Saturday, January 27

ब्रॉडबॅंड सेवा: एक अनुभव

ब्रॉडबॅंड घेण्याचं ठरवलं तेव्हा माझ्याकडे दोनच पर्याय उपलब्ध होते. १. टाटा इंडिकॉम २. रिलायन्स.

माझ्या सोसायटीत बीएसएनएलची टेलिफोनसेवा उपलब्ध नाही त्यामुळं त्यांची ब्रॉडबॅंड सेवा इच्छा असली तरी घेणं शक्य नाही.

टाटा इंडिकॉमवाल्यांच्या सेवेबद्दल मी एकदोन जण वगळता कुणाकडून चांगलं ऐकलं नव्हतं. (आणि रिलायन्सच्या सेवेबद्दल कुणाकडूनच चांगलं ऐकलं नव्हतं.) त्यात परत दोघांची तुलना केली तर टाटा इंडिकॉमने सेवेची प्रतिष्ठापना करण्यासाठीचे शुल्क (रू ५०० - एकदा भरल्यावर परत मिळणार नाहीत) दयाळूपणाने माफ केलं होतं.

टाटा इंडिकॉमचा फॉर्म भरून दिला. "दोन दिवसात कनेक्शन जोडून मिळेल" असं तोंडभरून आश्वासन देऊन फॉर्म भरून घेणारा प्रतिनिधी निघून गेला.

एक आठवडा झाला तरी जोडणी करुन द्यायला कोणीही आलं नाही. या काळात त्यांच्या कॉल सेंटरला आणि अर्ज भरून घेणार्‍या प्रतिनिधीला (माझ्या ऑफिसच्या सौजन्याने) अनेक फोन करुन झाले.
"तुमचा अर्ज मिळालाच नाही." पासून "आत्ता दुपारी जोडणी करण्यासाठी आम्ही निघालोच आहोत" पर्यंत सर्व उत्तरे मिळाली.

एक तर प्रतिष्ठापना करण्यासाठी पैसे न भरल्यामुळं तसं हुरहुर वाटायचं काही कारण नव्हतं. पण ब्रॉडबॅंड सेवेचा घरबसल्या अनुभव घेण्यासाठी मी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्यामुळं आपली काही तरी महत्त्वाची वस्तू आपल्याजवळ नाहीये असं विचित्र काहीतरी वाटत होतं

पुन्हा एकदोन दिवस वाट बघून रिलायन्सच्या प्रतिनिधीला फोन केला. तर साहेबांना मराठी बोलता येत नव्हतं. पण कळत होतं त्यामुळं नाना पाटेकरच्या मुलाखतीप्रमाणे मी मराठीत व तो हिंदीत असा संवाद साधावा लागला.
रिलायन्सच्या योजनाही टाटा इंडिकॉमप्रमाणेच असल्या तरी प्रतिष्ठापना करण्यासाठी गुरुजींना ५०० रुपये दक्षिणा देणे भाग होते. इथे अर्ज भरून दिला आणि सोबत ५०० रु. चा चेक जोडून दिला. पुन्हा एकदा "दोन दिवसात कनेक्शन जोडून मिळेल" असं तोंडभरून आश्वासन देऊन फॉर्म भरून घेणारा प्रतिनिधी निघून गेला.

पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन्नची उजळणी झाली. आठवडाभर काहीही प्रतिसाद नाही. प्रतिनिधी आणि कॉलसेंटर दोघांकडून खालील उत्तरे मिळाली.
१. कॉलसेंटर: तुमचा अर्ज मिळालाच नाही.
२. कॉलसेंटर: अर्ज मिळाला पण आमचा डेटाबेस डाऊन आहे. त्यामुळे तो अजून सिस्टीममध्ये आलेला नाही.
३. कॉलसेंटर: तुमची माहिती सिस्टीममध्ये आहे पण वर्क ऑर्डर निघाली नाही.
४. प्रतिनिधी: राउटर्स संपले आहेत. आज दुपारी येतील.
५. प्रतिनिधी: केबल नाहीत. नवीन फायबर ऑप्टिक केबल्स येतील. थोडं थांबलात तर तुम्हाला चांगलं स्पीड मिळेल.
६. कॉलसेंटर: शनिवार-रविवार आम्ही प्रतिष्ठापनेचे काम करत नाही. (हे लोक देखील मुहूर्त बघूनच कामं करतात!)
७. प्रतिनिधी: तुमचं काम अग्रक्रमाने घेऊन रविवारीच करून देऊ.

दरम्यानच्या काळात टाटा इंडिकॉमला मी दुसरे कनेक्शन घेत आहे वगैरे कळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन लागत नव्हता. शिवाय त्यांचाकडूनही २ आठवडे झाले तरी काहीही प्रतिसाद नाही.

एकदोन दिवसांनी रिलायन्सचे जोडणी करणारे लोक घरी येऊन वायर वगैरे लावून, "सर्वर चालू करून येतो असं सांगून परत १-२ दिवस आलेच नाहीत. शिवाय त्यांनी तोपर्यंत राउटरही आणला नव्हता.

रिलायन्सच्या प्रतिनिधीला या सर्व काळात नियमितपणे फोन करून मी "उद्यापर्यंत कनेक्शन मिळाले नाही तर मी कनेक्शन घेणार नाही. माझा चेक परत देऊन टाका" वगैरे सांगत होतो.

अर्ज भरून झाल्याच्या तब्बल १३ व्या दिवशी रविवारचा मुहूर्त पाहून प्रतिष्ठापना करणारे गुरुजी आले आणि त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना करुन ब्रॉडबॅंड सेवा चालू करून दिली.

सेवा चालू झाल्यानंतर मात्र अद्याप कोणतीही अडचण आलेली नाही. वेग उत्तम आहे. जोडणी मिळेपर्यंतचा त्रासदायक अनुभव वगळता सेवा समाधानकारक आहे.


श्री अनिल अंबानी,

तुम्ही (नटनट्यांच्या लग्नाच्या व इतर पार्ट्यांमध्ये हजेरी लावून पेज थ्री वर फोटो छापून आणण्यापेक्षा) विक्रीपूर्व सेवेकडे जरा अधिक लक्ष द्याल तर आपल्या सर्वांसाठी ते बरे होईल अशी एक कळकळीची विनंती करतो.
आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या कंपनीत पैसे गुंतवले आहेत. ह्या विश्वासाला आपण पात्र व्हावे हीच इच्छा.

एक चिंताग्रस्त गुंतवणूकदार आणि रिलायन्स ब्रॉडबॅंड सेवेचा ग्राहक

Friday, January 26

पुण्यातल्या काही पाट्या

बालगंधर्व रंगमंदिरासमोर लावलेल्या पाट्या :)





Thursday, January 25

आम्हीही आता भक्त

(चित्र पुढारी डॉट कॉम वरून घेतले आहे.)

अमिताभने सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर थोड्याच दिवसात अभिषेकचे लग्न ठरणे (आणि सगळ्या दूरदर्शनवाल्यांनी सारखी ती बातमी दाखवत राहणे) हे पाहून आमच्या आयुष्यातील एका मोठ्याच प्रश्नाचे बरेच दिवस शोधत असलेले उत्तर मिळाल्याचे आम्हाला वाटत आहे. सिद्धपुरुष आणि अधिकारी लोक (सब टीव्ही वाले अधिकारी नव्हेत) यालाच साक्षात्कार असे म्हणतात.


मुली पटविण्याचे आमचे (आणि काही वर्षांपूर्वी करिश्मा कपूरला पटविण्याचे अभिषेक बच्चनचे) असंख्य प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर अमिताभने एका आदर्श(!) पित्याप्रमाणे रीतसर लग्नाची पत्रिका जुळवणे आणि सिद्धीविनायकाचे पायी चालत जाऊन दर्शन घेणे आणि त्याचेच फळ म्हणून की काय थोड्याच दिवसात ऐश्वर्याने अभिषेकला लग्नासाठी चक्क होकार देणे यात काहीतरी संबंध नक्कीच असावा असे आमच्या मनाला राहून राहून वाटत आहे.

खरेतर देवाच्या अस्तित्वाबाबत इतके दिवस आम्ही थोडेसे संशयीच होतो. (मनाने अजूनही पुणेकर असलेली काही मंडळी रमेश देव, कपिल देव वगैरे भूतलावर असलेल्या देव-लोकांची उदाहरणे तात्काळ स्वत:च्या ब्लॉगवर फेकून आम्हाला निरुत्तर करू पाहतील. मात्र येथे आम्ही आकाशातल्या देवांबद्दल बोलत आहोत हे विनम्रपणाने त्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो.) मात्र इतके दिवस आमचा हाच पाखंडीपणा आम्हाला आयुष्यातील सर्वात मोठ्या यशापासून वंचित करत होता हे आम्हास आता कळून चुकले आहे. अमिताभने आपल्या कृतीने एक मोठेच उदाहरण आमच्या समोर ठेवले आहे.

अर्थात आम्ही मुंबईत राहत नसल्यामुळे मुंबईनिवासी सिद्धीविनायकाचे दर्शन घेणे आम्हाला तूर्तास शक्य नाही. त्यामुळे चिंचवडनिवासी मोरया गोसावी मंदिराच्या फेर्‍या गेले काही दिवस आम्ही करत आहोत. मात्र कालच मंदिराच्या कमानीसमोरील भेळवाल्याकडे भेळ खात असताना त्याने त्याच्या व्यवसायबंधूला "आजकाल मंदिरात कसलेही लोक येतात" असा त्याच्या भेळेप्रमाणेच कुजकट शेरा मारल्यामुळे, आम्ही आता त्याच्यासमोरच असलेल्या रसवाल्याकडे उसाचा रस पिणार आहोत. शिवाय रसवाल्याने "देशबंधूंनो देशाचा विचार करा, चहापेक्षा रस बरा!" वगैरे फलक लावल्यामुळे इतके दिवस न झालेली देशाचीही थोडीशी सेवा (आणि थोडासा विचार) आता आमच्याकडून होईल असे वाटते.

अमिताभ गुरुवायूर येथील मंदिराला एक सोन्याचा हत्तीदेखील भेट देणार आहे हे वाचून आता काय करावे हे नक्की न समजल्यामुळे मात्र आम्ही थोडे हबकलो होतो. मात्र येथे एक तांत्रिक पळवाट आम्हाला सुचली आहे. आमचा प्रिय मित्र सोन्या यास मोरया मंदिरासमोरीलच एका खेळण्याच्या दुकानातून एक प्लॅस्टिकचा हत्ती आम्ही विकत घेण्यास सांगितले आहे. हा 'सोन्याचा हत्ती' आम्हीही कुठेतरी लवकरच अर्पण करू व अमिताभच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करू.

हे सर्व करण्याची आकाशातला देव आम्हाला शक्ती देवो हीच त्याच्याचरणी प्रार्थना.

आमेन!


Wednesday, January 17

चला रोहिड्याला


रोहिडा किल्यावरील या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी रविवार दि. २१/०१/२००७ रोजी एक मोहिम आयोजित केली आहे.
विस्तृत निवेदन येथे वाचता येईल.

गुरुबद्दल आणखी थोडंसं...

प्रिय कौस्तुभ,


आम्ही (देखील इतरांप्रमाणेच) तुमच्या ष्टाईलवर फिदा आहोत.

आम्हाला गुरू हास्यास्पद वाटला व तुम्हाला आमचे परीक्षण हास्यास्पद वाटले हा आम्हाला एक दुर्मिळ योगायोगच वाटतो. (यामुळे आमचा लेखही गुरुच्याच दर्जाचा आहे की काय असे क्षणभर वाटून गेले.)


असो... धीरूभाई म्हणजे गुरुभाई नव्हेत असं आम्ही म्हणत नसून स्वत: मणीरत्नम साहेबच म्हणत आहेत.


धीरुभाईंचं आयुष्य हास्यास्पद आहे हा दावा आम्ही केलाच नव्हता. ते आयुष्य आमच्यासकट सगळ्यांना स्फुरणदायीच आहे. आमचा दावा केवळ चित्रपटाबद्दल आहे.


तुकड्या तुकड्यामध्ये चित्रपट अर्थातच चांगला आहे. पण असा छोट्या छोट्या भागात चित्रपटाचा आनंद लुटायला मणीचा सिनेमा काही 'आभाळमाया' नाही. चित्रपटाचा टोटल इफेक्ट (जो त्याच्या आधीच्या सिनेमांत जाणवत होता) तो आम्हाला जाणवत नाही.


आम्ही आमच्या आधीच्या लेखात उल्लेख करावयास विसरलो पण चित्रपटात अतिशय खटकलेले दोन प्रसंग येथे लिहित आहोत. ही संधी आम्हाला पुन्हा मिळवून दिल्याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत.


१. भारतातल्या सर्वात मोठ्या कंपनीचा मालक आपल्या दोन मुलींचा जन्म झाल्यावर ज्या पद्धतीने भांग वगैरे पिऊन नृत्य करतो हा प्रसंग तर मोठाच रसभंग करणारा आहे. येथे भांग पिण्यावर आमचा आक्षेप नाही हे देखील स्पष्ट करतो. (किंबहुना आम्ही आमचा हा लेख भांग पिऊनच लिहित आहोत अशी शंका तू पुढील एखाद्या पत्रात व्यक्त केली तर त्याचे निराकरण मात्र आम्ही करणार नाही!)
मणीने इथं थोडं तारतम्य बाळगायला पाहिजे होतं. असं राहून राहून वाटून जातं.


२. चित्रपटाचा शेवट मोठा धक्कादायक आहे. भ्रष्ट मार्गाचा वापर करून आपला व्यापार वाढवण्याच्या प्रयत्नांचे गांधीजींशी तुलना करून समर्थन करण्याचा गुरुभाईचा प्रयत्न अजिबातच पटला नाही. येथे मणीभाई काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ह्याचा आम्ही अद्याप विचार करत आहोत. डेरिंगबाज गुरुभाईने आपले पाप शेअरहोल्डरच्या माथी मारण्याचा केलेला प्रयत्नही आम्हाला पटला नाही. (कोर्टरूमच्या बाहेर एका शेअरहोल्डरने गुरुभाईला दिलेला आधार पाहून नायकनमधील कोर्टाच्या बाहेर असलेला असाच एक प्रसंग लगेच आठवून गेला आणि आमची वेदना अधिकच बळावली.)

थोडक्यात मणीच्याच नायकनमधील वेलुभाईचं कॅरॅक्टर जितकं तुम्हाला पटतं तितका गुरुभाई भिडत नाही असं आमचं म्हणणं आहे.

३. रहमानने अतिशय सुंदर संगीत दिलेली गाणी चित्रपटात बर्‍याच ठिकाणी अयोग्यरीत्या घुसडलेली पाहून "हेचि फळ काय मम तपाला" म्हणत (चित्रपटात वारंवार पडणार्‍या पावसाप्रमाणेच) रहमानही अश्रूंची बरसात करत असेल असे आम्हाला वाटत आहे.

मणीरत्नमने हिंदीत नायकन, रोजा, बॉम्बे वगैरे बनवून ज्या अपेक्षा निर्माण केल्या होत्या त्या दुर्देवाने दिल-से आणि युवा कडून पूर्ण झाल्या नाहीत. निदान गुरूकडून तरी असे होऊ नये असंही वाटत होतं.


शूर मर्दाचा पोवाडा मर्दानेच गावा असं म्हटलं जातं ते काय उगीच. त्यामुळेच मणीरत्नमच्या चित्रपटाची तुलना आम्ही करण जोहर वगैरे बाजारू पिक्चरवाल्यांशी न करता मणीच्याच आधीच्या सिनेमांचा निकष लावण्याचा प्रयत्न केला आहे.

मणीरत्नमबद्दल आम्हाला अतीव आदर आहे. या आदरापोटीच मणीरत्नमचा करण जोहर किंवा आदित्य चोप्रा बनू नये असे आम्हाला पोटतिडकीने वाटते.

चित्रपटाचा आनंद हा आम्ही जेवणाप्रमाणेच लुटतो. मात्र अतिशय भरवशाच्या सुगरणीने होळीच्या सणाचे जेवण करताना कटाच्या आमटीत (चुकून) मिठाचे दोन खडे जास्त टाकल्यामुळे आमटीची चव लागू नये अशी आमची परिस्थिती झाली आहे. मात्र इतरांप्रमाणे ताटात वाढलेली पुरणपोळी, भजी वगैरे पदार्थ चवदार आहेत म्हणून जेवणही चांगलं आहे अशी गुळमुळीत प्रतिक्रिया आम्ही व्यक्त केलेली नाही.

आम्हाला चित्रपटांबद्दल काहीही कळत नाही हे इतरांप्रमाणेच आमचंही मत आहे. पण आमच्या नजरेला जे योग्य दिसलं नाही ते आम्ही इथं लिहिलं. मणी साहेब या वेळेला "गल्ली चुकले" आहेत. हे आमचं मत ठाम आहे.

असो,
स्नेह आहेच. तो वृद्धींगत व्हावा हीच अपेक्षा.

-योगेश

पुण्यातील एक पाटी




लुक ऍट धिस बोर्ड... सो रबिश... कल बोलेंगे फ्रान्स में फ्रेंच, जर्मनी में जर्मन और अमरिका में इंग्लिश कंपल्सरी है।
थॅंक गॉड... धिस महाराष्ट्रा गवर्नमेंट इस विथ अस... और कॉमन महाराष्ट्रियन आदमी भी मराठी से ज्यादा हिंदी मे बात करना पसंद करता है। ऐसे बोर्ड लगाने वालोंको तो वो दिवाकर रावते की तरह जेल भेज देना चाहिये। Bloody Chauvinists

Tuesday, January 16

YouTube वर बंदी?

गांधीजींचे विडंबन करणारी चित्रफीत सादर केल्याबद्दल दयाळू भारत सरकार YouTube वर बंदी आणण्याचा विचार करत आहे हे वाचून राजाच्या नाकावर बसलेल्या माशीला उडवण्यासाठी तलवारीचा वापर करून राजाचे नाकच उडवून टाकणार्‍य़ा माकडाची गोष्ट आठवली.
मात्र आपल्या राजकारण्यांची माकडांशी तुलना करणे हा माकडांचा अपमान आहे.
व्यंकटेश माडगूळकरांचं "सत्तांतर" वाचल्यावर माकडं देखील किती प्रगल्भ राजकारण करतात हे कळून येतं.

गुरू... मणी असं नको रे करू...


(चित्र: रेडिफ डॉट कॉम वरून घेतले आहे.)


रविवारी 'गुरू' बघितला.
'गुरू' प्रदर्शित झाला की एक मोठीच चित्रपटक्रांतीच होणार आहे अशा अविर्भावात मुलाखती देणारे अभिषेक, ऐश्वर्या, मणीरत्नम आणि मल्लिका शेरावत गेले बरेच दिवस बहुतेक चॅनेल्सवर दिसत होते. थोरल्या बच्चनसाहेबांनी तर सिद्धीविनायकाचे दर्शनही घेतले होते.

मणीरत्नमचे आधी हिंदीत झालेले चित्रपटही (दिलसे मधील शाहरुख आणि बॉंम्बे, रोजा मधील अरविंद स्वामी) वगळता चांगले होते. हिंदीतला नायकन (डबिंग वाईट असूनही) जबरदस्त. त्यामुळं ह्या चित्रपटाकडून खूपच अपेक्षा होत्या.

पण हा चित्रपट (मणीरत्नमच्या मानाने) तितकासा चांगला नाही. (रहमानचं संगीत, राजीव मेननची फोटोग्राफी आणि अभिषेक-मिथुनदा सोडले तर चित्रपटात फारसं काही नाही.)

रंकाचा राव कसा झाला अशा धर्तीची कथा तुम्ही बर्‍याच ठिकाणी पाहिली आणि वाचली असेल. गुजरातच्या 'इधर' नावच्या गावात जन्म झालेला गुरुकांत देसाई हा शाळा-हेडमास्तरांचा मुलगा. शिक्षणात प्रगती दिसत नाही म्हणून परदेशात जाऊन नोकरी करतो. तिकडं तो मल्लिका शेरावत बरोबरचं नृत्य वगळता असं दुसरं काही तरी करतो की त्याला तीन वर्षातच पदोन्नती वगैरे मिळते. पण तो नक्की काय करतो हे आपल्याला कळतच नाही. पण इथं पदोन्नती मिळाल्यावर गुरूला अचानक साक्षात्कार होतो की आपण दुसर्‍यासाठी जर आपण इतकं चांगलं काम करू शकतो तर स्वत:साठी का नाही.

तो भारतात परत यायला निघतो. दृष्य बदल... सुजाता (ऐश्वर्या राय) पावसात नाचत आहे. (इथं थिएटरमधले लोक इतक्या शिट्ट्या वाजवतात की गाणं पूर्ण ऐकायलाच येत नाही.) नंतर गाणं वगैरे संपल्यावर ती (डोकं बिकं पुसून) घरी वडिलांना "तुम्ही माझ्या लग्नाची काळजी करू नका" वगैरे पत्र लिहिते. (सुजाता पावसात भिजली असली तरी डोकेदुखीचा त्रास व्हायला आपल्याला इथं सुरुवात होते)

नंतर गुरू आणि सुजाताची चित्रपट स्टाईलमध्ये भेट. ती गुरूच्या मित्राचीच जिग्नेशची बहीण असते! गुरुला आपला 'बिजीनेस' सुरू करायला पैशाची गरज असते. 'आपल्या बहिणीबरोबर जो लग्न करील त्याला वडील अमुकतमुक हुंडा देणार आहे' हे जिग्नेशकडून ऐकल्यावर गुरू लगेच लग्नाची मागणी बिगणी घालून हुंडा पदरात पाडून घेतो आणि मुंबईला जायला निघतो. रेल्वे स्टेशनवरचा गुरु आणि सुजातामधला संवाद विलक्षण संतापजनक आहे. 'तुमने मुझे एकही बार क्यूं पूछा... दूसरी बार पूछ नही सकते थे क्या' वगैरे प्रेमसंवाद(!) ऐकताना डोकेदुखी अधिकच बळावते.

आता गुरू मुंबईत. मुंबईच्या कपडा बाजारात त्याला व्यवसाय करायचा आहे. त्यात त्याला अनेक अडथळे येतात पण गुरू डेरिंगबाज असल्यामुळं सगळीकडून सहीसलामत निसटतो. आणि मोठ्ठा 'बिजीनेसमॅन' बनतो. गुरूचा हा प्रवास मणीरत्नमने अगदी हास्यास्पद दाखवला आहे. ह्या प्रवासात त्याला मदत करणारे नानाजी गुप्ता (मिथुनदा) यांना तो अगदी तीर्थरुपांप्रमाणे मानायला लागतो.

एकदा मोठा व्यावसायिक झाल्यावर आपल्या हितशत्रूंना नमवण्यासाठी गुरू वृत्तपत्रे वगैरे माध्यमांचा वापर करतो. नानाजींच्या वृत्तपत्राचाही यात वापर होतो. इथं नानाजींना अचानक कळतं की गुरू जे काही करतोय ते योग्य नाहीये वगैरे. (इतके दिवस नानाजी झोपले होते) मग नानाजी आपला शिष्यसदॄश असलेल्या श्याम सक्सेना (माधवन) ला आता तू गुरूला जरा सरळ कर असं सांगतात. मग गुरूचा फंडू डायलॉग "ना आप मुझे रोक सकते है, ना ये श्याम सक्सेना, ना ये आपका अखबार"

इंटरव्हल...

हुश्श... अर्धाच चित्रपट संपला आहे.

पुढचा भाग सुरू
गुरू आणि श्याम-नानाजी यांची (पेपरातून) मारामारी. ह्या वेळेपर्यंत गुरूची कंपनी शक्ती पॉलिस्टर्स ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी झाली आहे. पण शेअरहोल्डर्सची मीटींग मात्र पावसात. जसं काही मुंबईतले सगळे मंडपवाले संपावर गेले आहेत. सगळे शेअरहोल्डर पावसात छत्र्या घेऊन गुरूला शिव्या देत आहेत. गुरू पण एका छत्रीखाली उभा. (अरे रामदेव बाबांसारखा सिद्धयोगी महापुरुषपण पावसात योगशिबीर घेण्याचं धाडस करत नाही. गुरू तर 'किस झाड की पत्ती'. पण गुरू हा सगळ्यात डेरिंगबाज माणूस आहे त्याला सर्व शक्य आहे.)

श्यामने पेपरातून गुरूच्या कंपनीची वाट लावली आहे. शक्ती पॉलिस्टरच्या एका यूनिटला श्याम भेट देतो. तिथला त्याचा आणि घनश्यामभाई (मनोज जोशी) चा सीन पाहून तर हसून हसून पोट दुखतं. पुढे घनश्यामभाई आत्महत्येचा प्रयत्न करतो. शेअरहोल्डरनी घातलेल्या शिव्या आणि घनश्यामभाईचं नाटक पाहून गुरुला अर्धांगवायूचा झटका येतो. गुरू हॉस्पीटलमध्ये.

एव्हाना गुरूवर कायदेशीर खटला वगैरे भरण्यात येतो. त्याला न्यायालयाचे समन्स बजावायला येणारी मंडळी हॉस्पीटलमध्ये बेडवर अगदी सलाईन, ऑक्सीजन मास्क वगैरे लावलेल्या गुरूकडून समन्स मिळाल्याची पोचपावती घेतात. २ महिन्यानंतर तारीख असते.

खटला: खटला चालवणार्‍या टीमचे क्याप्टन इंग्लिशमधून कामकाज सुरू करतात. इथं किशोरवयापासून तारूण्यापर्यंत इस्तंबूलमध्ये आयुष्य गेलेला गुरू आणि आपले मुंबईला येईपर्यंतचे सगळे आयुष्य गुजरातेतल्या एका खेड्यात घालवेली सुजाता जी शक्य तेवढा वेळ गुजराती शब्द वापरूनच चित्रपटात बोलत असते, यांचा हिंदी-अभिमान अगदी उफाळून येतो. "आम्ही गावाकडचे 'देहाती' लोक असल्यामुळे आम्हाला विंग्रजी येत नाही... हिंदीमे बोलो..." वगैरे टीम क्याप्टनला सुनावण्यात येते. (गुरू इस्तंबूलमध्ये हिंदीत बोलत होता काय? आणि उठसूट सगळीकडे हिंदीचा आग्रह धरायला गुरु काय मर्‍हाटी माणूस आहे का?)
by the way हा चित्रपट हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलुगू मध्ये पण प्रदर्शित झाला आहे किंवा होणार आहे. त्यातही हा डायलॉग ऍडॉप्ट करून तमिळमध्ये/तेलुगूमध्ये कामकाज चालू द्या असं करणार काहो मणी भाई? का तिथेही एक गुजराती व्यावसायिक, तमिळ/तेलुगू चित्रपटात, हिंदीमे बोलो म्हणणार...
ह्या खटल्याच्या वेळेस सुजाताच्या उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला असता सुजाता अचानक स्वत: ५०% शेअरहोल्डर असल्याचं जाहीर करते. बहुतेक टीमच्या क्याप्टननी आपला गृहपाठ व्यवस्थित केला नसावा.
चित्रपटाच्या शेवटी एखाद्या राजकारण्याला शोभेल असा गुरुभाईचा मोठा डायलॉग आहे. आणि (एकदाचा) चित्रपट संपतो.


चित्रपट पहिल्या भागात अतिशय विस्कळीत तर दुसर्‍य़ा भागात अतार्किक आहे. चित्रपटाची कथा या आधी बर्‍याच ठिकाणी रिपीट झाली आहे. त्यात काही नाविन्य नाही. उगाचच गुरूभाई म्हणजे धीरूभाई वगैरे कंड्या पिकवून प्रेक्षकांची संख्या वाढवून घेण्याचा प्रयत्न आधी करण्यात आला आहे.
अभिषेकने चांगला अभिनय केला असला तरी चित्रपटात बर्‍याच वेळा अमिताभच असल्याचा भास व्हावा इतकी अमिताभची स्टाईल अभिषेक मारतो. ऐश्वर्याबद्दल नो कमॆंट. पण चित्रपटात अगदी उल्लेखनीय म्हणावं असं काम मिथुनदा आणि खटला चालवणार्‍या टीमचे क्याप्टन-व्हाईस क्याप्टन यांनी केलं आहे.
रहमानचं संगीतही छानच पण गाणी बर्‍याच ठिकाणी घुसडलेली वाटावीत इतक्या अयोग्य ठिकाणी आहेत.

एकूण हा चित्रपट म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोणगा!

Monday, January 15

कित्ती कित्ती नंबर?

येणार येणार म्हणून इतके दिवस सेबी आणि ऍम्फी ढोल पिटत असलेला एम-आय-एन (मिन) हा नंबर शेवटी १ जानेवारी २००७ पासून लागू झाला. नवा गडी नवं राज्य प्रमाणे नवे वर्ष नवा नंबर असं काहीसं सूत्र असावं. पण या नंबरची गरज काय हे मात्र अजूनपर्यंत मला कळलेलं नाही. हा नंबर मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं आणि इन्कमटॅक्स खात्याचा पॅन क्रमांक मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं साधारण सारखीच आहेत. मग पॅन क्रमांकाचाच वापर सगळीकडे का करत नाहीत? मिनबाबत अधिक चौकशी केली तेव्हा यूटीआय म्युच्युअल फंड वगळता इतर ए-एम-सी मध्ये मिन हा नंबर वैध धरला जाणार आहे. मात्र यूटीआय च्या गिर्‍हाईकांनी यूटीआयकडून अजून वेगळा एक नंबर घ्यायचा आहे ही देखील माहिती मिळाली. म्हणजे यूटीआय आणि आणखी दुसरा म्युच्युअल फंड बाळगणार्‍या गिर्‍हाईकांनी पॅन बरोबरच मिन आणि यूटीआय केवायसी नंबर घेणे आवश्यक आहे.

भारतीय स्टेट बॅंकेत मागच्या आठवड्यात एकदा काही कामासाठी गेलो होतो तेव्हा तिथल्या कर्मचार्‍यांची कार्यक्षमता(!) आणि कामाविषयीची निष्ठा(!) पाहून चकितच झालो. एक माणूस बॅंकेत खाते उघडण्याबाबत एका काउंटरवर चौकशी करत होता. काउंटरपलीकडच्या माणसाने त्याच्याकडे बराच वेळ दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला पण गिर्‍हाईक काही मागे हटले नाही. मग बॅंकवाल्याने त्याला त्याचा पत्ता वगैरे विचारून "तुमच्या घराजवळ एचडीएफसी बॅंक आहे ना. मग तिकडेच खाते का उघडत नाही. एवढ्या लांब कशाला येता. आमच्यापेक्षा त्यांची सर्व्हिसपण चांगली आहे" वगैरे समजावून सांगितलं होतं.


आपलं नशीब चांगलं की मिन नंबर मिळवण्यासाठी कुठल्या सरकारी खात्याशी किंवा असल्या सरकारी बॅंकेशी संपर्क करावा लागणार नाही. कार्वी, एचडीएफसी वगैरे लोकांकडूनही हा नंबर मिळेल.

ह्या नंबरसाठी नुकताच मी एचडीएफसी कडे मी अर्ज दिला तेव्हा तर फारच चांगला अनुभव आला. अर्ज भरून द्यायच्या वेळी चक्क काचेच्या (स्वच्छ) ग्लासात थंडगार पाणी!! अर्ज भरून देणार्‍या माणसाने मी मराठीत प्रश्न विचारल्यावर चक्क म-रा-ठी-त उत्तरे दिली. आणि अर्ज भरून दिल्यावर त्याची एक (फुकट!)झेरॉक्स प्रत काढून माझ्या संदर्भासाठी आणून दिली.

यात खटकावं अशी एकच गोष्ट म्हणजे एचडीएफसी वाल्यांना तुमचा फोटो हा पांढर्‍या पार्श्वभूमीवर काढलेला हवा आहे. जर तुमच्याकडे निळ्या, लाल पार्श्वभूमीवर काढलेले किंवा तुम्ही जास्त रसिक असाल तर हिमालय, चंद्रकोर, ताजमहाल वगैरे मागे ठेवून काढलेले फोटो चालणार नाहीत.

कार्वी, आयसीआयसीआय वगैरे लोकांकडे अर्ज भरून देणार्‍या लोकांचेही अनुभव असेच चांगलेच असतील.

बघू आता येणार्‍या नवीन वर्षात अजून किती नंबर घ्यायला लागतात ते!