
टिंग्या हा चित्रपट काल पाहिला आणि कृतज्ञता म्हणून थोडेसे लिहावे वाटले.
शेतात काम करणारा चितंग्या बैल रुतून बसल्यामुळे औताला जोडायला आता दुसरा बैल नाही. घरी बटाट्याचं बियाणं तर येऊन पडलं आहे. लवकर कामं आटपली नाहीत तर मोलामहागाचं बियाणं खराब होईल. याआधीच थकलेल्या कर्जाच्या व्याजाचेही हप्ते पुरते फिटलेले नाहीत. कुठेही मदत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. किंबहुना आपल्या मेव्हण्याकडे असलेला ट्रॅक्टर मिळवण्याचे व्यर्थ प्रयत्नही करून झाले आहेत.
आमच्या वस्तीत करतो सूर्य टाळाटाळ देवा
गोठला आहे कधीपासून येथे काळ देवा
कोसळाया लागले आहे पुन्हा दाही दिशांनी
बांधले कंत्राटदाराने कुण्या आभाळ देवा?
गोठला आहे कधीपासून येथे काळ देवा
कोसळाया लागले आहे पुन्हा दाही दिशांनी
बांधले कंत्राटदाराने कुण्या आभाळ देवा?
चित्तरंजन भटांच्या या ओळींची आठवण व्हावी अशी सगळी परिस्थिती. आता या शेतकर्याकडे चितंग्याला विकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. पण चितंग्यामध्ये गुंतलेले टिंग्याचे आतडे त्याच्या पायात अडकत आहे. बैलाला बरे करायला थेट ओतूरपर्यंत धावत जाऊन येणारा टिंग्या त्याच्या जिवाभावाच्या बैलाला कसायाच्या हाती देण्यास राजी होणे शक्यच नाही.
समोरच्या घरातली नानी आता म्हातारी झाली, ती देखील काम करत नाही. पण मग तिला कोणी कसायाला का विकत नाही? चितंग्यालाच का विकायचे या प्रश्नाचे उत्तर टिंग्याला समजत नाही.
गावाकडच्या छोट्या शेतकर्यांची परिस्थिती. हिंदू आणि मुसलमान शेजार्यांमधले घरगुती कौटुंबिक संबंध, परिस्थितीमुळे भेदरलेल्या या दोन कुटुंबांचे जीवन शैलीदार ग्रामीण भाषेतील संवादांद्वारे आपल्यासमोर सादर होते. ग्रामीण जीवनाचे सगळे रंग अगदी अनोख्या पद्धतीने हाडवळे यांनी चित्रपटात भरले आहेत. चित्रपटातील भाषा ही माझ्या गावाकडची बोलीभाषा
चित्रपटातल्या अगदी छोट्या छोट्या स्ंदर्भातून ग्रामीण जीवनाचा पोत उलगडत जातो. ट्रॅक्टर आणायला बहिणीकडे गेलेला गेलेला बाप घरी येताना फक्त केळीचा एक घड घेऊन परत येतो. हे दृश्य अगदी आतपर्यंत हलवून टाकणारे आहे. वांझोटेपणाचा शाप मिळाल्याने सवतपण भोगावे लागणारे त्याची बहीण, सवत आल्याने तिला कुटुंबात काहीही स्थान राहिलेले नाही. मात्र तिच्या मायेचा झरा आटलेला नाही. हे सगळे संदर्भ केवळ एका छोट्याश्या दृश्यातून व्यक्त होतात.
चित्रपटाच्या सुरुवातीला हातात बॅटसारखे दिसणारे एक फळकूट घेऊन नाचत येणारा टिंग्या. बटणं नसल्याने मागे उडणार्या शर्टातून दिसणार्या त्याच्या बरगड्या हे दृश्य असेच मनावर ओरखडा उमटवणारे आहे. टिंग्याचे कुपोषित शरीर आणि त्याच्या हातातली बॅट याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो.
'तिन्ही सांजेला उंबर्यावर बसू नये. ही लक्ष्मीची यायची वेळ असते.' या आईच्या प्रश्नाला 'लक्ष्मी म्हणजे काय आई?" या टिंग्याच्या उत्तर नसलेल्या प्रश्नाचे दृश्यही असेच.
खड्ड्यात पडलेल्या बैलाला बाहेर काढण्याचा प्रसंग काय किंवा बैल विकल्यानंतर घुंगराचा पट्टा स्वतःच्या गळ्यात घालून येणारा टिंग्या काय किंवा शेवटचा क्षण जवळ आल्याने अहेवपणाचे सगळे दागिने घालून आता शांतपणे मृत्यूची वाट पाहणार्या नानीच्या मृत्यूचा प्रसंग काय. हा सगळा चित्रपटच असा अगदी आतपर्यंत ढवळून आणणारा आहे.
ंटिंग्याचं काम करणारा शरद गोयकर हा मुलगा तर अफलातून. अनेक किंग, सुपरस्टार, हार्टथ्रॉब इत्यादी मंडळींनी त्याचे पाय धूवून पाणी प्यावे. या मुलाचे विलक्षण बोलके डोळे, गलबलून टाकणारं रडणं, शरीराचे हावभाव आणि बोलीभाषेतील संवाद हे केवळ अवर्णनीय आहेत. चित्रपटात असलेलं 'माझं आभाळ तुला दे हे असंच अत्यंत थोर गाणं आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला टिंग्याचा अवखळपणा, निरागसता अधोरेखित करणारं हे गाणं चित्रपटात नंतर वेगवेगळे अर्थ घेऊन समोर येतं.
टिंग्या हा एक हादरवून टाकणारा अनुभव आहे. एका लहान मुलाचे आपल्या बैलावर असलेले प्रेम आणि परिस्थितीमुळे तो बैल कसायाला विकावा लागत असल्याने त्या मुलाचे कोसळत जाणारे निराग भावविश्व, केवळ हाच चित्रपटाचा विषय नाही. जागतिकीकरणामुळे ढवळून निघणार्या आपल्या समाजात होणारे बदल, या बदलांशी जुळवून घेण्याची संधीच न मिळाल्यामुळे एका वस्तीतील कुटुंबाची होणारी ससेहोलपट. परिस्थितीशी अपरिहार्यपणे, निमूटपणे चाललेला त्यांचा लढा. अशा परिस्थितीत देखील आपला आत्मसन्मान न गमावता उभे राहण्याचा प्रयत्न. आयुष्याच्या रखरखाटातही मायेचा ओलावा न गमावण्याची त्यांची वृत्ती. साध्या सोप्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा समजूतदारपणा. या सर्व गोष्टी चित्रपटातून ठळकपणे सामोर्या येतात.
विकासाच्या लखलखाटामुळे आपले डोळे इतके दिपले आहेत की अशा यातना भोगणारे अनामिक आपल्याला आता दिसतच नाहीत. आपण अद्यापही जिवंत असलो तर निदान हा चित्रपट पाहून त्यांच्या परिस्थितीच्या जाणीवेने अशांत व्हावे. आपल्याच आयुष्याबाबतची आपली समज वाढवून घ्यावी इतकी अपेक्षा करणेही फार होईल.
