Friday, December 7

बेडूक, नार्सिसस, भस्मासुर, अतिशयोक्ती आणि चड्डीत राहणे

कॉलेजात असताना आमच्या मित्रमंडळींमध्ये "चड्डीत राहणे" हा एक वाक्प्रचार अत्यंत प्रसिद्ध होता. "अंथरूण पाहून पाय पसरावे" अशा साधारण अर्थाचा हा वाक्प्रयोग असला तरी त्याला अनेक छटा होत्या. कोणी जादा 'माज' करत असला की त्याला सरळ करण्यासाठी ‌"ए भो, चड्डीत राहा ना!" असे आम्ही म्हणत असू. आता हा वाक्प्रयोग येथे आठवण्याचे काय कारण? सांगतो. त्यापूर्वी ह्या अडीच गोष्टी वाचा.

१. मेंढककाण्ड अर्थात बेडकाची प्रेमकहाणी: प्लवंगेंद्र बेडकाचे मंदोदरी बेटकुळीवर फारच प्रेम. अगदी शाहरूख खानचं काजोलवर असतं ना तस्सं. पण अर्थातच मंदोदरीचे तातश्री मेंढकोबांना हा विवाह पसंत नव्हता. अमरीश पुरीच म्हणा ना! त्यांनी तिचा हात वृषभकुमार नावाच्या बैलाच्या हाती देण्याचे ठरवले होते. मंदोदरी दिसायला फारच सुंदर. वार्‍यालाही तिच्या रेशमी काळेभोर कुंतलाशी खेळावे वाटे. तिच्या भ्रुकोदंडांना पाहून अर्जुनाचे गांडीवदेखील शरमेने खाली पाहू लागले असते. तिचे गाल लालबुंद सफरचंदांची आठवण करून देत असत तर डाळिंबाचे दाणे शाखेमध्ये उभ्या राहणार्‍या स्वयंसेवकाप्रमाणे रांगेत एकामागे एक "दक्ष" उभे होते. तिचे ओठ... हाय... तिच्या ओठांकडे पाहून प्लवंगेंद्राला मदिरेची आठवण होई तर तिची नाजूक मान पाहून त्याला सुरईची म्हणजे पुन्हा मदिरेचीच आठवण होई. बेवडा कुठला! आता वर्णनासाठी मी जास्त खाली जात नाही. काय ते तुम्ही समजून घ्या!


हा तर आपले अमरीश पुरी ऊर्फ मेंढकोबांनी मंदोदरीचे म्हणणे ऐकून घेण्याचे ठरवले आणि प्लवंगेंद्राला सांगितले की त्याने जर वृषभकुमाराइतके मोठे होऊन दाखवले तर मंदोदरी त्याचीच. प्रेमात शहाणी माणसे देखील 'चड्डीत राहत' नाहीत तर बेडकाचे काय. एखाद्या पंपाने सायकलच्या ट्यूबमध्ये हवा भरावी तद्वत प्लवंगेंद्र फुस्स फुस्स करत स्वत:च्या शरीरामध्ये हवा भरत गेला. प्रेमात दिवाणी झालेली मंदोदरीचे मुखकमलही प्लवंगेंद्राच्या शरीरासोबत फुलत होते. पण शेवटी व्हायचे तेच झाले. नियतीने कपाळावर जे लिहिले आहे त्याला कोणी टाळू शकतो का? फुल्ल हवा भरलेल्या टायरला पंक्चरच्या दुकानदारांनी रस्त्यावर टाकलेला ४३ खिळ्यांपैकी नेमका खिळा लागावा आणि टचकन टायर फुटावा त्याप्रमाणे प्लवंगेंद्र फुटला. वृषभकुमारासारख्या धटिंगणाला नाजूक मंदोदरी मिळाली आणि प्लवंगेंद्राच्या फोटोला हार मिळाले.कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत!

२. नार्सिससची कथा: नार्सिससची कथा ही अभिजात ग्रीक कथा असल्याने सामान्यजनांना माहिती नसावी. नाही तर त्याला अभिजात कसे बरे म्हटले असते? पुराणकाळातील हृतिक रोशन शोभावा असला राजबिंडा हा तरूण. वर्णन बरेचसे मंदोदरीसारखेच. म्हणजे रेशमी कुंतल, चाफेकळी नाक वगैरे. फक्त त्याची शरीरयष्टी बलदंड असावी. त्याला सिक्स प्याक ऍब्जही असावेत. शाहरूखखानपूर्वी अशी शरीरयष्टी लाभलेला केवळ नार्सिससच. स्वत:चे रूप कधीही न पाहिलेल्या या तरूणाचे (म्हणजे नार्सिसचे. शाहरूखचे नव्हे!) सौंदर्य अगदी मंत्रमुग्ध करणारे होते.

नेहमी सूर्योदयापूर्वी उठणारा नार्सिसस रात्री जास्त 'झाल्यामुळे' सकाळी उशीरा तळ्यावर गेला. (कशाला ते विचारू नका! घाणेरडे कुठले!) आणि स्वत:चे रूप त्याने प्रतिबिंबरूपात तळ्यामध्ये पाहिले आणि काय हो आश्चर्य. स्वत:च्याच रुपाच्या प्रेमात पडून तो तळ्यात पडला. कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत!

३. भस्मासुराची कथा: ही भारतीय कथा असल्याने अभिजात नसावी. त्यामुळे कथा सर्वांनाच माहिती असावी. मोहिनीवर लाईन मारण्यात दंग झालेल्या भस्मासुराला कसलेही भान राहिले नाही आणि स्वत:च्या डोक्यावर हात ठेवून त्याने स्वत:चे भस्म करून घेतले. कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत.

उपसंहार:
शाळेत असताना आम्हाला व्याकरणामध्ये 'अतिशयोक्ती' हा अलंकार होता. इयत्ता सातवीपर्यंत आमच्या वर्गात फक्त वर्गबंधू असत. सहशिक्षणाचे पुरोगामी वारे व परिणामी वर्गभगिनी वर्गात नसल्याने आम्ही मास्तरांकडेच लक्ष देऊन प्रामाणिकपणे शिक्षण घेत होतो. (आठवीपासून वर्गभगिनी वर्गात आल्या नि शिक्षण बोंबलले! ते असो.) तर अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण देताना आमचे मास्तर खूप मस्त उदाहरण देत असत.

"दिडकीचे तेल आणले, सासुबाईंचे न्हाणे झाले, मामंजींची शेंडी झाली, भावोजींची दाढी झाली, उरले तेल झाकून ठेवले,ते येऊन मांजराने सांडले, वेशीपर्यंत ओहोळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला"

सुंदरच. अगदी +१.

भविष्यकाळात मराठी भाषेचे अलंकार शिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आली तर दिडकी, ओहोळ वगैरे शब्दांचे अर्थ सांगताना घाम फुटायचा ह्या विचाराने झोप येत नव्हती. तरी बरे मुले आजकाल कॅमलिन कंपनीचे साहित्य वापरतात त्यामुळे उंट म्हणजे काय हे सांगायला अडचण येणार नाही. पण आमची सर्व काळजी आता मिटली आहे. अतिशयोक्ती अलंकाराचे अतिशय सुरेख उदाहरण आमच्यासमोर आहे.


होय , हा मराठीतला पहिला संपूर्ण ऑनलाइन दिवाळी अंक आहे. आजवर ऑनलाइन दिवाळी अंक अनेक झाले. पण प्रत्येकानं स्वतःच आपली कुंपणं आखून घेतली होती. आता ही कुंपणं उचकून टाकण्याची वेळ आहे. मराठी ऑनलाइन म्हणजे फुटकळपणा , या समजाला मुळापासून गाडून टाकत , दर्जाच्या मैदानात छापील दिवाळी अंकांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचा हा प्रयत्न आहे.


अधिक माहितीसाठी हे पहा.

स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपावासारखी दर्जेदार संकेतस्थळे चालवणारे संकेतस्थळचालक. त्यांनी राबवलेले दिवाळीअंकांसारखे सुंदर उपक्रम. अतिशय गुणी माणसांशी ऑनलाईन ओळखी, गप्पाटप्पा, काव्यशास्त्रविनोद करण्याची दिलेली संधी. हे सगळे फुटकळ.
आणि आपले 'उत्पादन' अधिकाधिक 'ग्राहकांपर्यंत' पोचवण्यासाठी अशुद्धलेखनाने बुजबुजलेले, हिंदाळलेले मराठी. अर्धवस्त्रांकित उठवळ नट्यांची चित्रे पहिल्या पानावर छापणारे हे वृत्तपत्र तेवढे दर्जेदार ही अतिशयोक्तीच नाही का?
असो.
आम्हाला जास्त काही म्हणायचे नाही. त्या वृत्तपत्राला एकच सांगायचे आहे.
तुम्ही ओळखलेच असेल काय ते.
बरोब्बर.
'चड्डीत राहा ना भो'

Thursday, December 6

बम भोले बम

मोठमोठ्या चित्रपट कलाकारांशी (म्हणजे अमिताभ व शाहरुख) आमच्या फार ओळखी.

दुपारचे जेवण करून पान खाण्यासाठी पानाच्या गादीवर आलो तर तिथे शाहरूख. आश्चर्याने आम्ही तोंडातच बोट घातले. म्हणजे शाहरूख दिसला त्याबद्दल नाही तर त्याने शर्ट घातला होता त्याचे आश्चर्य वाटले. आय हाय "दर्द ए डिस्को". काय डान्स केलाय! मान गये. आम्हीही शर्टाची दोन बटणे काढून त्याला नाचण्याची हुक्की आली तर साथ देण्यासाठी तयार राहिलो.

गोल्डफ्लेक पेटवून शाहरूखने १ रुच्या दोन मेंटॉस घेतल्या. आम्ही पटकन तोंडातले बोट काढून मेंटॉस घेण्यासाठी हात (पुसून) तयार ठेवला. पण त्याने मेंटॉस (स्वत:च्या) खिशात टाकल्या.

आम्ही १२०-३०० हातात घेऊन बोटावर चुना घेतला आणि शाहरुखला दोन्ही हात वर करून प्रणाम केला.

"नमो नम:"

"वालेकुम अस्सलाम!", शाहरूख बाकी संस्कारांचा पक्का.

"कॉम मॉम मम माअयं?" आम्ही पान खाऊन चुन्याचे बोट तोंडात खुपसले.

शाहरूखने फक्त भुवई वर करून प्रश्नार्थक चेहरा केला.

"काय मग कसं चाललंय?", आम्ही.

"एएएएएए... काही नाही. निवांतच आहे.अम्म अम्म" धुराचा झुरका तोंडातून सोडत शाहरूख.

"बाकी पिक्चर मस्तच चाललंय. विशेषत: शर्ट वगैरे नाही म्हणजे खासच. पण हे शर्टाचं काय काढलंय मध्येच?" नसत्या काड्या घालायची आमची सवय जाणार नाही.

"एएएएएए.. शर्टाचं कुठे काढलंय. शर्टच काढलंय की! अम्म अम्म" शाहरूखची विनोदबुद्धी त्याला दगा देत नाही.

"हा हा. +१! मस्त. " प्रतिसाद कुठे आणि कसा द्यावा ते आम्हाला बरोबर कळते.
"थोडीशी कॉम्पीटिशन आहे पण बाकी धोधो चाललाय की!", इति आम्ही.

"कॉम्पीटिशन? कसली कॉम्पीटिशन?" शाहरूख थोडा चिडला.

"अहो 'चक दे' ची. गैरसमज नको.", बाजू सावरणे आम्हाला बरोब्बर जमते.

"एएएएएए... तो होय. घ्या मेन्टॉस घ्या." शाहरुख अपेक्षेप्रमाणे पाघळला.

पटकन हात पुढे करून मेन्टॉस खिशात घातली आणि आम्ही एक काडी सारली.

"हा आता पुढे काय नवे प्रोजेक्ट्स वगैरे?"

"एक पिक्चर काढतोय. ऑस्कर नक्की मिळणार बघा. पिक्चरला नाही तर मला नक्कीच.", शाहरूख

"ते तर आहेच. तुम्ही असल्यावर काय अशक्य आहे. तुम है तो क्या गम है? आणि तुम्हाला ऑस्करची काय गरज? खर्‍या हिर्‍याला तळपण्यासाठी कोंदणाची गरज थोडीच असते." नको त्या वेळी आमच्यातला लेखक बाहेर येऊ पाहतो. खरे म्हणजे आम्हालाही ज्ञानपीठ मिळायला हवा. ते असो.

"काय नाव काय आहे पिक्चरचं. कॅची पाहिजे बुवा. ओएसओ, के३जी सारखं.", आम्ही.

"एएएएएए... . बास बास. आपले विचार जुळतात. नाव तर जबरदस्तच आहे. बम-भोले-बम. ३बी म्हणता येईल. किंवा बी३. बघूया आकडेतज्ज्ञ काय सांगतात ते."

"राग मानणार नसाल तर एक विचारू का?" आता मेन्टॉस मिळाल्यामुळे आमचा कार्यभाग साधला होता.

"एएएएएए... असं काय? विचारा ना.शरमाओ मत. आम्ही तुम्हाला परके थोडेच मानतो. "

"ओएसओ मध्ये शर्ट काढला. आता या चित्रपटात तुम्ही प्यांट काढणार का?"

Tuesday, December 4

पालखी

दि.बा.मोकाशींच्या कथा काही वाचकांना परिचित असल्या तरी त्यांचे लेखन म्हणावे तितके प्रसिद्ध झाले नाही. त्यांच्या कथांकडे झालेले दुर्लक्ष पाहता त्यांनी प्रवासवर्णनांमध्ये केलेली मुशाफिरी मात्र उपेक्षितच राहिली आहे या बाबीचा खेद वाटला तरी आश्चर्य वाटत नाही. पुण्यापासून पंढरपूरपर्यंत वारकर्‍यांसोबत केलेल्या वारीची मोकाशींच्या अनोख्या शैलीतील "पालखी" ही "वाचलेच पाहिजे असे काही" प्रकारातील नोंद.

खरे म्हणजे "पालखी"च्या पार्श्वभूमीवर एखादी कादंबरी लिहावी अशी मोकाशींची फार इच्छा. त्यांच्या कल्पनेतल्या कादंबरीतील एका वारकर्‍याच्या डॉक्टर मुलाला, वडिलांच्याऐवजी, वारीला जावं लागतं. पालखी सुरू होते तेव्हा कादंबरी सुरू होते आणि पालखीबरोबरच ती संपते. ही कादंबरी लिहिणे मोकाशींना शक्य झाले नाही. मात्र पालखीबाबतचे आकर्षण मनात मात्र कायम राहिले. एक महिना व्यवसाय बंद करून, महिन्याभरासाठी संसाराची रक्कम व पालखीबरोबरचा खर्च यांची तरतूद करून जावे लागेल या कारणाने काही वर्षे पालखीला जाण्याचे त्यांनी टाळले. मोकाशींच्याच भाषेत सांगायचे तर "यंदा तगमग अतिशय वाढली. काळे ढग आले. पाऊस कोसळू लागला. हवा कुंद झाली. वारकरी दिसू लागले. एके दिवशी लौकर दुकान बंद करून घरी आलो आणि जाहीर केलं - काही झालं तरी यंदा पालखीला जाणार!"


मोकाशी रूढ अर्थाने वारकरी किंवा भक्त नव्हेत. किंबहुना वारी किंवा तीर्थक्षेत्रेच नव्हे तर समाजात सर्वच ठिकाणी चालणार्‍या अनिष्ट प्रथांबाबतची नाराजी त्यांनी त्यांच्या कथांमधून सौम्य रीतीने व्यक्त केली आहे. त्यांच्या कथांमधूनही त्यांची पुरोगामी वैज्ञानिक दृष्टी ठळकपणे दिसते. ही वारी करण्याची कल्पना पालखीची आकडेवारी काढावी अशी होती. वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व थरांतले व प्रांतातले लोक एकत्र येतात. त्यांना दिलेल्या प्रश्नावलीच्या उत्तरांमधून समाजाचाच एक आरसा दिसेल अशी मोकाशींची कल्पना. वारीसोबत जाणार्‍या चिवडा विकणारे, केशकर्तन करणारे, बांगड्या विकणारे यांसोबतच आपला व्यवसाय वारीच्या निमित्ताने चालू ठेवण्याचे ठरवत मोकाशी वारीत सामील झाले.

हातात प्रश्नावलींचे कागद व गळ्यात कॅमेरा लटकवल्याने इतर वारकर्‍यांपेक्षा वेगळ्या दिसणार्‍या मोकाशींना आपल्या शांत,सौम्य,प्रसन्न व सात्त्विक व्यक्तिमत्त्वाने अनेक वारकर्‍यांशी खुलून संवाद साधता आला. प्रश्नावली बाजूला ठेवून सुपारी-तंबाखूच्या साथीने मोकाशींनी वारकर्‍यांशी मारलेल्या गप्पांमधून वारीचे अंतरंग प्रकट झाले आहेत. वारीमध्ये परमेश्वराच्या दर्शनासाठी येणारे वारकरी आपल्या सांसरिक व्यथा चिंता सोबत वागवत येतात हे मोकाशींना खटकते. मात्र वारीच्या कालावधीतच पुराने थैमान घातलेल्या पुण्याची बातमी कळताच कुटुंबाची काळजी वाटून पुण्याकडे परत धाव घेतल्याचे मोकाशी प्रांजळपणे मान्य करतात. घरच्या माणसांना "धडा शिकवण्याच्या" उद्देशाने पालखीत येणारे वारकरी इथे आहेत तर पालखीच्या वाटेवरच देह ठेवण्याचा निश्चय करणारे नव्वद वर्षे ओलांडलेले काही वारकरी इथे आहेत.


दीडशे मैलाच्या पायपिटीतील सासवड-जेजुरी-वाल्हे-लोणंद-पुणे-फलटण-बरडगाव-नातेपुते-माळशिरस-वेळापूर-शेगाव-वाखरी-पंढरपूर अशा प्रत्येक मुकामाच्या ठिकाणी मोकाशींना आलेले अनुभव, त्रयस्थ दृष्टीकोणातून वारीकडे पाहत त्यांनी केलेली टिपणे, लहानसहान प्रसंगात पालखीतील वारकर्‍यांच्या वर्तणुकीचे अर्थ लावण्याचे त्यांचे कौशल्य "पालखी" मध्ये प्रतिबिंबित झाले आहे.


शेगाव येईपर्यंत वारीमध्ये आलेल्या अनुभवांवरूनही वारकर्‍यांप्रती असलेली मनाची ओल कायम ठेवणार्‍या मोकाशींच्या मनातील वारकर्‍याच्या प्रतिमेला शेगावमधील लाह्यांच्या व फुगडीच्या प्रसंगानंतर खरा धक्का बसतो. वाखरीमध्ये भेटलेला एक म्हातारा या भंग झालेल्या प्रतिमेला अधोरेखित करणारी संत तुकारामांची कथा त्यांना सांगतो आणि आयुष्याबद्दल तारतम्य आलेल्या एका खर्‍या वारकर्‍याची त्यांना ओळख पटते. पालखीत सोनोपंत दांडेकर, धर्मप्रसार करण्यासाठी आलेले ख्रिस्ती मिशनरी, जैतुनबाई सारख्या मुसलमान वारकरी बाई मोकाशींना भेटतात. फुगड्या, रिंगण यासारख्या विजोड प्रथांसोबत कृष्णलीला करणारे एक बोवाजींशीही मोकाशींची भेट होते. आणि हे पुस्तक पालखीचे दर्शन न राहता जीवनाच्या वारीचेच दर्शन होऊन जाते. मोकाशींच्या लेखणीला प्रिय असलेली संथ गती पुस्तकाला आहे. क्वचितच असलेला सौम्य विनोद पुस्तकाच्या प्रकृतीशी पूरक आहे.

पुस्तकातील आवडलेला उतारा द्यायचा म्हटला तर सगळेच पुस्तक इथे टंकावे लागेल. पण तरीही मला आवडलेला एक उतारा देतो. "चित्रपटातला देखावा बदलावा तसा सगळा परिसर बदलला आहे. खडूसचा ओढा टाकला नि रस्ते सरळ आकाशापर्यंत धावत गेले आहेत. रस्त्याला वळण येतं ते सुद्धा केवढं पसरट! पालखीची दोन मैलांची मिरवणूक संपूर्ण दिसते आहे. इतकी लांब की डोळ्यांत मावत नाही. पावसानं काळपटलेल्या मातीवर स्त्रीपुरूषांची रंगीत रांग रांगोळीसारखी वाटत आहे.

रस्त्याच्या रुंदीत वारकरी आता मावत नाहीत. सासवडहून निघताना एका रांगेत चार वारकरी होते. आता बारापर्यंत गेले आहेत. उदार हातांनी माप भरावं तसं पालखीनं वारकर्‍यांचं माप पृथ्वीवर भरपेट ओतलेलं आहे. चालताना उभं राहणं जड जात आहे. बाजूच्या शेतांतून लगबगीनं वारकरी चालत आहेत. पालखी रंगात घुमू लागली आहे. खरं पाहता मी भाबडा झालो आहे. यातले खरे वारकरी किती, ढोंगी किती, आयुष्यभर दुसर्‍यांना लुबाडत राहून देव-देव करायला आलेले किती - असलं काही मनात येत नाही. तसंच, बाहेर स्पुटनिक उडताहेत, लढायांच्या तयार्‍या सुरू आहेत नि इथं हे काय चाललं आहे - असंही मनात येत नाही.

मी एकदम मागील काळात जातो. आत्ता आत्ता माणूस केवळ जगण्यासाठी एकमेकांना फाडून खात होता आणि आज इथं माझ्या डोळ्यांसमोर गुण्यागोविंदानं भजन म्हणत हजारो माणसं एकत्र चालली आहेत. केवढा भव्य देखावा हा! केवढी प्रगती ही!"

आता थोडेसे पुस्तकाच्या सजावटीविषयी. पुस्तकाचे लक्षवेधक मुखपृष्ठ आकर्षक आहे. शिवाय पुस्तकाच्या मलपृष्ठावरील आणि पुस्तकाच्या आतील रविमुकुल यांनी काढलेली वारकर्‍यांची रेखाचित्रे सुरेख आहेत. पुस्तकाच्या प्रारंभी असलेल्या मोकाशींच्या रेखाचित्रातून "किंचित कुरळे व उलटे फिरवलेले केस, स्नेहाळ डोळे, जाडसर जिवणी व गोलसर चेहरा ही प्रथमदर्शनी अनुकूल ग्रह करणारी" त्यांची आकृती समोर उभी राहते. पुस्तकासाठी वापरलेला कुरूकुरू वाजणारा कागदही उत्तम. त्यामुळे पुढील पानावरील अक्षरे मागील पानावर फारसा गोंधळ घालत नाहीत.


१९६१ साली प्रथम प्रकाशित झालेल्या मौज प्रकाशनाच्या या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती. किंमत १०० रुपये.


(सर्व चित्रे पुस्तकातील)