गंधआसक्त - ३ पासून पुढे
"आता पुढे काय करायचं?" मी विचारलं
"सर्वात आधी मला आता प्रयोगाची निरीक्षणे आणि अत्तर तयार करण्याच्या कृतीची रासायनिक सूत्रांसह नोंद करायची आहे. अत्तर तयार करण्याची पद्धत माझ्याशिवाय कोणालाही - अगदी संपुनीतेलाही - ठाऊक नाही. आतापर्यंतच्या सगळ्या चाचण्यांची आणि सूत्रांची नोंद मी मुद्दामच सांकेतिक भाषेत केली आहे. सर्वप्रथम शास्त्रीय भाषेत सर्व लिहून काढण्याचे काम सुरु करतो. ते पूर्ण झाल्यावर थोडी विश्रांती घेईन. पण आपला शोध मोठा क्रांतिकारी आहे. आपण काय काय करू शकतो याचा विचार केलाय का तुम्ही? अगदी मोठी दंगल थांबवणेही आपल्याला शक्य होईल. फक्त त्या जमावावर हे अत्तर फवारायचे. शिवाय श्रीमंत स्त्रियांना हे अत्तर विकून आपण थोडी मायाही गोळा करू शकतो." सुश्रुतने मला डोळा मारला.
त्याच वेळी एक भन्नाट आयडिया माझ्या डोक्यात आली. मी एक बांधकाम व्यावसायिक आहे हे तुम्हाला आधी सांगितलेच आहे. त्यामुळे माझी इच्छा नसतानाही माझा संबंध राजकारण्यांशी येतो. त्यावेळी पुण्यामध्ये एका खासदार महाशयांनी राजकारणात थैमान घातले होते. केवळ राजकारणच नव्हे तर म्हातारीची बोरे खाणार्या गोष्टीतील कोल्ह्याप्रमाणे "चेअरमन" या नावाने ओळखल्या जाणार्या या दाढीबाबांनी गणेशोत्सव, मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिरे, क्रीडा स्पर्धा या सर्व ठिकाणी आपले बूड पुसून ठेवले होते. या सर्व कामांसाठी आवश्यक असणारा "निधी" उभारण्यासाठी आम्हा व्यावसायिकांवर केवळ जुलमी सक्ती झाली असती तर सर्व काही ठीक होते. मात्र आता बांधकाम प्रकल्पांमध्येही लुडबुड करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यांना धडा शिकवण्याची नामी संधी मला आता मिळू शकत होती. मी सुश्रुतला विचारले, "प्रयोगशाळेत आणखी किती अत्तर शिल्लक आहे?"
"साधारण १० मिली."
"आणि एका वेळी आपण किती अत्तर वापरतो?"
"१ मिली. आता आपण तेवढेच वापरले प्रयोगासाठी."
"ठीक आहे. मग तू मला १ मिली अत्तर काढून वेगळे दे. मला ते घरी हवे आहे."
"थोडा धीर धरा. प्रयोगाच्या या अवस्थेत त्या द्रावाशी खेळणे खूप धोकादायक आहे. "
"सुश्रुत, आपला करार विसरू नकोस. जे काही प्रयोगातून मिळेल त्यात अर्धा हिस्सा माझा आहे."
थोड्या वादावादीनंतर सुश्रुत मला १ मिली अत्तर द्यायला तयार झाला.
"पण काळजी घ्या. या अत्तराचा शोध ही या शतकातली खूप मोठी घटना आहे. तिला आदराने वागवणे तुमचे कर्तव्य आहे."
सुश्रुतच्या प्रयोगशाळेतून मी थेट एका मित्राच्या घरी गेलो. तो औषधे आणि वैद्यकीय उपकरणे बनवणार्या कंपनीत कामाला होता. शस्त्रक्रियांसाठी व कृत्रिम रोपणासाठी आवश्यक असे हृदयातील कृत्रिम पडदे, नाडीचे ठोके कमीजास्त करणार्या वस्तू तो बनवत असे.
"तू मला बरोबर १ मिली द्रव बसेल एवढी कॅप्सूल बनवून दे. ", मी म्हणालो. "शिवाय त्या कॅप्सूलला एक छोटासा टाईमर बसवायचा आहे जो आपोआप त्या कॅप्सूलला उघडेल आणि कॅप्सूलमधला द्रव बाहेर येईल. ही कॅप्सूल अर्ध्या इंचापेक्षा जास्त लांब नको. शिवाय त्या कॅप्सूलमध्ये द्रव भरणे आणि टाईमर लावणे या गोष्टी मला सहजपणे करता यायला हव्यात. तुला हे जमेल ना?"
दोनच दिवसांनी मित्राने मला ती कॅप्सूल बनवून दिली. पण त्याच दिवशी अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्या वासनापिसाट संपुनीतेने प्रयोगशाळेतले सगळे अत्तर स्वत:च्या अंगावर ओतून घेतले. सुश्रुत त्यावेळी प्रयोगशाळेतच त्याच्या नोंदींची तयारी करत होता. अत्तराच्या प्रयोगाच्या नोंदी त्याने सुरुही केल्या नव्हत्या. तिथे काय झाले हे सगळे सांगायची गरज नाही. पण कमकुवत हदयाच्या सुश्रुतचा त्या प्रसंगातच अंत झाला. अत्तराच्या सूत्रांची कसलीही नोंद न करता सुश्रुत कायमचा निघून गेला होता. माझे सर्व पैसे वाया गेल्याने मला वाईट वाटले. पण माझ्याकडे १ मिली अत्तर अजूनही शिल्लक राहिलेले होते.
कॅप्सूलमध्ये मी ते अत्तर भरून ठेवले आणि योग्य संधीची वाट पाहत बसलो. मला हवी असलेली संधी लवकरच आली. पुण्याच्या क्रीडांगणांमध्ये सुधारणा करण्यासाठी चेअरमन महाशय काही परदेशांच्या अभ्यासदौर्यावर जाणार होते. त्यानिमित्त आज संध्याकाळी त्यांचा सत्कार करण्याचे ठरले होते. पेज थ्री पार्ट्यांमध्ये नेहमी वावरणार्या पायल नावाच्या एका अर्धवस्त्रांकिता उठवळ अभिनेत्रीच्या हस्ते हा सत्कार होणार होता. अशा प्रकारच्या पार्ट्यांमध्ये माझा व्यावसायिक कारणांसाठी सहभाग असला तरी ती अभिनेत्री मला ओळखत नव्हती हे फार चांगले होते. माझी योजना जर यशस्वी झाली तर वृत्तपत्रांमध्ये दुसर्या दिवशी कशा प्रकारच्या बातम्या येतील याचा अंदाज मी बांधू लागलो.
पुण्याच्या भरजरी वस्त्रांची लक्तरे वेशीवर - सकाळ
चेअरमनचे पुण्यात लिंगथैमान - सामना
चेअरमनरूपी बांडगुळे आणि सोनियांचा वटवृक्ष - लोकसत्ता
'CHAIRMAN' INAUGURATES BLUE TV IN PUNE - The Indian Express
CHAIRMAN MAKES PUNEKARS VOYEURISTIC= The Times of India
प्रथेप्रमाणे हा सत्कार केवळ निमंत्रितांच्या उपस्थितीत पुण्यातील ब्ल्यू डायमंड हॉटेलमध्ये होणार होता. मी ताबडतोब सत्काराच्या ठिकाणी पोचलो. सत्कार सुरू व्हायला अद्याप बराच वेळ होता. हॉटेलच्या बाहेर असणार्या एका गुच्छवाल्याकडून मी फुलांचा एक गुच्छ घेतला आणि हॉटेलच्या स्वागतकक्षात पोचलो.
"मला पायलजींना भेटायचे आहे. चेअरमनसाहेबांकडून भेट आलेला हा बुके त्यांना देणे आवश्यक आहे." मी स्वागतिकेला म्हणालो.
"ठीक आहे. तुम्ही तो इथे ठेवा. मी आमच्या सेवकामार्फत तो त्यांच्या खोलीपर्यंत पोचवण्याची व्यवस्था करते." आपल्या दंतमंजनाची जाहिरात करत स्वागतिकेने हे शब्द उच्चारले.
"चेअरमन साहेबांनी हा बुके मला स्वत: देण्यास सांगितला आहे." मी म्हणालो.
चेअरमनसाहेबांचा वट अशा हॉटेलांमध्ये अर्थातच असल्यामुळे मला काही अडचण आली नाही. पायलजी ५०१ क्रमांकाच्या खोलीमध्ये तयारी करत थांबल्या होत्या. तेथे जाऊन मी दार ठोठावले. स्वत: पायलनेच दार उघडले.
"येस? हू आर यू? आय डोन्ट हॅव मच टाईम!", पायल.
"गुड आफ्टरनून मॅम. चेअरमनजी हॅज ऑर्डर्ड मी टु डिलिव्हर धिस टु यू इन पर्सन"
चेअरमनचे नाव ऐकताच ती मेणाप्रमाणे पाघळली. "हाऊ गॉर्जिअस ऑफ हिम." मी तिच्या हातामध्ये तो कागदात गुंडाळलेला पुष्पगुच्छ दिला.
"चेअरमनसाहेबांनी तुम्हाला त्या गुच्छाचे आवरण एकदा उघडून पाहण्यास सांगितले आहे." मी.
"सो स्वीट. हे आवरण तुमच्यासमोरच उघडणे आवश्यक आहे का?" पायल.
"माझी काही हरकत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तो उघडून पाहा आणि चेअरमनसाहेबांना काही निरोप द्यायचा असेल तर तेही सांगा."
तिने ते आवरण उघडले. "वॉव. ऑर्किड्स! पुण्यामध्ये इतकी सुंदर फुले कुठे मिळाली त्यांना? पाहा ना! मी हा घाणेरडा गुलाब लावला आहे माझ्या ड्रेसवर. थांबा. मी हा गुलाब फेकून देते आणि एक सुंदरसे ऑर्किडचे फूल लावते. सत्कारप्रसंगी चेअरमनसाहेबांना खूप आनंद होईल."
तिला न शोभेलशा चपळाईने तिने गुलाबाचे फूल काढून टाकून दिले.
"आणि हे फूल लावायला सेफ्टी पिन? ठीक आहे मी जुनीच वापरते." पायलने गुलाबाच्या फुलाला लावलेली पिन काढून माझ्या हातातले ऑर्किडचे फूल खेचून घेतले. आणि मी काही करण्यापूर्वीच फुलामध्ये ज्या ठिकाणी त्या अत्तराची कॅप्सूल लपवली होती त्याच्या अगदी जवळ ती पिन घुसवायला सुरुवात केली. अर्थात ती पिन त्या कॅप्सूलला जाऊन अडकली आणि पुढे सरकेना. तिने पुन्हा जोर लावला. पिन पुढे सरकत नव्हती.
"हे काय? हे फूल वेगळेच दिसते. पिन पण आतमध्ये घुसत नाहीये!" ती ओरडली.
पण "थांबा थांबा, मी करून देतो." असे मी म्हणण्यापूर्वीच तिने भयंकर जोर लावून ती पिन जोरात ढकलली आणि कॅप्सूलमधून बाहेर आलेल्या अत्तराचा रंग मला तिच्या ड्रेसवर दिसू लागला.
डोळ्याची पापणी लवण्यापूर्वीच तो गंध मला येऊन धडकला. खरं तर तो फक्त गंध नव्हताच. काहीतरी वेगळाच प्रकार होता. कोणत्याही गंधाचा फक्त वास येतो. पण या गंधाचा मला स्पर्शही होत होता. पाण्यात बुडल्यावर वाटते तसे मला गुदमरल्यासारखे अगदी आत ढवळल्यासारखे होऊ लागले होते. नाकातून आत येणारे गंधाचे रेणू पाण्याच्या जोरदार प्रवाहाप्रमाणे मला जाणवत होते. हळूहळू तो प्रवाह माझ्या नाकाच्या अगदी आत डोक्यापर्यंत पोचत आहे असे वाटू लागले होते. मी जोरजोरात गुरगुरलो. अचानक पायलच्या कपड्यावरील तो अत्तराचा डाग मोठा मोठा होऊ लागला. मला माझ्या हृदयाचे ठोकेही ऐकू येऊ लागले. नंतर काय झाले ते अजिबात आठवत नाही.
मी जागा झालो तेव्हा माझ्या अंगावर एकही कापड नव्हते. पायल कुठे दिसत नव्हती. वार्याच्या जोरदार झोताने विस्कटल्याप्रमाणे हॉटेलची रूम अस्ताव्यस्त वाटत होती. मी ताबडतोब कपडे चढवले आणि बाहेर पडण्यासाठी दाराकडे धावलो तेव्हा बेडखालून पायलचा आवाज आला.
"थॅंक यू यंग मॅन. चेअरमन साहेबांचे प्रेझेन्ट मला खूप आवडले!"
(समाप्त)
(Roald Dahl च्या Bitch या कथेचे मराठीत रुपांतर)
Sunday, October 28
गंधआसक्त - ४
Saturday, October 27
गंधआसक्त - ३
गंधआसक्त - २ पासून पुढे
प्रयोगशाळेच्या बंद दारावर मी टकटक केली. सुश्रुतने दार उघडले तेव्हा वर्षभरात त्याचे रुपांतर एका अस्वलामधून याकामध्ये झाले आहे असे मला वाटून गेले. त्याला अंघोळीसाठी शांपूची एक बाटली रोज लागत असावी.
"एक मिनिट थांबा. अजिबात आत येऊ नका. "
सुश्रुत आत पळाला आणि एक दोन सेकंदातच हातामध्ये इयरप्लग सारखी दिसणारी दोन ओशट, गुळगुळीत बोंडे घेऊन आला. प्रत्येक बोंडाच्या मागील टोकाला एक निळसर दोरी बांधलेली होती. स्वत:च्या नाकाकडे बोट दाखवत त्याने ती बोंडे माझ्या नाकात खुपसली. त्या दोर्यांचा उपयोग ती बोंडे पुन्हा बाहेर खेचून काढण्यासाठी करायचा होता.
"नाकावाटे हवा आत येता कामा नये. श्वासोच्छवासासाठी तोंडाचा उपयोग करा." अंगठ्याने ती बोंडे माझ्या नाकात वर वर ढकलत सुश्रुतने सूचना दिली आणि नाटकातल्या पात्राप्रमाणे हात पसरून "हदयनाथसाहेब, आत यावे. माझ्या आगाऊपणाबद्दल क्षमा करा, पण आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचकारी दिवस आहे." असे म्हटले.
सर्दी झाल्यावर येतो तशा चोंदलेल्या आवाजात सुश्रुत बोलत होता. प्रयोगशाळेतील एका कपाटाच्या आतल्या कप्प्यात हात घालून त्याने जाड काचेची छोटी बाटली काढली. त्या बाटलीत लालसर केशरी रंगाचा द्राव होता. ती बाटली माझ्यासमोर नाचवत सुश्रुत म्हणाला. "हाच तो. जगातील सर्वात मौल्यवान द्रवपदार्थ. मी ते अत्तर तयार करण्यात यशस्वी झालो आहे."
हातातली बाटली अतिशय काळजीपूर्वक टेबलावर ठेवत त्याने थोडे स्पष्टीकरण दिले.
"१०४८ क्रमांकाच्या या मिश्रणाचा एक शुद्ध थेंब मिळवण्यासाठी सुमारे अर्धा तास लागतो. शिवाय प्रत्येक थेंब हा बंद झाकणाच्या भांड्यामध्ये गोळा करावा लागतो. हा पदार्थ बाष्पीभवनशील असल्यामुळे त्याचा उघड्या हवेशी संपर्क येता कामा नये. मी आज प्रयोगशाळेत सकाळी आलो तेव्हा या पदार्थाचा वास घेतला आणि त्यानंतर झालेला प्रकार अवर्णनीय आहे. मी स्वत:वरचे नियंत्रण पूर्णपणे गमावले होते. मी अक्षरशः: प्राणी झालो होतो. शब्दांत व्यक्त करण्यासारखा तो प्रकारच नाही. त्यावेळी मला फक्त स्त्री हवी होती. जर ती मिळाली नाही तर माझा स्फोट होईल की काय असे मला वाटत होते."
डोळ्यानेच वासंतीच्या खोलीकडे खूण करून मी म्हणालो, "वासंती ठीक आहे ना मग आता?"
"वासंतीने केव्हाच नोकरी सोडली, आता संपुनीता आहे तिच्या जागेवर." सुश्रुत म्हणाला.
"मग संपुनीता कशी आहे. हॉस्पीटलमध्ये दाखल करावे लागले नाही ना?" मी थोड्या खोचकपणानेच विचारले.
"दुर्दैवाने संपुनीता आज नेमकी उशीरा आली. कामाला उशीरा येण्याची तिची ही पहिलीच वेळ. त्यावेळी मी अक्षरशः: वेडा झालो होतो. बागेतून पुढे रस्त्यावर मी पळत गेलो. पण तिथेही मला कोणी स्त्री दिसली नाही. थोड्याच वेळात मला पुरेसे भान आले. मी प्रयोगशाळेत ताबडतोब परत आलो आणि नाकात ही बोंडे घालून तुम्हाला बोलावले."
"तोंडावाटे हा वास आपल्या मेंदूपर्यंत पोचत नाही का?" .
"नाही . तोंडावाटे जरी तुम्ही हे गंधरेणू आत घेतले तरी ते गंधसंवेदनस्थळांपर्यंत पोचू शकत नाहीत. त्यामुळे तोंडावाटे केलेल्या श्वासोच्छवासामध्ये तुम्हाला कोणत्याही गंधाची जाणीव होणार नाही. तुम्हाला बोलावेपर्यंत संपुनीता प्रयोगशाळेत आली होती. मला पाहून ती बेशुद्ध पडायचीच बाकी होती. तिच्यासमोर मी संपूर्ण विवस्त्र उभा होतो. बहुधा रस्त्यावर मी माझे सर्व कपडे काढून फेकून दिले असणार. मी लगेच हे कपडे चढवले आणि तिला काय झाले हे सांगितले."
सुश्रुतचा अनुभव ऐकून मी थरारलो होतो. ती बाटली मी हातात घेऊन पाहिली. बाटलीमध्ये तळापासून अर्धा इंच वरपर्यंत जास्वंदाच्या रसाप्रमाणे दिसणारा गडद गुलाबी-लालसर रंगाचा द्रव होता.
"सांभाळून हाताळा किंवा बाटली खाली ठेवून पाहा. आता पुढची पायरी म्हणजे या अत्तरावर एक शास्त्रीय प्रयोग करणे आवश्यक आहे. त्यासाठी मला हे अत्तर स्त्रीवर फवारून एका मनुष्याला तिच्या जवळ जाण्यास सांगायचे आहे. ह्या प्रयोगाच्या नोंदी अतिशय काळजीपूर्वक घेणेही आवश्यक आहे."
"म्हणजे या प्रयोगाच्या निमित्ताने तुला तुझा कंड शमवायचा आहे म्हण ना." मी म्हणालो.
"नाही नाही. मी केवळ एक रसायनशास्त्रज्ञ आहे. आणि या प्रयोगात मी स्वत: सहभागी होणार नाही. प्रयोगासाठी योग्य वातावरण निर्माण करून नोंदी करण्याचे काम मी करणार आहे."
"ठीक आहे मग. मी स्वत: या प्रयोगात सहभागी होईन.", संपुनीता या नावानेच मला तिचे आकर्षण वाटू लागले होते.
"थोडा धीर धरा. ह्या अत्तराच्या प्रभावाखाली असताना जर स्त्री जवळ आली तर काय होईल हे अद्यापही आपण पाहिलेले नाही. मला खात्री आहे की हे अत्तर अतिशय शक्तिशाली आहे. तुम्ही प्रौढवयीन आहात. स्त्रीच्या संगतीत हे अत्तर वापरणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. या कामासाठी आवश्यक असा पुरुष मी आधीच शोधून ठेवला आहे. तुम्हाला स्थानिक समाजात फारसा त्रास होऊ नये म्हणून मी एका बाहेरच्या व्यावसायिक मुष्टीयोद्ध्याला या कामासाठी बोलावले आहे. तो केव्हाही इथे येईल. मानवी लैंगिक मानसशास्त्राशी निगडित अशा गुप्त प्रयोगात सहभागी व्हायचे आहे असे मी त्याला सांगितले आहे. मात्र त्याला या प्रयोगाबाबत फार कमी कळेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. "
"आणि या प्रयोगासाठी स्त्री?"
"अर्थातच संपुनीता! ती स्वत: शास्त्रज्ञच आहे असे समजा. माझ्यापेक्षाही जास्त जवळून ती पुरुषाच्या प्रतिक्रियांचे निरीक्षण करू शकते. मी तिला या संपूर्ण प्रयोगाची कल्पना नोकरी देतानाच दिली होती. मानवी जीवनावर सखोल परिणाम करणार्या अशा प्रयोगांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हा तिचाच गौरव आहे. शास्त्रीय संशोधनांमध्ये असे प्रसंग फार कमी येतात."
सुश्रुत हे सांगत असतानाच दारावर टकटक झाली. सुश्रुतने ताबडतोब कपाटातून दोन नवीन बोंडे काढली आणि तो दार उघडण्यासाठी गेला. दरवाज्यामध्ये जोसेफ उभा होता. हाच तो मुष्टीयोद्धा. सुश्रुतने त्याच्या नाकात बोंडे खुपसून त्याला आत आणले. एकमेकांची औपचारिक ओळख करून दिल्यानंतर आम्ही प्रयोग करण्यासाठी थेट संपुनीतेच्या खोलीत गेलो. संपुनीता तिशीची असावी. तिच्या प्रसन्न चेहर्याला लांबसडक केसांचा अंबाडा शोभून दिसत होता. एखाद्या परिचारिकेप्रमाणे तिने संपूर्ण पांढरा पेहराव केला होता. आम्ही आत गेल्यावर तिने तिच्या डोक्यावरही परिचारिकेची टोपी चढवली. एखाद्या हॉस्पीटलमध्ये येतो तसा स्पिरिटसारख्या द्रव्याचा वास खोलीभर तरंगत होता. संपुनीता निर्जंतुकीकरण केल्यासारखी अगदी स्वच्छ वाटत होती. तिने आपल्या टपोर्या डोळ्यांनी जोसेफला व्यवस्थित पाहून घेतले. सुश्रुतने सर्वांना तयार होण्यास सांगितले. खोलीमध्ये प्रत्येक अर्ध्या मीटरवर वेगळ्या रंगांची एक रेघ मारली होती.
"संपुनीता या खुर्चीमध्ये बसेल आणि जोसेफ तू समोर सहा मीटरची खूण केलेली पिवळी रेषा आहे त्यापलीकडे जाऊन उभा राहा. तुझ्या नाकातील बोंडे - प्लग्ज काढू नकोस. मी संपुनीतेच्या कपड्यांवर थोडे अत्तर फवारणार आहे. तुला इशारा केला की नाकातली बोंडे काढून हळूहळू तू तिच्या दिशेने चालू लाग. आपल्याला या अत्तराचा प्रभाव किती अंतरावरून होऊ शकतो हे मोजायचे आहे." सुश्रुतने सूचना देण्यास सुरुवात केली.
मला थोडीशी शंका वाटत होती. मी सुश्रुतला विचारले. "संपुनीतेने जोसेफला सहकार्य करणे अपेक्षित आहे की विरोध? "
"तिच्याकडून काहीही प्रतिसाद अपेक्षित नाही. तिने आपण प्रयोगातील केवळ एक निर्जीव वस्तू आहोत अशी भावना मनात ठेवणे आवश्यक आहे. तिला हे सर्व आधीच समजावून सांगितले आहे.", असे म्हणून सुश्रुतने तिला अत्तर आणायला सांगितले.
संपुनीतेचे ओठ कोरडे पडले होते. तिने ओठांवरून जीभ फिरवून ते पुन्हा ओलसर करून घेतले. हे करताना ती जोसेफकडे चोरून पाहत होती की काय असे मला क्षणभर वाटले. संपुनीता अत्तर आणायला प्रयोगशाळेत गेली तेव्हा तिने नाक झाकलेले नव्हते हे माझ्या लक्षात आले. मात्र स्त्रियांवर या अत्तराचा काही प्रभाव पडत नाही हे सुश्रुतने काही विचारण्याआधीच सांगून टाकले.
"त्या वूमनवर सेंट मारल्यानंतर मी स्लोली वॉक करत जाणे एक्स्पेक्टेड आहे. बट व्हॉट हॅपन्स देन?" जोसेफने प्रथमच तोंड उघडले.
"तेच तर आपल्याला पाहायचे आहे यंग फेलो. तुला भीती वाटत आहे का?", सुश्रुतने विचारले.
"कोण मी? आणि एका वूमनला घाबरणार? हॅ हॅ हॅ.", जोसेफचा आत्मविश्वास भलताच दांडगा होता.
"गुड बॉय!" सुश्रुतने खोलीमध्ये पुन्हा एकदा खुर्चीची स्थिती, अंतरे, सर्व खुणा वगैरे व्यवस्थित तपासून घेतल्या आणि खुर्चीच्या आसपास असलेल्या काचेच्या वस्तू बाहेर बाहेर प्रयोगशाळेत घालवल्यावर समाधान व्यक्त केले.
संपुनीता हातामध्ये अत्तराची लहान स्प्रे-बाटली घेऊन आली आणि ती बाटली सुश्रुतच्या हातात देऊन खुर्चीवर जाऊन बसली. सुश्रुतने खिशातून स्टॉप वॉच काढले.
"रेडी?" सुश्रुत म्हणाला.
सर्वांनी तयार असण्याचा इशारा दिल्यावर सुश्रुतने स्टॉप वॉच सुरु केले आणि हलकेच बटण दाबून तो फवारा संपुनीतेच्या मानेजवळ उडवला. मला स्प्रेचा स्स-स्स असा आवाज ऐकू आला. अगदी चोरपावलांनी मागे येत सुश्रुत माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. सुश्रुतने स्टॉपवॉचमध्ये पाहून काही क्षणांनंतर जोसेफला नाकातून बोंडे काढण्याचा इशारा केला.
"हां... आता हळूहळू चालायला सुरुवात कर. अं हं इतकं जोरात नाही. नॉट सो फास्ट. तू जितका हळू चालशील तितका प्रयोग अधिक यशस्वी होईल."
सुश्रुत थोडा उत्तेजित झाला होता. अर्थात मलाही फार उत्सुकता वाटत होती. मी खुर्चीत अवघडून बसलेल्या संपुनीतेकडे पाहिले. ती प्रचंड तणावाखाली दिसत होती. जोसेफच्या प्रत्येक पावलासरशी आपले शरीर आकसून घेतले तर आपण इथून अदृश्य होऊ व पुढचा प्रसंग टळेल असे तिला वाटत असावे. काही दिवसांपूर्वी एका सर्पोद्यानात मी पांढर्या उंदराला अजगराच्या पिंजर्यात सोडल्याचे पाहिले होते. संपुनीतेचा चेहरा पाहून मला त्या उंदराची आठवण झाली. अजगर उंदराला गिळंकृत करणार हे उंदरालाही माहिती होते. पण संमोहित झाल्याप्रमाणे उंदीर एकाच जागेवर आपल्या दिशेने हळूहळू सरकणार्या अजगराकडे पाहत खिळून राहिला होता.
जोसेफने पाच मीटरची रेषा ओलांडली तेव्हा संपुनीतेने मांडीवर ठेवलेले आपले हात उचलून हाताची घडी घातली. आणि पुन्हा मन बदलून त्या हातांनी खुर्चीला घट्ट पकडून ठेवले. जोसेफने हळूहळू चालत दोन मीटरची रेषा ओलांडली. तेव्हा तो थांबला. मी सुश्रुतकडे पाहिले. त्याने जोसेफला थांबण्याचा काहीही इशारा केला नव्हता. जोसेफचे डोळे चमकल्यासारखे झाले आणि पायातील जीव गेल्याप्रमाणे तो हेलपाटला. तो तोल जाऊन खाली पडतो की काय असे वाटत होते पण क्षणार्धात त्याने स्वत:ला सावरले. त्याला स्थिर उभे राहणे जमत नव्हते. तो दोन्ही बाजूला हेलकावे खाऊ लागला. नाकातून फुरफुरण्याचे, गुरगुरण्याचे आवाज करू लागला. आणि अचानक त्याने संपुनीतेच्या दिशेने उडी घेतली.
त्यानंतर काय झालं असेल हे ज्यांना माहिती आहे त्यांना सांगायची गरज नाही आणि ज्यांना माहिती नाही त्यांना सांगून काही उपयोग होणार नाही. पण सुश्रुतने या प्रयोगासाठी मला निवडण्याऐवजी सुदृढ प्रकृतीच्या व तरुण जोसेफला निवडले हे योग्य झाले असे मला वाटून गेले. माझे मध्यमवयीन शरीर त्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकले नसते. या प्रसंगाच्या मध्ये अचानक सुश्रुतने खिशातून एक रिव्हॉल्वर काढले. ते रिव्हॉल्वर घेऊन तो पुढे आला आणि जोसेफच्या अगदी जवळ जाऊन ओरडला. "लीव्ह हर, एल्स आय विल किल यू. जर तुला तुझ्या प्राणांची पर्वा असेल तर तिला सोड." पण जोसेफने सुश्रुतकडे लक्ष दिले नाही. प्रयोग संपल्यावर बाजूच्या खोलीत कपडे घालण्यासाठी जाणार्या संपुनीतेकडे मी पाहिले तेव्हा आपली हाडे शाबूत आहेत हेच आपले नशीब असे भाव तिच्या चेहर्यावर होते.
"फॅन्टॅस्टिक! मॅग्निफिशिअन्ट!! अनबिलिव्हेबल!!!" सुश्रुतला त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नव्हते.
"हृदयनाथ, आपण जिंकलो. आपल्याला जे हवे होते ते साध्य झाले आहे."
आश्चर्याची गोष्ट म्हणजे झालेल्या प्रसंग जोसेफला पुसटसाही आठवत नव्हता.
"माझा ड्रेस इथे कसा? आणि चेअरवर बसलेली ती वूमन कुठे गेली. मी काही केले का? व्हॉट डिड आय डू?" जोसेफने खाली पडलेले आपले कपडे उचलत प्रश्न विचारला.
"नथिंग माय डिअर, यू आर टेरिफिक! तुझ्यामुळे माझा प्रयोग अतिशय यशस्वी झाला आहे. हे घे तुझे पन्नास हजार रुपये. आणि तू जा आता. थॅंक्स फॉर को-ऑपरेशन!"
तेव्हढ्यात अचानक खोलीचा दरवाजा उघडून संपुनीता पुन्हा आत आली. ती विवस्त्रच होती.
"पुन्हा एकदा तो स्प्रे माझ्यावर फवारा. फक्त एकदाच", घोगर्या आवाजात ती जोरात ओरडली.
"बिहेव युवरसेल्फ संपुनीता, प्रयोग कधीच संपला आहे. " सुश्रुतने तिला धरून बाजूच्या खोलीत बंद केले.
"थोड्या वेळाने ती शांत होईल." सुश्रुत म्हणाला.
नंतर सुश्रुत आणि मी आमच्या बंगल्यामध्ये चहा घेण्यासाठी गेलो.
Friday, October 26
गंधआसक्त - २
गंधआसक्त - १ पासून पुढे
"कल्पना मजेदार आहे खरी." मी म्हणालो.
"मजा? अहो आपण जगावर राज्य करू शकू, जगावर. आहात कुठे?", सुश्रुत थोडा उत्तेजित झाला.
"पण तू तर आताच सांगितलं की गंधसंवेदनेचा मानवी वासनेवर काहीही परिणाम होत नाही म्हणून!"
"खरे आहे ते. सध्या असा परिणाम होत नाही. पण मनुष्य हा प्राणी असताना तो नक्कीच व्हायचा. उत्क्रांतीमधील हिमकालखंडोत्तर मनुष्यामध्ये स्त्रीकडून विशिष्ट गंधनिर्मिती झाली की पुरुषामध्ये संग करण्याच्या प्रेरणांचा उद्भव होत होता याचे पुरावे मला मिळालेले आहेत. अश्मयुगानंतरच्या कालखंडांमध्ये त्याची गंधाधारित लैंगिक प्रेरणा ही कमी होऊ लागली. इजिप्त आणि चीनमध्ये समूहजीवनाच्या प्राथमिक खुणा दिसू लागल्यानंतरच्या उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये ही प्रेरणा संपूर्णत: नष्ट झाली.
मी सांगतोय त्याचा तुम्हाला कंटाळा तर येत नाहीये ना?"
"नाही नाही. उलट मलाही उत्सुकता वाटू लागली आहे. पण एक गोष्ट कळली नाही. या सगळ्या कालावधीत आपल्या श्वसनसंस्थेमध्ये काही मूलभूत बदल झाले का? म्हणजे रचना किंवा कार्य करण्याची पद्धत यामध्ये?"
"अजिबात नाही. जर असे झाले असते तर आपण आता काहीही करू शकलो नसतो. तो विशिष्ट गंध ग्रहण करण्याची यंत्रणा आपल्या शरीरात अजूनही आहे. तुम्हाला अशी काही माणसे माहिती आहेत का जी आपले कान हलवू शकतात?
"माहिती काय? मी स्वत:ही असं करू शकतो." मी माझे कान थोडे मागेपुढे करण्याचा प्रयत्न केला.
"पाहा. कान हलवण्यासाठी लागणारे स्नायू तिथे आहेतच. मानव जेव्हा आपले कान एखाद्या श्वानाप्रमाणे ऐकण्यासाठी पुढे आणू शकत होता त्यावेळच्या क्षमतेचे हे स्नायू अवशेष आहेत. त्याची ही ताकद हजारो वर्षांपूर्वीच नष्ट झाली पण स्नायू अद्यापही तसाच आहे. अगदी हेच स्पष्टीकरण गंधग्रहण करणार्या शरीरातील संस्थेविषयी देता येईल. आपल्याला आवश्यक असणारे मज्जातंतू आपल्या शरीरात आहेत. त्यांची क्षमता मात्र नष्ट झाली आहे म्हणा किंवा ती सुप्त आहे म्हणा. "
"पण या मज्जातंतूंच्या अस्तित्वाची तुला इतकी खात्री कशी?"
"यासाठी तुम्हाला मानवी गंधयंत्रणा स्पष्ट करून सांगणे भाग आहे. थोडेसे क्लिष्ट वाटले तरी तुम्हाला समजण्यास फारशी अडचण येऊ नये. तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा ती हवा नळीसारख्या पोकळ अशा तीन हाडांमधून नासिकेच्या वरच्या भागात जाते. तेथे ती किंचित उष्ण आणि शुद्ध होते त्यानंतर अतिशय अरुंद वाटेने थोडा प्रवास केल्यावर गंधसंवेदी इंद्रियांजवळ जाऊन पोचते. हळदीसारख्या गर्द पिवळ्या रंगाच्या पेशींचा अंतर्भाव असलेल्या या इंद्रियांमध्येच गंधज्ञान होणार्या मज्जातंतूचे अंत्यबिंदू असतात. या प्रत्येक बिंदूवर अतिशय नाजूक अशी केशिका - तिला आपण गंधसंवेदिका किंवा रिसेप्टर म्हणूयात - ती असते. ही संवेदिका गंधरेणूंच्या अस्तित्वाने उत्तेजित होते आणि मज्जातंतूंद्वारे मेंदूपर्यंत तो संदेश प्रसारित केला जातो. सकाळी उठल्यावर तुमच्या पत्नीने स्वयंपाकघरात केलेल्या फोडणीच्या गरमागरम पोह्यांचा वास तुमच्यापर्यंत पोचल्यावर तुमच्या तोंडाला पाणी का सुटते हे आता कळले का?"
"माझं लग्न झालेलं नाही आणि मला पोहेही अजिबात आवडत नाहीत." मला त्याची फाजील सलगी आवडली नाही.
सुश्रुतने माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.
"आता जर तुम्हाला ह्या संवेदिका दोन वेगवेगळ्या गंधामधील फरक कसा जाणतात हे जाणून घ्यायचे असेल तर थोडे अधिक काळजीपूर्वक ऐका. प्रत्येक संवेदिकेच्या शेवटी नारळाच्या करवंटीप्रमाणे अंतर्वक्र असा पृष्ठभाग असतो. यालाच गंधसंवेदनस्थळ म्हणतात. अशा हजारो गंधसंवेदिका गंधरेणुंची वाट पाहत दबा धरून बसलेल्या असतात. एखाद्या विशिष्ट गंधाचे ज्ञान होणे म्हणजे त्या गंधाचे रेणू हे गंधसंवेदनस्थळामध्ये पूर्णपणे सामावून जाणे असे सोपे सूत्र आहे हे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गंधरेणू वेगवेगळ्या आकाराचे असतात. त्यामुळे गंधसंवेदनस्थळेही विविध आकाराची असतात. विवक्षित आकाराचा गंधरेणू हा एका विशिष्ट गंधसंवेदनस्थळातच पूर्णपणे सामावला जाऊ शकतो."
"एक मिनिट, एक मिनिट. याचा अर्थ मी जेव्हा गुलाबाचा वास घेतो तेव्हा हे रेणू गुलाबाच्या वासासाठी असलेल्या संवेदनस्थळामध्ये घट्ट बसतात का?"
"होय!"
"पण मग जगातील प्रत्येक गंधासाठी आणि त्याच्या संवेदनस्थळासाठी इतरांपेक्षा संपूर्ण वेगळा असा एक विशिष्ट आकार असतो का?"
"नाही नाही. खरी गोष्ट अशी आहे की मानवी गंधयंत्रणेमध्ये केवळ ७ वेगवेगळ्या आकाराची संवेदनस्थळे असतात. मनुष्य केवळ सात "शुद्ध गंध" जाणतो. इतर गंध हे या सात गंधांच्या मिश्रणातून तयार होतात.
एक उदाहरण देतो. आपली रसना ही गोड, कडू, तिखट, खारट, आंबट आणि तुरट अशा सहा मूळ चवींचे ज्ञान वापरून इतर क्लिष्ट चवींचाही आस्वाद घेऊ शकते. अगदी तशीच ही पद्धत आहे. आपल्या पूर्वजांनी चवींचा असा अभ्यास करून "रसास्वाद षट् मधुराम्ललवण कटु तिक्त कषायाः" सारखी सूत्रे लिहिली. मात्र गंधांचा असा शास्त्रशुद्ध अभ्यास वैदिक संस्कृतीत झाला नाही. मात्र द्रविड संस्कृतींमधील काही दुर्लक्षित संशोधनांमध्ये सात मूळ गंधांची नोंद द्राविडी भाषेत आढळते. त्यांना मी कर्पूरगंध, उग्र गंध, कस्तुरीगंध, स्वर्गीयगंध, पुष्पगंध, श्यामवल्लीगंध आणि विस्रगंध अशी देशी नावे दिली आहेत. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संशोधनामध्ये आठवा आणि आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असलेला गंध मात्र नोंदलेला नाही. या आठही गंधांसाठी आवश्यक असलेली संवेदनस्थळे आपल्या शरीररचनेमध्ये अर्थातच उपलब्ध आहेत."
"समजतंय. पण हा आठव्या क्रमांकाचा गूढ गंध हल्ली आपल्या नाकापर्यंत पोचत नाही का?"
"अगदी नियमितपणे पोचतो. कदाचित आताही तो तुमच्या नासिकेत असेल. पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही. या गूढ गंधाचे गंधरेणू संवेदनस्थळामधे बंदिस्तही होतात. मात्र पुढे त्याचे काहीही होत नाही. वीज नसेल तर कितीही वेळा कळ दाबली तर दिवा पेटत नाही हे तुम्हाला ज्ञातच असेल. अगदी तसेच आहे हे. मात्र सध्या कार्यरत नसलेली ही यंत्रणा पुन्हा चालू करणे शक्य आहे. मी त्याचा पुरेसा अभ्यास केला आहे. आपल्याला काही निवडक मज्जातंतूंवर काम करावे लागेल. खरे तर मज्जातंतू आणि स्नायू यांच्या मूलभूत रचनेत फरक असतो. एखादा स्नायू जर कार्यरत नसेल तर तो पुन्हा कार्यक्षम करणे अशक्य असते. मात्र मज्जातंतू पुन्हा कार्यक्षम करणे शक्य आहे. त्या विशिष्ट गंधाची तीव्रता काही हजार पटींनी वाढवून एखादा योग्य उत्प्रेरक त्यात मिसळला की त्या गंधाच्या प्रभावाने हा मज्जातंतू पुन्हा कार्यरत होईल. मनोरुग्णालयांमध्ये देण्यात येणारी 'शॉक ट्रीटमेंट' अशाच पद्धतीची असते. आता मी आवरते घेतो. इतकी तोंडओळख तुम्हाला पुरेशी आहे. यापुढील अधिक तांत्रिक माहिती द्यायला मला आवडेल पण तुम्हाला त्यातले काहीही कळणार नाही."
सुश्रुतच्या स्पष्टीकरणानंतर मी थोडासा विचार केला आणि त्याला आवश्यक ती मदत देण्यास तयार झालो. त्याची सध्याची नोकरी सोडून भारतात परत येऊन माझ्या बंगल्याशेजारच्या औटहाऊसमध्ये एक छोटी प्रयोगशाळा उभारण्याचे त्याने मान्य केले. प्रयोगासाठी होणारा सर्व खर्च - सुश्रुतच्या गलेलठ्ठ पगारासहित - मी उचलावा व बदल्यात प्रयोगाची जी काही निष्पत्ती असेल - फायदा वा तोटा - त्यामध्ये निम्मा हिस्सा माझा व निम्मा हिस्सा सुश्रुतचा असे करण्याचे ठरले.
दुसर्याच दिवशी सुश्रुतने "वैयक्तिक अडचणींमुळे नोकरीत राहणे शक्य नाही" असे सांगून आपला राजीनामा मालकीणबाईंकडे सूपूर्त केला आणि पॅरिसमधला गाशा गुंडाळून भारतात परतला. पुण्याहून नगरकडे जाणार्या रस्त्यावर चंदननगरच्या थोडं पुढे मुख्य रस्त्यापासून बराच दूर असा माझा भव्य बंगला होता. ठरल्याप्रमाणे बंगल्याच्या औटहाऊसमध्ये केवळ एका आठवड्यात संपूर्ण प्रयोगशाळा सुश्रुतने उभारली. प्रयोगांसाठी आवश्यक अशी दोन माकडेही - एक नर व मादी - त्याने कुठुनशी मिळवली. त्यांना ठेवण्यासाठी पिंजर्याची व्यवस्था केली. माझा बंगला वर्दळीपासून दूर, जरा आडबाजूला आहे हे त्याच्या पथ्यावर पडले होते. त्याच्या कामामध्ये मदत म्हणून वासंती नावाची एक सुस्वरुप नसली तरी बरीच सुबक-नीटनेटकी आणि आकर्षक अशी तरुणी त्याने सहाय्यक म्हणून ठेवली.
भारतात परत आल्यावर माझ्या दैनंदिन व्यापामध्ये मी आकंठ बुडून गेलो. सुश्रुतच्या प्रयोगाकडे व वाटचालीकडे लक्ष द्यायला मला वेळ मिळत नव्हता. पुणे शहराच्या बाहेर नवीन आय-टी पार्क तयार करण्याचा प्रस्ताव तेव्हा शासनाच्या विचाराधीन होता. त्याचे कंत्राट माझ्या कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळणे शक्य होते. त्यासाठी आवश्यक ती मोर्चेबांधणी करण्यात मी गुंतून गेलो होतो. बेंगलोर, गुरगाव व मुंबईमध्ये सुरु असलेल्या आमच्या प्रकल्पांना भेटी देण्यासाठी बराच काळ मला पुण्याबाहेर राहावे लागत होते. माझी आणि सुश्रुतची भेट महिन्यातून एखादेवेळी होत असे. शिवाय संशोधनात्मक कामांमध्ये मला काडीचाही रस नव्हता. एखाद्या कामाचे फळ मिळण्यास अनिश्चित काळ लागणार आहे हे एकदा स्पष्ट झाले की मला ते काम शिळे व उबगवाणे वाटू लागे. माकडांची प्रयोगात्मक लैंगिक क्रीडा व वासंतीचे विभ्रम यांनाही मी फार लवकर कंटाळलो. अर्थात एकदा प्राप्त झालेल्या स्त्रीकडे पुढे लक्ष देणेही मला कंटाळवाणे वाटते हे खरे असले तरी वासंती रतिक्रीडांमध्ये फारच तरबेज होती हे मान्य केलेच पाहिजे. तिचे बाह्यरुप व एका पावसाळी कुंद दिवशी झालेले तिचे आगळे दर्शन - सुश्रुत त्यावेळी एका बेडकाच्या नाकामध्ये इलेक्ट्रोड्स खुपसून काही नोंदी करण्यात मग्न होता - यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक होता. स्त्रिया अनाकलनीय असतात हे माझे मत वासंतीमुळे अधिक ठळकच झाले. मला भेटलेल्या सर्व स्त्रिया या पहिल्या प्रणयप्रसंगातच आपली सर्व शस्त्रे वापरून घेतात त्यामुळे पुन्हा त्याच स्त्रीला अगदी पाहणेही माझ्या जीवावर येते. नंतर घडणार्या रटाळ पुनरावृत्तीमध्ये उत्कटतेचा कणभरही अंश नसतो. त्यामुळे वासंतीसोबतच्या प्रसंगानंतर जवळपास वर्षभर प्रयोगशाळेकडे मी ढुंकूनही पाहिले नाही. त्वरित भेट घेण्यासंबंधीचा सुश्रुतचा एसएमएस आला नसता तर त्यालाही मी विसरून गेलो असतो.
Thursday, October 25
गंधआसक्त - १
मी सुश्रुतला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा एखाद्या केसाळ अस्वलाला पाहतो आहोत असं मला वाटलं होतं.
तीन वर्षापूर्वी एका बाईबरोबर सुट्टी घालवायला मी पॅरिसला गेलो होतो. तिथं हॉटेलबाहेरच्या हिरवळीवर निवांत बसलो असताना एक सावळा दिसणारा माणूस माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला,
"नमोनम:, मी सुश्रुत."
"नमस्कार, मी हृदयनाथ", मी म्हणालो.
एखाद्या शिंगे नसलेल्या पण किंचित फुगीर कानशिले असलेल्या केसाळ बोकडाच्या नाकातूनही जर काही केस डोकावू लागले तर तो सुश्रुतसारखा वाटला असता. फक्त सुश्रुतच्या हनुवटीवर थोडे अधिक केस होते.
"खरे म्हणजे मी बराच वेळ तुम्हालाच शोधत होतो.", असं म्हणून सुश्रुत अगदी माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि त्याने बोलायला सुरुवात केली. सुश्रुत अतिशय उत्तम वक्ता आहे हे थोड्या वेळातच माझ्या ध्यानात आलं. ऐकणार्याला अगदी संमोहित करण्याची कला त्याला अवगत होती. आपली केसाळ बोटं एखाद्या नर्तकीप्रमाणे नाचवत, हावभाव करत त्याच्या तोंडून अस्खलित भाषेत शब्दांची आतिषबाजी होत होती. सुश्रुतला अजिबात ओळखत नसूनदेखील त्याची आगंतुक उपस्थिती मला खटकेनाशी झाली.
सुश्रुत पॅरिसमध्ये एका अत्तरे, सुगंधी द्रव्ये बनवणार्या कंपनीत कामाला होता. तो स्वत:ला "विद्यापीठाचा पदवीप्राप्त रसायनशास्त्रज्ञ" म्हणवून घेत असला तरी तो तिथला एक साधारण सुपरवायझर होता हे त्याच्या व्हिजिटिंग कार्डावरून सहज लक्षात आलं.
"खरे म्हणजे मी एक उत्तम सुगंधतज्ज्ञ आहे. भारतात या कलेची कदर होत नसल्यामुळे इकडे यावे लागले.", सुश्रुत म्हणाला.
"म्हणजे? वेगवेगळ्या वासांची तुला माहिती आहे?", मी.
"नो नो नो, कोणताही वास नाही. फक्त सुगंध! कोणत्याही प्रकारच्या सुवासाबद्दल मला जितके ज्ञान आहे तितके जगात क्वचितच कोणाला असेल. मी कोणत्याही प्रकारचा गंध तयार करू शकतो. "
अशा अतिशयोक्तिपूर्ण दर्पोक्तीची मला अतिशय किळस येते. पण मी काही बोलण्यापूर्वीच सुश्रुतच्या शब्दांची आतिषबाजी सुरु झाली.
आपल्या तर्जनीचे टोक केसाळ नाकावर ठेवून "बघा, एखाद्या सामान्य नाकाप्रमाणेच वाटते की नाही?" सुश्रुतनं विचारलं.
त्याच्या नाकाच्या आसपास असलेले केस विंचरायला त्याला माशांच्या हाडांपासून बनवलेला एखादा स्वतंत्र कंगवा लागत असावा याकडे दुर्लक्ष करून त्याच्या नाकाबद्दल काहीही वेगळं वाटत नाही हा अभिप्राय मी नोंदवल्याबरोबर "पण हे सामान्य दिसणारे विशिष्ट इंद्रिय जबरदस्त संवेदी आहे. ओन्ली ट्वाईस, केवळ दोनदा हुंगून रॉकेलच्या गॅलनमध्ये कापराची वडी पडलेली आहे हे मी ओळखू शकतो. आयफेल टॉवरजवळच्या पर्यटकांच्या गर्दीतील काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या त्या तरुणीच्या अत्तराचा वास मला ३०० फूट अंतरावरही स्पष्ट जाणवतो." , सुश्रुतने समोर आयफेल टॉवरच्या दिशेने बोट केले. माझं लक्ष पुन्हा त्याच्या केसाळ हाताकडे गेलं.
पुढे त्याने त्याच्या कंपनीने बनवलेल्या दोन प्रसिद्ध अत्तरांची नावे सांगून या अत्तरांचा फॉर्म्युला आपणच बनवल्याचा दावा केला.
"आणि त्या हरामखोर बाईने ही अत्तरे विकून २० बंगले बांधले आणि १० जणांशी लग्न केले. ", सुश्रुत म्हणाला.
"कोण बाई?"
"आमच्या कंपनीची मालकीण."
"आणि तुला काहीही फायदा मिळाला नाही?"
"कसा मिळणार, मी केवळ एक गरीब पगारी नोकर आहे हो." एखाद्या कुत्र्याप्रमाणे लाचारी चेहर्यावर आणण्याचा अभिनय करत सुश्रुतने आपले हात पसरले आणि खांदे अगदी वर आपल्या कानांच्या केसाळ पाळ्यांपर्यंत आणले. खांदे खाली करून तो पुढे म्हणाला, "पण माझे एक भव्य आणि महान स्वप्