Wednesday, November 28

कन्नडा हाडु

दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच इतर भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय!
उदा. कन्नड भाषेतील खालील लोकप्रिय गाणे पहा. (बहुतेकांना नुसतेच पहावे लागेल, वाचता येणार नाही. पुन्हा एकदा हाय!)

आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की कन्नड भाषेतील उच्चारांचा गोडवा देवनागरीमध्ये उतरणे शक्य नाही. उदा पत्नी आपल्या पतिला "री" अशी जी गोड लाडिक हाक मारते त्याची री मराठीत ओढता किंवा लिहिता येणे सर्वस्वी कठीण.

पण व्याभिचारी आस्वादाला आमचा पाठिंबा आहे. या गाण्याचे देवनागरीतील भ्रष्ट उच्चार व मराठीतील अर्थ प्रत्येक कडव्याखाली देत आहोत. बघा आवडतो का ते.



ಅನಿಸುತಿದೆ ಯಾಕೊ ಇಂದು..ನೀನೇನೆ ನನ್ನವಳಿದ್ದು
ಮಾಯದ ಲೋಕದಿಂದ..ನನಗಾಗೆ ಬಂದವಳಿದ್ದು
ಆಹಾ ಎಂಥ ಮಧುರ ಯಾತನೆ
ಕೊಲ್ಲು ಹುಡುಗಿ ಒಮ್ಮೆ ನನ್ನ..ಹಾಗೆ ಸುಮ್ಮನೆ
ಅನಿಸುತಿದೆ ಯಾಕೊ ಇಂದು..

अनिसुतिदे याको इंदु.. नीनेने नन्नबळिंदु
मायदा लोकदिंदा...ननगागे बंदबळिंदु
आहा एंथा मधुरा यातने
कोल्लु हुडुगि ओम्मे नन्ना... हागे सुम्मने
अनिसुतिदे याको इंदु


मला हे असे आज का वाटत आहे कोण जाणे
की केवळ तूच एक माझ्यासाठी आहेस
मायावी दुनियेतून खास माझ्यासाठीच तू आज आली आहेस
हाय! काय गोड यातना आहे ही
हे मुली मला मारून टाक बरे,
उगीचच.


---------------------೧-------------------------

ಸುರಿಯುವ ಸೋನೆಯು ಸೂಸಿದೆ..ನಿನ್ನದೆ ಪರಿಮಳ
ಇನ್ನು ಯಾರ ಕನಸಲೂ..ನೀನು ಹೋದರೆ ತಳಮಳ
ಪೂರ್ಣ ಚಂದಿರ ರಜ ಹಾಕಿದೆ..ನಿನ್ನಯ ಮೊಗವನು ಕಂಡ ಕ್ಷಣ
ನಾ ಖೈದಿ ನೀನೆ ಸೆರೆಮನೆ
ತಪ್ಪಿ ನನ್ನ ಅಪ್ಪಿಕೊ ಒಮ್ಮೆ..ಹಾಗೆ ಸುಮ್ಮನೆ
ಅನಿಸುತಿದೆ ಯಾಕೊ ಇಂದು..

सुरियवा सोनेया सोसिदे... निन्नदे परिमळा
इन्नु यार कनसलू... नीनु होदरे तळमळा
पूर्ण चंदिरा रजा हाकिदे... निन्नय मोगवनु कंड क्षणा
ना खैदि नीने सेरेमने
तप्पि नन्ना अप्पिको ओम्मे... हागे सुम्मने



पावसाने तुझा नशीला गंध सोबत आणला आहे.
तुझा चेहरा क्षणभर पाहिल्यावर पौर्णिमेचा चंद्रही आकाशातून लाजून पळून गेला आहे
तू एक तुरुंग आहेस आणि मी एक कैदी.
असेच मला मिठीमध्ये घट्ट धरून ठेव.
उगीचच


---------------------೨------------------------
ತುಟಿಗಳ ಹೂವಲಿ..ಆಡದ ಮಾತಿನ ಸಿಹಿಯಿದೆ
ಮನಸಿನ ಪುಟದಲಿ..ಕೇವಲ ನಿನ್ನದೆ ಸಹಿಯಿದೆ
ಹಣೆಯಲಿ ಬರೆಯದ ನಿನ್ನ ಹೆಸರ..ಹೃದಯದಿ ನಾನೆ ಕೊರೆದಿರುವೆ
ನಿನಗುಂಟೆ ಇದರ ಕಲ್ಪನೆ
ನನ್ನ ಹೆಸರ ಕೂಗೆ ಒಮ್ಮೆ..ಹಾಗೆ ಸುಮ್ಮನೆ


तुटिगळा हुवलि... आडद मातिना सिहियिदे
मनसिना पुटदलि..केवला निन्नदे सहियिदे
हण्णेयलि बरेयदा निन्ना हेसरा... हृदयदि नाने कोरेदिरुवे
निननुंटे इदरा कल्पने
नन्न हेसरा कोगे ओम्मे... हागे सुम्मने

तुझ्या ओठांवरील रंगांना तू न बोललेल्या शब्दांचा गोडवा आहे
माझ्या हृदयातील पानांवर केवळ तुझ्याच स्वाक्षर्‍या आहेत
तुझे नाव दैवाने माझ्या नशिबी लिहिलेले नसून
मीच ते माझ्या हृदयात कोरले आहे
तुला ह्याची कल्पना आहे का वेडे.
माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे
उगीचच

Thursday, November 15

बोधकथा

बोधकथा - १

एकदा एक माणूस मित्राकडे जेवायला गेला.
मित्राच्या बायकोने फार सुंदर जेवण बनवले होते.
इतके चांगले जेवण कसे काय बनले हे मित्राने विचारले तर मित्राची बायको म्हणाली, "आज चिमूटभर टाकलेलं मीठ बरोबर पडलंय, त्यामुळे जेवण बरं झालंय"तो माणूस खूष झाला.चिमूटभर मिठामुळे जर जेवण इतके चांगले झाले, तर प्रत्यक्ष मीठ किती सुंदर लागत असेल. असा विचार करून त्याने बचकभर मीठ तोंडात घातले.


बोधकथा - २
एकदा नारदमुनी सहज फिरत फिरत पृथ्वीवर आले. आणि जाता जाता काही सत्कार्य करावे म्हणून उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या एका नागोबाला "तू लोकांना चावत जाऊ नकोस, त्रास देत जाऊ नकोस, म्हणजे तुझ्या पापाचा संचय कमी होईल व त्यामुळे रक्तदाबही कमी होईल." असे सांगितले.
पाचसहा महिने गेले. लीव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स एन्कॅश करण्यासाठी पुन्हा रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले. इथे येऊन पाहतात तो काय अगदी पोरासोरांनीही दगड, खडे मारून मारून नागोबाला अगदी बेजार केलेले. तो अगदी मरणोन्मुख होऊन पडला होता.
नारदमुनी जवळ येताच तो म्हणाला, "माझ्या ह्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही सांगितल्यापासून मी लोकांना त्रास देण्याचे सोडले आणि माझी परिस्थिती अशी झाली."
नारदमुनी म्हणाले, "अरे मी तुला चावत जाऊ नकोस असे सांगितले होते. पण स्वसंरक्षणासाठी तू निदान फुत्कार तरी टाकू शकतोस."

नारदमुनींच्या पुढच्या यलटीए ट्रीपच्या वेळी नागोबा टुमटुमीत होता.
तात्पर्यः फुत्कार टाकण्याने जे काम होते त्यासाठी चावण्याची काय गरज?

बोधकथा - ३
नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.)
पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा. पण डुकरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून त्याला आपण वराहगंधर्व म्हणूयात. कसें?
नारदमुनी म्हणाले, "नारायण, नारायण! हे वराहकुलभूषणा, इथे पृथ्वीवर काय करतोयेस?"
वराहगंधर्व: "हँ हँ, काही नाही, आपले नेहमीचेच"
नारदमुनी: "अरे पण तुझी जागा तर स्वर्गात आहे."
वराहगंधर्व: "का? स्वर्गात काय आहे?"
नारदमुनी: "अरे स्वर्गात अमृतफळे लागणारी झाडे, दुधातुपाच्या नद्या, मधूर कूजन करणारे पक्षी आहेत."
वराहगंधर्वः "मग?"
नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर."
वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?"
नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?"
वराहगंधर्वः "छे छे, मग मी स्वर्गात येऊन काय करू. मला याच गोष्टी अतिप्रिय आहेत. मला स्वर्गात यायचे नाही. लई बिल झाले. मारा डबल आणि निघा."

असो.
नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे काल्पनिक.

Wednesday, November 7

दिवाळीच्या शुभेच्छा

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

ही दिवाळी सुखासमाधानाची, समृद्धीची व शांततेची जावो हीच शुभकामना.

Friday, November 2

उघडझाप

हातकणंगलेकरांचं स्वतंत्र लेखन मी फारसं वाचलं नाही. बारावीत असताना अभ्यासाचा कंटाळा आला - तसा तो नेहमीच यायचा म्हणा - की ग्रामपंचायतीच्या लायब्ररीतून पुस्तकं आणून - आईवडिलांचे लक्ष चुकवत - वाचणे चालू होते. नेमका त्याचवेळी प्रोफेसर लोकांचा संप असल्याने कॉलेज बिलेज काही नसायचं. त्यात गावाकडं कोचिंग क्लासेसचाही त्रास नव्हता. त्यामुळे पुस्तकं वाचायला भरपूर मोकळा वेळ मिळायचा. हातकणंगलेकरांचं नाव पहिल्यांदा वाचलं ते "डोहकाळिमा" या जीएंच्या निवडक कथांचे संकलक/संपादक म्हणून. संध्याकाळी ८ वाजता एक पुस्तक बदलून "डोहकाळिमा" आणलं होतं. लोडशेडिंग ऊर्फ भारनियमन चालू असल्याने नेहमीप्रमाणे लाईट नव्हती. तेव्हा त्या पुस्तकाची हातकणंगलेकरांनी लिहिलेली प्रस्तावना कंदिलाच्या प्रकाशात वाचली होती. मध्ये जेवायला उठलो असेल तेवढाच. प्रस्तावना वाचून संपली तेव्हा रात्रीचे १२ वाजून गेले होते. काहीतरी खूप चांगलं, अभ्यासपूर्ण पण तरीही बोजड नसलेलं, अगदी गुंगवून टाकणारं वाचल्यानंतर येतो तसा थकवा आला होता. "डोहकाळिमा" तील मूळ कथा वाचल्यावर हातकणंगलेकर लक्षातही राहिले नाहीत.

हातकणंगलेकरांची फारशी पुस्तकं लायब्ररीत नसल्याने पुढे वाचायलाही मिळाली नाहीत. गेल्या एक दोन वर्षात त्यांनी संपादित केलेल्या जीएंच्या पत्रांचे ४ खंड वाचले नसते तर त्यांना विसरूनही गेलो असतो कदाचित.

मागच्याच महिन्यात एका पुस्तक प्रदर्शनात त्यांचं आत्मनिवेदनात्मक "उघडझाप" हे पुस्तक सापडलं. अर्थात ते पुस्तक विकत घेण्याचं कारण त्यातला "जीए नावाचं कोडं" हा लेखच होता. पण पुस्तकातून हातकणंगलेकरांची खूप वेगळी ओळख पटते. "नॉन जीए" असलेलं त्यांचं स्वतंत्र लेखन किती चांगलं आहे हे त्यांच्या "उघडझाप" याच लेखातील खालील उतारा वाचून कळेल.

उघडझाप


"गेल्या पंचाहत्तर वर्षांच्या काळाच्या प्रवाहाकडे तटस्थतेच्या टोकावरून पाहताना काय आठवते? अनेक आठवणी अंत:चक्षूंसमोर सरकतात. कोल्हापूरला गेलेले वडील रात्री आठच्या गाडीने परत येणार असतात. त्यांची वाट पाहत पेंगुळलेल्या डोळ्यांनी आजीच्या मांडीवर डोके टेकून मी पडलेला असतो. समोरच्या खोलीच्या चौकटीला कंदील टांगलेला आणि त्याची तांबूस पांढरी ज्योतच तेवढी डोळ्यांत भरत राहिलेली. पांढर्‍या वस्त्रांत लपेटलेली पिकल्या केसांच्या आजीची गोरीपान, सुंदर सुरकुत्यांनी रेखलेली आकृती. तिने सांगितलेल्या इसापाच्या, हातिमताईच्या, वेताळपंचविशीतील गोष्टी, पानाने रंगलेले तिचे पातळ ओठ आणि कुठल्या अज्ञातात पाहणारे तिचे स्थिर डोळे. स्टेशनात येऊन थांबलेल्या आगगाडीचे उसारे, पानकाडीबिडीचे आवाज देणारा स्टेशनावरचा पोर्टर आणि मग बराच काळ करावी लागणारी ओळखीच्या पावलांची मन ताणून केलेली प्रतीक्षा, कोपर्‍यावर वाजलेली वडिलांची पावले आणि त्यांच्या कमरेवरच्या किल्ल्यांचा आवाज आणि नंतर दारातून अवतरणारी त्यांची पावले आणि घर भरून पावल्याचा आभास, कुणीतरी गादीवर आणून ठेवणे, स्नान करून देवापुढे उघड्या, देखण्या पाठीने बसलेले वडील, उदाचा उदात्त वास, त्याच्या धुराची अनंताकडे झेपावणारी वलये आणि नंतरची गाढ झोप- खिडकीतून उन्हे आल्यानंतरच हलकेच संपणारी. हे चित्रच आयुष्यभर स्थिर झाले असते तर केवढा सुखाचा ठेवा मी जतन करत जगलो असतो. कुठलेच सुख स्थानबद्ध करून ठेवता येत नाही हेच माणसाचे कारुण्यगर्भ भागधेय.

आमच्या घराचे दोन भाग होते : पाठीमागे स्वयंपाकघर, पाण्याचा आड, जनावरांचा गोठा आणि मधल्या जागेत फरसबंदी चौक. उन्हे कलायला सुरुवात झाल्यापासून माझा मुक्काम या उबदार फरशीवर असायचा. मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची चाहूल. आजी ताज्या पालेभाजीला फोडणी देऊन, गरम भाकरी , तिखट, दही असे ताट करून मला या फरशीवरच जेवण द्यायची. झुंझुरक्या चंद्रप्रकाशात या अन्नाला अवीट गोडी प्राप्त होत असे. सोन्याचा घास म्हणतात तो हाच! त्यानंतर आयुष्यात तर्‍हतर्‍हेचे पदार्थ चाखले पण बालपणातल्या या भाजी-भाकरीची चव विसरता आली नाही.

पुढे व्यंकटेश माडगूळकरांची एक कथा वाचली : शिकारीला गेले असता ते एका पारध्यांच्या पालावर संध्याकाळच्या वेळेला पोचतात. रात्रीचे जेवण तव्यावर तयार होत असते. कोणता तरी पक्षी भाजला जात असतो. त्याचा खमंग वास सुटलेला. “काय शिजवता?” माडगूळकर विचारतात. “गिधाड गावलं मालक!” “ काय? तुम्ही गिधाडदेखील खाता?” “ तर काय, फार चवदार असतं मालक, उलिसं तेल घालून, लसूण टाकून भाजला की अक्षी चवदार!” लहानपणातल्या माझ्या जेवणाची अशीच रूची असावी. पदार्थ वेगळे पण अनुभव तसाच. “