Monday, June 25

बाबांशी भेट

कालच्या बाबांच्या भेटीचे वर्णन मनीषच्या शब्दात वाचा.



यावेळी काही अर्जंट आणि महत्त्वाच्या कामामुळे मला जायला जमलं नाही. :(
(ते काम अर्थातच "अपरिहार्य" होतं हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल ;) .)

Sunday, June 24

वाया गेलेलं मत



लोकसभा, महाराष्ट्र विधानसभा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि इंडिब्लॉगीजच्या निवडणुकीतील मताप्रमाणेच आयडिया सारेगमपच्या महाअंतिम फेरीसाठीही सुमीत राघवनला दिलेलं माझं मत वाया गेलं. :(

पण त्याने "सुंदरा मनामध्ये भरली" ही लावणी आणि "ती गेली, तेव्हा रिमझिम" हे गाणं झकासच म्हटलं होतं.





जाऊदे! अभिनंदन प्रसाद. पुण्याची शान राखलीस हो!

Thursday, June 21

मराठी माणसाचा सत्कार

रजनीकांत ऊर्फ शिवाजीराव गायकवाड यांचा शिवाजी चित्रपट सुपरहिट झाला आहे. ही सर्व मराठी माणसांसाठी गौरवाची बाब आहे.

गौरवने सांगितल्याप्रमाणे रजनीकांतचा सत्कार होणे अतिशय आवश्यक आहे. पण पुण्यात सत्कार केला तर रजनीकांतला स्वत:लाच हार व फुले घेऊन यावे लागेल. त्याला हार, शाल व श्रीफळ द्यायला पुणेकरांचे पैसे वर आलेले नाहीत. त्यामुळे तो कार्यक्रम मुंबईत केलेला बरा.

या चर्चेमध्ये मराठी माणसाची तळी उचलून धरल्याबद्दल गौरव, पॅट्रिक्स, साक्षीदालचिनी यांना "जाऊ तिथं खाऊ" या चित्रपटाचे प्रत्येकी एक तिकीट व चित्रपट पाहताना गौरव व पॅट्रिक्स यांना प्रत्येकी एक वडापाव व थम्स अप तर साक्षी व दालचिनीला पॉपकॉर्न व पेप्सी देण्याची व्यवस्था करावी अशी रजनीकांत यांना समस्त पुणेकरांच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत.

त्या चर्चेत मराठी माणूस व रजनीकांतच्या विरुद्ध बोलणार्‍यांना लक्ष्मी रस्त्यावर गाडी रिव्हर्स घेण्याची शिक्षा मिळण्यासाठी मनसे लवकरच प्रयत्न करील अशी आम्हाला खात्री आहेच. त्यासाठी आम्हाला वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही.

शिवसेनेचा क्रायसिस

शिवसेनेचा ४१ वा वर्धापनदिन नेहमीच्याच उत्साहाने साजरा झाला. त्यानिमित्ताने एका गोष्टीची पुन्हा उजळणी झाली की शिवसेनेमध्ये शिवसेना-प्रमुखांना पर्याय नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक प्रभाव असणार्‍या नेत्यांमध्ये शरद पवारांनंतर आजही बाळासाहेबांचाच नंबर लागेल.




अगदी १८ वर्षाच्या आजच्या मराठी तरुणापासून शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये काम सुरु केलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांबद्दल असलेलं आकर्षण इतक्या दिवसांनंतर बर्‍यापैकी टिकून आहे हे मुंबई महानगरपालिकेच्या मागे झालेल्या निवडणुकीत दिसून आलं. सर्व वयोगटांमध्ये इतकी लोकप्रियता/आदर/अनादर/तिरस्कार/प्रेम या सर्व भावना असलेला दुसरा राजकारणी महाराष्ट्रात नव्हे तर भारतातही कुठे दिसत नाही.

तुम्ही एक तर बाळासाहेबांचा तिरस्कार करु शकता किंवा त्यांच्यावर आत्यंतिक प्रेम करु शकता. बाळासाहेबांकडे दुर्लक्ष करणे मात्र शक्य नाही.

मात्र शिवसेनेची परिस्थिती काय आहे?

मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी सुरु झालेल्या संघटनेने स्थानीय लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेना यांचा मराठी बाणा सोयीस्कररीत्या फेकून देऊन मतांसाठी हिंदुत्त्वाचे लोढणे गळ्यात कधी अडकवून घेतले ते कळलेही नाही. त्यामुळे शेखावत की प्रतिभा पाटील असा आयडेंटिटी क्रायसिस शिवसेनेला आता झाला आहे. त्यातूनच मग मुकेश पटेल, प्रीतीश नंदी, संजय निरुपम, चंद्रिका केनिया यांना राज्यसभेवर पाठवणार्‍या पक्षाला प्रतिभाताई मराठी की गुजराती अशा प्रश्नाची चर्चा करणे भाग पडत आहे. अशा गोंधळामुळे व भाजपासारख्या मतलबी पक्षासोबत जाणे स्वत:हून ओढवून घेतल्यामुळे २००९ मध्ये महाराष्ट्रावर एकछत्री अंमल आणण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न हे स्वप्नच राहण्याची शक्यता खूप मोठी आहे.

छगन भुजबळ, दत्ताजी साळवी, नारायण राणे यांच्यासारखे खंदे नेते सोडून गेल्यावरही शिवसेना अजून टिकून आहे याचं आश्चर्य वाटतं तसंच शिवसेनेचा सर्वात मोठा शत्रू आता शिवसेनेतच मोठे झालेले राज ठाकरे आहेत याचं दु:खही. एकमेकांची डोकी फोडण्यात गुंतलेल्या या दोन पक्षांच्या राड्याच्या राजकारणात सर्वात जास्त नुकसान होतंय ते मराठी माणसाचंच.

ओरकुटवर बाळासाहेबांबद्दल बदनामीकारक मजकूर लिहिल्यानंतर बाळासाहेबांची प्रतिमा कलंकित झाली असेल वा नसेल पण त्यानंतर कल्याणच्या सायबर कॅफेवर हल्ला करणार्‍या शिवसैनिकांमुळं ते ज्या मराठी माणसाच्या नावाने राजकारण करतात त्याची प्रतिमा नक्कीच अधिक कलंकित झाली आहे. मराठी माणसांच्या कोणत्याही गुणाचा लवलेश शिवसैनिकांमध्ये दिसत नाही.

परत शिवसैनिकांनी असा राडा केल्यानंतर मनसैनिकांना मागे राहून चालणारच नाही, त्याल ते तरी काय करणार. त्यामुळं त्यांनीही मराठी शुद्धलेखनाच्या प्रश्नावरुन तसलाच गोंधळ घातला. आता शिवसेना या गोंधळाला काय प्रत्युत्तर देते ते पाहणे केवळ आपल्या हाती आहे.

Sunday, June 17

माहितीचा अधिकार

कोणाला माहितीच्या अधिकाराविषयी काही माहिती आहे का?

म्हणजे उदाहरणार्थ स्थानिक भाषा व संस्कृतीशी जवळीक असणार्‍या कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यासाठी परवाना घेतलेल्या (License for localized programming) रेडिओ मिरची सारख्या एफएम वाहिनीने आतापर्यंत किती मराठी गाणी पुण्यातल्या स्थानिक जनतेला ऐकवली आहेत याची माहिती हवी असेल तर ती देणे रेडिओ मिरचीवर बंधनकारक आहे का?

कोणत्याही प्रसारमाध्यमाकडून अशी माहिती मिळवण्याची काय पद्धत असते?

शुद्धलेखन व ब्लॉग

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अतिउत्साही मनसैनिकांनी दहावीच्या मराठीच्या पुस्तकात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यानंतर एका अधिकार्‍याच्या दालनात घुसून नेहमीप्रमाणे राडा केला. आता अशुद्धलेखन करणार्‍या मराठी ब्लॉगलेखकांनी (म्हणजे सगळ्याच मराठी ब्लॉगलेखकांनी) सावध राहणे अतिशय गरजेचे आहे.

पण एका गोष्टीची आता आशा वाटते. अशुद्धलेखन या एकाच निकषावर कितीतरी मराठी ब्लॉग हे मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होऊ शकतात.

Thursday, June 14

प्रतिभाताईंचे अभिनंदन




आमच्या (अर्थातच) आदरणीय वगैरे सोनियाजींनी प्रतिभा पाटील यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवले आहे. हरेकृष्णाजींनी सांगितल्याप्रमाणे भारताच्या सर्वोच्च नेतेपदी एका महिलेने विराजमान व्हावे आणि ती संधी एका मराठी माणसाला मिळावी ही आनंदाचीच गोष्ट आहे.

पण त्यांना "राष्ट्रपती" म्हणणे कसेसेच वाटते.

आणि राष्ट्रपत्नी हा तर भयंकर शब्द आहे.

तेव्हा प्रतिभाताई या पदावर विराजमान झाल्यावर त्यांना आपण राष्ट्राध्यक्ष ह्या Neutral Gender नामाने संबोधूयात :)

थॅंक्यू सोनियाजी. अभिनंदन प्रतिभाताई

Wednesday, June 6

अमितजींना प्रशिक्षक करा!

बीसीसीआय क्रिकेट संघाचा नवीन प्रशिक्षक शोधण्यासाठीची मोहीम पाहिली की "काखेत कळसा अन् गावाला वळसा" ह्या म्हणीची हटकून आठवण होते. डेव्ह व्हॉटमोर, अर्जुन रणतुंगा, डंकन फ्लेचर ह्यांपैकी एकाला "मेन इन ब्लू" चे प्रशिक्षक म्हणून निवडण्याची आयडिया ही बीसीसीआयची वैचारिक दिवाळखोरीच दाखवत नाही का?


अमिताभ बच्चनसारखे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व अद्यापि असताना इतर कोणाचा या महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या पदासाठी विचारच कसा काय होऊ शकतो?






अमितजींना संघाचे प्रशिक्षक करण्याचे अनेक फायदे आहेत.



१. अमितजींइतका खेळाचा (किंवा कोणत्याच गोष्टीचा) मोठा ब्रॅंड ऍम्बॅसेडर दुसरा होणे नाही! अमितजींना एकदा प्रशिक्षक केले की अगदी अमेरिकेपासून जपानपर्यंत क्रिकेटचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल.


२. अमितजींना जाहिरातींमध्ये काम करण्याचा पुष्कळ अनुभव आहे. विशेषत: आपले प्रमुख खेळाडू ज्या रंगीत पेयाची वारंवार जाहिरात करताना दिसतात त्या पेयाच्या जाहिरातीतले एक बुजुर्ग व्यक्तिमत्व म्हणजे अमितजी. त्यामुळे संघातील ज्येष्ठ खेळाडूंशी त्यांचे संबंध आधीच सलोख्याचे व प्रेमाचे असतील. इगो प्रॉब्लेम होण्याचा फारसा धोका नाही.


३. नाहीतरी आपले खेळाडू व प्रशिक्षक हे नीट खेळण्यापेक्षा खेळल्याचा (व हरल्यानंतर दु:खी दिसण्याचा) अभिनय करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. इथे अभिनयाच्या बाबतीत अमितजींना चॅलेंजच नाही हे तर शाहरुख खान पण मान्य करील.

४. क्रिकेट = मनोरंजन; अमितजी = मनोरंजन.

५. अमितजी संपूर्णपणे देशी आहेत. (Exhibit: पुनर्जन्म हो मेरा गंगा के तटपर) त्यामुळे परदेशी प्रशिक्षकांची ऍलर्जी असणार्‍या गावस्कर वगैरे मंडळींना याबाबतीत काहीही अडचण नसेल.

६. आता राहता राहिली मामुली गोष्ट ती खेळाच्या अनुभवाची. अमितजींना खेळाचा अनुभव असावा कारण डाबर च्यवनप्राशच्या जाहिरातीत "दद्दूचे" काम करताना ते फूटबॉल अशा आवेशाने खेळतात की ज्याचं नाव ते. आणि अनुभव नसला तरी बाराबंकी व मावळमध्ये जमीन खरेदी करताना ज्याप्रकारे त्यांनी शेतकरी असल्याचे सिद्ध केले तसेच खेळाचा अनुभव असल्याचेही सिद्ध करणे अमितजींना सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये अवघड असले तरी अशक्य नक्कीच नाही.


तेव्हा शरदचंद्ररावजी पवारसाहेब, आपल्या महाराष्ट्रातल्या या माणसाला येकदा चान्स देऊन बघा तर खरं. आपल्या संघाचा आळशी ब्लू रंग कसा पालटवतात ते.