Sunday, January 20

भारतरत्नचा घोळ आणि उपाय

एक तर 'भारतरत्न' च्या वादाबद्दल (मराठी ब्लॉगांव्यतिरिक्त इतरत्र) इतकं सारं लिहून झालं आहे की आमच्या एका मित्राकडे वाचलेल्या "बोलणे थोडे पण थुंकी फार" या वाक्प्रचाराचीच आम्हाला आठवण झाली!

मराठी ब्लॉग विश्व मात्र अर्थपूर्ण वगैरे लिहित असल्याने त्यांनी हा निरर्थक विषय दुर्लक्षित केला (आणि थुंकी गिळून टाकली) याचा मात्र आम्हाला अतीव आनंद झाला. :)

पण आम्ही मात्र सवयीप्रमाणे एक पिचकारी मारत आहोत. (कुत्र्याचे शेपूट! शेवटी... हम्म!)


पहिली गोष्ट अशी की राजकीय नेत्यांना मिळणार्‍या भारतरत्न पुरस्काराचा विचार करायचा तर प्रात:स्मरणीय बाबासाहेबांसारखी आपल्या कर्तृत्वाने, अभ्यासाने, व्यासंगाने त्या पुरस्काराचाच सन्मान करणारी राजकीय व्यक्ती सध्या भारतात नाही आणि पुढील काळात होईल की नाही याबाबतही आम्ही साशंक आहोत. त्यामुळे राजकीय नेत्यांऐवजी कलावंतांना हा पुरस्कार द्यावा अशी सुरक्षित खेळी खेळणे आम्हाला बरे वाटत आहे. त्यातही सध्याच्या पुरस्कारासाठी प्रत्येकाने आपापले घोडे स्पर्धेत उतरवलेले पाहून आम्हालाही आमची नेहमी विन मध्ये येणारी घोडी श श श शाहरूख आणि अमिताभशेठ बच्चन यांना उतरवण्याचा मोह झाला होता!


समजा उद्या अमिताभशेठला वाटले की भारतीय (म्हणजे हिंदी) चित्रपटसृष्टीची पैसे घेऊन सेवा वगैरे केल्याबद्दल आपण नाही तर निदान आपल्या राजबिंड्या वगैरे पुत्राला - अभिषेक याला - हा पुरस्कार मिळावा*. तर मुलायमसिंगांना पुरस्कार मिळेपर्यंत अमिताभशेठ थेट अशी मागणी करू शकत नाहीत. आणि आता या वयात पक्ष वगैरे बदलणे हे कजरा रे च्या तालावर नाचण्याइतके सोपेही नाही. शिवाय बच्चनशेठ व फ्यामिली यांची शारीरिक उंची जास्त असल्याने त्यांना लागणारे जास्त कपडे पाहता कपड्यांचे दुकानदार जरी त्यांच्या बाजूने उभे राहिले तरी अभिषेक महिनोन्महिने दाढीबिढी न करता तसाच घाणेरडा राहतो** आणि इतरांना दाढ्या वाढवण्यास उद्युक्त करतो हे पाहून अखिल पुणे केशकर्तनालय संघ, वस्तरा व ब्लेडचे दुकानदार वगैरे त्याला हा पुरस्कार मिळण्यास विरोध करणार की नाही?
(तुम्ही म्हणाल दाढीच्या बाबतीत शाहरुख तसा सेफ आहे. हो. मान्य! पण तो कपडे घालत नाही...)


त्यामुळे आमचा मोह आम्ही आवरत आहोत व निष्कारण वाद टाळत आहोत. कारण आम्हाला एक लख्ख युक्ती सुचली आहे!


हा सर्व वाद टाळण्यासाठी अभिषेकशेठने किंवा शाहरुखशेठने आपल्या पुत्राचे नाव 'भारतरत्न' ठेवून द्यावे आणि आपल्या गुंड्या पुत्राचा तिन्ही लोकी झेंडा लागण्याची वाट पहावी. बस्स दुसरे काही नाही. जसजसा मुलगा प्रसिद्ध होत जाईल तसतसे 'भारतरत्न अभिषेक बच्चन' किंवा 'भारतरत्न शाहरुख खान' हे नाव देखील आपोआप प्रसिद्ध होईल.

नाही का?

शेवटी भारतरत्न म्हणजे काय तर आपल्या नावाआधी लावावयाची साडेपाच अक्षरे. त्यापेक्षा आपण त्याला अधिक महत्त्व थोडीच देतो?


*गाढवाला आपले शिंगरू गोंडस वाटते अशा अर्थाची एक इजिप्शियन म्हण आम्हाला आठवली.
** एक्झिबिट ए: स्वत:च्या लग्नात सुद्धा दाढी केली नाही. शी!

इत्यलम!