नाणेघाटाला जाऊन आल्यानंतर पुढच्याच आठवड्यात लगेच एका गटासोबत माळशेजला निसर्गपर्यटनासाठी जाण्याची संधी मिळाली.
नाणेघाटाच्या वेळेस माळशेजचा प्रवास रात्री केला होता. त्यात खूप धुकंही होतं. त्यामुळं माळशेज फारसा दिसला नाही.
त्यामुळं गेलो.
कदाचित खंडाळा घाटाच्याही आधीचा, देशावरच्या लोकांना कोकणात उतरण्यासाठी असलेला हा खूप जुना घाट. पेपरात दरडी कोसळून रस्ता बंद या बातमीमुळे माहिती होणारा.
पुणे-नाशिक रस्त्यावर आळेफाट्यानंतर डावीकडे वळालो तेव्हाच माळशेजची चाहूल लागली होती. आजूबाजूला सगळं हिरवंगार होतं. डोंगरावर दिसणारं धुकं, रस्त्याच्या कडेला साचलेलं पाणी, डोक्यावर इरलं घेऊन लगबगीनं चालणारे लोक, हवेतला सुखद, ओलसर गारवा. मस्त वाटत होतं. खूप दिवसांनी माळशेज दिवसाढवळ्या बघण्याची संधी मिळत होती. लहान असताना कल्याण-ठाणे-मुंबईला ह्याच घाटाने जायचो. टोकावड्याचे बटाटवडे, खारे शेंगदाणे, करवंदं, जांभळं सगळं आठवून गेलं.
प्रत्यक्ष घाट सुरु झाला आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाजवळ आलो तेव्हा मात्र भ्रमनिरास झाला. पुढे बर्याच गाड्या दिसत होत्या. घाटात पर्यटकांची बरीच गर्दी असावी. गटामधले नवीन सदस्य लांब दिसणारे धबधबे, रस्त्यावरचं धुकं बघून उत्तेजित झाले होते. आता इथूनच चालायला सुरुवात करावी या हेतूने सगळेजण खाली उतरले. चालायला सुरुवात केली तेव्हा आजूबाजूला लक्ष गेलं. रस्त्याच्या बाजूला, लहान ओहोळांमध्ये दारुच्या, बिसलेरीच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कुरकुरे, लेज यांचे रॅपर्स पर्यटकांनी मुक्तहस्ताने निसर्गाला भेट दिले होते. निसर्ग आणि दारुडे या पोस्टमध्ये हरेकृष्णाजींनी सांगितल्याप्रमाणे माळशेजमध्येही दारुड्यांचा प्रचंड उपद्रव आहे. कदाचित मुंबई-नाशिक पासून येणेजाणे सोपे असल्यामुळे ताम्हिणी, वरंधा घाटापेक्षा खूपच जास्त.
प्लॅस्टिक आणि काचेच्या या प्रदूषणामुळे सह्याद्रीची माती आणि दगडं धरुन ठेवणार्या वनस्पतींची प्रचंड हानी होत आहे. गेल्या काही वर्षात दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याचं कारण हे या वनस्पतींचा नाश हेच असावं. सह्याद्रीच्या अस्तित्त्वालाच धोका उत्पन्न झाला आहे. दोन घटका धबधब्यात भिजून मद्याचा आस्वाद घेणार्या पर्यटकांना याची कसली काळजी!
रस्त्याने अनेक नवनव्या, चकचकीत गाड्या मोठ्यामोठ्याने संगीत वाजवत आणि हातातल्या बाटल्या नाचवत येत होते. गटातल्या मुलींना पाहताच अधिक चेव येऊन शिट्ट्या मारणे, ओरडणे वगैरे प्रकार चालू होत. माळशेजच्या बोगद्याच्या पुढे आल्यावर एक मोठा धबधबा आहे. तिथं तर चक्क ढोल-ताश्याची पथकं आणून काही धुंद मंडळी शर्ट वगैरे काढून स्वैर नृत्य करत होते. एक दोन पोलीस हातात छत्री धरुन बाजूला उभे होते. कदाचित तिथे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याकडे लक्ष देत असावेत. एवढ्या मोठ्या जमावाला दोन पोलीस कसे काय पुरे पडणार?
बाटल्या घेऊन नाचत असलेल्या पर्यटकांना घेऊन जाणार्या बर्याच गाड्यांवर असलेले UP, BR, GJ, CG, JH चे आरटीओ रजिस्ट्रेशन बघितल्यावर नवाकाळ, सामना, पुण्यनगरी वर पोसलेल्या माझ्या काही पेशींनी परप्रांतीयांविरुद्ध क्षणभर बंड पुकारले. पण थोड्याच वेळाने महा-०१ असे मराठी रजिस्ट्रेशन असलेल्या आणि गाडीच्या मागच्या बाजूवर डरकाळी फोडणार्या वाघाच्या चेहर्यासोबत "राजे" असे भगव्या रंगात रंगवून "जे" च्या मात्रेला तलवारीचा आकार दिलेले चित्र असणार्या एका गाडीतून आलेल्या मराठी बांधवांनी त्यावर पाणी ओतले! त्यांनी रस्त्याच्या बरोबर मध्येच गाडी थांबवून तिथेच बाजूला प्रातर्वैधिक जलोत्सर्जन करुन नंतर जोरात गाणी लावून रस्त्यातच मधोमध नाचायला सुरुवात केली. त्यामुळे झालेल्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेल्या प्रवाशांना थोडा वेळ आपले नृत्यप्रकार दाखवल्यावर बाटल्या काढून जोरात चीअर्स केले आणि मग गाडी निघून गेली.
काही बरे फोटो मिळाले. सूर्यस्नानासाठी पहुडलेला एक सुंदर साप बघायला मिळाला. त्यातच समाधान मानायचं. पुढे हे प्रत्यक्ष पाहायला मिळणार नाही कदाचित.
Wednesday, July 25
माळशेज घाट
Tuesday, July 24
तर्कक्रीडा: धन्वंगजाची प्रेमकहाणी
हिंदी महासागरातील अमरद्वीपावर राहणार्या धन्वंगजाचे रुधीरसागरातील मृत्यूद्वीपावर राहणार्या मृदूभाषिणीवर प्रेम होते. हा विवाह अर्थातच तिच्या वडिलांना मंजूर नव्हता. त्यांचे मन वळवण्यासाठी धन्वंगज द्वीपावर आला तेव्हा तेथील सेवकांनी त्याला पकडून सभास्थानी आणले. सभास्थानी असलेल्या श्वेतवर्णीय ध्वजदंडावरील शंखावर असलेला राजसर्पाची मुद्रा पाहताचा धन्वंगजाच्या हृदयाचा ठोका चुकला.
होय. मृदूभाषिणीचा परिवार हा नरभक्षक होता.
बर्याच दिवसांनी रुचकर नरमांसाचा आस्वाद आणि आपल्या आवडत्या उष्ण रक्ताचे प्राशन करावयास मिळणार हे लक्षात आल्यावर यःकश्चित ह्या मृत्यूद्वीपावरील तरुणाने तर बेभान होऊन नृत्यच सुरु केले.
सभास्थानी मृदूभाषिणीचे वडील कृष्णवर्णीय वस्त्र परिधान करुन आले होते. विवाह त्यांना मान्य नसला तरी आपल्या कन्येच्या प्रियकराला एक संधी देणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. अनुभवी अणि बुजुर्ग लोकांना कवडीमोलाचे समजून त्यांचा उर्मटपणे अवमान करण्याच्या नागरी जीवनात असलेल्या प्रथेचा अर्थातच या समाजात अभाव होता. मृदूभाषिणीच्या वडिलांच्या प्रस्तावाला सर्वांची साहजिकच मान्यता मिळाली.
मृदूभाषिणीचे वडील यज्वंधेय यांना तर्कशास्त्रामध्ये थोडीशी गती होती. शिवाय सदैव सत्यकथन करणार्या गंधर्वांचे मांस हे तळल्यावर जास्त चविष्ट लागते तर सदैव असत्यकथन करणार्या यक्षांचे मांस हे भाजल्यावर जास्त स्वादिष्ट लागते हे सूक्ष्म ज्ञानही त्यांना होते.
धन्वंगजासमोर त्यांचा कूटप्रश्न होता तो असा.
"धन्वंगजा, नीट लक्षपूर्वक ऐक.
तुझी अंतिम इच्छा म्हणून तू केवळ एक आणि एकच विधानार्थी वाक्य करु शकतोस.
ते वाक्य जर सत्यकथन असेल तर तुला आम्ही तळून खाऊ आणि असत्यकथन असेल तर तुला भाजून खाणे आम्हाला आवडेल.
आता तुझ्या मृत्यूची पद्धती स्वीकारणे केवळ तुझ्याच हाती आहे. "
हा कूटप्रश्न ऐकल्यावर हर्षभारित होऊन यःकश्चित आपले रुधिरप्राशनाचे आवडते पात्र आणण्यासाठी धावतच आपल्या कुटिराकडे निघाला आणि परत येऊन पाहतो तो काय. धन्वंगजाने असे एक विधानार्थी वाक्य निवडले होते की स्वतःचे प्राणरक्षण करणे त्याला शक्य झाले.
त्याच्या बुद्धिमत्तेवर प्रसन्न होऊन यज्वंधेयांनी मृदुभाषिणीचा विवाहही राक्षस पद्धतीने धन्वंगजाशी लावला. या विवाहात धन्वंगजाने उपक्रमावरील कोडी सोडवण्याच्या सरावामुळे हा कूटप्रश्न सोडवणे शक्य झाले अशी कृतज्ञता व्यक्त केली आणि ग्राम्य पद्धतीचा एक उखाणाही घेतला.
तू माझी म्हैस आणि मी तुझा रेडा"
असो. पुढे काय झाले हे सांगणे नलगे.
तर धन्वंगजाचे प्राणरक्षण करणारे ते विधानार्थी वाक्य कोणते हे तुम्ही ओळखू शकता का?
Monday, July 9
नाणेघाट
नाणेघाटातल्या पावसात प्रस्तरावरोहण करण्याची इच्छा होती. कँप फायर इंडिया ने तसा एक कार्यक्रम आयोजित केला आहे हे कळाल्यावर लगेचच तयार झालो. नेहमी सोबत असणारे आदित्य, विशाल, सागर यांनीही नोंदणी केली होती. मात्र आयोजकांना नावे कळवण्यात थोडा घोटाळा झाल्यामुळे विशाल, मी आणि सागर यांची नावे आयोजकांपर्यंत पोचलीच नव्हती. ऐन वेळी आदित्यच्या दोन मित्रांनी माघार घेतल्यामुळे सागर आणि माझा नंबर लागला.
ट्रेकिंगसाठी प्रायवेट बस करावी की आपल्या महामंडळाचा लाल डबा वापरावा यावर थोडी चर्चा झाली. पण जवळपास बस थांबतील असा मोठा बस थांबा नसल्याने लाल डब्याने प्रवास करणे फारच गैरसोयीचं होतं. त्यामुळे प्रायवेट बस केली. ६ तारखेला रात्री १० वाजता शिवाजीनगरहून बस निघाली. जेवणासाठी मध्ये एक थांबा घेऊन पुणे-नाशिक महामार्गाने आळेफाट्यापर्यंत आलो आणि तेथून माळशेजकडे जाणार्या रस्त्याला वळलो. रात्री एक-दीडच्या सुमारास माळशेज घाटात खुबी जवळ पाण्याच्या बाटल्या भरुन घेण्यासाठी उतरलो तेव्हा समोर धुक्याने लपेटलेला रस्ता आहे याची जाणीव झाली. जवळच्याच टपरीत एकएक चहा मारुन परत बसमध्ये येऊन बसताना पुढचा प्रवास धुक्यामुळे अवघड आहे याची जाणीव झाली होती. फार तर दहा फुटांपर्यंतच्या रस्त्याचा अंदाज येत होता. ड्रायवर साहेबांना मात्र तशी काळजी वाटत नसावी. दुभाजकाच्या पट्ट्यांचा अंदाज घेऊन मस्त ६० च्या स्पीडने गाडी मारत होते. मध्ये एका वळणाचा अंदाज जरा चुकला आणि जोरदार ब्रेक मारुन गाडी अगदी कड्याजवळ थांबवली तेव्हा साहेब जरा भानावर आले आणि आमच्या नशीबाने आता पुढे असलेल्या एका एस.टीच्या मागच्या दिव्यांचा अंदाज घेत आमची गाडी हळूहळू पुढे जाऊ लागली.
नाणेघाटाला जाण्याचा एक रस्ता साबर्णे गाव गेल्यानंतर वैशाखरेच्या थोडा अलीकडे डावीकडे जातो. तिथे बस थांबल्यावर कपडे वगैरे बदलून सगळेजण तयार झाले. हातातल्या बॅटर्या, सर्व वस्तू वगैरे एकदा तपासून डोंगर चढायला सुरुवात केली तेव्हा रात्रीचे पावणेतीन वाजले होते. दगडांवर असलेल्या दिशादर्शक बाणांच्या सहाय्याने मार्गक्रमणा सुरु झाली. रात्रीची वेळ असल्यामुळे चढताना फारसा थकवा जाणवत नव्हता. चढणही अगदी सोपी नसली तरी फारशी त्रासदायक नव्हती. अधनंमधनं पावसाच्या जोरदार सरी येत होत्या. साधारण एक तासाच्या चढणीनंतर ट्रेकला पहिल्यांदाच आलेल्या सदस्यांची दमछाक झाल्याचे लक्षात आले आणि पाच मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा चढायला सुरुवात केली.
सकाळी पावणेपाचाच्या आसपास बर्यापैकी वर चढून आलो तेव्हा आकाशात पांढरट फिकट प्रकाश जाणवू लागला. इतका वेळ आम्हाला रस्ता दाखवणार्या हातातल्या बॅटर्याही एकेक करुन मंद व्हायला लागल्या होत्या. त्यांचे आभार मानून त्या बॅगेत टाकून दिल्या आणि विसाव्याची जागा केव्हा येते याची प्रतीक्षा करत चालू लागलो. इथंही प्रचंड धुकं होतं. ढगच असावेत कदाचित. त्यामुळं अजून वर किती चढायचं आहे, डोंगर किती उंच आहे याचा अंदाज येत नव्हता. भिजल्यामुळं थंडीही वाजू लागली होती. त्यातच भर म्हणून पायर्यांसदृश दगड सुरु झाले होते. दगडांवर जमलेल्या शेवाळामुळे आणि दगडाच्या आजूबाजूने वाहणार्या पाण्यामुळे दगडावर पायाची पकड व्यवस्थित होत नव्हती. क्वचित पाय सटकतही होते.
काही क्षणासाठी ढग थोडेसे बाजूला झाले आणि नाणेघाटाचा रम्य परिसर दृष्टीस पडला. सगळा थकवा क्षणात पळून गेला. ढग पुन्हा येईपर्यंत आम्ही मुक्कामाच्या गुहेपर्यंत येऊन पोचलोही होतो. मुंबईहून आलेले लोक गुहेमध्ये आधीच निवांत पहुडले होते. आम्हाला पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यात आता जोरदार वारा सुरु झाला होता. त्यामुळे थोडा वेळ नाईलाजाने गुहेतच उभे राहण्याचा निर्णय घेतला.
गुहेच्या बाहेर आल्यावर पायर्यांवरुन वर चालत गेले की एक खिंडीसारखा भाग लागतो. ही खिंड धुक्यामुळे आणि कुंद वातावरणामुळे खूपच haunting वाटत होती.
खिंडीच्या पलीकडे गेल्यावर जमिनीत पुरलेले सातवाहनकालीन रांजण, पडक्या भिंती वगैरे दिसू लागल्या. एव्हाना वारा फारच जोरदार झाला होता. गुहेत परत आलो तर गरमागरम उपीट-चहा वगैरे खाण्यासाठी तयार होते. ते खाऊन जरा मोकळ्या झालेल्या जागांवर ओल्या कपड्यातच रात्रीच्या चुकलेल्या झोपेची भरपाई म्हणून थोडी विश्रांती घेतली.
आम्ही जागे झालो तेव्हा प्रस्तरावरोहणाचा कार्यक्रम वरती कड्यावर सुरु झाला होता. पुन्हा थोडंसं खाऊन :) आणि आवश्यक ती सुरक्षेची साधने बांधून तयार झालो. आधी जाऊन आलेली मंडळी "एकदम रावस आहे... मख्खन ...पण उतरल्यावर तो शेवटचा patch थोडा problematic आहे." "simply amazing... फक्त परत येताना सांभाळा" वगैरे सांगत होती.
शेवटच्या तुकडीत आम्ही नंबर लावून निघालो. खिंडीच्या पलीकडे येऊन कड्यावर जाताना वार्याचा वेग किती वाढला आहे हे जाणवलं. अगदी एक एक पाऊल मोठ्या मुश्किलीने पुढे पडत होतं. सपाट रस्त्यावर चालतानाही तोल जात होता. वार्याच्या दिशेला तोंड केले तर श्वास घेणेही अवघड व्हावे अशी परिस्थिती होती. त्यात अजून जोरदार धुकं असल्यामुळे कार्यक्रमात काही अप्रिय घटना तर घडणार नाही ना याची शंका लागून राहिली. वार्याचा अंदाज घेऊन हळूहळू चालत चालत कड्यावर चढू लागलो. जोरदार झोत आला की खाली मान घालून बसावं लागत होतं. असं धडपडत, अडखळत एकदाचे कड्यावर येऊन पोचलो तेव्हा राहिलेल्या लोकांबरोबर वारा कमी होण्याची वाट बघत बसणे क्रमप्राप्त होतं. चालण्याचा प्रयत्न करणार्या एका माणसाचे पाय वार्याने उचलले गेले आणि आमच्याच ग्रुपमधल्या एका मुलीचं rappeling चं हेल्मेट डोक्यावरुन उडून गेलं तेव्हा वार्याचा झोत किती वेगवान आहे याचे पुरावेच आम्हाला मिळाले.
तास-दीडतास वाट पाहूनही वार्याचा वेग कमी होण्याची काही लक्षणं दिसेनात. तेव्हा कार्यक्रम पुन्हा चालू करण्याचे ठरलं. उतरण्यासाठी एकंदर तीन दोरखंड बांधले होते. त्यापैकी दोन हे कड्याचा आडोसा घेऊन वार्याचा त्रास कमी होईल अशा पद्धतीने १०-१५ फूट खाली तर एक दोरखंड अनुभवी किंवा जास्त ऊत असणार्या पटूंसाठी होता. जन्मजात आगाऊ स्वभाव व आधी एकदा प्रपातावरोहण केल्याचा "अनुभव" असल्यामुळे "वार्याचा त्रास काय थोडावेळ होईल... पण इथवर आलोच आहोत तर जरा थोडं जास्त adventure करु" या हेतूने "अनुभवी" दोरखंडाकडे गेलो.
व्यावसायिक मंडळींनी आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमांमध्ये धोका खूपच कमी असतो. दिलेल्या सूचना व्यवस्थित पाळणे व स्वत:चे डोके न लावणे हे लक्षात ठेवले की फारसा त्रास होत नाही. कमरेच्या पट्ट्यामध्ये दोरखंड अडकवून हळूहळू खाली उतरु लागलो. उतरण्यासाठी पहिली एक दोन पावले तेव्हाच वार्यामुळे तोल जात होता. एकदा "लटकलो" की मग ठीक होईल या विचाराने तसाच पुढे उतरु लागलो. नाणेघाटाचा हा कडा शेवटचे ५०-६० फूट वगळता शेवटपर्यंत पायाला आधार देण्यासाठी आहे. मात्र अशा परिस्थितीत तुम्हाला "लटकून" शरीराचे वजन संपूर्णपणे दोरखंडावर टाकणे अवघड जाते. पाय कड्यावर टेकणे अतिशय आवश्यक ठरते. अन्यथा शरीराचा कोणताही भाग कड्यावर जोरात घासू शकतो.
पायांमध्ये व्यवस्थित अंतर ठेवत १०० फुटांपर्यंत खाली उतरलो तेव्हा अचानक एका ठिकाणी पायाला व्यवस्थित पकड न मिळाल्यामुळे कड्यावर आदळलो. दोन्ही गुडघ्याला, एका हाताला खरचटले. हेल्मेटमुळे डोक्याला फारसे लागले नाही. त्यात धुक्यामुळे किती खाली आलो आणि अजून किती खाली उतरायचं आहे याचा अंदाज येत नव्हता. दमट वातावरण आणि मधूनमधून पडणारा पाऊस यामुळे दोरखंड ओला झाला होता. हातमोजेही ओले झाले होते. उतरण्यासाठी आवश्यक ती पकड दोरखंडावर घेणे अवघड जात होते. ओला दोरखंड कमरेच्या कडीतून लवकर सरकतही नव्हता. खूप जोर लावावा लागत होता. अजून थोडा वेळ प्रयत्न करुन ५० फुटांपर्यंत खाली आल्यावर दोर खेचून खेचून उजवा हात भरुन आला. खरचटले होते त्या ठिकाणी भाजल्यासारखी आग होत होती. शिवाय अजून किती उतरायचं आहे याचा अंदाज येत नव्हता. घशाला कोरडही पडली होती. कड्यामध्ये समोर पाय ठेवण्यासाठी/बसण्यासाठी योग्य अशी एक खोबण दिसली आणि त्यातच मग एक दोन मिनिट विश्रांती घेऊन आता डाव्या हाताने दोर खेचूया असा विचार करुन पुन्हा खाली यायला सुरुवात केली. आता खाली येताना फारसा त्रास होत नव्हता. शक्य तितका जास्त दोर खेचून वेगात खाली जावे असे वाटत होते. मध्ये एका ठिकाणी दोर एका दगडात अडकला होता. त्याला जोरात खेचले तर दगडाचा एक मोठा टवका उडाला. असा मोठा दगड वरुन सटकला तर काय या विचाराने घाबरुनच गेलो आणि मग जोरजोरात दोर खेचत खाली येऊ लागलो. :)
एकदोन मिनिटांनंतर खाली एका कॅम्प फायर वाल्याचा लाल शर्ट दिसू लागला तेव्हा जरा बरं वाटलं. खाली उतरलो तर दोन्ही हातांमधला जीव गेला होता. तिथंच बसावं असा विचार होता पण आता २ वाजले होते आणि भूकही फार लागली होती.
आता फक्त कड्याला वळसा घालून गुहेमध्ये चालत जायचं शिल्लक होतं. पण rapelling तर "रावस" होतं... एकदम सोपं... पुढंच थोडं problemtic आहे... असंच सगळेजण म्हणत होते. त्यामुळं आता पुढं काय दिव्य आहे याचा अंदाज घेत चालू लागलो. पुढे एका छोट्या गुहेसारख्या दिसणार्या भागातून थोडं सरपटत आणि बर्याच ठिकाणी थोडा दोरीचा आधार घेऊन असं जावं लागत होतं. मात्र हा patch फारसा अवघड वाटला नाही.
मुक्कामाच्या गुहेत परत आल्यावर जेवण तयार होतंच. हातपाय स्वच्छ करुन जेवण केलं. आणि ओले कपडे बदलून कोरडे घातले तेव्हा जरा बरं वाटलं. थोड्या वेळाने परतीचा प्रवास सुरु करुन जुन्नर-नारायणगाव मार्गे ८ च्या सुमारास पुण्यात घरी पोचलो आणि गरम पाण्याने आंघोळ केली तेव्हा हातपाय जरा जिवंत झाले आणि लागलं होतं तिथं ठणकू लागले.
नाणेघाटाच्या अनेक दंतकथा आहेत. काही लोक सांगतात की सातवाहन काळात कोकणातून जुन्नरकडे येणार्या या रस्त्यावर टोल पद्धत सुरु करण्यात आली होती. टोल म्हणून नाणी द्यावी लागत. म्हणून हा नाणेघाट. तर कुणी सांगतं की शिवाजीराजांनी लुटलेल्या सुरतचा खजिन्याचा काही भाग इथे लपवून ठेवण्यात आला होता, त्यातली काही नाणी इथं सापडतात म्हणून हा नाणेघाट. मला ती नाणी काही सापडली नाही. पण हातापायाला झालेल्या जखमांबरोबरच परत आलो ते आदित्य, सागर सारख्या मित्रांबरोबर नाणेघाटाच्या धुंद वातावरणाच्या आठवणी घेऊन. हाच खरा खजिना. खरं तर जे अनुभवलंय ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. पण जी काही भटकंती करणार आहे त्याची नोंद ठेवण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच.
सागरने काढलेले नाणेघाटाचे अजून काही "रावस" फोटो.

अवघड शब्दांचे अर्थ:
प्रस्तरावरोहण: rappelling
कार्यक्रम: event
चढण: climb
सदृश: like
