प्रिय राजसाहेब,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर मनात आलेल्या काही असंबद्ध प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत.
सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की कोणत्याही व्यक्तीने परप्रांतात कायमच्या किंवा दीर्घ वास्तव्यासाठी राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक लोकांच्या संस्कृतीशी मिळून मिसळून राहणे. त्यांची भाषा आत्मसात करणे. त्यांना कमीतकमी त्रास होईल असे आपले वर्तन ठेवणे. आपला वेगळेपणा किंवा वर्चस्व सतत अधोरेखित करत राहण्याऐवजी त्यांच्याशी समरस होऊन राहणे हे तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे मला मान्य आहेत. किंबहुना कोणत्याही शहाण्या आणि समजूतदार माणसाला ते पटण्यासारखे आहे.
तुम्ही सुरु केलेल्या आंदोलनामागच्या भावनांना सामान्य मराठी माणसाकडून सक्रिय प्रतिसाद मिळत नसला तरी तो तुमच्या भावनांशी सहमत आहे हे सहज दिसते. मात्र हे आंदोलन ज्या पद्धतीने चालले आहे ते त्याच्यासाठी निश्चितच तापदायक आहे. आंदोलनाच्या स्वरुपामुळे हे मूलभूत प्रश्न जाणून घेण्याऐवजी अमिताभ बच्चनचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य व त्याला तुमच्या वक्तव्यानंतर थंडी वाजणे असल्या दुसर्याच बिनमहत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधले जाऊन या प्रश्नाचा विचका होऊ नये ही माझी इच्छा आहे.
१. मनसेच्या आंदोलनाच्या वेळी इलेक्ट्रॉनिक - विशेषत: हिंदी - प्रसारमाध्यमांनी या आंदोलनाला दिलेले मराठी विरुद्ध उत्तर भारतीय किंवा मराठी विरुद्ध इतर भारतीय असे स्वरुप पाहता या आंदोलनामुळे मराठी माणसाबद्दल इतरभाषकांच्या मनात कायमस्वरुपी अढी निर्माण होईल असे वाटते. जे मराठी माणसाच्या नक्कीच हिताचे नाही. यापुढील कोणतेही आंदोलन करताना ते लोकशाही, विधायक मार्गाने व महाराष्ट्रातील मालमत्तेचा विनाश न करता करणे आवश्यक नाही का? अमराठी प्रसारमाध्यमांमध्ये तुमच्या आंदोलनाची केवळ एकच बाजू दिसते. दुसरी बाजू व आंदोलनामागच्या भावनाही अमराठी माध्यमांमार्फत सर्वांपर्यंत पोचवाव्यात यासाठी मनसे काय करणार आहे?
२. परप्रांतातून महाराष्ट्रात येणारे लोक मराठीत बोलत नाहीत हा तुमचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्रातील मराठी लोक मराठी माणसांशी तरी मराठीत बोलतात का? मराठी जनांचा मराठी बोलण्याबाबतचा न्यूनगंड अनाकलनीय आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वत:हून मराठीत बोलले तर आपल्याला फार मोठी शिक्षा होणार आहे अशा अविर्भावातून चालणारे मराठीजनांचेच वर्तन पाहता इतरभाषक मराठीत बोलत नाही यात काय आश्चर्य आहे? आता मराठी माणसांवर हल्ले करायचे का?
३. महाराष्ट्राची व्यवहाराची भाषा हिंदी होण्याचा धोका तुम्ही या आंदोलनात अधोरेखित केला आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांना टीव्हीवर जवळून पाहता आले. शिरीष पारकर वगळता एकाही नेत्याला इंग्लिशमध्ये व्यवस्थित बोलता येत नाही. इंग्लिशमधून विचारलेल्या प्रश्नांना हिंदीत उत्तरे देण्याची महाराष्ट्रीय नेत्यांची परंपरा मनसेनेही चालू ठेवली आहे यावर तुमचे काय मत आहे?
४. कमी काळासाठी महाराष्ट्रात वास्तव्याला आलेल्या अमराठी लोकांशी आपल्याला इंग्लिश येत नसल्यास कोणत्या भाषेत बोलावे? महाराष्ट्रातील इंग्लिश व मराठी दोन्ही भाषांच्या शिक्षणाचे दिवाळे निघालेले आहे याची तुम्हाला कल्पना नाही का? व्यवस्थित इंग्लिश न येण्याचा न्यूनगंड आणि मराठी बोलण्याची लाज वाटणे या दोन्हींमुळे मराठी माणूस हिंदीतून बोलतो हे आपल्याला माहिती नाही का?
५. भोजपुरी चित्रपटांच्या प्रदर्शनावर हरकत घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटांचे रीळ जाळले. परप्रांतातून महाराष्ट्रात आलेला माणूस त्याची भाषा, संस्कृती जपण्याचा जीवापाड प्रयत्न करतो. भोजपुरी भाषेतील चित्रपट आवडीने बघतो. किती मराठी माणसे आवडीने मराठी चित्रपट पाहतात? दीपक सावंत यांच्यासारख्या मराठी माणसाला मराठीऐवजी भोजपुरी चित्रपट निर्माण करावेत असे का वाटते?
६. तुम्ही सुरू केलेले आंदोलन पुढे काय वळण घेणार आहे याची कोणालाच कल्पना नाही. मात्र या आंदोलनानंतर महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या अशिक्षित/अर्धशिक्षित हिंदी भाषकांचे ध्रुवीकरण होऊन समाजवादी पक्षासारख्या मतलबी पक्षाची एकगठ्ठा मतपेढी तयार होईल. याला मनसेचे काय उत्तर आहे?
७. मराठी तरूणांची इतर भाषकांइतके कष्ट करण्याची तयारी आहे का? याबाबतीत मला आलेले बहुसंख्य अनुभव उत्साहवर्धक व आवर्जून सांगावेत असे नाहीत. दुकानदाराने गिर्हाईकांशी नम्रपणाने बोलावे. सस्मित व हसतमुख सेवा द्यावी. गिर्हाईकाला आपलेसे करण्यासाठी दुकानदाराला थोडा त्रास सहन करावाच लागतो यासारखी मार्केटिंगची मूलभूत तत्त्वे मराठी माणसाला शिकवण्यासाठी मनसे काय करणार आहे? मराठी तरुणांना नोकरी मिळण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन मनसे करणार आहे का? याबाबतीत मनसेचे काय धोरण आहे?
८. संस्कृती या शब्दाविषयी मनसेच्या नक्की काय कल्पना आहेत? गणपती उत्सवात मोठमोठ्याने लाऊडस्पीकर्स लावले की संस्कृतीसंवर्धन झाल्यासारखे मराठी माणसाला वाटते. केवळ उत्सव साजरे करून संस्कृती संवर्धन होते का? साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्य अशा वेगवेगळ्या क्षेत्राबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांचे काय धोरण आहे? मनसेचे किती कार्यकर्ते कोणत्या प्रकारची पुस्तके वाचतात?
९. मराठी माणसाने योग्य प्रकारे भरपूर पैसा कमवावा. स्वत:च्या पायावर व्यवस्थित उभे रहावे. शेअर बाजार, म्युच्युअल फंडांसारख्या माध्यमातून गुंतवणूक करून उत्तम परतावा मिळवावा ही आर्थिक साक्षरता मराठी माणसात रुजण्यासाठी मनसे प्रयत्न करणार का?
१०. महाराष्ट्रातील शहरांपेक्षा दक्षिण भारतातील कित्येक शहरांमध्ये महिलांना व मुलींना सुरक्षित वाटते. बसप्रवासासारखे अगदी साधे उदाहरण घेतले तरी चेन्नई, हैदराबादसारख्या शहरात स्त्रियांना बसण्यासाठी असलेल्या वेगळ्या आसनांवर पुरूष बसत नाहीत. बसले तरी कंडक्टर त्याला हरकत घेतात. चढण्या उतरण्यासाठी स्त्रियांना व पुरुषांना वेगवेगळे दरवाजे आहेत. जेणेकरून स्त्रियांना कमीतकमी त्रास होईल. अशा प्रकारची समजूतदार, शांत पद्धत महाराष्ट्रात रुजवणार का? की इथेही मनगटाच्या जोरावरच प्रत्येकाने पुढे जायचे?
या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर कदाचित हवी ती प्रसिद्धी मिळणार नाही पण हवा तो परिणाम नक्कीच साधला जाईल असे मला तरी वाटते. तुम्हालाही तसे वाटते का?
तुमचाच ,
आजानुकर्ण
Saturday, February 9
राज ठाकरे यांना अनावृत्त पत्र
Labels:
मनसे
