Wednesday, May 30

स्स्स...

आपली कोल्हापूरचीच मिरची सगळ्यात जास्त तिखट अशी का कोण जाणे पण माझी समजूत होती.


मे महिन्याच्या नॅशनल जिओग्राफिक मध्ये मिरचीचा तिखटपणा मोजण्यासाठी स्कोविल स्केल किंवा स्कोविल हीट युनिट (SHU) हे परिमाण वापरतात अशी एक रंजक माहिती मिळाली. या विषयावर थोडं अधिक गुगलून पाहिल्यावर नागा जोलोकिया ही बांगलादेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आढळणारी मिरची ही जगात सगळ्यात जास्त तिखट असल्याचं कळलं.

खरं तर मिरची ही मूळ भारतीय नव्हे. १४९८ मध्ये भारतात आलेल्या वास्को द गामा ने त्याच्यासोबत आणलेली मिरची हीच पुढे आपल्या आहाराचा अविभाज्य भागच होऊन गेली आहे.

नॅशनल जिओग्राफिकमधल्या ह्याच लेखात मिरचीचे उपयुक्त गुणही सुंदर सांगितले आहेत. मिरची मुळे पचनाला मदत होते. Arthritis (म्हणजे सांधेदुखी का?) सारख्या रोगांवर एक उत्तम उपाय म्हणजे मिरची. श्वसनमार्ग मोकळा करण्यासाठी आहारातील मिरची अतिशय गुणकारी.

उगीच नाही "हान मर्दा आजून वाटीभर कोल्लापुरी रस्सा.. सरदी पडसं समदं पळून जाईल" असं आपण म्हणतो.


पण मिरचीची सवय नसेल तर मात्र असे हाल होतात.

टुनडू च्या सहाय्याने अशी मजेदार मराठी व्यंगचित्रं तुम्हीही करु शकता.



(मिरचीचे चित्र विकीपीडियावरून घेतले आहे.)

Sunday, May 27

पायतान

सांप्रत महाराष्ट्रदेशी पादत्राणांचे महत्त्व फार आहे. हे आम्ही (दुसरं कोण!) अर्थातच जाणून आहोत. थोर वगैरे होऊन गेलेल्या विभूतींच्या पादुकांसाठी प्रसिद्ध असलेल्या शेगाव, अक्कलकोट, शिर्डी यांच्याबरोबरच सामान्य माणसांच्या चपलांसाठीही प्रसिद्ध असणारी गावे म्हणजे कोल्हापुरी चपलांचे कोल्हापूर आणि पुणेरी जोडा मिळणारे आमचे पुणे!

थोर माणसांच्या विचारांप्रमाणेच त्यांच्या चपलांनाही इतके महत्त्व देणारा दुसरा प्रदेश विरळा. चपलांना मान देण्याची ही थोर परंपरा थेट मर्यादापुरुषोत्तम श्रीरामापासोन आमच्यापर्यंत चालत आली आहे. त्याने नाही का भरताला आपल्या चपला देऊन त्याच्यावर वॉच ठेवायला सांगितले होते? त्यावेळी चपलांना पादुका म्हणत. आता फ्लोटर म्हणतात इतकाच काय तो फरक.

पण ही बातमी वाचली आणि आम्ही निपचित पडून थोडा वेळ थेट सुषुम्नावस्थेत गेलो! आता चपलांसाठी प्रसिद्ध असलेल्या गावांमध्ये आमच्या पुण्याबरोबर चपलांमुळे प्रसिद्ध झालेल्या आपल्या मुख्यमंत्र्यांच्या लातूरचेही नाव घ्यावे लागेल. (येथे लातूर हे गाव चपलांमुळे प्रसिद्ध आहे असे वाचावे... मुख्यमंत्री नाहीत!)

मज पामरासी काय थोरपण
पायीची वहाण पायी बरी

असे ज्ञानोबा महाराज सांगून गेले आहेत. या वाक्यामधून त्यांची दूरदूष्टीच दिसत नाही का? पुढे मागे पायीच्या वहाणांना इतुके महत्त्व येईल हे त्यांना आधीच माहीत असावे. (त्यांच्याही पादुका आळंदी येथे पहावयास मिळतील!) असो.

तर आपल्या महाराजांच्या लातूर गावी प्रियांकादेवी चोप्रा (एकदम चाबूक हो!) ह्यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या भाविकांनी हर्षभराने चपला उडवून आपला आनंद व्यक्त केला. इतके दिवस लग्नामध्ये अक्षता, मिरवणुकीत गुलाल, तमाशात फेटे, खंडोबासमोर खोबरं, मंदिरात फुलं (आणि बारमध्ये नोटा!) उधळण्याची आपली परंपरा होती. त्यात हिरॉईनसमोर चपला उधळण्याचा समावेश झाल्याने आता ती अधिकच समृद्ध झाली आहे.

सादर आहे एक छोटासा काल्पनिक प्रसंग

महाराज: कोण आहे रे तिकडे?

प्रधानजी: मी आहे महाराज.

महाराज: तू महाराज? मग मी कोण?

प्रधानजी: तुम्ही महाराज. मी "आहे" असं म्हटलं.

महाराज: बरं बरं. (हातातला पेपर नाचवत) हे काय आहे?

प्रधानजी: पेपर महाराज.

महाराज: ते कळतंय मला. (पेपरातल्या बातमीकडे बोट दाखवून) हे काय आहे?

प्रधानजी: बातमी महाराज.

महाराज: उगीच पीजे मारु नका. सारखे सारखे फालतू विनोद करायला तुम्ही स्वत:ला योगेश समजता की राफा?

प्रधानजी: सॉरी महाराज, पण काय झालं?

महाराज: वर आम्हालाच तोंड करुन विचारता काय झालं? राज्यात काय चाललंय याची काही खबर ठेवता की नाही? इथे भर गावात एका सुंदर तरुणीवर चपलांचा मारा होतो आणि तुम्हाला काही खबर लागत नाही म्हणजे काय? उद्या आमच्या प्रचारासाठी कोणती हिरॉईन येईल?

प्रधानजी: महाराज, खरं म्हणजे कार्यकर्त्यांचं चुकलंच, प्रत्येक वेळेला सार्वजनिक कार्यक्रम म्हटला की राखी सावंतला बोलवायची रीत आहे आपली. खरं तर तिला बोलवायला पाहिजे होतं.

महाराज: आता झालं ते झालं. याच्यावर उपाय आहे का तुमच्याकडं? की एक एसमेस पाठवून उत्तर द्या अशी स्पर्धा जाहीर करायची आपल्या जनतेसाठी?

प्रधानजी: नाही महाराज. त्याची काही गरज नाही. येक उपाय आहे. इथून पुढच्या सगळ्या सभा आणि समारंभ प्रायोजित करण्यासाठी नायके, आदिदास, बाटा, पॅरेगॉन यांना विनंती करायची. कसं?

महाराज: वा प्रधानजी.

(चित्र सौजन्य: ई सकाळ डॉट कॉम)

Saturday, May 26

Thanks चांगदेव

मला तुमच्यासारखा प्रयत्नवाद बरा वाटत नाही. प्रयत्नवादी माणूस अनेक मूल्यांचं भेंडोळं करत शेवटी त्याच्यातच फसून जातो. दया क्षमा वगैरेपासून तर राष्ट्रीयता, युद्धं सगळं असल्या बुद्धिवादातून निर्माण होतं. सगळे मानवी समाज ह्या भोवर्‍यात सापडले आहेत असं तुम्हाला वाटत नाही? तटस्थ राहून पाहणारे हल्ली उरलेलेच नाहीत. महाकाव्यातल्या लढणार्‍यांपेक्षा काठावर उभे राहून पाहणारे व्यासहोमर मला अधिक शूर वाटतात. लढायला काही फार शौर्य लागतं असं मला वाटत नाही. कुठलाही भित्रा माणूस लढायला तयार होतो असं हल्ली वातावरण आहे.

ही गवतातली अळी एक दिवस जगणारी असते. तिच्या एका दिवसाच्या चक्राचं नीट निरीक्षण केलं तर आपल्या आयष्याच्या चक्राएवढंच आहे. की नाही त्या त्या परिमाणानं? लाख वर्षाच्या संदर्भात आपलं स्वकेंद्रित आयुष्यही ह्या अळीएवढंच आहे.


मला पण हेच म्हणायचं होतं.

Thursday, May 17

ये दोस्ती...

आपल्या देशाला बंधुप्रेम आणि मित्रप्रेमाची थोर परंपरा आहे. दोन पुरुषांमधल्या प्रेमाला आणि नात्याला अमेरिकन संस्कृतीच्या प्रभावामुळे वेगळा अर्थ आला असला तरी "ती" आपली संस्कृती नाही! आम्हाला तर आपल्या महान संस्कृतीविषयी नितांत प्रेम आहे. फॅशन टीव्ही वर पण भारतीय मॉडेल आल्या की आम्हाला त्या भारतीय असल्यामुळे थोडेसे वाईट आणि त्यांचे कपडे पाहून थोडेसे बरे असे वाटते. ते असो!

बंधू आणि मित्र प्रेमाची राम-लक्ष्मण, कृष्ण-बलराम, संताजी-धनाजी ही फार जुनी उदाहरणे झाली. जय-वीरू सुद्धा आता जुने झाले. आता जमाना आहे राहूल आणि वीरुचा! वीरुने बोलावे आणि राहूलने झेलावे असे रोज चालले आहे. या दोन मित्रांमधील प्रेमसंवाद आणि परस्परांविषयी वाटणारी काळजी पाहून आमचा कंठ दाटून येतो. काय बोलावे ते सुचत नाही आणि सुचले तरी बोलवत नाही. (त्यामुळे आम्ही आता लिहीत आहोत!)



या थोर मित्रांमधील प्रेमसंवाद ऐकण्याची सुसंधी आम्हाला आमच्या उपद्व्यापी वृत्तीमुळे मिळाली. या संवादाचा काही सारांश आमच्या लाडक्या इ. वाचकांसाठी पेश करत आहोत.

"लाहूल दादा लाहूल दादा, आपन खेलाला कदी जायचं?", उजव्या हाताने नाक पुसत आणि डाव्या हाताने चड्डी वर ओढत लहानगा वीरु म्हणाला.

"जाऊया हा. थोडंसं ऊन कमी झालं की जाऊ. कित्ती ऊन आहे बाहेर? आमच्या वीरु बाळाला ऊन नाही का लागणार?"

"आनी तुमी आमाला कलेवल घेनाल ना? ग्राउंडपर्यंत?"

"हो रे शोन्या. नियम आडवे येतात नाही तर तुला खेळताना पण कडेवर घेईन मी. "

"थॅंक्यू लाहूल दादा. पन हे नियम कलनाले लोक कित्ती कित्ती वाईट आहेत नाई? आपन घरी खेलतो तेव्हा मी बॅटिंग कलताना ३ वेला औट झाल्यावल एकदा; आनी मी बॉल टाकतो तेव्हा २ टप्पी औट असं कलतो; तेव्हा कित्ती कित्ती मज्जा येते नाही. त्यावेली माझ्या रन्स पन सच्चिन इतक्या होतात. मी त्याच्यासालखा खेलतो की नाई?"

"अरे तू तर सचिनपेक्षा पण भारी खेळतो. म्हणूनच तुला टीममध्ये ठेवायला सांगितलंय ना मी?"

"पलत थॅंक्यू लाहूल दादा. आपन ना मला ना खेलून देत नाई ना त्यांना देवबाप्पाला शिक्षा कलायला सांगू. देवबाप्पा रात्री त्यांचा कान कापून नेईल."

"अरे कपिल देव बाप्पा तर दुसर्‍या लोकांबरोबर आहे ना. त्याचा आपल्या टीमशी काय संबंध?"

"तो देव बाप्पा नाई काई. तो वर असतो ना तो. आक्काशातला."

"असं नाही बोलायचं वीरु. त्यांचे कान कापून टाकल्यावर नंतर तू केलेल्या रन्सच्या बातम्या त्यांना ऐकता येणार नाहीत ना. आपण की नाही त्यांचं घर उन्हात बांधू. चालेल?"

"तू कित्ती कित्ती चांगला आहेस लाहूल दादा! चल आता ऊन कमी झालं ना? चल खेलायला जाऊ!"

Wednesday, May 16

एक रात्र तंतरलेली

प्रसंग पहिला:

"ए... इकडं ये ना."

"हूं... कॅय काम आहे"

"रोज ग्लासात मस्त दूध आणतेस मग आज कोकम सरबत? गुस्सा आहेस का?"

"अमरसिंगजींनी आज दूध तापवलंच नाही. नासून गेलंय सगळं. छी!"

"Ok... पण तुला एवढं चिडायला काय झालं?"

"चिडू नको तर काय करु ऑं? कित्तीदा सांगितलं... तुम्ही आता एक आपलं ते बीयसपी जॉईन करा बघू."

"अगं पण, डॅडी अमरसिंगजींचे मित्र आहेत ना, त्यांना सोडून कसं चालेल?"

"किती दिवस मामंजींची कॉपी करणार म्हणते मी. जरा स्वतःचं करा की.. वेगळं. आधीच बीयसपी जॉईन केली असती तर आज एवढ्या शिव्या नसत्या खायला लागल्या मला. आता ती करीना पण मला अवगुणी वगैरे म्हणते. येन इल्ला. ते काही नाही म्हणते मी. तुम्ही आता मामंजींची कॉपी करणं सोडा."

"म्हणजे नक्की काय करु?"

"पहिलं दाढी करा. सल्लू बघा मस्त तुळतुळीत दाढी करुन यायचा. अंगावर पण केस ठेवत नव्हता. नाहीतर तुम्ही... लग्नात पण दाढी तशीच. माणूस आहे का अस्वल."

"चिडू नकोस... एक गाणं म्हणतो तुझ्यासाठी"

सुहाग रात है... घूंघट उठा रहा हू मै.

"शी.. इथं पण मामंजींची नक्कल. जरा तरी सुधरा म्हणते मी."




प्रसंग दुसरा:

"नमस्कार पंडितजी, मै अमिताभ बच्चन बोल रहा हू।"

"कौन बनेगा करोडपती से का?"

"नाही नाही, घरूनच बोलतोय. तुम्हाला मुहूर्त विचारल्याशिवाय मी चहातली साखर सुद्धा ढवळत नाही, परस्पर तिकडे कसा जाईन.. ऑय?"

"तेच म्हटलं!"

"मी तुमच्यावर भरोसा ठेवला पण हे काय भलतंच व्हायला लागलंय? एक तर अमरसिंगजींचं सरकार गेलं. नंतर मायावतींनी बाराबंकीची फाईल उघडण्याचे आदेश दिलेत. आणि आता पवना डॅम जवळच्या जमिनीचा पण वाद उभा राहणार असं दिसतंय. डॅम इट! आपलं ऑय!"

"असे गुस्सा होऊ नका अमितजी. थोडा धीर धरला तर सगळं ठीक होईल. सध्या तुम्हाला होणार्‍या त्रासाचे मुख्य कारण म्हणजे मंगळाचा कुंभ राशीत होणारा प्रवेश. ज्या लोकांच्या पत्रिकेत कुंभलग्न आहे आणि ज्यांच्या लग्नात मंगळ येत आहे. त्यांना येणारे थोडे दिवस त्रासाचे असणारच आहेत."

"बापरे मग याला उपाय कॉय?"

"सध्या तरी उपाय समजत नाही. तुम्ही स्वत: केबीसी खेळत आहात आणि सगळ्या लाईफलाईन्स आधीच वापरुन झाल्या आहेत असं समजा. काय?"

"ठीक आहे. वृक्ष हो भले खडे, हो घने हो बडे, एक पत्र छांह की, मांग मत मांग मत मांग मत"

"अग्नीपथ अग्नीपथ अग्नीपथ!"

Thursday, May 10

वाचलेच पाहिजे असे काही

मराठी वाचक नक्की कुठली पुस्तकं वाचतात हा एक प्रश्न पडला आहे.

काही दिवसांपूर्वी "मराठी पुस्तकांना सुगीचे दिवस" अशी बातमी पेपरात वाचली तेव्हा एक लहानसा आनंद झाला होता. म्हणजे मराठीसाठी तळमळ वगैरे सध्याची "इन थिंग" असलेल्या भावना असल्या तरी काही वर्षांपूर्वी वाचलेली आणि आता मराठी पुस्तकांचे मराठी दुकानदार तुसडेपणाने "औट ऑफ प्रिंट आहे" असं वाक्य आपल्या तोंडावर नेहमी फेकत असलेली जीए, गौरी देशपांडे, नेमाडे यांची पुस्तके कुत्र्याच्या कानासारखी पाने दुमडलेल्या अवस्थेत नाही तर नवीन कोरा प्रसन्न वास असलेल्या अवस्थेत परत वाचायला मिळतील. वाचून झाल्यावर मस्तपैकी कपाटात ठेवून देता येतील आणि आपल्याकडे इतकी भारी (किंमतीनं सुद्धा!) पुस्तकं आहेत याचा अभिमान वाटण्याची एक दुर्मिळ संधी मिळेल असं वाटलं होतं. (त्या दिवशी सिग्नलवर हिरवा दिवा होईपर्यंत मी चक्क वाट पाहिली!)

पण कसलं काय?

रविवारी दुसरी बातमी वाचली. मिलिंद बोकील यांच्या "कातकरी: विकास की विस्थापन?" या पुस्तकाच्या गेल्या वर्षभरात १००० प्रतीसुद्धा विकल्या गेल्या नाहीत. मराठी वाचकांची चॉईस पाहून धन्य वाटलं! खरं तर हे पुस्तक मराठीतील भयानक सुंदर पुस्तकांपैकी एक म्हणावं असं आहे. एकदम आउटस्टॅंडिंग!

मराठीत सामाजिक विषयांवरचे लेखन कमी आहे असे नाही. अगदी मराठी ब्लॉग लिहिणार्‍यांचा सॅंपल डेटा घेतला तरी एखाद्या मस्त कात-तंबाखू टाकून जमवलेल्या पानाप्रमाणे जमलेल्या लेखावर जर सामाजिक जाणीवेच्या चुन्याची दांडी धरली नाही तर मायबाप वगैरे वाचकांच्या प्रतिसादाच्या पिचकार्‍या कमी पडतात हे कोणाच्याही लक्षात येईल!

मिलिंद बोकील त्यांच्या स्वत:च्या लेखनाची भूमिका मांडताना म्हणतात:

...अलीकडच्या काळात काही पत्रकारांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिशय माहितीपूर्ण व वाचनीय लिखाण केलेले आहे. एरवी समाजासमोर न येणारे प्रश्न मांडून त्यांनी मोठीच सामाजिक कामगिरी बजावली आहे. मात्र एकदा तशी जाणीव-जागृती निर्माण झाली की मग त्याच्या पुढचा टप्पा आपण गाठायला हवा. केवळ प्रश्न वा समस्यांची मांडणी करुन पुरेसे नाही तर ते सामाजिक प्रश्न असल्याने त्यामागचे समाजशास्त्रही उलगडून दाखवणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रकियेमागचे शास्त्रीय रूप का तपासायचे, तर त्यातून 'समानतत्त्व' काढता यावे म्हणून, तसेच इतरांना त्याचा पडताळा पाहता यावा म्हणून. जर असा तत्त्वबोध जर जिवंत माणसांच्या अभ्यासातून झाला तर तो अधिक स्मरणीय होतो....

शिवाय हे लेखन मराठीत करण्याचेही मोठे सुंदर कारण त्यांनी दिले आहे.

...कारण आपल्या समाजासाठी लिहितो तेव्हा ते त्याच्याच भाषेतून लिहिणे आवश्यक असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मातृभाषेचे पांग फेडणे हे कोणत्याही लेखकाचे कर्तव्य असते; मग त्या भाषेला मान्यता असो वा नसो, त्या भाषेत त्याची कदर होवो ना होवो. सुदैवाने असा तत्त्वविचार मांडण्याची ताकद मराठी भाषेमध्ये आहे. किंबहुना गंभीर तत्त्वविचार हेच मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहे. व्यावसायिक आवश्यकतेपोटी ह्यातील बरेचसे लेखन मी इंग्रजीतही प्रसिद्ध केलेले आहे. मात्र त्या गोष्टीचे मल तेवढे अप्रूप वाटत नाही. हे ज्ञान फक्त मराठीतच आहे आणि म्हणून आपण मराठीकडेच गेले पाहिजे असे लोकांना जाणवले तरच मराठीचे महत्त्व वाढू शकेल....


"कातकरी: विकास की विस्थापन?" या पुस्तकात बोकीलांनी गेल्या काही वर्षात कोकणात आलेल्या औद्योगिकीकरणाच्या - आधुनिकीकरणाच्या लाटेचे होणारे सामाजिक आणि आर्थिक परिणाम. आणि या परिणामांचा कातकर्‍यांसारख्या दुर्लक्षित समाजावर पडणारा प्रभाव या विषयावर केलेल्या संशोधन प्रक्रियेबाबत समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून लेखन केले आहे.

पुण्या-मुंबईतच नव्हे तर राज्याच्या कोणत्याही शहरी-निमशहरी भागात राहणार्‍या माणसाला कातकरी हे आदिवासी लोक एवढेच ऐकून माहिती असते. मात्र हे कातकरी नक्की कोण आहेत? "आपला" आणि "त्यांचा" संबंध समाजशास्त्रीय दृष्टीने कितपत जवळचा आहे, कातकर्‍यांच्या गुलामगिरीची सुरुवात, कातकरी ते कोळसाकरी ते वीटमजूर असा त्यांचा प्रवास, जमिनीचा प्रश्न, कातकरी संस्कृती या सर्व मुद्द्यांना पुस्तकात अतिशय विस्ताराने स्पर्श केला आहे.

कातकर्‍यांसारख्या उपेक्षित समूहाला काही भवितव्य आहे का? त्यांच्या सभोवतालचे जग इतके वेगवान, स्पर्धेचे, स्वकेंद्रित होत असताना या आदिवासी समूहाला त्यात काही स्थान राहिले आहे का? कातकर्‍यांशी समांतर म्हणाव्यात अशा महादेव कोळी व ठाकर जमातींमध्ये शिक्षणाचा (तुलनेने) चांगला प्रसार झाला असताना गरीब-अल्पसंख्य अशा कातकरी समाजाला विकासाच्या समान संधी खरंच उपलब्ध होत आहेत का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित करतानाच औद्योगिकीकरणामुळे पारंपारिक उपजीविकेवर परिणाम होत असला तरी कातकर्‍यांच्या आजूबाजूच्या वातावरणात आधुनिकतेचे वारे खेळू लागल्यामुळे पारंपारिक अन्यायाचे प्रमाणही तुलनेने कमी होत आहे. वातावरणातील खुलेपणामुळे या वर्षानुवर्षे दबून राहिलेल्या समाजाला मोकळेपणाने श्वास घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आश्वासक वाटाव्यात अशा या गोष्टीही बोकील अधोरेखित करतात.

कातकरी समाजाच्या लाभलेल्या सहवासाचे ऋण व्यक्त करताना बोकील म्हणतात,

...आपण शहरी, मध्यमवर्गीय माणसे स्वत:ला प्रगत म्हणवतो आणि कातकर्‍यांसारखे समूह आपल्यापेक्षा मागास आहेत असे समजतो. भौतिक बाबतीत ते खरे असेलही, पण इतर अनेक बाबतीत शंकेला जागा आहे. एकेकाळी आपण सगळेच आदिवासी होतो. तथाकथित प्रगतीची कास धरुन शहरी, औद्योगिक व्यवस्थेत अग्रभागी आलो. ह्या प्रवासात आपण पुष्कळ काही कमावले, पण पुष्कळ काही गमावलेसुद्धा.

आपण काय गमावले याचे भान कातकर्‍यांसारख्या समूहाशी संबंध येतो तेव्हा येते. शहरी, मध्यमवर्गीय जीवन पुढारले तेव्हा त्यात क्षुद्रपणाची, संकुचितपणाची आणि असंस्कृतपणाची वाढ झाली. स्पर्धा, स्वार्थ, हेवेदावे वाढले. लहानसहान गोष्टींतूनही आपला क्षुद्रपणा समोर येत राहतो. आपण रांगेत घुसाघुशी करतो. दुसर्‍याशी उर्मटपणे वागतो. सदैव आपलंच खरं मानतो आणि स्वार्थ साधायची एकही संधी सोडत नाही. आपल्या सगळ्या जीवनात उच्च - नीचता, धूर्तपणा, असभ्यपणा काठोकाठ भरुन राहिला आहे. अशा प्रकारची उर्मट, हिणकस, असभ्य वृत्ती मला कातकरी समाजात कधीही दिसली नाही. कातकरी समाज अज्ञानी, अशिक्षित असला तरी शहरी, मध्यमवर्गीय जीवनात जी दांभिकता, कर्कशता, चढाओढ आहे तिचा त्यांच्यामध्ये मागमूसही नाही. हे सगळे लोक एका अबोल सोशिकतेने, अलिप्तपणाने, शांतपणाने जीवन जगतात. वैयक्तिक लोभ, मत्सर कुणालाही सुटलेले नाहीत. स्वार्थ प्रत्येक माणसामध्ये असतो. पण कातकर्‍यांच्या वागण्या-बोलण्यात एक अबोल सभ्यता आहे. दुसर्‍याला लुबाडून आपली तुंबडी भरावी, धूर्तपणाने दुसर्‍याचा काटा काढावा, मिळेल तेवढे फुकटात लाटावे ह्या प्रवृत्ती त्यांच्यामध्ये दिसत नाहीत. त्यांच्या वाड्यावर हिंडताना हे सतत जाणवत राहायचे. या जाणिवेतून जो विश्राम मनाला यायचा, तो फार आल्हाददायक असायचा...

कातकर्‍यांची ही अबोल सभ्यता समजून घेता आली तर निश्चितच आपले जीवन अधिक चांगले होईल असा विश्वास व्यक्त करणारे हे पुस्तक गेल्या वर्षामध्ये इतर मराठी वाचकांना फारसं आवडलं नसलं तरी मला मात्र खूप आवडलं.



अवांतर: मिलिंद बोकील यांच्याबद्दल माझे आवडते ब्लॉगर सन्जोप सरांनी लिहिलेला लेखही जरुर वाचा

Wednesday, May 9

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे

१. करबचतः
साधारणपणे एका विशिष्ट पातळीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवणार्‍या व्यक्तीस प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी करभरणा करणे आवश्यक असते. गुंतवणूकदारांनी त्या आर्थिक वर्षामध्ये आपल्या गुंतवणुकीतून मिळवलेल्या फायद्याचा काही भाग हा कररुपाने सरकारजमा करावा लागतो. कर वजा करुन जाता राहिलेल्या रकमेची पुनर्गुंतवणूक करता येते. अर्थात हे करभरणा करण्याचे हे तत्त्व समभागांमध्ये प्राधान्याने गुंतवणूक करणार्‍या म्युच्युअल फंडांमध्ये होणार्‍या गुंतवणुकीस लागू नाही.
अशा म्युच्युअल फंड योजनांना गुंतवणुकीतून मिळणार्‍या फायद्यावर सरकारला कर द्यावा लागत नाही. त्यामुळे जास्त रकमेची पुनर्गुंतवणूक करणे शक्य होते. शिवाय म्युच्युअल फंडांमध्ये मिळणारे डिव्हिडंड्स हे करमुक्त असतात.
शिवाय म्युच्युअल फंड्स मधील काही विशिष्ट "करबचत योजनां'मध्ये एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम प्राप्तिकर कायद्याच्या "८० सी'खाली वजावटीस पात्र आहे.
गुंतवणुकदाराने त्याचे गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य झाल्यानंतर म्युच्युअल फंड्सच्या युनिट्सची विक्री केल्यास त्याला झालेल्या फायद्याचा कर-आकारणीसाठी विचार केला जातो. समभागाधारित म्युच्युअल फंडांची विक्री जर दीर्घकालीन भांडवली फायद्याच्या निकषानुसार योग्य कालावधीनंतर केली तर हा फायदाही करमुक्त आहे. सामान्य गुंतवणूकदारांनी समभाग व त्यावर आधारित योजनांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करावी यासाठी ही सवलत सरकारने दिली आहे.
सध्या भारतात समभागाधारित गुंतवणुकींवर दीर्घकालीन भांडवली फायदा मोजण्यासाठीचा कालावधी हा एक वर्ष इतका आहे.

उदा. जर तुम्ही १५ एप्रिल २००७ रोजी एचडीएफसी टॉप २०० फंड विकत घेतला व १४ एप्रिल २००८ नंतर त्याची विक्री केली तर तुम्हाला होणारा फायदा हा संपूर्णपणे करमुक्त आहे. मात्र जर तुम्ही १४ एप्रिल २००८ पूर्वी त्याची विक्री केली तर होणार्‍या फायद्यावर अल्पकालीन फायद्याच्या तरतुदींप्रमाणे फायद्याच्या १०% इतका कर भरणे आवश्यक आहे.शिवाय या अवधीमध्ये एचडीएफसी टॉप २०० या फंडाने जाहीर केलेला कोणताही डिव्हिडंड हा पूर्णपणे करमुक्त आहे.

मात्र ही सवलत समभागाव्यतिरिक्त इतर साधनांमध्ये गुंतवणूक करणार्‍या फंडांना लागू नाही. आयकर खात्याच्या धोरणांनुसार अशा म्युच्युअल फंड युनिटांची अंतिम विक्री केल्यानंतर झालेला फायदा जर दीर्घकालीन असेल तर त्यावर इंडेक्सेशन आधारे २० टक्के किंवा इंडेक्सेशन चा आधार घेतला नाही तर १० टक्के इतका कर भरणे अपेक्षित आहे.
आयकर खाते महागाई दरानुसार प्रतिवर्षी एक इंडेक्स जाहीर करत असते.
उदा. १ मे २००४ रोजी १००० रुपये इतके खरेदी मूल्य असलेले युनिट्स जर ३१ एप्रिल २००५ नंतर १२०० रु. ला विकले तर झालेल्या फायद्यावर करमोजणी ही दोनपैकी एका प्रकाराने होऊ शकते.

१. इंडेक्सेशन आधारे:
२००४ चा इंडेक्स समजा ४००
२००५ चा इंडेक्स समजा ४५०
खरेदी मूल्यः १०००*४५०/४०० = ११२५
विक्री मूल्य: १२००
फायदा = १२०० - ११२५ = ७५
अपेक्षित कर: ७५ * २० % = १५

२. इंडेक्सेशन चा आधार न घेता:
खरेदी मूल्य: १०००
विक्री मूल्य: १२००
फायदा: १२०० - १००० = २००
अपेक्षित करः २०० * १० % = २०
दोन्ही पैकी कोणत्याही एका प्रकारे करांची मोजणी करुन जो कमी असेल तो कर भरणे ही कायदेशीर मान्यता असलेली गोष्ट आहे.

२. व्यावसायिक व्यवस्थापनः
समभाग-रोखे बाजारातील गुंतवणूक ही अतिशय वेळखाऊ व तज्ज्ञ लोकांनी अभ्यास करुन करण्याची अविरत चालणारी प्रक्रिया आहे. सामान्य गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीसाठी लागणारा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ व सर्व साधने उपलब्ध असणे अतिशय अवघड असते. आपल्या पैशाच्या वृद्धीसाठी व्यावसायिक व्यवस्थापनाचा वापर करून घेण्याची संधी अतिशय कमी खर्चामध्ये गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड योजनांद्वारे मिळते.

३. सुलभ गुंतवणूकः
अनेक म्युच्युअल फंड कंपन्या, ब्रोकरेज हाऊसेस, दलाल यांनी त्यांच्या ठिकठिकाणच्या केंद्रांद्वारे, इंटरनेटद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हे अधिक सोपे केले आहे. आगाऊ सूचनांद्वारे गुंतवणूकदार हे नियमित गुंतवणूक(एस.आय.पी.), नियमित विक्री(एस.डब्लू.पी.), व नियमित योजनाबदल(एस.टी.पी.) याचे आदेश म्युच्युअल फंड कंपन्यांना देऊ शकतात.

४. लिक्विडिटी:

म्युच्युअल फंडांच्या ओपन एन्डेड योजनांची विक्री हवी तेव्हा करणे गुंतवणूकदारांना शक्य असते. समभाग बाजारातील व्यवहारांप्रमाणे या विक्रीसाठी कोणी ग्राहक मिळेल का याची चिंता करण्याची गरज नसते.

५. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन:

अतिशय कमी रकमेमध्ये उत्तम डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तयार करणे गुंतवणूकदारांना शक्य होते.
उदा. इन्फोसिस या कंपनीच्या समभागाची किंमत बाजारात २००० रुपये आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे केवळ १००० रुपये असतील तर त्याला इन्फोसिसचा शेअर घेणे शक्य नाही. मात्र याऐवजी त्याने इन्फोसिसचा अंतर्भाव असलेल्या इंडेक्सवर आधारित म्युच्युअल फंडचे युनिट घेतले तर त्याच्य पोर्टफोलिओमध्ये आपोआप इन्फोसिसचा समावेश होईल.
रिलायन्स व आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल सारख्या अग्रगण्य फंड हाऊसेसनी लहान गुंतवणूकदारांना आपल्या योजनांकडे आकर्षित करण्यासाठी ५०-१०० रुपयांनी सुरू होणार्‍या समभागाधारित म्युच्युअल फंडांचा प्रस्ताव आता ठेवला आहे. यावरुन अतिशय लहान रकमेपासून समभागांमध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूक करणे हे शक्य होणार आहे.

Friday, May 4

बातम्या

सध्या 'सबसे तेज' आणि 'सबसे अलग' असलेले सगळेच न्यूज चॅनेल्स बघणे पूर्णपणे बंद झालं आहे. बच्चन यांच्या घरातील युगप्रवर्तक, माहितीपूर्ण, उद्बोधक, क्रांतीकारक, पाचक, रेचक, आयुर्वेदिक व मनोरंजक अशा विवाहाच्या बातम्या सुरू झाल्या तेव्हा बातम्या बघताना एखाद्या लग्नाची रेकॉर्ड केलेली कॅसेटच बघत आहोत असं वाटत होतं.
प्रत्येक न्यूज चॅनेलची शेपूट वर करुन हिंडणार्‍या आणि एखादी गोड, गोजिरवाणी, काळे ठिपके असणारी पांढरी कुत्री दिसली तर जीभ बाहेर काढून हॉ हॉ असले आवाज काढणार्‍या आणि पांढरे ठिपके असलेल्या काळ्या कुत्र्याप्रमाणे प्रत्येक बातमीच्या खांबावर आपला विश्लेषण नामक पाय वर करण्याच्या, हातोड्याने खिळा ठोकावा तसल्या डोक्यात जाणार्‍या सवयीमुळे बातम्या वगैरे बघण्याची सवय अगदी मोडलीच.
ह्या बातम्या बघताना उपरोल्लिखित कुत्र्याला प्रिय असलेल्या कुत्रीप्रमाणेच पूर्वी आम्हाला अतिशय प्रिय असलेल्या 'संध्यानंद' या रंगीतसंगीत वर्तमानपत्राची अगदी जीव कासावीस करणारी आठवण होत असे. न्यूझीलंड मधल्या ओनुमागाबुमागागुमागाबुमु ह्या पूर्व किनार्‍यावरील छोट्याश्या खेड्यात अलेक्झांड्रियाना नावाच्या एका बाईला एकाच वेळी सात मुले झाली व त्यातल्या पाचव्या मुलाच्या केसाचा रंग हा त्यांच्या शेजारच्यांच्या घरातील घोड्याच्या शेपटीवरील केसांच्या रंगासारखा आहे. प्रसूतीनंतर आई व मुले सुखरूप आहेत मात्र सुईणबाईंना आयसीयूमध्ये दाखल केले आहे ही "तुम्हाला माहिती आहे का"? टाईपची बातमी या वृत्तपत्रात पहिल्या पानावर असे.

काल बर्‍याच वर्षांनी सह्याद्री (की अस्मिता?) वाहिनीवरील मराठी बातम्या पाहिल्या आणि जीवाची तगमग करणार्‍या कडक उन्हाळ्यात डोक्यावर थंडगार पाण्याची धार धरावी असं वाटलं. जाईच्या फुलाप्रमाणे शालीन वृत्तनिवेदिका, कोणत्याही बातमीला पायाशी खेळत खेळत झुरळाने लाडिकपणा करावा तसले पार्श्वसंगीत नाही. "बातम्यांच्या स्पर्धेत आम्हीच पुढे" असला बढाईखोर पांचटपणा नाही. "पुणे" हा शब्द पूणे किंवा पुने असा लिहून व्याकरणाचा नवीनच नियम लिहिल्याची नसती ऐट नाही.
याला म्हणतात बातम्या!

Thursday, May 3

मराठी - तमिळ


एक वाचक लिहितात.
... मराठी व तमिळ या भाषांचा आणि संस्कृतींचा गाढ, प्राचीन संबंध दाखवणं हे या सर्व
लेखनाचं उद्दिष्ट आहे.प्रतीकार्थानं हा संबंध मराठीच्या बाळपणापासून सुरू होतो असं दाखवणारं गाणं म्हणजे बाळाला तीट लावण्याच्या वेळी मराठी आया शतकानुशतके म्हणत
आल्या आहेत ते:
अडगुलं मडगुलं/ सोन्याचं कडगुलं/रुप्याचा वाळा/ तान्ह्या बाळा/
तीट लावू//
तमिळमध्ये अटकु (अडगु) म्हणजे ठेवीची, विनिमयाची किंवा गहाणाची वस्तू. मडक्कू म्हणजे मातीची मोठी थाळी. मट्कलम् म्हणजे मडकं. मण् म्हणजे माती आणि कलम म्हणजे भांडं यावरून तो शब्द आला आहे. 'मडकं मोल म्हणून दिलं किंवा गहाण ठेवलं' असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. सोन्नम् म्हणजे सोनं आणि कडगम् म्हणजे कडं. ' मडकं देऊन सोन्याचं कडं घेतलं.' वाळम् म्हणजे गोल किंवा वर्तुळ. इरिप्पु म्हणजे रुपं, 'रुप्याचा वाळा घेतला.' हे दागिने तान्ह्या बाळाला घातले. 'ती' म्हणजे आग, जाळ. तीत्तल म्हणजे करपवणं, काजळणं. तीट्टुतल् म्हणजे अंगाला लावणं. तीत्तु म्हणजे दुष्टावा. 'दृष्ट' लागू नये म्हणून काजळीची तीट लावताना हे सगळे अर्थ एकत्र आले आहेत. तमिळ आणि मराठी समानार्थी शब्द किती सारखे आहेत पाहा.
खैरे विचारतात, "नवतरण्या महाराष्ट्री माउलीने तान्ह्या मराठी बाळाला जी शब्दाभूषणे घातली ती तमिळाईकडून तर घेतली नव्हती?" "होय" असं आत्मविश्वासपूर्ण उत्तर देण्यापर्यंत खैर्‍यांचा प्रवास नजीकच्या काळातच झाला. आणि केवळ शब्दभूषणं नव्हे तर सांकृतिक आभरणंही तामिळाईकडून मिळाली असे पुरावे ते सादर करीत राहिले.ओवी, अंगाई, पोवाडा हे सर्व तमिळमधून आले. ओवीचा चौथा चरण तुटका असतो एवढ्यावरून त्या अर्थाचे संस्कृत शब्द बनवायचे आणि त्याचा अपभ्रंश म्हणून ओवी शब्द सिद्ध झाला हे दाखवायचं असा
खटाटोप प्रस्थापित भाषाशास्त्राला धरून पूर्वीच करण्यात आला होता. प्रा. वेलणकरांनी ती संज्ञा अशी व्युत्पादिली आहे:
'अर्धचतुष्पदी-अठ्ठोठवइ-अड्ढुड्ढवयी-अड्ढूहवई-ढूहवई-हूहवई-होवई-ओवाई-ओवी. डॉ. कत्रे यांनी अपपादिका-अववाइआ-ओवैया-ओवी अशी परंपरा सांगितली."संस्कृतवरून व्युत्पत्ती काढायची म्हटल्यावर असा द्राविडी प्राणायाम करावाच लागतो" अशी यावर खैरे यांची टिप्पणी आहे. सरळ द्रविड भाषेकडे गेलं तर काय दिसतं? ओवीचा चौथा चरण तुटका ना? तमिळ ओऽवाय म्हणजे दात नसलेलं तोंड, तुटक्या काठाचं भांड. शिवाय 'ओवि' म्हणजे ध्वनी, आवाज. बाळ झोपताना ओऽ ओऽ करतं. त्याच तालावर आई त्याला ओऽ ओऽ करीत पटते. आवाहन करणारा हा आईचा मराठी ओऽ आहे. आजही मराठी गुराखी ओढाळ गुरू लांब गेलं तर ओऽ ओऽ करून त्याला ओवई किंवा ववई घालतो. (हे ग्रामीण बोलीचे महत्व. अशी अनेक उदाहरणे पुढे येतात.)छे, इश्श, अय्या हे उद्गार तमिळ.खंडोबा, त्याचा येळकोट, विठ्ठल, गोंधळ, तुळजाई, बोल्हाई, काळूबाई, फिरंगाई हे सर्व तमिळ.शेंडी पासून क्रमाने डोई, डोळा, पापणी, मिशी, ओठ, मोहरा, हात, पोट, स्त्रीयोनीचा मराठी शब्द, गुडघा, नडघी, घोटा, बोट हे सर्व तमिळ. 'तात्पर्य, शरीरवर्णनात आपण मराठी भाषिक नखशिखांत तमिळ आहोत.' शरीरवर्णनाचे शब्द हे भाषेतील प्राथमिक शब्द असतात हे या संदर्भात लक्षात ठेवणं योग्य होईल.चूलमूल, नातीगोती, भाजीपाला, स्वैपाकाचे पदार्थ, शेतीची अवजारे यांच्याशी संबंधित असलेले मराठीतील शब्दही तमिळ.
महाराष्ट्रातील स्थळनामांच्या अर्थाचा उलगडा तमिळवरून होतो हे द्रविड महाराष्ट्र या पुस्तकात दाखवले आहे. मुंबई, परळ, चेंबूर, वसई, वाशी, पुणे, वानवडी, येरवडा, थेऊर, जेजुरी, खंडाळा, जुन्नर, इत्यादी. मुठा, मुळा, उल्हास या नद्याही. उल्हास नदीच्या नावात उल्ह म्हणजे 'पल्ला मासा', जो केवळ याच नदीत सापडायचा. (आता प्रदूषणमुळं सापडत नाही.)मराठी वाचकांसमोर हे पुरावे मांडत असताना, दक्षिणी भाषाभ्यसकांपुढेही त्यांना भावतील असे तमिळ-मराठी संबंधांचे पुरावे इंग्रजी निबंधांतून खैरे सादर करीत आले आहेत. निर्णायक वाटावा असा पुरावा 'टोवर्डस इंडियन फोनॉलजी अँड लिंग्विस्टिक्स' या त्यांच्या निबंधात पहायला मिळतो. दक्षिणी भाषांच्या व्युत्पत्तिकोशाच्या दोघांपैकी एक संपादक एमेनो यांनी १९७० साली द्रविडियन कंपॅरेटिव्ह फोनॉलजी-ए स्केच या नावाच्या प्रबंधात सुमारे २७५ दक्षिणी शब्दावलीच्या वर्णांची तुलना केली आहे. त्यातल्या जवळ जवळ २६० गटांमधे मराठीतल्या एक ना एक शब्दाची ओळख पटते. त्यातल्या अनेकांच्या ज्या संस्कृत व्युत्पत्ती दिलेल्या आहेत त्या नमूद करून त्यांची कृत्रिमताही उघड केली आहे. अस्सल दक्षिणी म्हणवतात त्यांचे समशब्द मराठमोळे म्हणून वावरताहेत हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही.पण अगदी बिनतोड पुरावा हवा असेल तर तो पुढचा आहे. जे आपल्याला 'अस्सल मराठी' वाटतं त्याला आपण 'मराठमोळं' म्हणतो. अस्सल मराठी भाषेला आपण 'मराठमोळी' म्हणतो. तमिळ मर्रा (जो मराठीत मर्‍हा होतो) म्हणजे न झाकलेलं, उघडं किंवा स्पष्ट. 'मर्‍हाटाचि बोलु'! ज्ञानेश्वरीमधे बावीस वेळा हा शब्द आला आहे. आणि त्याचा हाच अर्थ असल्याचे खैर्‍यानी एका निबंधात दाखवून दिलं आहे. मोळि म्हणजे बोली, भाषा...


संदर्भ: दुवा



आता मला कळलं मला रजनीकांत एवढा का आवडतो ते. :)