Wednesday, March 21

शब्दार्थाची शिक्षा

मी दादरकर यांनी लिहिलेल्या म्हणींच्या राज्यातील फेरफटका ह्या लेखात दिलेली अनेक भाषांमधल्या म्हणींमधील साम्यस्थळे वाचताना द.दि.पुंडे यांनी लिहिलेल्या "भयंकर सुंदर मराठी भाषा" या पुस्तकातील "शब्दार्थाची शिक्षा" हा लेख आठवला.

भारतात भाषिक विविधता आहे, पण संस्कृत भाषेच्या पूर्वपरंपरेमुळे एका भारतीय माणसाला दुसर्‍या भारतीय माणसाची भाषा कळणे जड जात नाही असे म्हणतात, ते तितकेसे खरे नाही. उलट एखादा स्वभाषेतील शब्द परक्या भाषेत वेगळ्या अर्थाने आला तरी त्याचा स्वभाषेत जो अर्थ आहे तोच घेतला जातो व घोटाळा होतो.

अनेक भारतीय भाषा संस्कृतपासून जन्मलेल्या असल्या तरी त्यातून आलेला एक शब्द अनेक भाषांमध्ये आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो. सत्कार ह्या शब्दाचे उदाहरण सर्वांच्या परिचयाचे आहेच.

संताप या शब्दाचे असेच आहे. बंगाली व कन्नडमध्ये हा शब्द "शोक" या अर्थाने वापरला जातो. उदा: "मुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल जनतेने संताप व्यक्त केला."

साक्षर हा शब्द गुजरातीत "विद्वान" या अर्थाने वापरण्यात येतो... मात्र मराठीत याचा अर्थ नेमका उलट आहे. जेमतेम लिहिता वाचता येणार्‍या माणसाला आपण साक्षर म्हणतो.

आपण मराठीत जंतू म्हणतो ते सूक्ष्म जीवांना; मात्र बंगाली व तेलुगूमध्ये वाघासारख्या मोठमोठ्या प्राण्यांना जंतू म्हणतात.

कौतुक हा शब्द बंगाली भाषेत "हास्यास्पद ठरवणे" या अर्थाने वापरला जातो. मराठीच्या किती विरुद्ध अर्थ आहे हा.

हिंदी भाषेची "शिक्षा" ही देशातील सर्व राज्यात भोगावीच लागते.

Tuesday, March 13

फेड - जीएंची एक लघुकथा

जीएंच्या लांबलचक कथा तुम्ही पाहिल्यात. पण छोट्या कथा पाहिल्यात का?


'कुसुमगुंजा' हे जीएंनी लिहिलेल्या लघुकथांचं पुस्तक आणि मी वाचलेलं जीएंचं पहिलं पुस्तक. पुस्तक वाचनाची काही पद्धत असते, पहिल्या पानापासून, अगदी प्रस्तावनेपासूनच सुरुवात करावी वगैरे गोष्टी माहिती नव्हत्या, त्यावेळी पुस्तकात मध्येच कुठेतरी असलेली "फेड" ही कथा प्रथम वाचली. नंतर झपाटून जाऊन जीएंची जवळपास सगळी पुस्तकं वाचून काढली. पण ज्या कथेने मला जीएंची ओळख करुन दिली ती कथा तुम्हीही वाचावी अशी इच्छा आहे.

एक जीएप्रेमी वाचक पुरुषोत्तम धाक्रस यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून,

जी.ए. कुलकर्णी यांच्या ह्या 'कुसुमगुंजा' म्हणजे काही दुर्मिळ चीजा आहेत. त्यांत
बहुतेक छोट्या छोट्या कथा असल्या तरी कथाकाव्याच्या रुढ चौकटीत बसवता न येणारेही
काही मासले त्यात आढळतील."जी.ए. म्हणजे प्रदीर्घ पल्ल्याचा लेखक", "त्यांच्या कथा
म्हणजे कादंबऱ्याच त्या," हा त्यांचा लौकिक इथे डोकावत नाही. इथे जीए नावाचा एक
अनोखा पक्षी चोचीतून एकेक आगळी गुंज जमवीत असल्याचा प्रत्यय येतो.

फेड


शाळा सुटल्यावर घरी यायचे म्हणजे सर्वात जवळचा रस्ता मारुतीच्या देवळाजवळचा होता. पण अलीकडे त्या रस्त्याने यायचे म्हणजे घरी परतत असल्याचा मोकळा आनंद माधवला कधी वाटला नाही. कारण घरी जाऊन दप्तर टाकताच त्याला बाटली घेऊन पुन्हा दवाखान्याकडे जावे लागे. घरी तो चहा घेत असतानाच आई बाटली घेऊन उभी असे. मग मीठ-मिरची लावलेले पोहे एका कागदात ठेवून ती ते त्याच्या खिशात ठेवून सांगे, "आता लौकर पळ, नाही तर डॉक्टर जातील."

दवाखान्यात डॉक्टर सहा वाजेपर्यंत असत. तेवढ्या वेळात गेले नाही तर मग दूर बाजारातल्या दवाखान्यात जावे लागे. मग रस्त्यातच पोह्यांचा एकेक घास खात जायला बरे असे. पण कट्ट्यावर बसून खाण्यासारखी त्यात गंमत नव्हती. आणि शाळा सुटल्यावर अजूनही गरम असलेल्या कट्ट्याच्या फरशीवर बसायला तर त्याला एकदाही मिळाले नव्हते.

माधव देवळापाशी आला. त्या ठिकाणी दामलेचे किराणा मालाचे दुकान होते. माधव जवळ आल्यावर दामलेने त्याला हाक मारली, व म्हटले "अरे, काय सामान घेऊन जाताना धाड होत नाही. पैसे कोण तुझा बाप देणार आहे की काय?"

माधव एकदम शरमला. तो खालच्या मानेने म्हणाला, "आबा तर आजारी आहेत. आईला विचारुन सांगतो."

दामले खाली उतरून आला. त्याने जाड मिशा ठेवल्या होत्या, आणि तो फार दारू पितो हे सगळ्यांना माहीत तर होतेच. पण त्याची बायकोच सगळ्यांना तसे सांगत असे. तो म्हणाला, "काय खेळ चालवलात की काय? उद्यापर्यंत नऊ रुपये घेऊन ये, नाही तर पुन्हा या रस्त्याने आलास तर पाय मोडून देईन."दामलेने नंतर हात उगारला व माधवच्या थोबाडीत दिली. त्याच्या हातातील दप्तर खाली पडले, व त्याचा गाल पेटल्याप्रमाणे जळू लागला. त्याने दप्तर कसेबसे उचलले व ओल्या डोळ्यांनी तो घरी आला.

आई त्याची वाट बघत होती. पण आता तिच्या हातात बाटली नव्हती. त्याचा चेहरा पाहून तिने विचारले, "काय झालं? सगळं सांग मला."

माधवने सगळे सांगितल्यावर ती क्षणभर बसली. मग तिने चहा व पोहे त्याच्यापुढे ठेवले व म्हटले, "आज दवाखाना नको. मघाशीच डॉक्टर आले होते. उद्या औषध बदलून देतो म्हणाले. मी जरा जाऊन येते, तोपर्यंत तू पोहे खात कट्ट्यावर बस."

ती कपाटाकडे गेली व एक-दोन डबे उघडून तिने पाहिले. एका डब्यातून तिने काही तरी मुठीत घेतले व बाहेर जाताना ती म्हणाली, "मी येथेच गाडगीळांकडे जाऊन येते."

माधवने समोरच्या चहा-पोह्यांकडे पाहिले. किती तरी दिवसांनी त्याला कट्यावर बसून पोहे खायची संधी मिळाली होती. पण त्याची भूकच मेली होती. आणि त्याला चेंगरुन गेल्यासारखे वाटत होते. तो तसाच येऊन बाहेर बसला. गाडगीळांचे घर समोरच होते. घराला मोठी माडी होती. तेथल्या सोप्यावर मोठमोठे आरसे होते, आणि तेथल्या खुर्च्यांना फुलाफुलांच्या मऊ गाद्या होत्या.

थोड्या वेळाने आई परत आली. चहा-पोहे तसेच पाहून तिने माधवकडे पाहिले. पण ती काही बोलली नाही. तिने बशी कपावर टाकली, आणि आबा झोपले होते त्या खोलीकडे पाहत म्हटले, "मी दहा मिनिटांत परत येते मारुतीला जाऊन!"

तिने बाहेरच्या दाराला नुकतीच कडी लावली व माधवला म्हटले, "चल माझ्याबरोबर." माधवने तिच्या पायांकडे पाहत म्हटले, "तुझी जोडवी राहिलीच की!"

जोडवी घातल्याखेरीज आई कधी बाहेर जात नसे, आणि तिच्या बरोबर जाताना तिच्या जोडव्यांचा होणारा रस्त्यावर होणारा आवाज त्याला फार आवडे. मग आईने पुन्हा कडी काढली, देवाच्या कोनाड्यांतील जोडवी गोळा करून पायांच्या बोटात अडकवली व त्याला बाजूला घेऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, "हं, आता चल."

आई दामलेच्या दुकानात आली. दामले रस्त्यावर खाली वाकून साबणाची पेटी उघडत होता. आई दुकानाच्या फळीवर जाऊन उभी राहताच त्याने पेटी उघडण्याचे काम थांबवले व तो उभा राहिला. आई फळीवर उभी होती, तरी दामले तिच्याएवढा उंच दिसत होता.

"दामले, तुमचे किती पैसे द्यायचे आहेत?" तिने शांतपणे विचारले, "पैसे द्यायला आणखी एक महिना तरी लागेल, असं मी गेल्या शनिवारीच सांगितलं होतं ना? त्याला तुम्ही बरं म्हणाला होता ना?"

"म्हणालो म्हणून काय झालं? मऊ लागलं म्हणून काय कोपरानं खणायचं काय?" दामले म्हणाला, "तुमची बाकी नऊ रुपये आहे?"

आईने नोटा काढल्या व एकेक पुन्हा मोजून त्या दामलेला दिल्या. त्याने त्या हातात घेतल्या व गुर्मीने म्हटले, "बाकी चुकती झाली. आता यापुढं उधार मिळणार नाही."

"सगळी बाकी अद्याप चुकती झाली नाही." आई म्हणाली. तिने झटकन हात वर केला, व फाडकन दामल्याच्या मुस्काटात दिली. दामले खुळ्यासारखा पाहतच राहिला. रस्त्यावर दोन बायका शाल पांघरून मारूतीला चालल्या होत्या, त्या तेथेच थबकल्या. एक माणूस सायकलीवरून उतरून पाहू लागला. दुकानातील गिऱ्हाईके तर एकदम गप्पच झाली. आणि साखरेचा पुडा बांधत असलेला सखाराम तो तसाच हातात धरून वेंधळ्यासारखा पाहत उगाच दोरा फिरवू लागला.

"तू एक चपराक याला दिली होतीस ना, ती देखील फेडायचीच होती. आता सगळी बाकी चुकती झाली." आई म्हणाली, "आणखी एक लक्षात ठेव. पुन्हा जर पोराच्या अंगाला हात लावशील तर मारुतीच्या चौकात तुझं मढं पाडीन आडवं!"

आई तितक्याच शांतपणे फळीवरून खाली उतरली व माधवच्या खांद्यावर हात ठेवून त्याला ढकलत चालू लागली. "आता घरी जाऊन चहा तापवून देते. मग कट्ट्यावर बसून पोहे खा."

माधव त्या चित्राने फार सुखावला व झपझप चालू लागला. शेजारी चालत असलेल्या जोडव्यांच्या चटचट आवाजाची त्याला विशेष ऐट वाटली.

हॅलो लालूजी

सकाळी फोन पाहिला तर एक मिस्ड कॉल.
नंबर बघितला तर तो आमचे प्रिय रेल्वेमित्र लालूसाहेब...

तुम्हाला इतके दिवस सांगितलं नाही पण लालूसाहेब (आमच्या) लहानपणापासून आमचे मित्र!

लालूसाहेबांचे गोबरे गोबरे (तेलकट) गाल पाहिले की आपण खूष.

सर्कशीतल्या विदूषकापेक्षाही जास्त खदखदून हसवणारं लोभस व्यक्तिमत्व म्हणजे लालूजी.

लगेच मी त्यांना फोन केला.

मी: "नमस्ते लालूजी, जय महाराष्ट्र... आपलं सॉरी(जीभ चावून)... जय बिहार"

लालू: "का चल रहा है बेटा?"

मी: "मेरा चांगलाच चल रहा है. आपने बोला वैसे हिंदी का शिकवणी रख दिया हू. आपने फोन किया था क्या?"

लालू: "अरे वो तुम्हारा राज ठाकरे क्या अनाप शनाप बक रहा है? पढा क्या तुने"

मी: "वैसे मै आपकी बातमी छोडके दुसरी बातमी नही वाचता, लेकिन ये बातमी चुकीसे वाची"

लालू: "तो तू क्या बोल रहा है इसके बारेमे"

मी: "मै क्या बोलू, पहले आप सांगो आपका क्या मत है"

लालू: "बिहार का इतना सारा विकास करके बिहारी लोग अब महाराष्ट्र का विकास करने के लिए वहा पे आ रहे है. राज ने तो उनका स्वागत करना चाहिये."

मी: "एकदम बरोबर"

लालू: "हमारी भारतीय सभ्यता भी 'अतिथी देवो भव' ही कहती है. और बारबार राजनीती में संस्कृती और सभ्यता ऐसे शब्द लानेवाले इस बात को समझेही नही"

मी: "एकदम खरा है. हमारी मराठी संस्कृती भी "कासेकी लंगोटी देओ" ऐसाही सांगती है."

लालू:"अगर महाराष्ट्र के लोक बिहार मे आयेंगे तो हम उनका स्वागत ही करेंगे ना?"

मी: "बरोबर लालूजी, राज एकदम चुकीका बोल रहा है. अरे मराठी पेपर की सब बातमी वाचो तो ऐसे लगता है के मै बिहार मेंही रह रहा हू. इधर ये हात कापा, उधर उसका खून किया, १०० किलो गांजा पकडा. महाराष्ट्र और बिहार मे फरक ही नही है"

लालू: "हम भी तो वही बोल रहा हू. बिहार में लोगोंको रोजगार की संधी ना देके मै महाराष्ट्र के विकास हम कितना हात बटा रहा हु तुम देख ही रहे हो ना. लेकिन कुछ लोग इसे गलत अंदाज में समझ रहे है"

मी: "लालूजी, आपको राग नही आयेगा तो मेरे पास एक नंबर उपाय है इस मामले मे"

लालू: "अरे बोल, हम जानते थे की तुही एक है जो इसका उपाय बतायेगा. इसी लिए तो तुझे फोन किया हू"

मी: "वैसे भी आपके यहासे बहुत सारे लोगोंको महाराष्ट्र मे ही नोकरी करनेकू आना पडता है, है क्या नही?"

लालू: "तो?"

मी: "तो आप बिहारमेंही मराठी शिक्षण देना क्यू नही सुरु करते? तो बिहारी लोग भी मराठी हो जायेंगे और कोई विरोध ही नही कर पायेगा"

तर लालूजींनी फोन बंद केला. बहुधा त्यांना माझं हिंदी कळलं नसावं. लालूजींशी असलेली मैत्री टिकवण्यासाठी हिंदीची शिकवणी नियमितपणे केली पाहिजे. उगाच माझ्या बोलण्याचा भलता अर्थ काढायचे.

Monday, March 12

ड्रग्जचा विळखा

पुण्यात झालेल्या रेव्ह पार्टीच्या निमित्ताने लोकसत्ताच्या पुणे वृत्तांत मधील 'ड्रग्जचा विळखा' या सदरात आलेला अनिल अवचटांचा लेख खाली वाचा:

पुणे वृत्तांतची इंटरनेट आवृत्ती उपलब्ध नसल्याने इथेच तो देत आहे.


संस्कृतीचा र्‍हास
समाजात उपभोगवाद वाढत चालला आहे, हे 'रेव्ह पार्टी' आणि त्यात गुंतलेल्या धनिक बाळांना झालेल्या अटकेच्या निमित्ताने ठळकपणे समोर आले आहे. 'मला मजा मिळाली पाहिजे. त्याचे परिणाम विचारणारे तुम्ही कोण?' अशी बेदरकारी या उपभोगवाद्यांमध्ये आहे. 'रेव्ह' आणि तत्सम प्रकारच्या पार्ट्यांमधून तरुणांना नवीन व्यसनांची ओळख करून दिली जाते. त्यातून अगदी सगळ्यांना नाही, तरी काहींना अमली पदार्थांची सवय जडते. तिचे पर्यवसान व्यसनात होते. थोडक्यात 'रेव्ह पार्ट्या' झाल्या नाहीत, तर ही मुले वाचतील इतके हे सरळ गणित आहे. अशा पार्ट्यांमागची प्रेरणा मौजमजाच असते. मौजमजेचे काही सुसंस्कृत मार्ग शिल्लक राहिले आहेत की नाहीत, हा खरा प्रश्न आहे. पकडले गेलेले तरुण एकत्र जमून संगीताच्या तालावर नाचले असते, तर कोणाची हरकत असण्याचे काहीच कारण नव्हते. दुर्दैवाने 'बीअर पिण्यात काही गैर नाही,' असे मानणार्‍या पालकांच्या मुलांकडून असे समंजस पाऊल उचलले जाणे संभवत नाही.

'रेव्ह पार्टी' किंवा तत्सम प्रकारांची वाढती संख्या हे समाजस्वास्थ्याच्या दॄष्टीने धोक्याचे चिन्ह आहे. संस्कृतीच्या र्‍हासाचेच ते लक्षण आहे. अमली पदार्थाच्या सेवनाचे मानसिक परिणाम खूप खोलवर असतात. अमली पदार्थांचे सेवन केलेला मनुष्य एका विशिष्ट भावनेच्या आहारी जातो आणि त्याला व्यसन लागते. मेंदूवर हमखास परिणाम करणारे हे पदार्थ घातक आहेत; कारण त्यात चटक लावणारे घटक असतात.

'मुक्तांगण' पुरते बोलायचे, तर आमच्याकडे येणार्‍या रुग्णांमध्ये ८० टक्के व्यक्ती दारूच्या आहारी गेल्या असतात; तर २० टक्के या अमली पदार्थ आणि अन्य व्यसनांचे सावज बनलेल्या असतात. या व्यसनांचे चार गटांत वर्गीकरण केले जाते. अफू (हेरॉईन व गर्द), मारुवाना ड्रग्ज (गांजा व चरस), झोपेच्या गोळ्या आणि सिगारेटस हे ते गट होत. दारूबाजांना ज्याप्रमाणे नातेवाईक व्यसनमुक्ती केंद्रात आणून सोडतात, तसे रस्त्यावरच्या गर्दुल्ल्यांबाबत घडत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. गर्दच्या आहारी गेलेली व्यक्ती सुशिक्षित घरातील असेल, तरच तिला केंद्रात दाखल केले जाण्याची शक्यता निर्माण होते. नेमकी हीच वस्तुस्थिती लक्षात घेऊन 'मुक्तांगण'ने वस्त्यांवस्त्यांमध्ये जाऊन शिबिरे घेण्यावर भर ठेवला आहे. मानवी मनाचा थांग संत महंतांनाही लागलेला नाही. अमली पदार्थांच्या भयावह समस्येवर उपाय सुचवण्याच्या अपेक्षेने मानसोपचारतज्ज्ञांकडे पाहिले जाते. मात्र, असा तज्ज्ञसुद्धा अखेरीस माणूसच असतो, हे आपण विसरून जातो. नैराश्यावर विजय मिळवण्याचे अनेक सकारात्मक मार्ग आहेत. पण असे मार्ग मोहाच्या क्षणी नैराश्यग्रस्त व्यक्तीला समोर दिसणे, हेसुद्धा तितकेच आवश्यक आहे. एकाकीपणावर किंवा दु:खावर मात करण्यासाठी काही आरोग्यपूर्ण मार्ग असू शकतात, हे 'रेव्ह पार्टी' करणार्‍या युवकांच्या गावीही नव्हते, असे खेदाने म्हणावेसे वाटते. नैराश्यावर मात करण्यासाठी परिस्थितीशी मानसिकदृष्ट्या जुळवून घ्यायचे की निराशा दारूत बुडवायची?

काही वर्षांपूर्वीपर्यंत ड्रग्जसेवनाचे प्रमाण कमी झाले होते; पण गेल्या दीड वर्षात ते पुन्हा वाढले आहे. अमली पदार्थांच्या सेवनामागे एड्सचा मोठा धोका दडला आहे. क्षणिक मौजमजेची जबरदस्त किंमत व्यसनासक्त व्यक्ती आयुष्यभर मोजत राहते. व्यसनांची समस्या मानसिक त्रासापुरती मर्यादित नाही; तर संस्कृतीच्या रसातळाला जाण्याशी ती जोडलेली आहे.

-डॉ. अनिल अवचट.



टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक हे वाचून थोडा बोध घेतील अशी (व्यर्थ) अपेक्षा आपण बाळगू. :)

Tuesday, March 6

शिमगा

गावाकडचा मित्र
बर्‍याच दिवसांनी भेटला
आणि
मला म्हणाला
"पुण्यात" राहतोस ना तू
आणि ट्रेक बिकला पण
जातोस म्हणे
सिंहगडावर

त्याच्या काळ्याभोर डोळ्यांत
लख्ख दिसत होती
माझ्याविषयीची असूया .
पुढे काही न बोलताही
मला सगळं कळून गेलं.

होळीच्या दिवशी
आम्हाला पुरणपोळी
आणि आमटीचा भुरका

पुणेकरांना मात्र
गांजाचा झुरका?

हा आमच्यावर अन्याय आहे
जणू तो ओरडत होता

तुमच्याकडे सिंहगड आहे
तसा आमच्याकडे पण
शिवनेरी आहे

मग आम्हाला पण
असं का मिळत नाही गावाकडं
करायला?

फक्त पुण्याचीच प्रगती
का करतात सगळे?

मी म्हटलं
टेन्शन नको घेऊ,
तू पण पुण्याला ये
तू पुण्याला आला
की सगळं मिळेल
आपली
सांस्कृतिक राजधानी आहे ती.
पुणे तिथे काय उणे?




आपल्या कुशीतल्या
डोणज्याचं दु:ख
कोंढाण्याच्या मनात
खोलवर घुसलं

तानाजीच्या डोळ्यातलं
पाणी
महाराजांनी थरथरत्या हातांनी
पुसलं

:(

Saturday, March 3

मी एक 'रसिक'

रसिक या शब्दाचा अर्थ माझ्या मते तरी ज्याला गुर्‍हाळातला लिंबू-आले टाकून केलेला ऊसाचा ताजा रस आवडतो असाच आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडेल गुर्‍हाळ म्हणजे नक्की काय?
ही गोष्ट गुर्‍हाळ ज्यांनी पाहिले नाही त्यांना समजावून सांगणे अवघडच आहे.

बर्‍याचदा वृत्तपत्रांमध्ये 'चर्चेचे गुर्‍हाळ' वगैरे प्रयोगांमध्ये हा शब्द वाचण्यात येतो. गुर्‍हाळ या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे जिथं गूळ तयार केला जातो ती जागा.

पण माझा गुर्‍हाळ या शब्दाशी संबंध जिथं ऊसाचा रस प्यायला मिळतो ह्यापुरताच आला आहे. आणि त्यातही हा रस फुकट मिळत असेल तर अधिकच उत्तम.

सर्व प्रकारच्या फळांच्या रसामध्ये मला ऊसाचा रस अतिशय प्रिय आहे. बाकीची फळं ही त्यांचा रस करुन पिण्यापेक्षा खायला जास्त आवडतात. ज्यूस या नावाखाली भरमसाट साखर घालून, त्या फळाची मूळ चव मारुन टाकून वर आणखी त्याचे भयंकर पैसे घेणार्‍या लोकांमुळे इतर फळांचे रस तितकेसे प्रिय नाहीत. ऊस खायला आवडत नाही असं नाही पण ऊस खाण्याची खरी मजा ही तो चोरून खाण्यात आहे. साखर कारखान्याकडे निघालेल्या ट्रकच्या किंवा बैलगाडीच्या पाळतीवर राहून डायवर साहेबांचे लक्ष नसले की खेचून काढलेला ऊसच जास्त गोड लागतो हे वैश्विक सत्य आहे.

आता गावाकडचा माणूस असला तर म्हणेल ऊस हे काय फळ आहे का?
कारण गावाकडं भाजी म्हटली की डोळे निवतील अशी हिरवीगार पाने असलेली, पानांच्या कडांवर लख्ख दिसेल अशी सोनेरी छटा असलेली, अगदी थोडंसं पाणी शिंपडल्यावर अधिकच टवटवीत दिसणारी, थोडक्यात ज्याला लसणातली भाजी म्हणतात अशी मेथीची जुडी समोर उभी राहते. भाजी या प्रकारात शेपू, पालक, करडई, तांदुळजा, चाकवत, चुका (ही भाजी आहे), माठ(आणि ही पण) या भाज्यांचा नाईलाजानेच समावेश केला जातो. वांगी, बटाटे, गवार, कोबी, फ्लॉवर वगैरे प्रकारांचा त्यांच्या विशेष-नामानेच उल्लेख करण्याची पद्धत आहे. ह्यांना 'भाजी' असं शाळेतले पालेभाज्या-फळभाज्या शिकवणारे गुरुजी सोडले तर कुणी म्हणत नाही.

तीच गोष्ट फळांची, फळ म्हटलं की गावाकडं आठवतो आंबा. मग नंतर द्राक्षं, सीताफळ, केळी, चिकू, मोसंबी, संत्री आणि सफरचंद ह्यांचा उपफळ म्हणून समावेश होतो. पेरू, आवळा, बोरं, चिंचा यांना कुणी फळ म्हणत नाही. पण पुण्यात जे गोड दिसतं त्या प्रत्येकाला फळ म्हणतात असं एकूण दिसलं. मी वैतागून बाजारात शेजारच्या काकांना पिकलेल्या रताळ्याला पण तुम्ही फळ म्हणता का हो? असं विचारुन त्याचं डोकं पिकवलं होतं.

पुणेकर मंडळी फळ कशाला म्हणतील याचा नेम नाही. पुणेकरांचे फंडे क्लीअर नाहीत हे माझं पुणेकर होण्यापूर्वीपासूनचं मत आहे. पण मीही आता बर्‍यापैकी पुणेकर झालो असल्यामुळे माझं मत ठोकून देतो.

त्यामुळे ऊसाला फळ म्हणावं की नाही हा प्रश्न (तुम्ही गावाकडचे असाल आणि तुम्हाला पडला असेल) तर तो विचारु नका अशी पुणेरी नम्र विनंती. आणि असा प्रश्न पडलाच तर वांग्याला फळ का म्हणू नये व सीताफळालाच का म्हणावे यावर दहा ओळींचे उत्तर मला पाठवा. तरच तुमच्या प्रश्नावर विचार केला जाईल.

तर ऊसाचा रस हा खास उन्हाळ्यात पिण्याचा पदार्थ. ऊसाच्या रसापेक्षा कोकम सरबत, नीरा, शहाळे हे देशी पदार्थ जास्त ग्लॅमरस आणि लोकप्रिय आहेत खरे. लिंबू सरबत तर उन्हाळ्यात अमृतानुभवच देऊन जातो असं म्हणतात. त्यामुळं तो खरं तर जास्त आवडायला हवा. पण लहानपणी सर्दी होईल म्हणून अनेकदा आईने सरबत नाकारल्यामुळे ती घरात नसताना मी लिंबू सरबत तयार करुन पिण्याचे प्रयोग केले होते. मी केलेला सरबत चवीला नेहमीच ओआरएस - जलसंजीवनी प्रमाणे लागत असे. त्यामुळे (दुसर्‍यांनी केलेला) लिंबू-सरबत आवडत असला तरी त्याविषयी मनातून तितकंसं प्रेम काही उत्पन्न झालं नाही. कोकम सरबत, शहाळे वगैरे प्रकार गावाकडं लहानपणी अभावानंच मिळायचे. त्यात शहाळ्याचा संबंध गावात आजारी माणसाशी जोडलेला गेला असल्यामुळं शहाळ्याचं पाणी पिऊन आपण आजारी बिजारी पडतोय की काय अशी भीती वाटायची. नीरा देखील बरीच उशीरा प्यायला मिळाली. पण ऊसाच्या रसाशी पहिला संबंध आला तेव्हापासून उन्हाळा आला की मी त्याच्याशीच अजूनही एकनिष्ठ राहतो.

लहानपणी गावात असताना रसाची सगळी दुकानं ही एसटी स्टॅंडवर होती. घरातलं कुणाला बाहेरगावी जाताना स्टॅंडवर पोचवायला गेलो किंवा कुणा पाहुण्याला आणायला गेलो की 'जनता रसवंती गृह' नावाच्या दुकानात हमखास रसपान होत असे. हे दुकान जनता पार्टीच्या एका खंद्या कार्यकर्त्याचं होतं. दुकानात सर्वत्र हिरवे झेंडे - निवडणूक असो वा नसो - कायम असत. तो आधी कोणत्या पार्टीचा होता ते माहीत नाही. पण पूर्वीच्या काळची नांगरधारी शेतकरी ह्या खुणेची कट-आऊट्स. "नांगरधारी शेतकरी - लोकसभेचा मानकरी" वगैरे घोषणा लिहिलेले फलक त्याने बाकड्यांवर बसण्यासाठी, उन्हाला आडोसा म्हणून लावले होते. त्या काळात जनता दलाचं असलेलं चक्र हे चिन्ह सहजगत्या लक्षात येईल ठिकठिकाणी ठेवलेलं असायचं. खोटं वाटेल पण ग्लास वगैरे धुण्यासाठी देखील 'व्हील' साबणाचाच वापर केला जायचा. :)

नंतर शेषन आल्यावर आचारसंहिता वगैरे लागू झाली आणि काही लोकांनी दुकानाच्या नावाबाबत तक्रार केली. आम्हीदेखील 'कॉंग्रेस रसवंती गृह सुरु करु' अशा धमक्या निवडणूक आयोगाला देण्यात आल्या. शेवटी जनता वाल्याने माघार घेतली व दुकानाला 'जयप्रकाश नारायण रसवंती गृह' असं दमदार नाव ठेवलं. मात्र नाव बदललं तरी क्वालिटीत फरक नाही. त्याच्याकडं मिळणार्‍या रसाला तोड नव्हती. रंग, वास, चव सगळ्याच बाबतीत एक नंबर. मला माहीत होतं तोपर्यंत त्याच्या दुकानात रस काढण्यासाठी बैलाचाच वापर केला जायचा. भर मे महिन्यात गिर्‍हाईकांचा लोड वाढला की तो आणखी एक बैल आणून दुसरा चरक लावत असे. गावातून पुण्याला येईपर्यंत त्या रसाची संगत काही सुटली नाही.

सीओईपीत तिसर्‍या व चौथ्या वर्षात असताना, जेव्हा मास्तर आमचा व आम्ही मास्तरांचा चेहरा पूर्णपणे विसरुन गेलो होतो, तेव्हा कॉलेजात येण्याचं काही कारणच नसायचं. एकतर कॉलेजपेक्षा हॉस्टेलवरच जास्त गंमत असायची. कॉलेजातली आहे ती सर्व प्रेक्षणीय स्थळं आधीच बघून झाल्यामुळे आणि त्यात फर्स्ट इयरचे ऍडमिशन्सही सुरु नसल्यामुळे अगदीच अमावास्या-पौर्णिमेला डिफॉल्टर्सची फायनल लिस्ट लागली की मग नाईलाजाने कॉलेजात प्रकट व्हायचो.

अपवाद मात्र फेब्रुवारीपासून सुरु होणार्‍या दिवसांचा. बोटक्लबवर येऊन ज्याच्याकडं बाईक आहे त्याला घेऊन रस प्यायला जाणे हाच काय तो कॉलेजात न येण्याच्या व्रताचा भंग करणारा प्रसंग. शिवाजीनगरच्या प्राईड हॉटेलशेजारचं एक रसाचं दुकान कॉलेजच्या काळात आमचं प्रिय होतं. कृषी महाविद्यालय, सदाशिवपेठेतल्या जेव्हीके सरांच्या क्लासजवळचं एक 'शैलेश(?) रसवंती गृह' वगैरे प्रसिद्ध ठिकाणीही रस प्यायलो पण दोन्हीकडचा रस तितकासा आवडला नाही. एक तर हे लोक रस कसा काढतात हे आपल्याला दिसत नाही. आणि ज्या ऊसाचा रस आपल्यासमोर काढलेला नाही त्याचा रस मला का कोण जाणे पण गोड लागत नाही.

आमच्या एका मित्रावर तर आर्किमिडीजच्या सिद्धांताचा भयंकर परिणाम झाला होता. 'कोणतीही वस्तू आपल्या आकारमानाइतका द्रवपदार्थ बाजूला सारते' वगैरे सिद्धांत त्याच्या मनावर इतका खोल ठसला होता की रस प्यायला गेल्यावर तो कधीही पहिला घोट पिऊन ग्लासमध्ये पुरेशी मोकळी जागा झाल्याशिवाय त्यात बर्फ टाकून देत नसे.

रसात वापरला जाणारा बर्फ अस्वच्छ असतो. ऊसाच्या रसामुळे कावीळ होते. दॅट प्लेस इज नॉट हायजिनिक यू नो, आपण घरीच ज्यूस करु. वगैरे मुक्ताफळं ऐकली की तो ऊसाचा बांबू हे सांगणार्‍यांच्या पाठीत मारावा किंवा त्या चरकात त्या माणसाला पिळून काढावा असं वाटतं. अशाच लोकांना त्या ऊसापासूनच बनवण्यात येणार्‍या गुळाची चव लागत नसणार. अरे ऊसाचा रस ही काय घरी करायची गोष्ट आहे का? नाही म्हणायला एका मित्राच्या माऊलीने आम्ही बाहेर जास्त 'पितो' हे पाहून आम्हाला घरी ऊसाचा रस तयार करुन पाजला होता. ऊसाच्या कांडीचे संक्रांतीच्या वाणासाठी करतात तसे छोटे छोटे तुकडे करुन मिक्सरमधून रसनिष्पत्ती करण्याचा व्यर्थ प्रयत्न करुन तयार झालेला द्रवपदार्थ जास्त गोड नाही म्हणून त्यात वरुन साखर घातली होती. त्या पदार्थापेक्षा गोमूत्र जास्त चविष्ट लागत असेल. नंतर तो मित्र घरच्यांशी खोटे बोलून माझ्याबरोबर बाहेर रस प्यायला यायला लागला.

ऊसाच्या रसाचा रंग व चव याचं शब्दात वर्णन करणं तर खूपच अवघड आहे. मी स्वत: पोपटासारख्या हिरव्यागार रंगाच्या रसापासून तर अगदी दुधासारख्या पांढर्‍याशुभ्र दिसणार्‍या रंगाचा रस प्यायलो आहे. त्यामुळे रंगावरुन त्याच्या चवीचा अंदाज येणे अवघड. रसाची चव जशी ऊसावर अवलंबून असते तशीच रस करताना त्यात लिंबू, आले वगैरे ऍडिटिव्हज किती घालतात यावरही रसाची चव बदलते. लिंबू-आले यांचं प्रमाण थोडं जरी बिघडलं तर रस कडू होतो. आमच्या जुन्नर-आंबेगाव परिसरातल्या ऊसाचा रस मस्त गोड असतो. बहुधा त्यातला साखरेचा ऊतारा जास्त असावा. इंदापूरकडच्या ऊसाचा पुण्यात बर्‍याच ठिकाणी मिळणारा रस मात्र बेचव लागतो. अर्थात ही सगळी रसवाल्यांशी झालेल्या चर्चेतून कळालेली ऐकीव माहिती आहे.

मराठीत निर्माण झालेले रसिक, रसास्वाद, रसनिष्पत्ती, अरसिक, रसाळ वगैरे शब्दांची उत्पत्ती देखील ऊसाच्या रसाचे प्रेमी असलेल्या आपल्या पूर्वसूरींनी केली असावी असं मानण्यास जागा आहे. कारण रस म्हटलं की समोर उभा राहतो थंडगार ऊसाच्या रसाने भरलेला ग्लासच.



भर उन्हाळ्यातला शिवनेरीचा ट्रेक असावा. उन्हाच्या काहिलीनं जीव कासावीस झालेला असावा. हातातल्या पाण्याच्या बाटलीतलं सगळं पाणी संपून गेलं असावं. बॅगेमधलं ग्लुकॉन-डी चं पाकीट नेहमीप्रमाणे घरीच विसरलेलं असावं. गड उतरताना घशाला भयानक कोरड पडलेली असावी. आता परत ट्रेकला जायचं नाही असा मनाशी दृढनिश्चय झालेला असावा. मग अगदी पायथ्याशी सत्यनारायणाच्या पूजेला केळीची पानं-आंब्यांच्या डहाळ्या लावतात त्याप्रमाणे खांबाला बांधलेली ऊसाची मोळी लावलेलं 'रसवंती गृह' सापडावं. दुकानाबाहेरच्याच एखाद्या झाडाखाली थकून बसकण मारावी. 'पोरगं दमून आलंय, त्यो शिळा राहूदे तसाच. नवीन कांडकं काड' असं मालकानं बायकूला म्हणावं. नवर्‍याच्या औदार्याला नेहमीप्रमाणे नाकाला मुरड घालून बायकोने नाराजी व्यक्त करावी. 'हैश्शा" असं मालकाने म्हटलं की चरकाला बांधलेल्या बैलाने चालायला सुरुवात करावी. बैलाच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज येऊ लागला की आपण डोळे बंद करुन पुढे येणार्‍या रसाची प्रतीक्षा करावी. घुंगरांचा आवाज आता थांबला आहे. किंचित डोळे किलकिले करुन पहावे. मालकांनी बारदानात गुंडाळलेला, भुश्श्यात ठेवलेला बर्फाचा ठोकळा फोडण्यासाठी काढला आहे. "धनु आता सोबत असता तर त्याने लगेच बर्फ टाकून दिला नसता" या विचारांनी नकळत हास्य फुटावं. मग ग्लास समोर येतो. ग्लास पाहिल्यावरच निम्मा थकवा पळून जातो. ग्लासावर असलेल्या फेसाप्रमाणेच आपल्या मनावर सुखाचा तवंग आता पसरणार आहे हा विचार मनात ठेवून ग्लास ओठाला लावावा.

मग "आहा!"

ये दिल नक्कीच मांगे मोअर.

आपल्या मुलांसाठी शेतातून ऊस घेऊन येणारा तुकाराम काय किंवा "ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा" वगैरे उदाहरण देणारा चोखामेळा काय, हे अगदी माझिया जातीचे वाटतात. उदाहरण देण्यासाठी चोख्याला लिंबाचाही वापर करता आला असता. पण 'लिंबू डोंगा परी सरबत नव्हे डोंगा' मध्ये ती मजा नाही. हे त्याने जाणलं.

थोडक्यात काय एका रसवंती गृहात लावलेला 'सुविचार'च खरा.
" देशबंधूनो विचार करा चहापेक्षा रस बरा"