सध्या जोधा अकबर निमित्ताने अनेक मंडळी चित्रपट विरोधात हिंसक आंदोलने करत आहेत. हिंदी चित्रपट सामान्यपणे फालतू असतात. त्याविषयी जास्त न बोलणे बरे. मात्र अकबराविषयी काही तरी सांगणे आवश्यक आहे.
अकबराने हिंदू राजकन्येशी लग्न करण्यापेक्षाही अधिक महत्त्वाच्या अशा इतर गोष्टी केल्या. पहिली बाब म्हणजे राज्यविस्तारासाठी युद्धे चालू ठेवली असली तरी युद्धजितांना सक्तीने मुसलमान वा गुलाम करण्यात येऊ नये. मुस्लिम धर्मशास्त्रानुसार प्रत्येक मुसलमान हा फक्त धर्मयुद्धासाठीच बिगर मुसलमानांशी लढत असतो . दोन मुसलमानांमधील भांडण हे त्यांची खाजगी बाब आहे तर बिगरमुसलमानांशी होणारी लढाई हे धर्मयुद्ध. त्यामुळे अकबराचा विजय झाला तरी धर्माचा विजय होणार नाही ही बाब तत्कालीन समाजव्यवस्थेत धक्कादायक होती. अकबराने धर्मशास्त्रात केलेला उघड हस्तक्षेप होता. दुसऱ्या एका निर्णयानुसार अकबराने मुसलमान धर्मगुरुंचे अधिकार किती हे ठरवण्याची पद्धत निश्चित केली. हा सरळसरळ खलिफाच्या अधिकारामध्ये केलेले आक्रमण होते. पुढेपुढे अकबराने हिंदू राजकन्यांशी विवाह करताना त्यांनी मुसलमान होण्याची काहीही गरज नाही असा धर्मद्रोही निर्णयही घेतला होता.
१५६३ साली अकबराने हिंदूंवर असलेला यात्रा कर रद्द केला व लगेच पुढच्या वर्षी जिझिया कर रद्द केला. मूर्तिपूजक किंवा अग्नीपूजक यांना इस्लाममध्ये परवानगी नाही. त्यांना जिझियाची परवानगी नसते. त्यांनी एक तर मुसलमान तरी व्हावे किंवा मृत्यू तरी पत्करावा असे मुसलमान धर्मशास्त्रानुसार लिहिले आहे. मुहम्मद बीन कासीमने लादलेला हा कर म्हणजे हिंदूंना दिलेली एक प्रकारची सवलत होती. उत्तरेतील मुसलमान राजे सक्तीने हा कर वसूल करत. दक्षिणेत हा कर तत्त्वतः अस्तित्वात होता. मात्र जिझिया घेऊन हिंदूंना जिवंत ठेवणे हीच मुसलमान धर्मशास्त्राविरोधात केलेली तडजोड होती. अकबराने जिझिया कर रद्द केला हा धर्मशास्त्रातील खूप मोठा हस्तक्षेप होता!
हा कर रद्द करण्यामागची अकबराची भूमिका उदारमतवादाची होती. एक म्हणजे जिझिया दिल्यानंतर हिंदूंवर हे राज्य टिकवण्याची व लढण्याची जबाबदारी राहत नाही. मात्र प्रत्यक्षात हिंदू लोक आपल्या (म्हणजे अकबराच्या) राज्यासाठी लढत होते. शिवाय जिझिया कर हा शत्रूंवर असतो. आमच्या राज्यातील बिगरमुसलमान लोक हे शत्रू वा जित लोक नाहीत अशी त्याची भूमिका होती. शिवरायांच्या औरंगजेबाविरोधातील लढाईचे एक प्रमुख कारण हे औरंगजेबाने पुन्हा सुरू केलेला जिझिया कर हे होते. शिवरायांची अकबराविषयीची भूमिका ही आदराची होती. त्यांनी अकबराला पुण्यश्लोक म्हटलेले आहे.
जिझिया कर रद्द करणे म्हणजे मुसलमान हे देशाचे जेते नसून इथलेच नागरिक आहेत व बिगरमुसलमान हे जित लोक नसून ते देखील याच देशाचे प्रजाजन आहेत अशी भूमिका घेणे आहे. हिंदू व मुसलमान हे दोघेही याच देशाचे नागरिक आहेत ही स्पष्ट भूमिका घेणारा अकबर हा पहिला मुसलमान राजा असावा!
हिंदू जागृती नामक एका संघटनेचे जोधा अकबर विरोधातील एक पत्रक पाहिले तर त्यात अकबराने ५००० हिंदू स्त्रियांना जनानखान्यात ठेवले होते व अत्याचार केले होते असे लिहिले आहे. अकबराच्या जनानखान्यात अनेक स्त्रिया होत्या. तो वैराग्यशील राजा नव्हता. स्त्रिसहवासासह इतरही काही भोगविलास तो करत असे. मात्र हे चित्र एकट्या अकबराचे नाही. त्याच्या अनेक सरदारांचेही मोठमोठे जनानखाने होते. हिंदू मंडळींचे जनानखाने थोडे लहान असत. महाराणा प्रताप यांचे वडील उदयसिंह यांच्या अनेक बायका होत्या. जनानखान्यामध्ये अनेक स्त्रिया होत्या. हिंदू राजाच्या अंतःपुरामध्ये पकडून आणलेल्या शत्रूंच्या स्त्रिया वा कन्या नसत हे मानणेभोळसटपणाचे आहे. मात्र बहुसंख्य हिंदू राजांची मोठमोठ्या जनानखान्यांची प्रथा नव्हती मुसलमान राजांची ती होती.
आयुष्याच्या उत्तरकाळात अकबर थोडा अधिक धर्मनिष्ठ झाला असे मानतात. मात्र अकबरपूर्व व अकबरोत्तर मुसलमान राजवटींपेक्षा अकबराची राजवट ही वेगळी होती. आपला राज्यविस्तार, राजकारण व प्रशासन याला धार्मिक रंग येऊ नये हे त्याने कटाक्षाने जपण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन कालखंडातील अकबराचा विरोधक राणाप्रताप व नंतर उदयास आलेले शिवाजी महाराज यांनीही आपले राजकारण व प्रशासन याला धार्मिक रंग येऊ नये हे पाळले. शिवाजीने आपले आरमार मुस्लिम सेनापतीच्या हातात दिले होते.
अयशस्वी असला तरी अकबराने केलेला समाजपरिवर्तनाचा प्रयोग अभ्यासणे आवश्यक आहे. काळाच्या कितीतरी पुढे असलेल्या राजाचे अनेक गुण त्याच्यामध्ये दिसतील. अकबराचे शेवटपर्यंत मी भारतीय आहे, हा मुद्दा जपला. भारतीय मुसलमान जेथे स्वतःला जेते समजत आले आले आणि हिंदू हे राज्य परके समजत आले तेथे अकबराने समाजरचनेला नवा आशय देण्याचा प्रयत्न केला.
सध्या चालू असलेली आंदोलने इतिहास समजून न घेता केलेली आणि पर्यायाने मूर्खपणाची आहेत.
संदर्भः 'आकलन' (नरहर कुरुंदकर)
Wednesday, February 27
'जोधा -अकबर' च्या निमित्ताने
Saturday, February 16
Friday, February 15
भाषेचे संरक्षण
मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे संरक्षण करण्याची टूम सर्वत्र निघाली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफिक स्ट्डीज, बेंगलोर चे संचालक सी. बालचंद्रन यांचे कन्नड भाषेबाबतचे विचार असलेला एक इंग्लिश लेख मित्राने इमेल द्वारे पाठवला होता. 'घरोघरी मातीच्या चुली' या न्यायाने हेच विचार मराठीलाही लागू पडतात असे वाटले. त्याचा हा स्वैर अनुवाद.
७४वे कन्नड साहित्य संमेलन उडुपी येथे झाले. संमेलनात चर्चिलेले विषय आणि शेवटी काढलेला निष्कर्ष हे पूर्णपणे अपेक्षितच होते. कन्नड भाषेचे 'रक्षण' करा. कन्नड भाषेला 'जतन' करा. कन्नड भाषेला 'वाचवा'. अशा हजारो घोषणा देण्यात आल्या.
अशा प्रकारच्या घोषणा या साधारण दोन प्रकारच्या व्यक्तींकडून देण्यात येतात. १. बुद्धीमंत २. बुद्धीमंद
बुद्धीमंत हे स्वत:ला हुशार आणि विद्वान मानत असले तरी भाषा वाचवणे म्हणजे नक्की काय करणे याबाबत त्यांचे स्वत:चेच विचार स्पष्ट नसतात. भाषा वाचवण्यासाठी केलेल्या उपायांचे परिणाम काय होतील हे पाहण्याइतकी दूरदष्टी त्यांच्याकडे नसते. तर बुद्धीमंद लोक हे त्यांचे भाषेविषयीचे तथाकथित प्रेम आणि अभिमान हा वेगवेगळ्या सभा, मोर्चे आणि इतर भाषांमधील फलक फाडणे, त्यांना काळे फासणे. बसवर दगडफेक करणे किंवा स्वत:ला अधिक शूर मानत असल्यास ती बस जाळून टाकणे यासाठी वापरतात.
भाषा ही संस्कृतीचे वाहन आहे. संस्कृतीचा प्राण आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेले विचार, ज्ञान हे भाषेमध्ये प्रकट होते. मूर्त स्वरुप घेते. हे विचार पुढे अनेक पिढ्यांमध्ये आणि प्रदेशांमध्ये संक्रमित होतात. याच विचारांमध्ये समूहजीवन आणि वैयक्तिक आयुष्य प्रभावित करण्याची, त्याला दिशा देण्याची ताकद असते. कुवेम्पु, पंपा, बेंद्रे, बसवेश्वर, पुरंदरदास, कारंथ आणि इतर अनेकांचे विचार आपल्याला उपलब्ध आहेत याचे बहुधा सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी कन्नड भाषेच्या माध्यमातून आपले विचार प्रकट केले.
'जतन', 'संरक्षण', 'वाचवा' या शब्दांचे नक्की अर्थ काय आहेत? सर्व व्यवहार हे कन्नडमधूनच व्हावेत? जगातील सर्व तांत्रिक ज्ञान कन्नडमध्ये भाषांतरित करावे? कन्नड भाषेच्या किती तथाकथित रक्षणकर्त्यांना मद्य आणि मध्य यामधला फरक माहिती आहे? मोले-मोळे किंवा मले-मळे या शब्दांमधले फरक ते छातीठोकपणे सांगू शकतात का? अतिशय घाणेरड्या कन्नडमध्ये हे लोक देत असलेल्या घोषणा पाहून मला त्यांचा तिरस्कार वाटतो.
कन्नड वाचविण्याच्या नावाखाली एकामागून एक येणारे राज्यकर्ते शिक्षणव्यवस्थेशी खेळ करत आहेत. शालेय शिक्षण केवळ कन्नड भाषेतून असावे असे फतवे काढत आहेत. कोणतेही नियंत्रण नसलेल्या अशा निर्णयांमुळे आपल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना तांत्रिक व शास्त्रीय ज्ञान योग्य प्रकारे कसे मिळेल? अशा निर्णयांमुळे आपल्या मुलांचे किती नुकसान होत आहे याची आपल्याला कल्पना आहे का?
कन्नड वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकडे पाहिल्यास, कन्नड प्रसारमाध्यमांमध्ये मी रोज पाहतो तेव्हा एकही व्यक्ती आपले संपूर्ण वाक्य शुद्ध आणि योग्य कन्नडमध्ये बोलत नाही. वाक्यातील महत्त्वाचा गाभा हा इंग्लिशमध्ये असतो. मुलाखतकार, निवेदक, कलाकार सर्वांची हीच स्थिती आहे. कन्नड चित्रपटांची नावे इंग्लिशमध्ये असतात. चित्रपटप्रसारासाठी देण्यात येणार्या मुलाखती इंग्लिशमध्ये किंवा कांग्लिशमध्ये असतात. चित्रपट कलाकारांची नावेही इंग्लिशमध्ये असतात. अशा वित्तपिपासू लडदू प्रसारमाध्यमांमुळे कन्नड भाषा जतन होत आहे का? माझ्या मते तर अशा गोष्टींमुळे एका सुंदर भाषेची आणि त्याच्याशी निगडीत प्रगतीशील संस्कृतीची आपण विटंबना करत आहोत.
कर्नाटकात बाहेरून येणार्या लोकांना कन्नड शिकावे असे वाटण्यासाठी आपण काय करत आहोत? अशा लोकांशी असहकार पुकारणे, व्यवहार करण्यास नकार देणे ह्या गोष्टी तर अतिशय धोकादायक आहेत. अशा गोष्टी केल्याने आपली संस्कृती, प्रतिमा आणि अर्थकारणावर खूप वाईट परिणाम होईल. कन्नड भाषा फुलण्यासाठी अधिकाधिक लोकांनी ती प्रेमाने, आनंदाने आणि उत्साहाने वापरणे आवश्यक आहे.
जागतिकीकरण ही क्लिष्ट प्रक्रिया आहे. नव्या विचारांसाठी कवाडे उघडताना आपल्याला आपल्या श्रद्धा आणि जुने विचार यांचे कठोर परीक्षण करणे हे क्रमप्राप्त असते. सध्या अस्तित्वात असलेल्या संस्कृतीमध्ये तणावही निर्माण होत असतात. मात्र असे तणाव आणि प्रश्न निर्माण झाल्यावर आपण काय करतो हे खूप महत्त्वाचे आहे. या परिस्थितीचा अनुकूल वापर करून घेऊन आपली प्रगती कशी होईल हे पाहण्यासाठी स्वत:मध्ये बदल करायचे की स्वत:ला जगापासून कोंडून घेऊन नंतर दगडफेक करायची?
कन्नड ही प्रादेशिक भाषा आहे. तिला भौगोलिक मर्यादा आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, अर्थकारणामध्ये - कर्नाटक असो वा बाहेर - इंग्लिश ही अत्यावश्यक भाषा आहे. कन्नडचा वापर करून आपण खूप मोठी तांत्रिक आणि शास्त्रीय मजल मारू शकू हे मानणे मूर्खपणाचे आहे.
बहुभाषिक असण्याचे अनेक फायदे आहेत हे सर्वच जण जाणतात. मी त्यात काही नवीन सांगत नाही. मात्र नवीन भाषा शिकण्याची प्रक्रिया जर आनंददायी आणि स्वेच्छेने केली असेल तरच ती व्यवस्थित होऊ शकते. कन्नड भाषेला 'जगू' द्या. 'जगवू' नका. कन्नड वापरणे ही 'कूल थिंग' होणे आवश्यक आहे. मात्र ते केवळ प्रेमानेच होऊ शकते. दबावाने नाही.
हे होण्यासाठी कर्नाटक सरकार महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आपल्या मुलांना काही 'विशेष कायदा' करून नोकर्या मिळवून देण्यापेक्षा त्याची क्षमता, गुणवत्ता कशी वाढेल याकडे सरकारने लक्ष द्यावे.
Saturday, February 9
राज ठाकरे यांना अनावृत्त पत्र
प्रिय राजसाहेब,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर मनात आलेल्या काही असंबद्ध प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत.
सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की कोणत्याही व्यक्तीने परप्रांतात कायमच्या किंवा दीर्घ वास्तव्यासाठी राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक लोकांच्या संस्कृतीशी मिळून मिसळून राहणे. त्यांची भाषा आत्मसात करणे. त्यांना कमीतकमी त्रास होईल असे आपले वर्तन ठेवणे. आपला वेगळेपणा किंवा वर्चस्व सतत अधोरेखित करत राहण्याऐवजी त्यांच्याशी समरस होऊन राहणे हे तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे मला मान्य आहेत. किंबहुना कोणत्याही शहाण्या आणि समजूतदार माणसाला ते पटण्यासारखे आहे.
तुम्ही सुरु केलेल्या आंदोलनामागच्या भावनांना सामान्य मराठी माणसाकडून सक्रिय प्रतिसाद मिळत नसला तरी तो तुमच्या भावनांशी सहमत आहे हे सहज दिसते. मात्र हे आंदोलन ज्या पद्धतीने चालले आहे ते त्याच्यासाठी निश्चितच तापदायक आहे. आंदोलनाच्या स्वरुपामुळे हे मूलभूत प्रश्न जाणून घेण्याऐवजी अमिताभ बच्चनचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य व त्याला तुमच्या वक्तव्यानंतर थंडी वाजणे असल्या दुसर्याच बिनमहत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधले जाऊन या प्रश्नाचा विचका होऊ नये ही माझी इच्छा आहे.
१. मनसेच्या आंदोलनाच्या वेळी इलेक्ट्रॉनिक - विशेषत: हिंदी - प्रसारमाध्यमांनी या आंदोलनाला दिलेले मराठी विरुद्ध उत्तर भारतीय किंवा मराठी विरुद्ध इतर भारतीय असे स्वरुप पाहता या आंदोलनामुळे मराठी माणसाबद्दल इतरभाषकांच्या मनात कायमस्वरुपी अढी निर्माण होईल असे वाटते. जे मराठी माणसाच्या नक्कीच हिताचे नाही. यापुढील कोणतेही आंदोलन करताना ते लोकशाही, विधायक मार्गाने व महाराष्ट्रातील मालमत्तेचा विनाश न करता करणे आवश्यक नाही का? अमराठी प्रसारमाध्यमांमध्ये तुमच्या आंदोलनाची केवळ एकच बाजू दिसते. दुसरी बाजू व आंदोलनामागच्या भावनाही अमराठी माध्यमांमार्फत सर्वांपर्यंत पोचवाव्यात यासाठी मनसे काय करणार आहे?
२. परप्रांतातून महाराष्ट्रात येणारे लोक मराठीत बोलत नाहीत हा तुमचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्रातील मराठी लोक मराठी माणसांशी तरी मराठीत बोलतात का? मराठी जनांचा मराठी बोलण्याबाबतचा न्यूनगंड अनाकलनीय आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वत:हून मराठीत बोलले तर आपल्याला फार मोठी शिक्षा होणार आहे अशा अविर्भावातून चालणारे मराठीजनांचेच वर्तन पाहता इतरभाषक मराठीत बोलत नाही यात काय आश्चर्य आहे? आता मराठी माणसांवर हल्ले करायचे का?
३. महाराष्ट्राची व्यवहाराची भाषा हिंदी होण्याचा धोका तुम्ही या आंदोलनात अधोरेखित केला आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांना टीव्हीवर जवळून पाहता आले. शिरीष पारकर वगळता एकाही नेत्याला इंग्लिशमध्ये व्यवस्थित बोलता येत नाही. इंग्लिशमधून विचारलेल्या प्रश्नांना हिंदीत उत्तरे देण्याची महाराष्ट्रीय नेत्यांची परंपरा मनसेनेही चालू ठेवली आहे यावर तुमचे काय मत आहे?
४. कमी काळासाठी महाराष्ट्रात वास्तव्याला आलेल्या अमराठी लोकांशी आपल्याला इंग्लिश येत नसल्यास कोणत्या भाषेत बोलावे? महाराष्ट्रातील इंग्लिश व मराठी दोन्ही भाषांच्या शिक्षणाचे दिवाळे निघालेले आहे याची तुम्हाला कल्पना नाही का? व्यवस्थित इंग्लिश न येण्याचा न्यूनगंड आणि मराठी बोलण्याची लाज वाटणे या दोन्हींमुळे मराठी माणूस हिंदीतून बोलतो हे आपल्याला माहिती नाही का?
५. भोजपुरी चित्रपटांच्या प्रदर्शनावर हरकत घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटांचे रीळ जाळले. परप्रांतातून महाराष्ट्रात आलेला माणूस त्याची भाषा, संस्कृती जपण्याचा जीवापाड प्रयत्न करतो. भोजपुरी भाषेतील चित्रपट आवडीने बघतो. किती मराठी माणसे आवडीने मराठी चित्रपट पाहतात? दीपक सावंत यांच्यासारख्या मराठी माणसाला मराठीऐवजी भोजपुरी चित्रपट निर्माण करावेत असे का वाटते?
६. तुम्ही सुरू केलेले आंदोलन पुढे काय वळण घेणार आहे याची कोणालाच कल्पना नाही. मात्र या आंदोलनानंतर महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या अशिक्षित/अर्धशिक्षित हिंदी भाषकांचे ध्रुवीकरण होऊन समाजवादी पक्षासारख्या मतलबी पक्षाची एकगठ्ठा मतपेढी तयार होईल. याला मनसेचे काय उत्तर आहे?
७. मराठी तरूणांची इतर भाषकांइतके कष्ट करण्याची तयारी आहे का? याबाबतीत मला आलेले बहुसंख्य अनुभव उत्साहवर्धक व आवर्जून सांगावेत असे नाहीत. दुकानदाराने गिर्हाईकांशी नम्रपणाने बोलावे. सस्मित व हसतमुख सेवा द्यावी. गिर्हाईकाला आपलेसे करण्यासाठी दुकानदाराला थोडा त्रास सहन करावाच लागतो यासारखी मार्केटिंगची मूलभूत तत्त्वे मराठी माणसाला शिकवण्यासाठी मनसे काय करणार आहे? मराठी तरुणांना नोकरी मिळण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन मनसे करणार आहे का? याबाबतीत मनसेचे काय धोरण आहे?
८. संस्कृती या शब्दाविषयी मनसेच्या नक्की काय कल्पना आहेत? गणपती उत्सवात मोठमोठ्याने लाऊडस्पीकर्स लावले की संस्कृतीसंवर्धन झाल्यासारखे मराठी माणसाला वाटते. केवळ उत्सव साजरे करून संस्कृती संवर्धन होते का? साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्य अशा वेगवेगळ्या क्षेत्राबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांचे काय धोरण आहे? मनसेचे किती कार्यकर्ते कोणत्या प्रकारची पुस्तके वाचतात?
९. मराठी माणसाने योग्य प्रकारे भरपूर पैसा कमवावा. स्वत:च्या पायावर व्यवस्थित उभे रहावे. शेअर बाजार, म्युच्युअल फंडांसारख्या माध्यमातून गुंतवणूक करून उत्तम परतावा मिळवावा ही आर्थिक साक्षरता मराठी माणसात रुजण्यासाठी मनसे प्रयत्न करणार का?
१०. महाराष्ट्रातील शहरांपेक्षा दक्षिण भारतातील कित्येक शहरांमध्ये महिलांना व मुलींना सुरक्षित वाटते. बसप्रवासासारखे अगदी साधे उदाहरण घेतले तरी चेन्नई, हैदराबादसारख्या शहरात स्त्रियांना बसण्यासाठी असलेल्या वेगळ्या आसनांवर पुरूष बसत नाहीत. बसले तरी कंडक्टर त्याला हरकत घेतात. चढण्या उतरण्यासाठी स्त्रियांना व पुरुषांना वेगवेगळे दरवाजे आहेत. जेणेकरून स्त्रियांना कमीतकमी त्रास होईल. अशा प्रकारची समजूतदार, शांत पद्धत महाराष्ट्रात रुजवणार का? की इथेही मनगटाच्या जोरावरच प्रत्येकाने पुढे जायचे?
या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर कदाचित हवी ती प्रसिद्धी मिळणार नाही पण हवा तो परिणाम नक्कीच साधला जाईल असे मला तरी वाटते. तुम्हालाही तसे वाटते का?
तुमचाच ,
आजानुकर्ण
Tuesday, February 5
संध्याखंत - २
आमची प्रेरणा नंदनशेठ यांची अप्रतिम कविता संध्याखंत
आम्ही परतुनी आलो
झाली होती सांज
बल्ब लावूनी बसलो
सुरु जाहली खाज
नाही बिलगाया कोणी
मनात येती इच्छा
माडीवरती जाऊनी
करावयाची का पृच्छा
रंगीत बाटलीतूनी
वाहतील सोनेरी धारा
पेल्यात तरंगे जणू
जीव अमुचा सारा
रात्र येई गोकुळी
आम्ही करितो खंत
'साकी' दिसे ना कुठे
आता तुम्हीच ओता पंत
(ह. घ्या.)
Monday, February 4
शाळा
आमच्या सुपरष्टारला कोणीही (स्टुलावर उभे राहून) टपली मारावी आणि त्याचे केस विस्कटवून टाकावे याला काय म्हणावे?
राजसाहेबांनी केलेल्या वक्तव्याने आमचे मन इतके दुखावले तर सुपरष्टार साहेबांचे किती दुखावले असेल याची कल्पनाच करवत नाही. आम्ही तडक 'बंगल्या' वर पोचलो. जयावैनी फोनवरून डायलॉग लिहून घेत होत्या. मात्र आम्हाला पाहून गडबडीने फोन खाली ठेवून "या या" म्हणाल्या.
आम्ही अचंबित!
"बसा, बसा. थोडा चहा टाकते.", जयावैनी.
"चहा तर टाकाच. थोडं आलंही टाका. ठेचून! काय थंडी आहे. हू हू हू हू.". फुकट मिळते तर सोडायचे कशाला अशी आमची (सुपरष्टारप्रमाणेच) पॉलिसी आहे.
"आलं? कोण आलं?" जयावैनी घाबरल्या. त्यांना वाटलं 'कार्यकर्ते' आले की काय!
"अहो. कोणी आलं नाही. आलं म्हणजे जिंजर! अहो, अद्रक अद्रक! बंदर क्या जाने अद्रक का स्वाद असं तुम्ही म्हणता ना! आम्हाला आवडतो बाबा त्याचा स्वाद! विशेषत: अशा थंडीत चहा काय मस्त लागतो."
"छ्या. ही काय थंडी आहे! थंडीची खरी मजा तर आमच्या उत्तर प्रदेशात." आजूबाजूला 'कार्यकर्ते' नाहीत हे पाहून जयावैनींनी मनातली गोष्ट सांगितली.
"हे बाकी खरं बोललात! 'पुनर्जन्म हो मेरा तो हो गंगा के तटपर!' असं कुणीसं म्हटलंच आहे. असो. चहाला उकळी आली असेल. उतू जाईल. बाकी 'शिक्षणमहर्षी अमितजी' कुठे दिसत नाहीत?", आम्ही.
"बाराबंकीला गेलेत. विटांची डिलीव्हरी यायची होती. लवकरात लवकर काम पुरं करावं म्हणते. गुढीपाडव्याला झालं तर सोन्याहून पिवळं. तेवढंच विरोधकांचं तोंड बंद राहील.", जयावैनी.
"त्याचीच युक्ती सांगायला आलो होतो ना! म्हटलं विटांचा एखादा ट्रक महाराष्ट्रातून न्या. नंतर उगीच बोंबाबोंब नको.", आम्ही.
जयावैनी चहा आणायला आत गेल्या. आम्ही फोनजवळ जाऊन कोणत्या चित्रपटाचे डायलॉग आहेत ते पाहू लागलो. वडील, भाऊ असे काहीतरी लिहिले होते. बहुधा चित्रपट कौटुंबिक असावा.
चहा घेऊन घरी आलो आणि संध्याकाळी टीव्हीवरच्या बातम्या पाहू लागलो तर काय चमत्कार!
आम्ही फोनजवळ वाचलेले डायलॉग जयावैनी पत्रकारांसमोर मारत होत्या!!
ही नवीनच शाळा म्हणायची.
आम्हाला इतुके दिवस फक्त 'मातोश्री' माहिती होत्या. शाळेत न जाता तातश्री आणि दादोश्री हे देखील शिकलो.
असो.

