संगणकावरील मराठी टंकलेखनासाठी बहुतेक जण बरहा चा वापर करत आहेत. मात्र कार्यालयातील किंवा नेट कॅफेमधील संगणकांवर अशा फ्री-वेअर्सना इन्स्टॉल करण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे इच्छा असूनही मराठी-देवनागरीमध्ये लिहिता येत नाही.
मनोगतावरील मराठी टंकलेखनप्रणाली ही वापरण्याच्या दृष्टीने बरहापेक्षा बरीच चांगली असली तरी ती वापरण्याची परवानगी केवळ मनोगताच्या सदस्यांनाच आहे. शिवाय मनोगत संकेतस्थळाचे पान तुमच्या ब्राउझरमध्ये उघडायला बराच वेळही घेऊ शकते.
ॐकार जोशी यांची गमभन ही मुक्तस्रोत मराठी टंकलेखन प्रणाली मात्र या दोन्हींपेक्षा बरीच वेगळी आहे. गमभन वापरण्यासाठी तुम्हाला संगणकावर काहीही इन्स्टॉल करावे लागत नाही. तुमच्या संगणकावर जावास्क्रिप्टला परवानगी असली की तुम्ही गमभन वापरु शकता. गमभनची आवृत्ती संगणकावर उतरवून घेऊन इंटरनेटशी जोडणी न करता तुम्हाला गमभन वापरता येते.
गमभन हे Open WYSIWYG शी अतिशय सहजगत्या जोडता येते. त्यामुळे अक्षरे ठळक/तिरकी/अधोरेखित करणे, रंगीत करणे, चित्रे किंवा सारणी टाकणे यासारख्या गोष्टी अतिशय सोप्या होतात.
भविष्यकाळात जर एखादे मराठी संकेतस्थळ विकसित करण्याची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी गमभन सहजरीत्या वापरता येते. द्रुपल, जूमला यासारख्या Content Management Systems किंवा मायबीबी, पीएचपीबीबी सारख्या Discussion Forums मध्ये गमभन + Open WYSIWYG Editor एकत्र टाकणे हे अतिशय सोपे काम आहे.
गमभन या प्रकल्पांतर्गतच मराठी शुद्धलेखन चिकित्सक विकसित करण्याचे कामही सुरु आहे. या चिकित्सकाची चाचणी आवृत्ती तुम्हाला येथे बघायला मिळेल. शुद्धलेखन चिकित्सा प्रकल्पात भाग घेण्याची इच्छा असल्यास तुम्ही ॐकार जोशी यांना "shabdasampada - madatanis" असा विषय लिहून josh9383 [at] gmail [dot] com या पत्त्यावर इमेल पाठवू शकता.
Sunday, April 29
गमभन टंकलेखन प्रणाली व शुद्धलेखन चिकित्सक
Saturday, April 28
भारतीय संस्कृती

Friday, April 20
इफ ओन्ली दीज पीपल हॅड अदर ऑप्शन्स...
"सिटी ऑफ गॉड" हा चित्रपट पुण्यातील गोल्ड ऍडलॅब्ज मध्ये लागणार आहे. तेव्हा वेळ न घालवता तिकिट, देणगी प्रवेशिका, फुकट पास जे मिळेल ते घ्या. काहीही मिळालं नाही तर डोअरकीपरला वशिला लाऊन पायरीवर बसून बघा पण मोठ्या पडद्यावर पाहण्याची सुवर्णसंधी अजिबात घालवू नका.
ई-स्क्वेअरचा स्क्रीन नंबर ४. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) सिटी ऑफ गॉड हा चित्रपट बघितला.
स्क्रीनमधली जागा तशी लोकांच्या मानाने खूप कमी. त्यात आयएमडीबी, रॉटन टोमॅटोज या चित्रपटविषयक संकेतस्थळांवर या चित्रपटाला अगदी दणकून रेटिंग. त्यामुळंही तुफान गर्दी.
पायर्यांवर पाय ठेवायला जागा नाही.
अगदी पहिली रांग व पडदा याच्यामध्ये असणार्या जागेतही लोक बसलेले.
चित्रपट सुरु झाल्यावरही लाईट्स चालू होते म्हणून एकानं "मालवून टाक दीप" हे गाणं सूर लावून म्हटलं तर सगळा हशा.
टायटल्स संपली आणि चित्रपट सुरु झाल्यावर एकदम शांतता झाली.
एक कोंबडा आजच्या चिकनच्या मेनूमध्ये आपली आहुती पडू नये म्हणून जिवाच्या आकांताने पळतोय... त्याच्यामागे दहा पंधरा जण हातात पिस्तुलं घेऊन धावत आहेत... अगदी मुंबईच्या झोपडपट्टीतलंच वाटावं असं आजूबाजूचं वातावरण... मात्र पडद्यावरच्या उन्हाचा रखरखाट अगदी थेटरातल्या एसीतही जाणवतो आहे... कोंबडा गल्लीबोळ हिंडून नंतर मेन रोडवर येतो... तोपर्यंत त्याच्यामागं पळणार्यांची संख्याही हळूहळू वाढते आहे... त्यांच्या हातातील पिस्तुलं उन्हात चमकत आहेत... मेन रोडवर हातात कॅमेरा घेऊन एक पत्रकार उभा आहे... त्याच्यामागं बरेच दूर दोन-तीन पोलीस उभे आहेत... मात्र पोलीसांना काडीचीही किंमत न देता गटाचा म्होरक्या कॅमेरामनला तो कोंबडा पकडायला सांगतो... आणि चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो.
रिओ दि जानेरो शहरातल्या झोपडपट्टीतील जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. मादक द्रव्यांची तस्करी, स्वार्थी राजकारणी, भ्रष्ट्राचारी पोलीस यांच्या कचाट्यात सापडलेल्या रॉकेट आणि लिट्ल झेड या समवयीन तरुणांची होणारी होरपळ यांची ही कथा. ज्या शहरात मादक द्र्व्यांचे व्यापारी हेच राजे आहेत तेथे हे दोघे वेगवेगळ्या मार्गाने कसे पुढे जातात आणि पुढं त्यांचं काय होतं याची आपल्याला अक्षरश: मुळापासून हादरवून टाकणारी गोष्ट.
रॉकेटच्या निवेदनातून ही कथा उलगडत जाते. पैसा, सत्ता व पुढे प्रसिद्धी यांचे अमाप आकर्षण असणार्या लिट्ल झेडचे आयुष्य दोन-तीन दशकांच्या वाटचालीत कसे बदलत जाते. गुन्हेगारी विश्वातील त्याच्या प्रवासात अडथळा ठरणारे - न ठरणारे यांना मनात येईल तेव्हा मारुन टाकणे. जे माझ्याबरोबर नाहीत ते सगळे माझ्याविरोधात असं उफराटं तत्त्वज्ञान लावणार्या झेडला पुढे शेरास सव्वाशेर असा फायटर नेड भेटतो. दोघांमधल्या वैयक्तिक वादाचा उपयोग प्रतिस्पर्धी गॅंग लिट्ल झेडशी लढण्यासाठी करु लागते. केवळ लिट्ल झेडशी असलेले भांडण सेटल करण्यासाठी यात सामील झालेला नेडही ह्या गॅंगवॉरमध्ये पुढे पूर्ण गुरफटून जातो.
सिटी ऑफ गॉडमध्ये एकही लोकप्रिय किंवा प्रोफेशनल म्हणावा असा कलाकार नाही. फेस्टिव्हलच्या माहितीपत्रकात आणि चित्रपट सुरु होण्यापूर्वीच्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार चित्रपटातील अगदी सगळेच कलाकार हे तिथलेच स्थानिक रहिवासी आहेत. आणि हा चित्रपटाचा खूपच स्ट्रॉंग पॉइंट आहे.
संपूर्णपणे दिग्दर्शकाचीच कामगिरी म्हणावा असा हा चित्रपट आहे. पहिल्या प्रसंगापासून तर शेवटच्या प्रसंगापर्यंत आपण स्वत: हे सगळं अनुभवत आहोत असं वाटत राहतं.
चित्रपटातल्या एका प्रसंगात लिट्ल झेडची सारखी कुरापत काढणार्या दहाबारा वर्षाच्या मुलांच्या टोळक्यातील दोन मुलं त्याच्या हाती लागतात. तेव्हा या दोघांपैकी कोणाला मारायचं आणि कोणाला ठेवायचं याचा निर्णय तो गॅंगमध्ये नव्यानेच सामील झालेल्या तितक्याच वयाच्या मुलाला सांगतो. आता आपल्यापैकी कोण मरणार याची दोघांच्या डोळ्यात दिसणारी भीती आणि या दोघांपैकी कोणाला मारलं तर लिट्ल झेड आपल्याला मारणार नाही या गहनप्रश्नात गुंतलेला मारेकरी हा प्रसंग पाहताना आपल्या मनात अगदी आतमध्ये काहीतरी टोचतं आणि तोंडाची चव कडवट होते.
"थोडं समजुतीनं घे" असा लिट्ल झेडला नेहमी सल्ला देणार्या, रंगीत केस आणि रंगीत कपडे घातले की आपण 'सेक्सी' दिसू असा विचार करणार्या, त्याच्या लहानपणापासूनच्या पार्टनरचं - बेनीचं कॅरॅक्टरही असंच जिवाला चटका लावून जाणारं आहे.
चित्रपटातील गोळ्यांचा खणखणाट, सतत-प्रत्येक क्षणाला अंगावर येणारा हिंसाचार यामागे सतत जाणवत राहते ते माणसाच्या मनातलं क्रौर्य. जगण्याचा दुसरा कोणताही "मानवी" मार्ग शिल्लक नसल्यामुळे याच मार्गावर वळण्याची अपरिहार्यता. अगदी सात-आठ-दहा वर्षाची मुलंही हातात खुलेआम पिस्तुलं घेऊन सिटी ऑफ गॉड मध्ये फिरताहेत, दिवाळीच्या टिकल्या वाजवाव्यात तशा बंदुका झाडताहेत हे पाहून आपण उद्विग्न होतो. हे सगळं कशासाठी चाललंय. ज्याच्या नावानं हे शहर उभं आहे तो आकाशातला देव झोपलाय का? त्याला हे सगळं थांबवता येत नाही का? या लोकांना जगण्यासाठी दुसरे पर्याय उपलब्ध नाहीत का? असल्या असंख्य प्रश्नांचं मोहोळ मनामध्ये उभं राहतं.
चित्रपटाच्या शेवटी येणारं "हा चित्रपट वास्तव प्रसंगांवर आधारित आहे" हे वाचून तर आपण अगदीच बधीर होऊन जातो. चित्रपट संपल्यावर "सुंदर चित्रपट" म्हणून टाळ्या वाजवायचंही कोणाला भान राहत नाही.
चित्र विकिपीडिया वरुन घेतले आहे.
Thursday, April 19
आवाहन क्र. २१
"....नाही ना. पण तो पार आत राहतो तिकडं. प्राधिकरणात. बट ही इज सो स्टुपिड. पण
त्याच्याकडं न्यू आणि सिलेक्टेड मटेरियल मिळतं. परत माझं नेक्स्ट इयर पण इम्पॉर्टंट
आहे. त्यामुळं आत्ताच मिळेल ते बघून घ्यायचं. त्याच्याकडं जेना जेमसनचे पण बहुतेक
सगळे मूव्हीज होते पण त्याला ती आवडत नाही म्हणून तो डिलीट करणार होता. आत्ता जर
मिळाले तर कूल. तुमचा सेलफोन पण चांगला नाहीये नाहीतर... "
वगैरे.
-इति: आमचा सोसायटीतला प्रिय वगैरे मित्र चि. निखिल (नाईन्थ स्टॅंडर्ड, सेंट एक्स वाय झेड हायस्कूल, निगडी)
बातमी १
बातमी २
प्रिय ना. विलासराव देशमुख,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
आपल्या महाराष्ट्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण ते शिक्षण आपल्या संस्कृतीविरोधात आहे.
शिवाय हे शिक्षण शाळेत सुरु केल्यावर बहुधा शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांनाच या विषयाचे ज्ञान जास्त आहे हे उघडकीस येईल.
तेव्हा तुमचा निर्णय एकदम बरोबर!
आता आपल्या संस्कृतीशी काहीही संबंध नसलेल्या कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इंग्रजी भाषा अशा विषयांचाही अभ्यासक्रमातील समावेश रद्द करावा ही विनंती.
धन्यवाद.
(संस्कृतीरक्षक) योगेश
सरळ
अचानकच गावचा एक मित्र पुण्यात भेटला... गावात असल्यावर गप्पा बिप्पा मारायला एकदम ग्रेट... त्यात परत त्याचा "आय-टी", भारताची नेत्रदीपक प्रगती... वगैरेशी काही संबंध नसल्यामुळे गप्पा मारायला एकदम मजा... त्याचे सगळेच अनुभव त्याच्यामते एकदम फंडामेंटल... पण हा पुण्यात कसा काय?
कॉलेजात असताना त्याचं एका मुलीवर प्रेम वगैरे बसलं... गावात जितकं जमेल तितकं - म्हणजे सहा महिन्यात दोनदा - एकत्र फिरल्यावर नंतर तिने घरच्यांच्या संमतीने परस्पर दुसरीकडे लग्न करुन याला एकदम बूच मारून ठेवल्यावर हा आपला गावातच येड्यासारखा इकडंतिकडं भटकायला लागला.... मळ्यातल्या एकदोन मुलींना नंतर 'लाईन' मागून बघितली पण त्यांनी याला 'एंगेज आहे' असं थोडक्यात पण स्पष्टपणे हाकललं... मग हा बहकलाच... पहिले काही दिवस सिगरेटी आणि नंतर बिड्या ओढून बघितल्या... पण मनाला शांतता काही लाभत नाही असं याचं म्हणणं... त्याचे वडीलच दारुबिरु पिऊन घरी आईला त्रास द्यायचे त्यामुळं याला दारु काही प्यावीशी वाटली नाही... घरचे इतर आपले सगळे शेतीबितीच्या कामात बिझी... याच्याकडं लक्ष देत नाहीत असं याचं म्हणणं... त्याची आई म्हणायची आम्ही मागं एकदोन पोरी बघितल्या पण एकपण याला पसंत नाही... किती लोकांच्या पोरींना नाही म्हणायचं... आम्हाला पण समाजात राहायचं आहे.... याचं सगळंच जगावेगळं.... आता ती अमक्यातमक्याची पोरगी... चांगली कॉलेजात आहे... याच्यामागं दोन वर्षं... रोज धा लोकांचा स्वैपाकपाणी, दूध, शेण सगळं करुन अभ्यास पण... आपल्या घरात अशीच पोर पाहिजे... सगळा रामरगाडा कोण चालवणार.... पण ह्या मुडद्याला गोरी कातडीच आवडतीया त्याला काय करणार... असली नाजूक मैना घरात आल्यावर मलाच पुन्हा सगळं करायला लागणार... हा परत तिच्या मुठीत राहणार... आम्ही याच्यासाठी किती खस्ता खाल्या... याला जाणीव नाही... वगैरे.
पुढं बरेच दिवस निघून गेले पण आता कंटाळून घरच्यांनी लग्नाचा विषय पार टाकूनच दिलेला... गावात कधी भेटल्यावर हा बंटी और बबली मध्ये ऐश्वर्या कशी सुंदर दिसते... कजरारे मध्ये कशी कंबर सुंदर हलवते वगैरे आम्हाला वर्णन करुन दाखवायचा... थोडक्यात याचं लग्न होणं आता अतिशय महत्त्वाचं होतं... पण आता घरात विषय कोण काढणार... माघार कुणी घ्यायची असा तिढा!
पण हा हुशार!
आम्ही सांगतो तुझ्या घरी म्हटलं तर त्याला याची तयारी नाही... त्याच्या मते घरच्यांना आत्ताच 'सरळ' करणं अतिशय आवश्यक आहे. 'शरण' जाऊन उपयोग नाही.
अजून काही दिवस गेल्यावर दिवसा इकडंतिकडं भटकून हा रात्री कीर्तन-पारायणांना जायला लागला... नेमके त्यात गावाबाहेर एक १००८ नावाचे एक स्वामी येऊन राहिले होते... तसे ते पुण्यातल्या ऍग्री कॉलेजातून बीटेक वगैरे झालेले पण आता त्यांनी अध्यात्मिक लाईन पकडली होती. हा तिथं जाऊन दुपारी बसायला लागला... त्यांचं बघून सर्वांगाला कडुनिंबाच्या पानांचा लेप वगैरे लावायला लागला.... आणि घरी सांगून टाकलं "मला आता लग्न करायचंच नाही."
घरचे हादरले... पोराने लग्नच केलं नाही तर पुढं याचं- आणि नंतर आपलं - कसं व्हायचं... गावात काय पत राहणार वगैरे... मग जोरदार पोरी शोधायची मोहीम सुरु केली... ही खरंतर याचीच आयडिया... नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही असा याचा दावा... घरचे याच्यामते सरळ झाल्यावर... दुसर्या दिवसापासनं यानं कीर्तन-१००८ बाबा वगैरे सगळं सोडून रीतसर पोरी बघायला सुरुवात केली.
शेवटी एक पोरगी घरच्यांना आणि याला पसंत पडली. नाही म्हणायला याच्या बहिणीनं (याच्या मते) काडी घालून पाहिली... तिचं म्हणणं पडलं पोरीचं कपाळ मोठं आहे... असली पोरगी अशुभ! पण आता याला पोरगी आवडलेली आणि हा अजून पिसाळू नये म्हणून आहे ह्याच पोरीबरोबर लग्न करायचं ठरलं.
आणि म्हणून लग्नाचा बस्ता वगैरे खरेदी करायला हा एकदम पुण्यात!
"अरे गावातच घ्यायचा ना... पुण्यात कशाला पैशे घालवतोस एवढे... तिकडं स्वस्त पडला असता", मी.
"हॅ! गावात काय आहे... मायला पुण्यात जे विकत नाही ते शिळं तुम्ही गावात पाठवता", तो.
"पण घरचे कसे काय तयार झाले इकडं खरेदीला?", मी.
"सांगितलं ना, एकदा 'सरळ' केल्यावर परत आपला शब्दपण पडू देत नाहीत.... वर अजून सासुरवाडीला पण आपण किती जंटलमेन आहे ते आधीच सांगून ठेवलंय", तो.
Sunday, April 1
लगीन ठरलंया!
लग्नाची तारीख ठरल्याची बातमी पाहून अगदी राहवेना.
ढाकुम टुकुम असं नाचत, गुणगुणत आम्ही थेट 'जलसा' वर पोचलो.
गेट उघडून आत बागेत गेलो. तर करोडपती साहेब आरशात बघून दाढीतले काळे केस उपटून बाहेर टाकत होते. (डोक्यावरचे काळे, मात्र दाढीतले सगळे केस पांढरे ठेवण्याचा काय हा खटाटोप!)
ह्या केसांना गोळा करुन जर लिलाव केला तर आपणही करोडपती होऊ या आशेने आम्ही एकदोन केस उचलण्याचा प्रयत्न केला तर बच्चन साहेबांनी डोक्यावर टपली मारोन आम्हास हटकले.
"नमस्ते बच्चनजी", आम्ही.
"तुम अंदर कैसे आये, ऑय? ", बच्चनजी.
"चलके" आम्ही एक विनोदाचा प्रयत्न केला!
"गुरखा, अगली बारसे दरवाजेको लॉक किया जाय! बोला, काय काम होतं?"
"नाही असंच आलो होतो... लग्नाची तारीख कळली. म्हटलं अभिनंदन करावं."
"तारीख नही तिथी कहो. ऑय... आणि झालं ना अभिनंदन... आता फुटा."
"सॉरी सॉरी... तिथी.... एनडीटीव्हीवर कळली." आम्ही योग्य त्या शब्दावर जोर दिला.
"एनडीटीव्ही?"
"नाही म्हणजे आम्ही आता ष्टार प्लस बघत नाही... एनडीटीव्ही बघतो. ताईंचा कार्यक्रम तिथं असतो ना. ष्टार वर आमच्या आवडीचा ष्टार नसल्यामुळं काही मजा नाही आता." आम्ही थोडा गूळ काढला.
"चाय पिओगे?" बच्चनजी थोडे खुलले.
"ठीक आहे. जैसी आपकी मर्जी. काही दुसरा ऑप्शन नाही का?", खरं म्हणजे आम्हाला कुठं नेण्याची लायकी नाही.
"ऑप्शन देनेके लिए हे काय कौन बनेगा करोडपती आहे का, ऑय?"
"चालेल चालेल... चाय पण चालेल."
"कुर्सी पर बैठो."
आम्ही खुर्चीकडे पाहिलं. या खुर्चीवर चढून बसण्यासाठी दुसरा एक स्टूल आवश्यक होता. बरोबर आहे. घरातली दोन माणसं नारळाच्या झाडाइतकी उंच असल्यावर खुर्च्या इतक्या उंच लागणारच. (जयावैनी खुर्चीवर कसं बसतात?)
थोडा प्रयत्न करुन खुर्चीवर बसलो.
इतक्यात आमचे तोंड गोड करण्यासाठी लाडू आले.
"ये लो. मिठाई खाओ." बच्चनजींनी बॉक्स पुढे केला.
"थॅंक्यू. आमच्या पिशवीत ठेवून द्या ना." आम्ही पिशवी पुढे केली.
"अरे सब नही... एक ले लो." बच्चनजी.
मग (स्वत:च्या) पार्श्वभागी हात पुसोन एक लाडू उचलला.
चहा येईपर्यंत काही तरी बोलणे भाग होते. आजूबाजूला कुठे अमरसिंग(जी) दिसत नाहीयेत ना हे पाहून घेतले. मागच्या वेळी असाच चहाटळपणा केला तर बच्चनजींनी अमरसिंगजींना बोलावले होते. त्यांचा चेहरा पाहून दोन दिवस झोप आली नाही! (याबाबतीत कधी नाही तो शाहरुखला आमचा पाठिंबा. )
"लग्न कुठे करणार ते अजून कळलं नाही! म्हणजे जलसावरच की गंगा के तट पे?"
"ते अजून ठरलं नाहीये. सगळ्याच बातम्या आत्ता दिल्या तर नंतर काय सांगणार? परत रिपोर्टर लोक आत्तापासूनच लग्नाच्या ठिकाणी फिल्डींग लावून बसतील."
"बरोबर आहे.. खरं म्हणजे त्यासाठीच आलो होतो."
एवढ्यात चहा आला.
"ताजमहाल चहा वाटतं... फुर्र" आमची धाव कुंपणापर्यंतच!
"ओरिजिनल दार्जिलिंग टी है. हम छोटामोटा चाय नही पिते. अमरसिंगजीने लाया है दार्जिलिंगसे."
नाव ऐकून परत आमचा ठोका चुकला.
"खरं म्हणजे आम्ही वेगळ्या कारणासाठी आलो होतो."
"हमें यकीन था. काही तरी कामधंद्याची गोष्ट करण्यासाठी आला असाल."
"नाही म्हणजे... गुस्ताखी माफ बच्चनजी पण... "
"अरे बोलो बोलो... "
"आता आपल्या मेन इन ब्लू नी तोंड काळं करुन आणल्यामुळं सेट मॅक्स ची वाट लागली आहे नाही का?"
"तो फिर?"
"मंदिरादीदीचा फोन आला होता! आता खरं म्हणजे काही लोक चॅनेल बघतात ते तिच्यामुळेच."
"मग?"
"तर तिचं म्हणणं होतं की लग्नाच्या (आणि लग्नानंतरच्या) कार्यक्रमाच्या प्रसारणाचे हक्क सेट मॅक्सला मिळावेत. म्हणजे त्यांचा इथं झालेला लॉस भरुन निघेल आणि तुमचाही लग्नाचा खर्च...."
"अमरसिंगजी... जरा बाहर आयेंगे.."
हे ऐकून मात्र आम्ही धूम ठोकली. मंदिरादीदीला सॉरी कसं सांगावं हा एक प्रश्न आहे.
