाची भेट असल्याने त्यांना नाकारू नका त्याऐवजी जीवनशैलीत बदल करा अशी शिकवण ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी दिली. आफ्रिकेत खरे तर बहुपत्नीत्त्वाची पद्धत होती मात्र धर्मप्रसारकांनी प्रचलित केलेल्या ख्रिश्चन धर्मातील एकपत्नीव्रतामुळे बाहेरख्याली व असुरक्षित संबंध जास्त फोफावत आहेत असे लेखिकेचे निरीक्षण आहे.या प्रवासातील आवडलेल्या अनुभवांविषयी कितीही लिहिले तरी कमीच आहे. तरी एक नमुना देण्याचा मोह अनावर होतो.

"दुसऱ्या दिवशी सकाळी माझा रस्ता एका दलदलीसमोर जाऊन संपला तेव्हा मोठीच अडचण आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल असल्याने पुन्हा काही मैल मागे जाऊन एखाद्या वस्तीवर रस्त्याची चौकशी करावी लागणार. मी मागे वळले तर एक म्हातारा माणूस माझ्या मागेच उभा असल्याचे मला दिसले. त्याच्या वेशभूषेवरून तो आफ्रिकेतील एखाद्या जमातींपैकी एक आहे हे स्पष्टपणे कळत होते. त्याने गळ्यात तांब्यांची मोठमोठी कडी घातली होती. त्याच्या उजव्या हातात एक भाला आणि डाव्या हातात चामड्याने मढवलेली ढाल होती. एक परदेशी स्त्री या भागात सायकलवरून फिरत आहे हे त्याला माहीत असावे. त्याने काहीही न बोलता त्याच्या हातातला भाला माझ्याकडे दिला आणि सायकलीचा ताबा घेतला. नंतर माझ्या बुटांकडे बोट दाखवले. मी ते काढून हातात घेतले. समोरच्या घोटाभर चिखलातून चालताना त्या भाल्याचा उपयोग आधारासाठी काठीसारखा करायचा होता. कदाचित फक्त सायकलीने मला ती दलदल ओलांडणेही शक्य झाले नसते. साधारण अर्ध्या मैलभर तो चिखल तुडवल्यावर पायवाट आली. सायकल बाजूला ठेवून त्याने माझ्या हातातून भाला परत घेतला आणि काहीही न बोलता तो आल्या वाटेने मागे परतला. मी या रस्त्याने येत असताना त्याने पाहिले असावे आणि या अनोळखी बाईला इथे नक्कीच मदत लागेल हे पाहून तो माझ्यामागे आला असावा हे स्पष्टपणे कळत होते." रानटी समजल्या जाणाऱ्या टोळ्यांकडून लेखिकेला असे अनेक अनुभव आले आहेत.

असो. आफ्रिकेतील प्रत्येक देशाचे प्रश्न वेगळे आणि तितकेच क्लिष्ट आहेत.मात्र त्या सर्वांना जोडणारा समान धागा आहे तो वसाहतवादी पिळवणुकीमुळे उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था, धर्मप्रचाराच्या नावाखाली समाजरचनेत झालेली ढवळाढवळ, आफ्रिकेतील रूढी परंपरा यांना समजून न घेता शोधलेली पाश्चात्य धाटणीची उत्तरे आणि या सर्वांमुळे गोंधळून गेलेला, आणि आता एड्सने पोखरलेला आफ्रिकी समाज यांचा. या सर्वांचे नेमके चित्रण या पुस्तकात होते.
The Ukimwi Road

"Certainly Economists are the most dangerous animals on earth, skilled at making situations look so complicated that only their own solutions can solve the problems they themselves created" अशी अनेक ठिकाणी लेखिकेची लेखणी विलक्षण बोचरी आहे तर "हॉटेलात झोपताना ढेकणांपासून बचाव करावा की पिसवांपासून याचा विचार करत असताना मला डासही चावत आहेत हे बराच वेळ लक्षातच आले नाही" अशी काही ठिकाणी अतिशय प्रसन्न आणि नर्मविनोदी आहे. मात्र एकंदरीत हे हलकेफुलके प्रवासवर्णन नाही. लेखिकेने वास्तवतेला रंजक भाषेत सादर केले असले तरी विषयाचे गांभीर्य कोठेही कमी होऊ दिलेले नाही. तिने वेळोवेळी दिलेले अनेक पुस्तकांचे दिलेले संदर्भ, निवडक उतारे, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चर्चांनंतर विस्ताराने मांडलेले स्वतःचे मत - फुल टिल्ट या पुस्तकाच्या तुलनेत या पुस्तकात मर्फी यांनी स्थळवर्णनांपेक्षा संवाद आणि स्वतःची मते यावर जास्त भर दिला आहे - यामुळे हे पुस्तक केवळ प्रवासवर्णन न राहता हा प्रदेशाचा एक विश्वासार्ह ताळेबंद झाले आहे. आफ्रिकेतील समाजरचना, शिक्षणव्यवस्था, आरोग्यसेवा, विवाहसंस्था अशा अनेक गोष्टींबाबतची लेखिकेची सगळीच मते पटण्यासारखी नसली तरी ती विचार करायला लावतात. विशेषतः एकंदर विकासाबद्दलची लेखिकेची टोकाची मते आणि आदिवासी किंवा 'अविकसित'जीवनशैलीबाबतचे तिचे रोमॅंटिक वाटावे असे आकर्षण थोडेसे जाणवते मात्र ते पूर्वग्रह गृहीत धरूनही हे पुस्तक फार वाचनीय आहे यात शंका नाही.

पुस्तकाच्या नावाबाबत थोडे अधिक. Ukimwi हा स्वाहिली भाषेतील शब्द एड्स या रोगासाठी वापरला जातो. त्याचा शब्दशः अर्थ आहे Slim Disease असा. या संपूर्ण प्रवासाला 'एड्स रस्ता' असे नाव लेखिकेला द्यावेसे वाटते यावरूनही आफ्रिकेतील या प्रश्नाच्या भयावहतेची कल्पना यावी. पुस्तकाचे बाजूला दाखवलेले मुखपृष्ठ आणि डोक्यावर पाणी घेऊन जाणारे रेखाटन असलेले मलपृष्ठ दोन्ही अप्रतिम.


'वाचलेच पाहिजे' या यादीत हे पुस्तक अवश्य असू द्या.

Wednesday, November 5

Scripting Success



'गमभन'बद्दल आलेली बातमी आणि सोबत ॐकारचा झकास फोटो.


Sunday, November 2

तेंव्हाही - २

आमच्या आवडत्या संकेतस्थळाचा दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि त्यातली ही कविता वाचून आम्हाला आमचे गेलेले तें दिन याद आले. आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला...

हाय :)

दिवाळी अंकाला, गझलकारांना आणि विडंबनकारांना शुभेच्छा


झाले होते जरि माझे मुंडण तेंव्हाही
उगाच नव्हते केले मी भांडण तेंव्हाही!

मला ठोकण्यासाठी जरि तू फिरून थकलिस
मिटले नव्हते डोळे... तू कारण तेंव्हाही...

कशास वाटे काळ थांबला कालच्यापरी
असह्य झाले होते... सारे.. क्षण तेंव्हाही...

तुझे नि माझे हिशेब होते चुकते झाले
(तुझेच भरले पाकिट... मी तारण तेव्हाही...)


मिठीत घेऊ नको! गुन्ह्यांना माफी असते
शिक्षेचे ना दिलेस, तू कारण तेंव्हाही!


कलाप सारे थांबवले मी केसांचे जरी...
कुठे थांबली टकलाची पसरण तेंव्हाही?


कशास केली फक्त सखे श्वासांची भाषा..
(माऊथवॉशचे केले का तोरण तेंव्हाही!! )


कसे तुला पाहुनी, खुलुनी छान म्हणावे?
कशी कळेना तुला जमे भणभण 'तेंव्हाही' ;)


कशी तुला, कळली माझी ही, भगवद गीता
घरी माजले, नंतर होते, रण तेंव्हाही

Saturday, November 1

विलासप्रसादांची दिवाळी

दारावर थाप पडली आणि विलासप्रसादांची झोप मोडली. आज पाडवा असूनही विलासप्रसाद अंमळ उशीराच उठले. उठल्याबरोबर ताबडतोब त्यांनी आरशात पाहून केस व्यवस्थित केले, ठेवणीतले हास्य तोंडावर चिकटवले आणि दार उघडले.

हातात ओवाळायचे ताट घेऊन बाईसाहेब उभ्या होत्या.

"हे काय तुम्ही अजून तयार नाही. आज पाडवा ना. रितेशबाबा पण अजून उठायलाय"

कावरेबावरे होऊन विलासप्रसादांनी आजूबाजूला पाहिले.

"अगं हळू बोल. कोणी ऐकलं तर.. खुर्ची जाईल माझी "

"का काय झालं.?"

"खुशाल जोरजोरात पाडवा पाडवा ओरडतेस. मॅडमना काय वाटेल? कृपाशंकर, अहमद पटेल, निरूपम सगळे काय म्हणतील?"

"काय म्हणणारेत? आपण आपली दिवाळी सेलिब्रेट करतोय. त्यांची काळजी कशाला?"

"दिवॅळी म्हणे.. शिमगा होईल शिमगा... दिवाळं निघेल आपलं."

"हो पण काय झालंय सांगाल की नाही.?"

"हे बघ, एका राज्याची जबाबदारी मॅडमनी माझ्यावर सोपवली असली तरी मी एका राष्ट्रीय पक्षाचा निष्ठावंत सेवक आहे."

"बरं मग"

"पाडवा वगैरे क्षुल्लक प्रादेशिक उबळींना येथे जागा नाही. देशाच्या एकात्मतेचं काय होईल? प्रत्येकानं जर आपलेच सण साजरे करण्याचा हट्ट बाळगला तर लोकांच्या भावना दुखावतील ना! रितेशबाबाची करिअरही महत्त्वाची आहे. ते काही नाही. आपण करवा चौथ साजरी करणार आहोत. शेवटी पाडवा काय आणि करवा चौथ काय, तुझं सौभाग्य (आणि तुला घातलेली ओवाळणी) हे महत्त्वाचं. काय? मी कृपाशंकरला बोलावलंय. हे बघ आलाच तो. दार उघड बरे"

कृपाशंकर नमश्कार नमश्कार करत आत आले.

"आईये, आईये, आईये", विलासप्रसादांनी हातभर तोंड वेंगाडले.

"दिवालीच्या शुभेच्छा तुमाला. केस थोडेसे खाली आलेत. कपालापर्यंत.", कृपाशंकरांनी जणू काही एमेनेसचा धसका घेतला होता.

विलासप्रसादांनी खिशातून गोल आरसा काढून हातानेच केस व्यवस्थित केले. आणि आपल्या सहकाऱ्याला शुभेच्छा दिल्या.

"हैप्पी दिवाली कहों जनाब.. और आपका वो बूड रखो खुर्चीपें... क्या कहते है उसे, तकलीफ?"

"तकलीफ?"

"हा वो बैठने के लिए खुर्ची पे रखते है उसें?"

"तश्रीफ! तश्रीफ कहिएँ विलासप्रसादजी."

"ओहोहो. तश्रीफ रखिए."

"मै तुमको एक शंका विचारना चाहता हूं"

"अरे मराठीत बोला साहेब.. मला तेवढी मराठी कळते."

"मी बोलेन हो. पण तुम्ही मॅडमना सांगू नका मी मराठीत बोललो ते!"

"नाही नाही साहेब.. तुम्ही विचारा.. "

"म्हणजे काय आहे. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना सहानुभूती दाखवण्यासाठी आम्हांला करवा चौथ साजरा करायचा आहे. तो सण कधी असतो?

"तो तर ऑक्टोबरमध्येच होऊन गेला साहेब"

विलासप्रसादांना नैराश्याचा झटकाच बसला. त्या गडबडीत त्यांचे केस थोडे विस्कटले.

"पण कालजी नको. छटपूजेला सगलं मेकअप करता येईल. निरूपमही येतोय मागून. तो छटपूजेचं बघतो. शिवाय हा थोडा वादग्रस्त विषय असल्यानं प्रसिद्धीही जास्त मिळेल."

विलासप्रसादांना चान्स न हुकल्याचं समाधान वाटलं. बाहेर निरूपमच्या गाडीचा आवाज आला. कृपाशंकरांनी दार उघडलं.

विलासप्रसादांनी त्यांचे स्वागत केले. नमस्ते नमस्ते करत निरूपमही आत आले. .

"दिवालीकी शुभकामनाएँ विलासप्रसादजी. केस थोडे विस्कटल्यासारखे दिसतात."

आपल्या प्रतिमेची आणि व्यक्तिमत्त्वाची इतकी काळजी करणारे सहकारी आपल्याला मिळाले याचा विलासप्रसादांना अतीव आनंद झाला.