Saturday, September 29

चांदोबा

काही दिवसांपूर्वी हे कोडे लिहिल्यावर "का रे अजून चांदोबा वाचतोस का?" असं कुणीतरी मला विचारलं होतं. त्यावेळी उगाचच चांदोबाची आठवण येऊन पिसं उधळल्याप्रमाणं झालं. खरंच लहानपणी एका वेगळ्याच दुनियेत नेणार्‍या या अद्भुत पुस्तकाबद्दल अजून कोणी कसं बरं लिहिलं नाही?

"चांदोबा" ची ओळख करुन द्यायची खरं तर आवश्यकता नाही. माझ्या लहानपणी लहान मुलांच्या मासिकांचे पर्याय फारच मर्यादित होते आणि आता टीव्हीच्या धुमाकुळामुळे कोणी वाचतही नसेल. चांदोबा, किशोर, कुमार, ठकठक, चंपक आणि ज्ञान प्रबोधिनीचे "छात्र प्रबोधन" ही मासिके मला माहिती होती. त्यातही किशोर सारखे मासिक दिवाळी अंक वगळता कधी मिळालेच नाही. बहुतेक फक्त दिवाळी अंकच काढत असावेत. त्यांचे दिवाळी अंकात येणारे किल्ले करायला मजा यायची. ठकठक आणि चंपक वाचायला सुरुवातीला मजा वाटली. पण नंतर त्याचा प्रभाव फारसा टिकून राहिला नाही. चांदोबाचं मात्र तसं नव्हतं. चांदोबा वाचताना कधी कंटाळा आला नाही.


चांदोबाच्या गोष्टींमध्ये डावे-उजवे करणे शक्य नाही असे आता वाटते. पण त्यात सर्वाधिक आवडणारा भाग कोणता? असं विचारलं तर या प्रश्नाला "विक्रम आणि वेताळ" हे उत्तर सगळेच जण देतील. वेताळ पंचविशी नावाचं एक दुसरं पुस्तक त्यावेळी मिळायचं पण त्यात "चांदोबा"ची मजा नव्हती. साहस, अद्भुतरम्यता, गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण करून नंतर विक्रमाला बोलायला भाग पाडणारा वेताळाचा प्रश्न, कथेतील पात्रांची संस्कृतप्रचुर नावं हे सगळं एका वेगळ्याच जगात घेऊन जायचं.

आधी वाचलेल्या रामायण, महाभारतातल्या गोष्टी, ग्रीक कथा, लोककथा या पुन्हा पुन्हा वाचायलाही मजा येत असे.याचं महत्त्वाचं कारण कदाचित चांदोबातली लाल-पिवळ्या-हिरव्या-निळ्या अशा गडद रंगातली, पिळदार स्नायू असलेले हीरो आणि टपोर्‍या डोळ्यांच्या नायिका यांची रेखीव चित्रं हे असावं. चित्रांमध्ये जमिनीवर सरपटणारे नाग, निवडुंगाची झाडं, झाडावर बसलेले पक्षी आणि फांद्यावर अडकलेल्या मानवी कवट्या अशा बारीकसारीक गोष्टींची नोंद असायची."क्रमश:" असणार्‍या कथामालिकेतील एखादा भाग वाचला की त्याच्या आधीचे आणि नंतरचे भाग वाचण्यासाठी उरलेले चांदोबा मिळवण्यासाठी खूप धडपड करायचो. चांदोबात २५-३० वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली कथा पुन्हा वाचताना ती तितकीच ताजी वाटायची. या कथांचे मराठी अनुवाद कोण करतो देव जाणे. अगदी सुरेख अनुवाद असतात.

चांदोबाला जुलैमध्ये ६० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने चांदोबाचा जीवनप्रवास वाचनात आला. तोदेखील चांदोबातील गोष्टींइतकाच सुरस आहे. तो इथं देणे म्हणजे जीएंच्या भाषेत दुसर्‍याने बनवलेला स्वयंपाक आपण गरम करून वाढण्यासारखा आहे. पण तो देण्याचा मोह आवरत नाही.

जुलै १९४७ मध्ये सुरू झालेल्या चांदोबाची स्थापना नागीरेड्डी आणि चक्रपाणि यांनी केली. सुरुवातीला चांदोबा तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रकाशित होत होता. ६ आणे इतक्या किमतीच्या चांदोबाच्या सुमारे ६००० प्रती सुरुवातीला विकल्या जात होत्या.

चक्रपाणि आणि नागीरेड्डी यांनी चांदोबा सोबतच तेलुगू चित्रपटांच्या निर्मितीचेही काम सुरू ठेवले. चक्रपाणि यांचे १९७५ मध्ये निधन झाल्यानंतर विश्वनाथ रेड्डी यांनी चांदोबाचे काम पाहण्यास सुरुवात केली. विश्वम या नावाने ते अजूनही चांदोबाचे संपादकीय काम पाहतात. हळूहळू १२ भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ लागलेला चांदोबा लोकप्रिय होत होता. १९८० मध्ये चांदोबाच्या सर्व भाषा मिळून सुमारे ९ लाख प्रती विकल्या गेल्या. नागीरेड्डी तोपर्यंत एक यशस्वी चित्रपट निर्माते म्हणूनही गणले जाऊ लागले होते. त्यांचे "राम और श्याम", "ज्युली" वगैरे चित्रपट हिट झाले होते.

१९८० मध्ये नागीरेड्डी यांच्या थोरल्या मुलाचे - प्रसादचे - निधन झाल्यावर नागीरेड्डींना नैराश्याचा झटका आला. त्यावेळी चित्रपट अभिनेते संजीव कुमार यांनी त्यांना मदत करून "श्रीमान श्रीमती" या नव्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा पाठपुरावा केला आणि नागीरेड्डींना नैराश्यातून बाहेर काढलं. मात्र नव्वदाव्या दशकात कामगारांच्या अडचणींमुळे काही कौटुंबिक तंट्यामुळे चांदोबाचे प्रकाशन काही काळ बंद करावे लागले. त्यावेळी चांदोबाची विक्री होती सहा लाख प्रतींची. नोव्हेंबर १९९९ मध्ये विश्वम यांनी पुन्हा प्रकाशन सुरु केले आणि तेव्हापासून सर्व भाषांतील चांदोबाची प्रतिवर्षी २ लाख प्रतींची विक्री होते. इन्फोसिस, प्रथम अशासारख्या संस्थांकडून मिळणारी मदत आणि वॉल्ट डिस्ने कंपनीबरोबर सहकार्यामुळे चांदोबाची आजची वाटचाल कमी अडथळ्य़ांची झाली आहे. विश्वम यांना चांदोबा ही मुलांवर भारतीय संस्कार करणारी एक विनालाभ संस्था बनवायची आहे.

चांदोबाला साठ वर्षं पूर्ण झाल्याच्या बातम्यांमुळे लहानपणी निर्भेळ आनंद देणार्‍या या दर्जेदार मासिकाची आठवण पुन्हा एकदा जागी झाली आणि एका दुकानातून सप्टेंबर महिन्याचा चांदोबा घेऊन आलो. मुखपृष्ठावरच अशोकवनातल्या सीतेचं चित्र होतं. मिथिला नगरीतली सीता दक्षिण भारतीय पद्धतीप्रमाणे अगदी मीनाक्षी. :) जयमल्ल, श्वानकर्णी, बिडाली, वीरबाहू, विक्रमार्क अशा नावांमध्ये पुन्हा गुंग होऊन गेलो. चांदोबा उगाचच इतके दिवस बंद केला. परत वाचायला सुरुवात केली पाहिजे.

Monday, September 24

रानातील प्रकाश

अनुवादित साहित्याला मराठीत मानाची खुर्ची कधी मिळत नाही ही नेहमीची रड आहे. जीए कुलकर्णी, शांता शेळके, वीणा गवाणकर, दुर्गा भागवत वगळता दर्जेदार मराठी अनुवाद माझ्या फारसे पाहण्यात आलेले नाहीत.

काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रदर्शनात जीएंचे "रानातील प्रकाश" हे छोटेसे पुस्तक हाती लागले आणि वाचायला सुरुवात केल्यावर पुस्तक संपल्यानंतरच भानावर आलो. बर्‍याच दिवसांनी असे झाले होते. "रानातील प्रकाश" हा Conrad Richter या लेखकाच्या "The Light in The Forest" या पुस्तकाचा अनुवाद.

Conrad Richter हा जीएंचा अतिशय आवडता लेखक. "माझ्या एखाद्या पुस्तकाचे परीक्षण छापून आले की, मी Richter चा अनुवाद केला आहे, ही गोष्ट कुणी नमूद करतो की काय हे उत्सुकतेने पाहत असे" असे म्हणण्याइतपत त्यांना तो आवडत असे. जवळचा वाटत असे. USIS च्या एका प्रकल्पांतर्गत या लेखकाची जीएंनी रान-गाव-शिवार ही कादंबरी मालिका, आणि "स्वातंत्र्य आले घरा", "रानातील प्रकाश" या स्वतंत्र कादंबर्‍या अशी पाच अस्सल खानदानी पुस्तके अनुवादित केली.

दोन संस्कृतींमधील संघर्ष हा चिरंतन चाललेला प्रकार आहे. एखादा नवा देश - नवा समाज कसा निर्माण होतो. झुंडींनी येणारे लोक तेथील मूळ रहिवाशांना मागे ढकलत, त्यांना नामशेष करत स्वत:ची नवी संस्कृती कशी निर्माण करतात असा या कथेचा गाभा असला तरी कहाणी आहे ती "ट्रू सन" नावाच्या जन्माने युरोपियन-अमेरिकन तरूणाची.

ट्रू सन ४ वर्षांचा असताना डेलावर इंडियन जमातीच्या लोकांच्या ताब्यात सापडतो. इंडियन लोक त्याला त्यांच्या पद्धतीप्रमाणे वाढवतात. त्याच्या मनावर पूर्णपणे इंडियन संस्कार होतात. १० वर्षांनंतर इंडियन आणि अमेरिकन लोकांमधील संघर्षविरामातील करारानुसार त्याला त्याच्या मनाविरुद्ध जन्मदात्या युरोपियन पालकांकडे पाठवले जाते. दु:खी ट्रू सन या नव्या जगातील आयुष्याचा मनापासून तिरस्कार करतो. संधी साधून तो पुन्हा आपल्या इंडियन पालकांकडे परत येतो. इंडियन लोकांना मागे हटवताना त्यांच्या लहान मुलांचे अमानुष बळी घेणार्‍या अमेरिकनांचा तिरस्कार करणार्‍या ट्रू सनला इंडियन लोकांकडेही गोर्‍या मुलांची कातडी सापडते. मात्र पुढे त्याला एका जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. त्याचा इंडियन ते अमेरिकन आणि नंतर पुढे होणारा प्रवास हा जीएंनी त्यांच्या अनोख्या भाषाशैलीने मराठीत अक्षरश: जिवंत केला आहे.

ही कादंबरी वाचल्यावर मी पूर्णपणे हलून गेलो. साम्राज्यवादी मानसिकतेचा इंडियन प्रदेशावर अन्यायाने झालेला कब्जा. दोन संस्कृतींमधील संघर्षामध्ये नेहमीच अंतर्भूत असलेली हिंसा आणि लहानपणापासून एका संस्कृतीत-एका संस्कारात वाढलेल्या मुलाला पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीत पाठवल्यानंतर निर्माण होणारी गुंतागुंत या कादंबरीत अतिशय प्रभावीपणे व्यक्त झाली आहे.


अनुवाद वाचल्यानंतर मूळ इंग्रजी कादंबरी वाचण्याची इच्छाही लगेचच पूर्ण झाली. मूळ कादंबरीची भाषाशैली आणि अनुवादाची तुलना केली तर जीएंनी स्वत:च्या भाषाशैलीने या अनुवादात थोडे आक्रमण केले आहे असे थोडे वाटून गेले.

ऊर्जा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची किंमत ९० रुपये आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रकाशक श्रीनिवास पंडित यांनी Conrad Richter ची जीएंनी अनुवादित केलेली इतर पुस्तकेही प्रकाशित करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. :) त्यांच्याशी मागच्याच आठवड्यात फोनवर बोलणे झाले तेव्हा खूप वर्षांपूर्वी वाचलेली - अतिशय वेगळा विनोद असलेली "सोन्याचे मडके" (The Crock of Gold) ही जीएंची अनुवादित कादंबरी ब्लू बर्ड प्रकाशन प्रकाशित करण्याचा विचार करत आहे हे कळले.

खरंच ही सगळी पुस्तके वाचायला मिळाली तर काय मजा येईल.

अवांतर: The Light In The Forest ही कादंबरी येथे वाचता येईल.

Saturday, September 22

एकमेव!

शिवाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रात जवळजवळ प्रत्येक गावात आहेच. बहुतेक पुतळे हे अर्धपुतळा स्वरुपाचे आहेत. शिवाय पुतळ्यांमुळे प्रेरणाबिरणा मिळण्याऐवजी पोलिसांची डोकेदुखी म्हणूनच ते जास्त त्रासदायक ठरतात. पुतळ्यांचा उपयोग किती आणि त्रास किती वगैरे आठ्याळ प्रश्नांची चर्चा करायला भरपूर वेळ आहे. मी पण त्यात भाग घेईन.

पण डांगे चौकातला महाराजांचा हा पुतळा सुंदरच आहे. शिवाय संध्याकाळच्या प्रकाशात फोटोही मस्त आला आहे.






Thursday, September 20

गौरी गणपती

आमच्या घरी गणपती नसतो. त्याऐवजी चिंचवड परिसरातले हे गणपती पहा.

गौरी

आमच्या शेजारचा गणपती

सोसायटीचा गणपती

सोसायटीचा गणपती


रेणुका माता (यल्लम्मा)

गांधी पेठ

दत्तनगर

संपादकीय अग्रलेखः मिसळ की भेसळ

सर्व पात्रे काल्पनिक. (असे आपले म्हणायचे.)

संपादकत्व स्वीकारुन आम्हाला बरेच (म्हणजे २) दिवस झाले आहेत. पण एकही लेख आमच्या अनुमतीची वाट पाहत शेपूट हलवत बसलेला नाही हे ध्यानात आल्यावर आम्ही ताडकन भानावर आलो. आणि ह्या पदात वाटते तितकी मजा नाही हे जाणून घेऊन संकेतस्थळाचे सदस्य लोकशाही मार्गाने आमच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करण्यापूर्वी आम्हाला संपादकपद मिळाल्याची निळसर सुगंधी आठवण लिहून ठेवायचे ठरवले.

या आठवणीचे ब्याकग्राऊंड तुम्हाला माहीतच असेल. किंवा नसले तर हा परिच्छेद वाचल्यावर माहीत होईल. मराठी संकेतस्थळांवरील आमच्या वावराला बरेच दिवस होऊन गेले होते. पण मराठी संकेतस्थळांवर आवश्यक तो मान आम्हाला मिळत नाही या कल्पनेने आम्ही प्रचंड बेचैन होतो. जग उलथापालथ करुन सोडण्याची क्षमता असणार्‍या आमच्या साहित्याला केवळ २ प्रतिसाद. आणि संजोप राव, विसोबा खेचर असल्या मूळच्या पुण्याबाहेरच्या मंडळींच्या लेखाला ८० प्रतिसाद येत असत. या काळात आमची पोटदुखीही थोडी बळावली होती. (परवाच्या गणेशचतुर्थीपासून ती बरी आहे.) पण या सर्वामागे संकेतस्थळांच्या संचालकांचे काही कुटील कारस्थान आहे हे सिद्ध करण्यास काही विदाचीही गरज नव्हती. अगदी सूर्यप्रकाशाएवढे ते सत्य होते. त्यामुळे प्रशासकत्व नाही तरी निदान उपसंपादकपदाची तरी जबाबदारी मिळावी या हेतूने सध्या ह्या खुर्च्या उबवणार्‍या लोकांवर मिळेल तिथून टीका करणे हे Dilbert Principle आम्ही भक्तिभावाने आचरत होतो. पण कुठे डाळ शिजेल तर शपथ. उगाच नंतर कोणी आमच्यावर काही फाजील आरोप करायला नको म्हणून आमची साईड 'सेफ' ठेवण्यासाठी आम्ही स्त्री सदस्यांना व्य.नि. तर नाहीच पण शिवाय त्याचे लेखन आवडूनही प्रतिसाद देण्याचे टाळत होतो.

पण एखादे बाबा जसे भक्तांच्या मनातल्या इच्छा ओळखतात आणि भक्ताने त्या व्यक्त करण्यापूर्वीच त्या पूर्ण करून टाकतात तसे प.पू. तात्यामहाराजांनी आम्हाला संपादक मंडळात स्थान दिले. (आम्ही त्यांना मादक द्रव्य तर सोडा -येथे सोडा म्हणजे सोडून द्या- अद्यापि चहादेखील पाजलेला नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. )

असो. मराठी भाषेला संपादकांची थोर परंपरा आहे. जांभेकर, भोपटकर, अत्रे, खाडिलकर, परुळेकर यांच्यासोबत आमचे नाव घेतले जाणार आणि आमचे गुरू सुमार केतकर यांच्या ग्लासात सोडा ओतण्याची संधी आपल्याला मिळणार ( आता येथे 'सोडा' चा अर्थ बदलला. जो तुम्हाला माहितीच आहे.) आणि चिंचवड स्टेशनच्या इतिहासात परवाचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार हे आम्हाला पुरते कळून चुकले आहे पण त्यासाठी एक झणझणीत अग्रलेख पाडणे आवश्यक आहे ही जाणीवही झाली आहे.

तेव्हा निळसर सुगंधी आठवणीऐवजी सादर आहे लोकसत्तेतून साभार परत आलेला आमचा अग्रलेख

"मिसळ आणि भेसळ"


“महाराष्ट्रातील बरेच लोक नाष्ट्याला मिसळ खातात. पुण्याला मिसळ मटकीची बनवतात तर मुंबईला वाटाण्याची. मिसळीचे तसे बरेच प्रकार आहेत त्यापैकी "कोल्हापुरी मिसळ" हा जहाल प्रकार खवय्यांमध्ये लोकप्रिय आहे. या मिसळीची खासियत म्हणजे याची तर्री फारच तिखट असते. त्या तर्रीला कट असा शब्द आहे. सेतुसमुद्रमचे निमित्त करून भाजपा आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी भारतात जो थयथयाट चालवला आहे. त्यालाही कट हेच नाव देणे सयुक्तिक ठरेल. रामाचे नाव घेऊन त्यांनी चालवलेली रावणलीला अपेक्षितच आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडून तेथे थयथय नाचणार्‍यांमध्ये हेच लोक पुढे होते. आता १२३ कराराचा वार फुकट गेल्याने रामसेतूचा मुद्दा उपस्थित करून कॉंग्रेस सरकारला अडचणीत आणायचा त्यांचा डाव आहे. अडचणीत आलेली मांजर जशी गळा धरते तसा भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याच्या ह्या वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

मिसळीवर फरसाण टाकणे आवश्यक असते. नाही तर त्याला सॅंपल पाव म्हटले असते. पुण्यातील मिसळ कुरकुरीत तर मुंबईची मिसळ तिथल्या दमट हवामानामुळे मऊ पडलेली असते. फरसाण हा मूळचा गुजराती पदार्थ. मिसळीमध्ये केवळ शेव असून चालत नाही सोबत भावनगरी, गाठी, पापडी या सर्वांची साथ आवश्यक असते. मात्र ह्या फरसाणाची निर्मिती करणार्‍या गुजराती बंधूंमध्ये ह्या सर्वसमावेशकतेची जाणीव नष्ट होत आहे. विहिंप आणि नरेंद्र मोदींनी हिंदुत्त्वाची प्रयोगशाळा बनवलेल्या ह्या राज्यामध्ये नराधमांचा नंगानाच सुरु आहे. आणि त्यांना फूस आहे ती परदेशीय गुजराती धनिक बांडगुळांची.

मिसळीचा फरसाण बनवण्यासाठी फक्त बेसनपीठ, मीठ आणि मिरची असून चालत नाही. त्याला एकजीव करून नंतर तळण्यासाठी तेलही आवश्यक असते. इंदिरा गांधींनी अन्नटंचाईच्या काळात पामतेल आयातीचा निर्णय घेतला तेव्हा त्यावर टीका करणार्‍यांमध्ये जनसंघाच्या सोबत लालभाईही होते. सर्व देश सांभाळण्याची जबाबदारी साक्षात मार्क्सनेच आपल्या खांद्यावर दिली आहे असे या पक्षातील काही दुढ्ढाचार्यांना वाटते. पण लालभाईंना भारतापेक्षा चीनची काळजी जास्त आहे. आताही १२३ चे निमित्त करून सोनियांना अडचणीत आणण्याच्या भाजप आणि त्यांच्या पित्त्यांना मदत करण्याचे काम ही मंडळी करतच आहेत.

मिसळीसोबत पाव असणे गरजेचे असते. एका हाताने पाव तोडून तो सॅंपलमध्ये बुडवावा आणि चमच्याने फरसाण खावे असे काही मंडळी करतात. वास्तविक पाव हा परदेशी पदार्थ. "पाव खाल्ल्याने धर्म बाटतो" अशी आपल्या पूर्वसूरींची धार्मिक श्रद्धा. विध्वंसाचे राजकारण करण्यासाठी धर्मासारखे साधन नाही. “धर्म ही अफूची गोळी आहे" असे मार्क्सने म्हटले आहे. पण भारतातील लालभाईंना मार्क्सशी काही देणेघेणे नसल्याने धर्मआंधळ्या जनसंघाच्या हातात हात घालून त्यांची वाटचाल सुरूच आहे. मागील निवडणुकीत सोनियांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यासमवेतच त्यांच्या धर्माचाही मुद्दा काही मंडळींनी उपस्थित केला होता. पण मतदारांनी त्यांना सणसणीत मुस्काटीत हाणून देखील ही मंडळी सुधारली नाहीत. शेवटी सोनियांनी पंतप्रधानपद नाकारुन एकाच फटक्यात दहा जणांना गार केले. या फटक्यामुळे बधीर झालेली काही मंडळी अद्यापही भानावर आलेली नाहीत. उमा भारती अजूनही केशवपन करण्यासाठी रोज वस्तर्‍याला धार करतात.

तात्यासाहेब अभ्यंकरांनी मिसळपाव हे संकेतस्थळ सुरू करून राष्ट्रीय एकात्मतेला मोठा हातभार लावला आहे. केवळ मराठी असण्याचा अभिमान आम्हाला कधीही नव्हता. ते काम बाळासाहेबांचे. शिवाय त्यांना माणूस मराठी असून चालत नाही. तो हिंदूही असला पाहिजे. त्यामुळे अविनाश भोसल्यांचे समर्थन करणार्‍या बाळासाहेबांनी दाऊद इब्राहिम मराठी असूनही त्याचे समर्थन का केले नाही हे आम्हाला माहीत आहे.

माणसाने जन्माने मराठी असणे पुरेसे नाही तर कर्माने मराठी असणे आवश्यक आहे. आणि मिसळपाव या सर्वासाठी उपयुक्त आहे.
मिसळपावाला आमच्या शुभेच्छा.



वास्तविक हा अग्रलेख साभार परत येण्याचे कारणच नव्हते. पण हा अग्रलेख लिहिताना केतकरांच्याच ष्टाईलने आम्ही सोडा व सोड्याला थोडे सौम्य करण्यासाठी त्यात मिसळतो ते सोनेरी रंगीत द्र्व्य यांचे प्रमाण उलटपालट केले होते. ते भोवले असावे.

Sunday, September 16

निळ्या काचेचे पेन

संजोप रावांनी म्हटल्याप्रमाणे

कोणतेही पूर्वगृह, कोणत्याही निष्ठा, कोणतेही अहंकार (धार्मिक कार्यक्रमात जानव्यातली लोखंडी किल्ली बाजूला काढून ठेवतात त्याप्रमाणे - जी. ए. ) बाजूला ठेवून वाचकांनी 'निळ्या काचेचे पेन' या चौकस यांच्या कथेचे भाग http://www.manogat.com/node/11514http://www.manogat.com/node/11516 वाचावेत. माहितीजालावर यापेक्षा वरच्या दर्जाचे साहित्य सहसा वाचायला मिळत नाही.


ही कथा वाचल्यावर प्रतिक्रियेसाठी कोणतेही शब्द अपुरेच आहेत. चौकस यांना सलाम!

या आधी संजोप रावांनीच लिहिलेला "वर्तूळ" हा लेख आणि जी.एस. यांनी लिहिलेली "भूलपाखरू" ही कथा यांच्या जोडीने "निळ्या काचेचे पेन" मनात कायमचे बसून राहील.

Saturday, September 15

लाल सिग्नल

निकोल किडमन
रक्तवर्णी असणारे केस तेजस्वी दिसत असले तरी या केसांचे भविष्य निश्चितच उज्वल नाही. नॅशनल जिओग्राफिक मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार खरेखुरे लाल केस असणार्‍या निकोलसारख्या व्यक्ती इ.स. २१०० पर्यंत नामशेष होतील.

याचं मुख्य कारण म्हणजे केसांच्या लाल रंगाच्या निर्मितीस कारणीभूत असलेली गुणसूत्रे ही दोन्ही पालकांकडून - आई व वडील - मुलांमध्ये येणे आवश्यक असते. परंतु अशा "शुद्ध" लग्नांचा आग्रह धरणे सध्या शक्य नसल्यामुळे ही गुणसूत्रे पुढील पिढीमध्ये संक्रमित जरी झाली तरी ती निद्रावस्थेतच राहतात व केसांच्या रंगावर त्याचा फारसा फरक पडत नाही.

हजारो वर्षांपूर्वी जेव्हा केसांना तपकिरी रंग देणार्‍या गुणसूत्रांच्या भेसळीतून ही लाल रंगासाठीची गुणसूत्रे तयार झाली तेव्हा मानवाला त्याचा फायदाच झाला होता. या गुणसूत्रांमुळे सूर्यकिरणांपासून व्हिटॅमिन डी बनविण्याची त्या व्यक्तीच्या शरीराची क्षमता वाढली.

मात्र हे गुणसूत्र शरीरात असलेल्या व्यक्तींना त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय उष्णता-थंडी अशा हवामानातल्या बदलांचा अशा व्यक्तींच्या त्वचेवर लगेच परिणाम दिसून येतो.

जगातील सुमारे ४ टक्के लोकांमध्ये ही गुणसूत्रे आढळली आहेत. अर्थात त्यापैकी अर्ध्या लोकांच्या शरीरात ही गुणसूत्रे निद्रावस्थेत नसतात. खरेखुरे लाल केस असणारे लोक फारच थोडे आहेत. त्यामुळे लाल रंगाच्या केसांच्या आकर्षणापोटी अमेरिकेत मागच्या वर्षी १२.३ कोटी डॉलर्स खर्च झाले ही बातमी फारशी आश्चर्यकारक वाटत नाही.

मिसळपाव डॉट कॉम

शास्त्रीय संगीताचे एक जाणकार आणि मराठी संकेतस्थळांवरील वादग्रस्त व्यक्तिमत्व तात्या यांनी अखेर मिसळपाव डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू केले. आम्हीही या संकेतस्थळाची बरेच दिवस वाट बघत होतो. (आता बर्‍याच संकेतस्थळचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. ;) )

पण मराठी संकेतस्थळांविषयी एक गोष्ट सहज लक्षात येते की आता संकेतस्थळांना भेट देणार्‍या सदस्यांपेक्षा संकेतस्थळांचीच संख्या जास्त झाली आहे. ;)

आंतरजालावर अजून अशी बरीच मराठी जनता आहे की ज्यांना मनोगत, मायबोली, उपक्रम आणि मिसळपाव यासारखी मराठीतली चांगली संकेतस्थळे उपलब्ध आहेत याची कल्पनाच नाही.

नवीन सदस्यांना आकर्षित करून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न आवश्यक आहेत.

Tuesday, September 4

नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड!

सह्याद्रीत ट्रेकिंग करणार्‍या लोकांमध्ये २ प्रकार असतात.
१. हरिश्चंद्रगड पाहण्याची इच्छा असलेले.
२. हरिश्चंद्रगड पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा असलेले.

ही अतिशयोक्ती नाही. हरिश्चंद्रगड या नावाचं प्रचंड आकर्षण ट्रेकर्सना आहे. माळशेज घाट आणि आजूबाजूच्या परिसराचा संरक्षक अशा या किल्ल्याला "ट्रेकची पंढरी" असेच म्हटले जाते. मत्स्यपुराण, अग्नीपुराण, स्कंदपुराणात या गडाचे उल्लेख आढळतात. ह्या पंढरीची वारी करण्याची प्रत्येक ट्रेकरची इच्छा असते. हरिश्चंद्रेश्वर, केदारेश्वर, तारामती माची आणि कोकणकडा यांना भेट देण्यासाठी न तळमळणारा ट्रेकर हा खरा ट्रेकरच नव्हे. ;)

१,२ सप्टेंबरला हरिश्चंद्रगडाला भेट देण्याचा योग आला त्याचीच ही विस्तृत आणि रटाळ नोंद.

हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी खालील रस्ते आहेत.

१. पुणे-आळेफाटा-खुबीफाटा-खिरेश्वर-तोलार खिंड-हरिश्चंद्रगड:
खुबीफाट्याला उतरून पाच किमी चालत खिरेश्वरमध्ये यावे. तिथून तोलार खिंडीच्या वाटेने साधारण चार ते पाच तास लागतात.
२. पुणे-संगमनेर-राजूर-पाचनई-हरिश्चंद्रगड
३. पुणे-संगमनेर-राजूर-तोलार खिंड-हरिश्चंद्रगड
४. पुणे-आळेफाटा-सावर्णे-बेलपाडा-साधले घाट-हरिश्चंद्रगड
५. पुणे-आळेफाटा-सावर्णे-बेलपाडा-नळीची वाट-हरिश्चंद्रगड




आमची मोहीम होती कोकणकड्याच्या डाव्या बाजूला असलेल्या खाचेतून नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड चढण्याची. उपलब्ध असणार्‍या मार्गांमधला हा बहुधा सर्वात अवघड रस्ता.
ट्रेकची योजना आकार घेत असताना अनेकांनी "पावसाळ्यात नळीच्या वाटेने जाण्याचा धोका पत्करू नका" अशा अर्थाचे अनेक इशारे दिले होते. स्वत: आयोजकांनीही हा ट्रेक "अतिशय अवघड" या प्रकारातला असल्यामुळे नियमित ट्रेकर्स वगळता इतरांनी हे धाडस करू नये असे सुचवले होते. पण अशा सूचना (नेहमीप्रमाणे अतिशहाणपणा करून) धुडकावून लावून शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास आम्ही १२ जण शिवाजीनगर बसस्थानकावर हजर झालो. पुणे-नाशिक आरामगाडीतून साडेदहाला आळेफाट्याला आल्यावर सर्वांनाच भुका लागल्याची जाणीव झाली. कल्याणच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलात खाऊन बाहेर आलो आणि सावर्णे गावाकडे जाणारी गाडी किती वाजेपर्यंत मिळेल याची आजूबाजूला चौकशी केली तर "आताच पाच मिनिटांपूर्वी कल्याण गाडी गेली." असे कळले. ट्रक किंवा जीपने माळशेजचा प्रवास रात्री करणे हे धोक्याचे आहे हे नाणेघाटाच्या वेळी कळले होते. त्यामुळे तो पर्याय स्वीकारण्यास कोणी तयार नव्हते. शिवाय आळेफाट्यावरुन कल्याणला जायला "पाहिजे तेवढ्या" बसगाड्या मिळतात हा एक गोड गैरसमज आमच्या मनात होता. दीडदोन तास एस्टीची वाट बघण्यात गेले. बारा-साडेबाराच्या सुमारास नगर-बोरिवली गाडी मिळाली आणि दीड तासाने माळशेज घाट उतरून सावर्णे गावाबाहेर आम्ही उतरलो. उजव्या बाजूला आत जाणार्‍या रस्त्याने पाच मिनिटे चालल्यावर एक शाळा आहे. व्हरांड्यात आयोजकांचे स्थानिक कार्यकर्ते साबळेमामा आमची वाट पाहत होते. मुंबईचे लोक दोन-अडीचपर्यंत येतील आणि ते येईपर्यंत इथेच बसावे लागेल हे स्पष्ट झाले. . पावसामुळे शाळेचा व्हरांडा ओलसर झाला होता. सर्वांना झोपण्यासाठी पुरेशी जागाही नव्हती. शिवाय तासाभरात मुंबईचे लोक येतील तेव्हा सगळं सामान काढण्यापेक्षा तसंच भिंतीला टेकून बसलो.

शाळा, सावर्णे


मुंबईची वीसेक मंडळी पावणेचार वाजता आली. आधी ठरल्याप्रमाणे आम्ही शनिवारी पहाटे निघणार होतो. आणि आता चार वाजले होते म्हणजे पहाट झालीच होती. तेव्हा विश्रांतीची भानगड न करता चार वाजता आम्ही बेलपाड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली.

बर्‍यापैकी उंच अशा दोन टेकड्या पार करून आम्ही कोकणकड्याच्या पायथ्याशी असलेल्या बेलपाडा-वाल्हिवरे गावात आलो. तेव्हा सकाळचे साडेसात वाजत आले होते. ढग आणि धुक्यामुळे कोकणकडा पूर्ण दिसत नव्हता पण त्याच्या भव्यतेची कल्पना येत होती. आयोजकांच्या सौजन्याने गावात चहापान व नाश्त्याचा कार्यक्रम उरकून थोडेसे बसून घेतले. गावाबाहेरच्या ओढ्यावर पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. त्यावेळी गावातल्या काही लोकांनी "नळीच्या वाटेने जाऊ नका त्याऐवजी साधले घाटाने जा. थोडे लांब पडेल पण तो मार्ग तुलनेने सुरक्षित आहे. नळीमध्ये उभं राहणंसुद्धा अशक्य आहे. शेवाळामुळं सगळा रस्ता निसरडा झाला आहे" वगैरे सूचना आम्हाला दिल्या. मात्र त्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं आणि नळीच्याच वाटेने जायचं असं ठरलं.

सव्वानऊच्या आसपास आम्ही कोकणकड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. ऐनवेळी आयोजकांचे अनेक कार्यकर्ते न आल्याने शनिवार दुपार, रात्र आणि रविवार सकाळ यासाठी असलेले स्वयंपाकाचे सामान सर्वांनी वाटून घ्यावे म्हणजे एकाच माणसाला खूप जास्त ओझे येणार नाही असे ठरले. मला मिळालेल्या पिशवीत प्रत्येकी २ लीटर असे दुधाचे साधारण ३-४ टेट्रा पॅक आणि काही छोट्या पुड्या होत्या. त्यामुळे बॅगेचे वजन एकदम आठएक किलोने वाढले. पण त्याला काही पर्यायच नव्हता.
बेलपाड्यावरुन कोकणकड्याच्या डाव्या बाजूला असलेली इंग्रजी व्ही आकाराची खाच स्पष्टपणे दिसते. ह्या खाचेतच नळी लागते. आम्हाला तिथपर्यंत जायचं होतं. बेलपाड्याच्या प्रदेशात अतिशय घनदाट जंगल आहे. झाडाच्या एका प्रकाराने आम्हाला प्रचंड त्रास दिला. या झाडाच्या सर्व फांद्या, खोड वगैरे ठिकाणी बाभळीच्या काट्यांसारखे काटे होते. अशी अनेक झाडे येथे मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे रस्ता निसरडा असला तरी आधारासाठी बर्‍याच झाडांचा काही फायदा होत नव्हता. शिवाय झाड अंगाला लागून खरचटण्याची भीती असल्याने अवधानाने चालावे लागत होते. चार-साडेचार तासांच्या वाटचालीनंतर एक नदी ओलांडून आम्ही थोडी विश्रांती घेतली.

धबधबा


पोहण्याची मजा


कोकणकड्यावरचे ढग थोडेसे विरळ होऊ लागले होते. साधारण ३००० फूट उंचीच्या अनेक भिंती आजूबाजूला दिसू लागल्या. कोकणकडा तर नजर पोचत नव्हती इतका उंच दिसत होता. कड्याच्या उंचीचा अंदाज बांधणे चुकीचे होते. कारण कडा नक्की संपला आहे की त्याचे टोक ढगांमध्ये लपले आहे हेही ठरवता येत नव्हते.

उत्तुंग सह्यकडा


पुढेपुढे चढण त्रासदायक होऊ लागली होती. घनदाट झाडांमधून चालणे अशक्य असल्याने ज्या मार्गाने पाणी वाहते त्याच घसरड्या मार्गाने वर चढणे आवश्यक होते. शिवाय रात्रीची चुकलेली झोप आणि पहाटेपासून झालेली सात तासांची वाटचाल यामुळे चालण्याचा वेगही मंदावला होता. ह्या मार्गात दरडी कोसळण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. प्रत्येक दगडावर पाय ठेवताना तो सटकेल की काय अशी भीती वाटते. तीन तासांच्या वाटचालीनंतर समोर हरिश्चंद्रगडाची "नळी" आता समोर दिसू लागली.



नळीची वाट

अतिप्रचंड उंच अशा दोन डोंगरकड्यांमधील चिंचोळा असा खिंडीसारखा हा भाग आहे. नळीपर्यंत जाण्याचा रस्ता थोडा बिकट होता. कोकणकड्याला चिकटून कपारींचा आधार घेत पुढे पुढे सरकावे लागते. शिवाय हाताने आधार घेतली कपार आणि पाय ठेवलेली खाच कधी निखळून जाईल याचा भरवसा नाही. अगदी मजबूत दिसणार्‍या दगडाला धरावे तर त्याचा मूठभर तुकडाच हातात येईल. अतिशय काळजीपूर्वक चालत नळीच्या सुप्रसिद्ध रॉक पॅचसमोर आलो. पंधरा फूट उंचीचा हा धबधबा आहे. आमच्या मदतीसाठी दोर बांधण्याची व्यवस्था केली होती. नाकातोंडात जाणारे पाणी न जुमानता सगळेजण वर चढून आले.


चढण १


आमचा समज असा होता की हा धबधबा आणि खिंड संपली की एखादा महादरवाजा लागेल आणि आपण थेट किल्ल्यावर प्रवेश करू. पण तसे नव्हते. हा तर पहिलाच पॅच होता. असे सुमारे ४ ते ५ धबधबे आम्हाला चढून पार करावे लागणार होते. प्रत्येक ठिकाणी दोर बांधणे आणि सर्वांना वर घेणे हे काम जोराने वाहणारा वारा, पाऊस, धबधब्यांच्या पाण्याचा जोर यामुळे अतिशय वेळखाऊ होत होते. पावसापासून आडोसा असा कुठेही न मिळाल्याने दुपारचे जेवण शिजवणे व खाणे शक्य झाले नाही. त्यामुळे बिस्किटे, लाडू, चणे, शेंगदाणे अशा गोष्टींवर भूक भागवावी लागली. जसजसे वर जाऊ तसतसा कडाही उंच होतोय की काय असे वाटत होते. अनेक ठिकाणी दोर बांधण्यासाठी आवश्यक असा मजबूत दगड न सापडल्याने एकमेकांना हातानेच आधार देऊन पुढे घ्यावे लागले.


चढण २



शेवटून दुसरा धबधबा ओलांडून वर आलो तेव्हा संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. झाडीमधून जाणारी चिखलाची निसरडी उंच चढण पार केली आणि एका पठारावर आलो. सर्वजण तिथे जमेपर्यंत साडेसहा वाजून गेले. आता अंधार पडू लागला होता. बर्‍याच जणांनी आवश्यक असलेल्या बॅटर्‍या आणि सेल न आणल्याने एकमेकांना रस्ता दाखवत घनदाट जंगलातून चालायला सुरुवात केली. अडीच तास चालल्यानंतर पुढे शेवटचा पॅच होता.


चढण ३


रात्री नऊच्या सुमारास आम्ही त्या पॅचच्या पायथ्याशी पोचलो. दोर बांधणे व त्याची चाचणी घेणे यात तासभर गेला. या वाटेवरचा हा सर्वात उंच पॅच. साधारण २० फूट उंचीचा अर्धवर्तुळाकार दगड चढून वर यायचे होते. अंधारात चढायला खूपच वेळ लागत होता. सर्वजण वर येईपर्यंत अकरा वाजले. एकदाचे आम्ही गडावर येऊन पोचलो हो