Friday, February 15

भाषेचे संरक्षण

मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे संरक्षण करण्याची टूम सर्वत्र निघाली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफिक स्ट्डीज, बेंगलोर चे संचालक सी. बालचंद्रन यांचे कन्नड भाषेबाबतचे विचार असलेला एक इंग्लिश लेख मित्राने इमेल द्वारे पाठवला होता. 'घरोघरी मातीच्या चुली' या न्यायाने हेच विचार मराठीलाही लागू पडतात असे वाटले. त्याचा हा स्वैर अनुवाद.

७४वे कन्नड साहित्य संमेलन उडुपी येथे झाले. संमेलनात चर्चिलेले विषय आणि शेवटी काढलेला निष्कर्ष हे पूर्णपणे अपेक्षितच होते. कन्नड भाषेचे 'रक्षण' करा. कन्नड भाषेला 'जतन' करा. कन्नड भाषेला 'वाचवा'. अशा हजारो घोषणा देण्यात आल्या.

अशा प्रकारच्या घोषणा या साधारण दोन प्रकारच्या व्यक्तींकडून देण्यात येतात. १. बुद्धीमंत २. बुद्धीमंद

बुद्धीमंत हे स्वत:ला हुशार आणि विद्वान मानत असले तरी भाषा वाचवणे म्हणजे नक्की काय करणे याबाबत त्यांचे स्वत:चेच विचार स्पष्ट नसतात. भाषा वाचवण्यासाठी केलेल्या उपायांचे परिणाम काय होतील हे पाहण्याइतकी दूरदष्टी त्यांच्याकडे नसते. तर बुद्धीमंद लोक हे त्यांचे भाषेविषयीचे तथाकथित प्रेम आणि अभिमान हा वेगवेगळ्या सभा, मोर्चे आणि इतर भाषांमधील फलक फाडणे, त्यांना काळे फासणे. बसवर दगडफेक करणे किंवा स्वत:ला अधिक शूर मानत असल्यास ती बस जाळून टाकणे यासाठी वापरतात.


भाषा ही संस्कृतीचे वाहन आहे. संस्कृतीचा प्राण आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेले विचार, ज्ञान हे भाषेमध्ये प्रकट होते. मूर्त स्वरुप घेते. हे विचार पुढे अनेक पिढ्यांमध्ये आणि प्रदेशांमध्ये संक्रमित होतात. याच विचारांमध्ये समूहजीवन आणि वैयक्तिक आयुष्य प्रभावित करण्याची, त्याला दिशा देण्याची ताकद असते. कुवेम्पु, पंपा, बेंद्रे, बसवेश्वर, पुरंदरदास, कारंथ आणि इतर अनेकांचे विचार आपल्याला उपलब्ध आहेत याचे बहुधा सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी कन्नड भाषेच्या माध्यमातून आपले विचार प्रकट केले.

'जतन', 'संरक्षण', 'वाचवा' या शब्दांचे नक्की अर्थ काय आहेत? सर्व व्यवहार हे कन्नडमधूनच व्हावेत? जगातील सर्व तांत्रिक ज्ञान कन्नडमध्ये भाषांतरित करावे? कन्नड भाषेच्या किती तथाकथित रक्षणकर्त्यांना मद्य आणि मध्य यामधला फरक माहिती आहे? मोले-मोळे किंवा मले-मळे या शब्दांमधले फरक ते छातीठोकपणे सांगू शकतात का? अतिशय घाणेरड्या कन्नडमध्ये हे लोक देत असलेल्या घोषणा पाहून मला त्यांचा तिरस्कार वाटतो.

कन्नड वाचविण्याच्या नावाखाली एकामागून एक येणारे राज्यकर्ते शिक्षणव्यवस्थेशी खेळ करत आहेत. शालेय शिक्षण केवळ कन्नड भाषेतून असावे असे फतवे काढत आहेत. कोणतेही नियंत्रण नसलेल्या अशा निर्णयांमुळे आपल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना तांत्रिक व शास्त्रीय ज्ञान योग्य प्रकारे कसे मिळेल? अशा निर्णयांमुळे आपल्या मुलांचे किती नुकसान होत आहे याची आपल्याला कल्पना आहे का?

कन्नड वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकडे पाहिल्यास, कन्नड प्रसारमाध्यमांमध्ये मी रोज पाहतो तेव्हा एकही व्यक्ती आपले संपूर्ण वाक्य शुद्ध आणि योग्य कन्नडमध्ये बोलत नाही. वाक्यातील महत्त्वाचा गाभा हा इंग्लिशमध्ये असतो. मुलाखतकार, निवेदक, कलाकार सर्वांची हीच स्थिती आहे. कन्नड चित्रपटांची नावे इंग्लिशमध्ये असतात. चित्रपटप्रसारासाठी देण्यात येणार्‍या मुलाखती इंग्लिशमध्ये किंवा कांग्लिशमध्ये असतात. चित्रपट कलाकारांची नावेही इंग्लिशमध्ये असतात. अशा वित्तपिपासू लडदू प्रसारमाध्यमांमुळे कन्नड भाषा जतन होत आहे का? माझ्या मते तर अशा गोष्टींमुळे एका सुंदर भाषेची आणि त्याच्याशी निगडीत प्रगतीशील संस्कृतीची आपण विटंबना करत आहोत.


कर्नाटकात बाहेरून येणार्‍या लोकांना कन्नड शिकावे असे वाटण्यासाठी आपण काय करत आहोत? अशा लोकांशी असहकार पुकारणे, व्यवहार करण्यास नकार देणे ह्या गोष्टी तर अतिशय धोकादायक आहेत. अशा गोष्टी केल्याने आपली संस्कृती, प्रतिमा आणि अर्थकारणावर खूप वाईट परिणाम होईल. कन्नड भाषा फुलण्यासाठी अधिकाधिक लोकांनी ती प्रेमाने, आनंदाने आणि उत्साहाने वापरणे आवश्यक आहे.

जागतिकीकरण ही क्लिष्ट प्रक्रिया आहे. नव्या विचारांसाठी कवाडे उघडताना आपल्याला आपल्या श्रद्धा आणि जुने विचार यांचे कठोर परीक्षण करणे हे क्रमप्राप्त असते. सध्या अस्तित्वात असलेल्या संस्कृतीमध्ये तणावही निर्माण होत असतात. मात्र असे तणाव आणि प्रश्न निर्माण झाल्यावर आपण काय करतो हे खूप महत्त्वाचे आहे. या परिस्थितीचा अनुकूल वापर करून घेऊन आपली प्रगती कशी होईल हे पाहण्यासाठी स्वत:मध्ये बदल करायचे की स्वत:ला जगापासून कोंडून घेऊन नंतर दगडफेक करायची?

कन्नड ही प्रादेशिक भाषा आहे. तिला भौगोलिक मर्यादा आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, अर्थकारणामध्ये - कर्नाटक असो वा बाहेर - इंग्लिश ही अत्यावश्यक भाषा आहे. कन्नडचा वापर करून आपण खूप मोठी तांत्रिक आणि शास्त्रीय मजल मारू शकू हे मानणे मूर्खपणाचे आहे.

बहुभाषिक असण्याचे अनेक फायदे आहेत हे सर्वच जण जाणतात. मी त्यात काही नवीन सांगत नाही. मात्र नवीन भाषा शिकण्याची प्रक्रिया जर आनंददायी आणि स्वेच्छेने केली असेल तरच ती व्यवस्थित होऊ शकते. कन्नड भाषेला 'जगू' द्या. 'जगवू' नका. कन्नड वापरणे ही 'कूल थिंग' होणे आवश्यक आहे. मात्र ते केवळ प्रेमानेच होऊ शकते. दबावाने नाही.

हे होण्यासाठी कर्नाटक सरकार महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आपल्या मुलांना काही 'विशेष कायदा' करून नोकर्‍या मिळवून देण्यापेक्षा त्याची क्षमता, गुणवत्ता कशी वाढेल याकडे सरकारने लक्ष द्यावे.