नंदन ने टॅग केल्याबद्दल मंडळ त्याचे आभारी आहे!
प्रवीण टोकेकर हे माझे आवडते स्तंभलेखक. काही वर्षापूर्वी 'सकाळ' मधील 'ढिंग टांग' सदरात ब्रिटीश नंदी या नावाने त्यांनी धमाल उडवून दिली होती. त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह 'ढिंग टांग' याच नावाने 'सकाळ पेपर्स' तर्फे प्रकाशित झाला आहे.
अतिशय अचूक शब्दयोजना आणि मराठीच्या बोलींचा दांडगा अभ्यास हे टोकेकरांचं वैशिष्ट्य. एकाच वेळी आपल्याला हसवून अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य असलेले त्यांचे लेख अजूनही ताजे वाटतात याचं कारण कमी शब्दात अत्यंत चपखलपणे लिहिण्याची त्यांची जबरदस्त हातोटी.
उदाहरणार्थ खालील लेख पहा:
प्रीय आबाशेट यानला, 'सोनिया' डॅन्स बार ऍंड रेस्टारण्ट वतीने आखिरचा सलाम! तुमच्या नावाने बोटे मोडन्यापेक्षा डायरेक तुमाला लेटर लिवून मन की भडास काढून टाकने सही ठरेल, असे माज्या दिलात आले. म्हनून हे लेटर लिवते आहे!
आमच्या बारमधे मी येकलीच आटवी पास आहे. गल्ल्यावरचा शीतारामशेट सगळी आकडेमोड डोक्यात तुळूत करायचा! हाफ्ते पन तुळूमध्येच देयाचा! हितल्या पोलिटेशनमदल्या फौजदारापासून कानस्टेबलपरेंत सर्व्यांना तुळू भाशा येते. (पलीकडच्या चौकापासून हितल्या येमजी रोडपरेंत मोजून चौदा डॅन्स बार आहेत! म्हंजे होते!!) पन मी मराठी आहे!!
मी रिटनमदे हिते तुमाला सांगते, की तुमचे काई बरे होनार नाही. लौकरच तुमची खुर्ची जाईल आनि नारायनदादा राने होम मिनिष्टर होतील! तुमच्या पोलिटिकलची शिवशेणा होईल!! येवड्या तरन्याताठ्या बायामान्सांचा आनि गब्बरगुंड्या शेटलोकांचा तळतळाट कुठे तरी लांगलच! तुमच्या गुनाने आमी देशोधडीला लागलो!
आबाशेट, तुमी होम मिनिष्टरझाले, तेव्हा आमच्या बारमधे माझा भाव सॉलिड वाढला होता. 'होम मिनिष्टर अपने अरिया का आदमी है' असे मी डिक्लेर केल्याणे शीतारामशेट पन आपल्याशी इज्जतमधे बोलायचा. पन तुमी शेट्टीलोकांशी पंगा घेतला आनि आमचा लोच्या झाला! आता तर तुमी कायदाच करून टाकला!!
हे म्हंजे मोरी तुंबते हे कळल्यावर शिमिट मारून कम्प्लीट मोरीच बाद करण्यासारखे झाले! इंचभर लांबीने होते, त्याच्यासाठी शिमिट कशाला हवे? जाऊ दे! गया सो गया! पंध्रा ऑगस्टपासून तुमी डॅन्स बार बंद करनार! ज्या दिवशी तुमी शिक्षामाफी करून जेलमधून कैदी सोडता, त्या दिवशी आमी उघड्यावर येनार! सौतंत्र्यदिनालाच आमची कल्हई! हा काय न्याव झाला का?
गेल्याच साली मी 'मारुती' घेटली. पंध्रा ऑगस्टपासून इन्कम बंद. माझ्या एका फ्रेण्डनी (आपल्याकडेच असते! तिचा 'धूम मचाले' डॅन्स फेमस आहे.) तीन साल पहिले टाटा सफारी घेतली होती. आता रोजीरोटीसाठी चार घरी धुणी-भांडी करायची म्हटली, तर टाटा सफारी (आणि डायवर) कसा परवडनार? आबाशेट आमचे पुनर्वेशन कर, पन आमची आमदनी सांबाळून! तुमच्या मंत्रालयात पगाराची तारीख पुढे गेली तरी राडा होतो. आमच्या लुकसानीची कोनाला पडली आहे?
बाकीच्यांचे जाऊ दे. मी आपल्य एरियात न्हानाची मोठी झालेली आहे. माझ्या पुनर्वेशनाचे रिजर्वेशन करा, येवडी माझी विनंती आहे!
तुमच्या हॉपीसमदे रिशेप्शनिष्टची जागा आहे का?
कळावे आपली अपनी सुमन ऊर्फ नीलम ऊर्फ काजल
(तीन्ही नावे आपलीच)
मी खालील लोकांना खो देतोय. :)
कौस्तुभ
अभिजित
प्रिया
अजित
मंजिरी
Thursday, October 4
आवडलेलं काहीतरी
Labels:
ढिंग टांग,
प्रवीण टोकेकर,
भाषा
