रेडिओ सिटी सुरू झाल्यामुळे आता रेडिओ मिरचीचे खंग्री बूच लागले आहे. वैतागलेला श्रोतावर्ग टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी त्यांची कंबर कसून प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे 'मराठी' गाणी ऐकवणे हा!
खरं म्हणजे रेडिओ मिरचीवर मराठी गाणी सुरू झाल्याचे मित्राकडून ऐकल्यावर मी बेशुद्ध पडलो होतो. पण चप्पल हुंगवणे, नाकाला कांदा लावणे वगैरे प्रकारांऐवजी रेडिओ मिरची मला ऐकवल्यावर परत शुद्धीवर आलो. नंतर आत्मक्लेश सहन करून एक पूर्ण दिवस रेडिओ मिरचीची गाणी ऐकली पण त्यात मराठी गाणं कुठंच ऐकायला मिळालं नाही.
थोडं खोदून खोदून चौकशी केल्यावर कळलं की सकाळी ५ ते ७ या वेळात 'काही' मराठी गाणी ऐकवली जाणार आहेत. अधिक खोलात गेल्यावर असंही कळलं की रेडिओ मिरचीची आधीची योजना ही रात्री १ ते ३ किंवा रात्री ३ ते पहाटे ५ या वेळात मराठी गाणी प्रसारित करण्याची होती. पण या वेळामध्ये काही गुरखे, रात्रपाळीवरचे कामगार वगैरे जागे असतात. मात्र पहाटे ५ ते ७ या साखरझोपेच्या काळात एकही माणूस जागा असणार नाही याची त्यांनी खात्री करून घेतली. विशेषत: इतक्या उन्हाळ्यात पहाटे जरा गार हवा असल्यावर चांगली झोप लागते तेव्हा ५ ते ७ ही ओळ गाण्यांच्या प्रसारणासाठी उत्तम.
असो.
भणभण गाणी, उबगवाण्या संतापजनक जाहिराती आणि तोंडशिंदळीचे निवेदक असल्यावर रेडिओ मिरची स्वत:हून ऐकणार्यांबद्दल काही ठेवणीतले शब्द वापरता येतील. पण मराठीच्या टवाळ्या करून हिंदीच्या चोळ्या धुणार्या या तुंग्रुस रेडिओ मिरचीवाल्यांबद्दल आमच्या तुकोबांनी एक अभंग आधीच लिहून ठेवला आहे. आम्हाला तो अभंग फार्फार आवडतो.
संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥
संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
वा!
खरं तर गुटखासंप्रदायी थुंकसैनिकांनी एखादे निषेधात्मक पाणीदार आंदोलन जाहीर करायला पाहिजे.
Thursday, April 24
रेडिओ मिरची आणि संत तुकाराम
Labels:
पिंक,
रेडिओ मिरची
