अनुवादित साहित्याला मराठीत मानाची खुर्ची कधी मिळत नाही ही नेहमीची रड आहे. जीए कुलकर्णी, शांता शेळके, वीणा गवाणकर, दुर्गा भागवत वगळता दर्जेदार मराठी अनुवाद माझ्या फारसे पाहण्यात आलेले नाहीत.
काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रदर्शनात जीएंचे "रानातील प्रकाश" हे छोटेसे पुस्तक हाती लागले आणि वाचायला सुरुवात केल्यावर पुस्तक संपल्यानंतरच भानावर आलो. बर्याच दिवसांनी असे झाले होते. "रानातील प्रकाश" हा Conrad Richter या लेखकाच्या "The Light in The Forest" या पुस्तकाचा अनुवाद.
Conrad Richter हा जीएंचा अतिशय आवडता लेखक. "माझ्या एखाद्या पुस्तकाचे परीक्षण छापून आले की, मी Richter चा अनुवाद केला आहे, ही गोष्ट कुणी नमूद करतो की काय हे उत्सुकतेने पाहत असे" असे म्हणण्याइतपत त्यांना तो आवडत असे. जवळचा वाटत असे. USIS च्या एका प्रकल्पांतर्गत या लेखकाची जीएंनी रान-गाव-शिवार ही कादंबरी मालिका, आणि "स्वातंत्र्य आले घरा", "रानातील प्रकाश" या स्वतंत्र कादंबर्या अशी पाच अस्सल खानदानी पुस्तके अनुवादित केली.
दोन संस्कृतींमधील संघर्ष हा चिरंतन चाललेला प्रकार आहे. एखादा नवा देश - नवा समाज कसा निर्माण होतो. झुंडींनी येणारे लोक तेथील मूळ रहिवाशांना मागे ढकलत, त्यांना नामशेष करत स्वत:ची नवी संस्कृती कशी निर्माण करतात असा या कथेचा गाभा असला तरी कहाणी आहे ती "ट्रू सन" नावाच्या जन्माने युरोपियन-अमेरिकन तरूणाची.
ट्रू सन ४ वर्षांचा असताना डेलावर इंडियन जमातीच्या लोकांच्या ताब्यात सापडतो. इंडियन लोक त्याला त्यांच्या पद्धतीप्रमाणे वाढवतात. त्याच्या मनावर पूर्णपणे इंडियन संस्कार होतात. १० वर्षांनंतर इंडियन आणि अमेरिकन लोकांमधील संघर्षविरामातील करारानुसार त्याला त्याच्या मनाविरुद्ध जन्मदात्या युरोपियन पालकांकडे पाठवले जाते. दु:खी ट्रू सन या नव्या जगातील आयुष्याचा मनापासून तिरस्कार करतो. संधी साधून तो पुन्हा आपल्या इंडियन पालकांकडे परत येतो. इंडियन लोकांना मागे हटवताना त्यांच्या लहान मुलांचे अमानुष बळी घेणार्या अमेरिकनांचा तिरस्कार करणार्या ट्रू सनला इंडियन लोकांकडेही गोर्या मुलांची कातडी सापडते. मात्र पुढे त्याला एका जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. त्याचा इंडियन ते अमेरिकन आणि नंतर पुढे होणारा प्रवास हा जीएंनी त्यांच्या अनोख्या भाषाशैलीने मराठीत अक्षरश: जिवंत केला आहे.
ही कादंबरी वाचल्यावर मी पूर्णपणे हलून गेलो. साम्राज्यवादी मानसिकतेचा इंडियन प्रदेशावर अन्यायाने झालेला कब्जा. दोन संस्कृतींमधील संघर्षामध्ये नेहमीच अंतर्भूत असलेली हिंसा आणि लहानपणापासून एका संस्कृतीत-एका संस्कारात वाढलेल्या मुलाला पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीत पाठवल्यानंतर निर्माण होणारी गुंतागुंत या कादंबरीत अतिशय प्रभावीपणे व्यक्त झाली आहे.
अनुवाद वाचल्यानंतर मूळ इंग्रजी कादंबरी वाचण्याची इच्छाही लगेचच पूर्ण झाली. मूळ कादंबरीची भाषाशैली आणि अनुवादाची तुलना केली तर जीएंनी स्वत:च्या भाषाशैलीने या अनुवादात थोडे आक्रमण केले आहे असे थोडे वाटून गेले.
ऊर्जा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची किंमत ९० रुपये आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रकाशक श्रीनिवास पंडित यांनी Conrad Richter ची जीएंनी अनुवादित केलेली इतर पुस्तकेही प्रकाशित करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. :) त्यांच्याशी मागच्याच आठवड्यात फोनवर बोलणे झाले तेव्हा खूप वर्षांपूर्वी वाचलेली - अतिशय वेगळा विनोद असलेली "सोन्याचे मडके" (The Crock of Gold) ही जीएंची अनुवादित कादंबरी ब्लू बर्ड प्रकाशन प्रकाशित करण्याचा विचार करत आहे हे कळले.
खरंच ही सगळी पुस्तके वाचायला मिळाली तर काय मजा येईल.
अवांतर: The Light In The Forest ही कादंबरी येथे वाचता येईल.
