स्टार माझावर काल नेमाड्य़ांशी गप्पा या नावाने एका कार्यक्रमात भालचंद्र नेमाड्यांशी मारलेल्या गप्पा पाहण्यात आल्या.
एक तर स्टार माझा (किंवा झी २४) ह्या वाहिनीवरचे मराठी इतके भयंकर असते की आपण इतकी वर्षे जी भाषा शिकलो, लिहितो, वाचतो ती वेगळीच कोणती तरी आहे आणि ह्या वाहिनीवरची भाषा वेगळीच आहे असेच वाटत राहते. घरंगळलेले अनुस्वार व रफार यांचा सुकाळ करून काय बातमी देण्याचा प्रयत्न करतात तेच कळत नाही.
सूचना हा शब्द "सुचना" असा लिहिणे. 'कायर्क्रम' सारखे जिभेला मल्लखांब खेळायला लावणारे शब्द दाखवणे हे प्रकार पाहून मनोरंजन होत असले तरी ते फारसे आनंददायी नसते. शिवाय शाहरूख खान पुढील चित्रपटात प्यांट घालणार की नाही अशा गहन आणि अतिमहत्त्वाच्या 'मराठी' विषयांवर अर्धा अर्धा तास विश्लेषणात्मक चर्चा करून नंतर काहीही निष्कर्ष न काढता प्रेक्षकांवर (त्यांच्या भाषेत दर्शकांवर) एसएमएस पाठवण्याची लाडिक सक्ती करण्याची दृश्ये पाहण्यात मला काहीही रस नसतो. त्यात अजून एक संतापजनक प्रकार म्हणजे ह्या वाहिनीवर बातम्या सांगणारी निवेदिका आहे ती पाठीत स्प्रिंग बसवल्याप्रमाणे इतकी मान हलवते की या बातम्या मूव किंवा आयोडेक्सने स्पॉन्सर करायला काहीच हरकत नाही असेही वाटून जाते. (स्टारवाले, ह्या युक्तीचे पेटंट मला द्या!)
त्यामुळे या वाहिनीला नेमाडे कोण असावेत हे माहिती असणे हीच मोठी आश्चर्याची बाब होती. त्यात नेमाड्यांशी गप्पा हा कार्यक्रम दाखवणे हा सुखद अपेक्षाभंगाचा कळसच होता. गप्पांचा सुरुवातीचा काही भाग चुकला.
नेमाड्य़ांच्या "मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपण आपली भाषा, राष्ट्र, धर्म या मूळ ओळखी आहेत त्या स्वत:कडे जपून ठेवायला हव्यात" अशा काहीशा वाक्याला मी कार्यक्रम बघायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना नक्की कोणत्या संदर्भात हे वाक्य म्हणायचे होते ते कळलेच नाही. (नेमाड्यांसारखे मोठे लेखक असे न कळणारे नेहमी बोलतात त्यामुळे कोणीही न कळणारे काहीही बोलले की ते थोर वाटू लागते! असो.) मात्र पुढे नेमाड्यांनी केलेली टोलेबाजी झकास होती.
"व्ही.एस.नायपॉल, सलमान रश्दी यासारख्या लेखकांना काहीही महत्त्व देण्याची गरज नाही. ते लोक ब्रिटिशांनी त्यांना चांगले म्हणावे या दृष्टिकोणातून भारताला शिव्या घालतात. आपल्याला जशी तस्लीमा नसरीन जवळची वाटते. (ती बांगलादेशातील मुसलमानांना नावे ठेवते म्हणून) तसेच ब्रिटिशांना किंवा युरोपियनांना नायपॉल, रश्दी हे जवळचे वाटतात. एन आर आय लोकही असेच आहेत. त्यांच्याकडून फारशा अपेक्षा ठेवू नयेत. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या प्रथांना, परंपरांना केवळ आपल्या मनात येते म्हणून नाव ठेवू नये. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मी पुरस्कर्ता आहे पण समाजात पिढ्यानपिढ्या चालणार्या गोष्टींना, श्रद्धास्थानांना ती डळमळीत होतील इतपत नावे ठेवण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नसतो.
पेपरात लिहिणारे लोक संपूर्णपणे मूर्ख असतात. ज्यांना काहीही अक्कल नाही असे लोक संपादक होतात आणि इतरांना शहाणपणा शिकवतात. त्यामुळे पेपरवाल्यांकडे लक्ष देऊ नये. जातीधर्म या गोष्टी नष्ट करणे वर्षानुवर्षे कुणालाही जमले नाही त्यामुळे त्या नष्ट करण्याच्या बाता मारू नयेत."
वगैरे वगैरे. झकास.
पण शेवट फारच दमदार होता. अनेक वर्षे वाट पाहत असलेला त्यांचा "हिंदू" हा ग्रंथ कधी प्रकाशित होणार असे विचारले तर "तुम्ही असे कार्यक्रम आयोजित करुन माझे साडेचार पाच तास वाया घालवता. एवढ्या वेळात माझी थोडी पाने लिहून झाली असती. पण तरी तीन चार महिन्यात तो ग्रंथ तयार होईल. (लिहून की छापून?)"
खल्लास!!
Monday, January 28
नेमाड्यांशी गप्पा
Sunday, January 20
भारतरत्नचा घोळ आणि उपाय
एक तर 'भारतरत्न' च्या वादाबद्दल (मराठी ब्लॉगांव्यतिरिक्त इतरत्र) इतकं सारं लिहून झालं आहे की आमच्या एका मित्राकडे वाचलेल्या "बोलणे थोडे पण थुंकी फार" या वाक्प्रचाराचीच आम्हाला आठवण झाली!
मराठी ब्लॉग विश्व मात्र अर्थपूर्ण वगैरे लिहित असल्याने त्यांनी हा निरर्थक विषय दुर्लक्षित केला (आणि थुंकी गिळून टाकली) याचा मात्र आम्हाला अतीव आनंद झाला. :)
पण आम्ही मात्र सवयीप्रमाणे एक पिचकारी मारत आहोत. (कुत्र्याचे शेपूट! शेवटी... हम्म!)
पहिली गोष्ट अशी की राजकीय नेत्यांना मिळणार्या भारतरत्न पुरस्काराचा विचार करायचा तर प्रात:स्मरणीय बाबासाहेबांसारखी आपल्या कर्तृत्वाने, अभ्यासाने, व्यासंगाने त्या पुरस्काराचाच सन्मान करणारी राजकीय व्यक्ती सध्या भारतात नाही आणि पुढील काळात होईल की नाही याबाबतही आम्ही साशंक आहोत. त्यामुळे राजकीय नेत्यांऐवजी कलावंतांना हा पुरस्कार द्यावा अशी सुरक्षित खेळी खेळणे आम्हाला बरे वाटत आहे. त्यातही सध्याच्या पुरस्कारासाठी प्रत्येकाने आपापले घोडे स्पर्धेत उतरवलेले पाहून आम्हालाही आमची नेहमी विन मध्ये येणारी घोडी श श श शाहरूख आणि अमिताभशेठ बच्चन यांना उतरवण्याचा मोह झाला होता!
समजा उद्या अमिताभशेठला वाटले की भारतीय (म्हणजे हिंदी) चित्रपटसृष्टीची पैसे घेऊन सेवा वगैरे केल्याबद्दल आपण नाही तर निदान आपल्या राजबिंड्या वगैरे पुत्राला - अभिषेक याला - हा पुरस्कार मिळावा*. तर मुलायमसिंगांना पुरस्कार मिळेपर्यंत अमिताभशेठ थेट अशी मागणी करू शकत नाहीत. आणि आता या वयात पक्ष वगैरे बदलणे हे कजरा रे च्या तालावर नाचण्याइतके सोपेही नाही. शिवाय बच्चनशेठ व फ्यामिली यांची शारीरिक उंची जास्त असल्याने त्यांना लागणारे जास्त कपडे पाहता कपड्यांचे दुकानदार जरी त्यांच्या बाजूने उभे राहिले तरी अभिषेक महिनोन्महिने दाढीबिढी न करता तसाच घाणेरडा राहतो** आणि इतरांना दाढ्या वाढवण्यास उद्युक्त करतो हे पाहून अखिल पुणे केशकर्तनालय संघ, वस्तरा व ब्लेडचे दुकानदार वगैरे त्याला हा पुरस्कार मिळण्यास विरोध करणार की नाही?
(तुम्ही म्हणाल दाढीच्या बाबतीत शाहरुख तसा सेफ आहे. हो. मान्य! पण तो कपडे घालत नाही...)
त्यामुळे आमचा मोह आम्ही आवरत आहोत व निष्कारण वाद टाळत आहोत. कारण आम्हाला एक लख्ख युक्ती सुचली आहे!
हा सर्व वाद टाळण्यासाठी अभिषेकशेठने किंवा शाहरुखशेठने आपल्या पुत्राचे नाव 'भारतरत्न' ठेवून द्यावे आणि आपल्या गुंड्या पुत्राचा तिन्ही लोकी झेंडा लागण्याची वाट पहावी. बस्स दुसरे काही नाही. जसजसा मुलगा प्रसिद्ध होत जाईल तसतसे 'भारतरत्न अभिषेक बच्चन' किंवा 'भारतरत्न शाहरुख खान' हे नाव देखील आपोआप प्रसिद्ध होईल.
नाही का?
शेवटी भारतरत्न म्हणजे काय तर आपल्या नावाआधी लावावयाची साडेपाच अक्षरे. त्यापेक्षा आपण त्याला अधिक महत्त्व थोडीच देतो?
*गाढवाला आपले शिंगरू गोंडस वाटते अशा अर्थाची एक इजिप्शियन म्हण आम्हाला आठवली.
** एक्झिबिट ए: स्वत:च्या लग्नात सुद्धा दाढी केली नाही. शी!
इत्यलम!
Thursday, January 17
वळू
उमेश कुलकर्णी यांचा "वळू" हा मराठी चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होईल. या चित्रपटाचा प्रदर्शनपूर्व प्रीमिअर बघायला मिळाला. या चित्रपटाविषयी थोडेसे...
"वळू" ही महाराष्ट्रातील अगदी पन्नास कुटुंबांचे म्हणता येईल अशा कुसवडे गावाची कथा. गावात नेतृत्व करणारे आण्णा सरपंच आहेत. त्यांचे वर्चस्व मान्य नसणारे गावचे तरूण नेते आबा आहेत. वनअधिकार्याला मदत करण्यासाठी सदैव एका पायावर तयार असणारा जीवन्या आहे. बुडाखाली फटफटी आल्याने इंप्रेशन मारणारा शिवा आहे तर त्याच्यावर मनापासून फिदा असणारी संगी आहे. संगीचे जमलेले पाहून मत्सर वाटणारी तानी आहे तर आपल्या अवघडलेल्या गायीचे काय होईल या विवंचनेत असणारी जीवन्याची आई सखुबाई आहे. गावचे भटजी, त्यांची बायको, भटजींना नेहमी चिडवणारा सत्या आहे. या सर्वांना साथ देणारे पोपट्या, शंकर्या, गण्या, मारत्या आणि संपतराव आहेत. आणि या सर्वांच्या नियमित, शांत आयुष्यात खळबळ माजवणारा चित्रपटाचा नायक डुरक्या वळू आहे.
“बैल दिसला की 'ब्लोअर' किंवा 'गन' वापरून त्याला इंजेक्शन द्यायचे. बेशुद्ध बैलाला दोरीने बांधून घेऊन यायचे" असा दोन ओळींचा सोपा कार्यक्रम मनाशी धरून गावात वन-अधिकारी ऊर्फ 'फॉरेष्ट' (अतुल कुलकर्णी) येतो. पण आपण मनाशी आखलेला कार्यक्रम वाटतो तितका सोपा नाही हे त्याला समजू लागते. माहितीपट करण्यासाठी सोबत म्हणून आलेला त्याच्या जोडीदाराचे डॉक्युमेंटरीचे काम हे बैलाला पकडण्यापेक्षाही गावकर्यांना जास्त पसंत पडते. चित्रपटात काय काय होते हे सांगणे हा या लेखाचा उद्देश नाही. शिवाय हा चित्रपट "डुरक्या" ला पकडताना झालेला गोंधळ व त्यातून उलगडणारे गावकर्यांचे भावविश्व यापुरताच असल्याने हे सर्व येथेच सांगण्याचे कारणही नाही.
अतुल कुलकर्णी, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, अमृता सुभाष सर्वांनीच झकास काम केले आहे. म्हटलं तर साईड हीरोची पण सर्वात जास्त भावखाऊ अशी जीवन्याची भूमिका करताना गिरीष कुलकर्णींनी तर धमाल उडवली आहे. नंदू माधव आणि सतीश तारे हे असेच फारसे प्रकाशात नसणारे वीर चित्रपटात धमाल करुन जातात. सतीश तारे हा खरे तर अगदी गुणवान कलाकार. ज्यांनी त्याचे "विच्छा माझी पुरी करा" पाहिले असेल त्यांना या विनोदवीराच्या अचूक टायमिंगची प्रचिती नक्कीच आली असेल. पण दुर्दैवाने त्याला सवंग विनोदाच्याच भूमिका जास्त मिळाल्या आहेत. मात्र या चित्रपटातील छोट्याशाच भूमिकेत त्याने बहार आणली आहे. नंदू माधव आणि मोहन आगाशे यांच्या तिरकस संवांदातून एकमेकांवर चाललेली कुरघोडी पहायला तर फार मजा येते.अतुल कुलकर्णी आणि सतीश तारे यांना जास्त मोकाट सोडले तर आवरणे फार कठीण जाते पण या चित्रपटात त्यांचा तोल कुठेही सुटलेला नाही.
चित्रपटात खटकणार्या गोष्टी कमी आहेत पण तरीही काही न पटलेले.
चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेल्या "डुरक्या" वळूचे पात्र थोडेसे गोंधळवणारे आहे. "ज्युरासिक पार्क" च्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रसंगांतून आधी शेपूट, मग पाठ, नंतर वशिंड, शेवटी कपाळ असे दाखविल्यानंतर "डुरक्या"ची एक लार्जर दॅन लाईफ इमेज मनामध्ये तयार होते. अतुल कुलकर्णीच्या "काय सांगता, डुरक्या समोर दिसतो त्या बैलापेक्षा कितीतरी मोठा आहे" अशा संवादांनी त्या इमेजला खतपाणीच घातले जाते. मात्र "डुरक्या" संपूर्ण दिसतो तेव्हा भ्रमनिरास झाल्यासारखे वाटते. अर्थात वळू म्हणजे काही डायनासॉर नव्हे पण तरीही टीव्हीएस हन्क च्या जाहिरातीत दिसतो तसा उग्र रानरेडा असेल असे वाटले होते.
दुसरं म्हणजे डुरक्याचे पात्र फारच अंडरप्ले करुन रंगवल्यासारखे वाटते. डुरक्याच्या विध्वंसांचे केवळ अवशेष दिसत राहतात. पण प्रत्यक्ष हल्ला करणारा डुरक्या कधीच दिसत नाही. त्याचा हिंस्रपणाही केवळ एकदोन डुरकावण्यांमधूनच ऐकू येतो. एरवी डुरक्या अगदी प्रेमळ स्निग्ध डोळ्यांचा एक घरगुती बैल वाटत राहतो. याशिवाय डुरक्याचे भोळ्या प्रेमातून, अंधश्रद्धेतून समर्थन करणार्या बायका पाहून ही प्रतिमा अधोरेखितच होते. ;)
आणखी एक म्हणजे अतुल कुलकर्णीच्या भावाचे काम करणारा कलाकार अगदी पुस्तकात वाचल्याप्रमाणे कृत्रिम संवाद म्हणत राहतो. नशीबाने त्याला अगदीच कमी भूमिका आहे.
इतकेच.
चित्रपट तुलनेने लहान आहे. चित्रपटात एकही गाणे नाही. त्यामुळे चित्रपट कुठेही रेंगाळत नाही.ग्रामीण जीवनातील रसरंगगंधाने नटलेल्या या चित्रपटात मराठी चित्रपटातील नेहमीचेच 'अ'यशस्वी कलाकार असलेले तमाशे आणि लावण्या, एकमेकांच्या जीवावर उठलेले पाटील, अंगविक्षेप आणि द्वयर्थी, अश्लील विनोद, अर्धवस्त्रांकित कलाकारांचे आयटम सॉंग हे प्रकार नाहीत, घासून गुळगुळीत झालेला, प्रेमकहाणीसारखा विषय अगदीच तोंडी लावण्यापुरता आहे. कोणीतरी जोड्याने मुस्कटात मारल्याप्रमाणे सदैव सुतकी, गंभीर चेहरे करून वावरणार्या आणि दोन जांभया देऊन झाल्या तरी पुढचा डायलॉग म्हणतील तर शपथ असल्या कलाकारांची तथाकथित कलात्मकता नाही. मात्र हे सर्व नाही म्हणून चित्रपट चांगला आहे असे म्हणणे चित्रपटासाठी फारच अन्यायकारक ठरेल. चित्रपटाचे मुख्य यश आहे ते अगदी चुरचुरीत, चटपटीत ग्रामीण मराठीतील संवाद. एकही शब्द खाली पडू न देता हजरजबाबीपणाने मिळणारे प्रतिटोले. या संवांदातून उलगडणारे गावकर्यांचे भावविश्व. त्यांची निरागसता, डॉक्युमेंटरी व वन-अधिकार्यांच्या कामाबद्दलची उत्सुकता, आण्णा आणि आबांमधली स्पर्धा आणि गावकर्यांची भोळी श्रद्धा. एका वाक्यात सांगायचे झाले तर शंकर पाटलांच्या एखाद्या कथेप्रमाणे अगदी "जमलेला" हा चित्रपट आहे.
निखळ मनोरंजन - पैसे वसूल - करण्यात हा चित्रपट अगदी यशस्वी होतो. चित्रपटातील विनोदाची जातकुळी वेगळी असल्याने अगदी सात मजली हास्य वगैरे प्रकार अनुभवायला मिळणार नाहीत पण मनापासून खळखळून हसवण्यात चित्रपट कुठेही कमी पडत नाही. वेगवान हाताळणी, वेगळा विषय, प्रत्येक फ्रेममध्ये नवेपणा, ताजेपणा असलेला असा कुठेही तोल न जाणारा एक निर्मळ विनोदी चित्रपट पाहिल्याचा आनंद हा चित्रपट पाहिल्यावर नक्की मिळेल.
चित्रपटाविषयी अधिक माहिती http://www.valuthefilm.com/ येथे पहा.

