स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त भाषाशुद्धीकरणाच्या विषयाची पुन्हा एकदा उजळणी झाली. माझे मित्र चित्त यांनी काही दिवसांपूर्वी गप्पा मारताना मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे लेखन वाचा असे सांगितले होते. राजाध्यक्षांच्या 'भाषाविवेक' या पुस्तकातील हे काही निवडक उतारे भाषाशुद्धीचे खूळ उतरवतील का?
मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ १९व्या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते. शेवटी आपले लेखन ज्यांच्यासाठी त्या लोकांना ते कितपत समजेल ही शंका आड आली असणार. पण भाषाशुद्धीकरणाची चळवळ थंडावली, तिचे उघड उद्योग संपले, तरी आपल्या स्वातंत्र्यचळवळीच्या भाषेत ती 'भूमिगत' झाली. परिणामी ती कीड लागल्या प्रमाणे पसरली. बर्याच लेखनाच्या मुळांना ती कीड लागली. अनेकदा त्या लेखकांच्या नकळत! आणि 'शिष्ट' लेखकांमुळे ती लागण स्वत:ला लेखक न समझणार्या वाचकांपर्यंत पोचली. कृत्रिम, अर्थहीन आणि जडजंबाल लेखन त्यांना तसे वाटेनासे झाले. आपल्या भाषेबाबतची संवेदनाच क्षीण झाली आणि ती पुढे नष्ट झाली.
या भाषाशुद्धीचळवळीचे प्रणेते त्या काळी नावामागे बॅ. हा बॅरिस्टर या इंग्रजी पदवीचा संक्षेप लावणारे आणि आता 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी लावले जाणारे वि. दा. सावरकर. या भाषाहोमात भस्म करायचा संकल्प होता तो मराठीत आलेल्या फारसी व इंग्रजी शब्दांचा. या संकल्पामागची चेतना राजकीय होती, तशीच ती धार्मिकही. पण राजकीयपेक्षा मुख्यत्वे धार्मिक. एक तर इंग्रजी शब्द लेखनात येत ते तुलनेने फारच थोडे. फारसी कुळीतलेच फार. आणि इंग्रजी शब्द जेमतेम शतकभरात आलेले तेवढेच. मात्र फारसी शब्द कित्येक शतके ठाण मांडून बसलेले. अगदी शिवशाहीपूर्वीपासून. आणि एवढे एकजीव झालेले की तीक्ष्ण नाकाचे व्युत्पत्तिशोधक सोडल्यास ते शब्द परके आहेत याचा वाचणार्यांना, लिहिणार्यांना, वापरणार्यांना संशयदेखील येऊ नये.
पण ही शुद्धीकरणाची चळवळ जोरात आल्यावर काही घ्राणेंद्रिये (म्हणजे देशी भाषेत नाके) अधिकच तिखट झाली. आणि हाय खाल्लेल्या म्लेंच्छ सैनिकांना जळीस्थळी संताजी व धनाजी दिसू लागले तशी या शुद्धीसैनिकांना म्लेंच्छ व यवनी शब्द दिसू लागले. या सर्वच सैनिकांना भाषाशास्त्राची तालीम (हा देखील एक म्लेंच्छ शब्दच) मिळालेली होती असे नाही. तिची भरपाई करायला भाषाभिमान समर्थ होता!
पुढे आपले एक मोठे कवी माधव जूलियन यामध्ये उतरले. फारसीचा विटाळ झालेल्या अनेक कविता त्यांनी संस्कृतच्या फवार्यांनी सोवळ्या करून घेतल्या. याशिवाय भाषाशुद्धीकरणाचा प्रचारही केला. मात्र पुढे १९१७ मध्ये त्यांनी आपल्या एका पत्रात लिहिले "संस्कृत शब्दांची निष्कारण गर्दी निषेधार्ह आहे. या लोकांना संस्कृत भाषा अवगत असावी. पण स्वत:च्या मराठी भाषेशी नीट परिचय नसावा याची कीव येते! बोलीतील सुलभ शब्दांकडे आपले दुर्लक्ष होते." १९२१ साली त्यांनी "प्रत्येक मराठी शब्दाचे संस्कृतशी नाते जोडण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न धिक्कारला."
अर्थात हे शुद्धीकरणाचे खूळही संपूर्णत: देशी नाही! साहेबाला त्याने आधी पछाडले होते. पहिल्या महायुद्धानंतर, इंग्रजीतील 'नेटिव' (ऍंग्लो सॅक्सन कुळातले) शब्द कटाक्षाने वापरून फ्रेंचद्वारा आलेल्या लॅटिन कुळीतल्या व तशा शब्दांना नाकारायचे अशी टूम निघाली होती. भाषा साधी सोपी करावी हा त्यामागचा हेतू. आपले शुद्धीकरण मात्र त्याच्या अगदी उलट जाणारे.
भाषाशुद्धीचा हा आग्रह प्रामुख्याने हिंदीच्या प्रगतीलाही भोवला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय व्यवहाराला सोयीची
म्हणून वापरल्या जाणार्या इंग्रजीचा वरचष्मा उतरवण्यासाठी तिच्याजागी कोणती भाषा आणायची असा प्रश्न पडल्यावर संख्याबळाच्या आधारावर हिंदीची वर्णी लागली. पण कोणती हिंदी? गांधीजींचा कौल पडला साध्या सोप्या 'खडीबोली'च्या बाजूने . मात्र पंडित मालवीयांसारख्या काही पुढार्यांच्या हिंदीच्या पुनरुज्जीवनवादी संस्कृतीकरणामुळे, तापलेल्या धर्मनिष्ठेमुळे. भावी सत्तेच्या गाजरामुळे, संस्कृतचे रंगरोगण केलेल्या हिंदीची घोडदौड सुरू झाली. सत्ता आल्यावर हिंदीच्या उद्धारासाठी पैशांची लयलूट झाली. इतर भाषांच्या वाट्याला कंजूष भिक्षा आली.
डॉ. कालेलकर यांच्या 'भाषा आणि संस्कृती' या विद्वत्ता, स्पष्टवक्तेपणा आणि विषयोचित विनोद यांच्या मेळाने फार वाचनीय झालेल्या पुस्तकातील काही वाक्ये इथे देतो. "इंग्रजीपेक्षाही कठीण अशी ही शुद्ध नवमराठी कित्येकदा इतकी दुर्बोध आहे की ती कळण्यासाठी ती ज्या मूळ इंग्रजीचे भाषांतर आहे तिकडे वळल्यावाचून गत्यंतर नसते... लोकांच्या माथी एक अगदी नवी, बोजड भाषा मारण्याचा जो प्रयत्न झाला तो फसला... 'सरकार' हा शब्दच पाहा. कोट्यवधी लोक अगदी सहजपणे हा शब्द वापरतात. मात्र त्याच्या जागी संस्कृतातून आलेला 'शासन' हा शब्द! मग त्याला साथीदार म्हणून 'शासकीय' 'प्रशासनिक' हे शब्द... 'सरकारी छापखाना' असे म्हणताच अंगावर सांडपाणी पडले असे वाटणार्या लोकांनी 'शासकीय मुद्रणालय' हा शूचिर्भूत पवित्र प्रयोग चालू केला आणि मराठीपासून सामान्य जनता कशी दुरावेल याची काळजी घेतली.
भाषेच्या बाबतीत शुद्धीकरण ही शास्त्रबाह्य कल्पना आहे. धर्माभिमान, खोटा स्वाभिमान, उच्चनीचतेच्या कल्पना... स्वत:ला श्रेष्ट न समजणार्या वर्गाची भावना अशा कारणांमुळे लोक शुद्धीकरणाकडे वळतात. "
याउलट गुजरातेतील बडोदे संस्थानात एके काळी मराठी व इंग्रजी या कारभाराच्या भाषा होत्या. त्याऐवजी लोकांची भाषा गुजराती ही कारभारासाठी वापरण्याचा गायकवाडांनी निर्णय घेतला. आणि त्यातील परभाषिक फारसीसारखे शब्द काढण्याचा अडाणी खटाटोप न करता कारभार व्यवस्थितपणे चालला.
पण सयाजीरावांच्या या विचारावर एका शुद्धीकारक मराठी पंडिताने आक्षेप घेतला म्हणे: "गुजराती ही क्षुद्र भाषा! मराठीत मुखकमल, चरणकमल असे म्हणतात. पण गुजरातीत तसे काही नाही!"
मराठी भाषा 'उच्च' करण्याची केविलवाणी धडपड ज्यांनी आरंभली त्यांनी तिला घसरणीला लावले. उदा हे काही शब्द पहा: रेडिओला सांवहिक. वनस्पतिशास्त्राला: औद्भिदशास्त्र. लंबगोलाला: विवृत्ताकृति. 'अवलंबनपर्णोद्गमसूत्र हा जबडातोड शब्द कशासाठी वापरला आहे कोण जाणे! एका विदुषीने Honeysuckle या शब्दाला सामान्य माणसे वापरत असलेल्या 'फुलचुखी' या सोप्या शब्दाऐवजी मधुचोष्यक हा शब्द सुचवला. :D
Thursday, May 29
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

1 प्रतिसाद:
मजा आली. मीही प्रशासनात सॉरी सरकारी नोकरीत असल्यामुळे हे चांगलेच भोगत असतो.
टिप्पणी पोस्ट करा