Saturday, September 15

लाल सिग्नल

निकोल किडमन
रक्तवर्णी असणारे केस तेजस्वी दिसत असले तरी या केसांचे भविष्य निश्चितच उज्वल नाही. नॅशनल जिओग्राफिक मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार खरेखुरे लाल केस असणार्‍या निकोलसारख्या व्यक्ती इ.स. २१०० पर्यंत नामशेष होतील.

याचं मुख्य कारण म्हणजे केसांच्या लाल रंगाच्या निर्मितीस कारणीभूत असलेली गुणसूत्रे ही दोन्ही पालकांकडून - आई व वडील - मुलांमध्ये येणे आवश्यक असते. परंतु अशा "शुद्ध" लग्नांचा आग्रह धरणे सध्या शक्य नसल्यामुळे ही गुणसूत्रे पुढील पिढीमध्ये संक्रमित जरी झाली तरी ती निद्रावस्थेतच राहतात व केसांच्या रंगावर त्याचा फारसा फरक पडत नाही.

हजारो वर्षांपूर्वी जेव्हा केसांना तपकिरी रंग देणार्‍या गुणसूत्रांच्या भेसळीतून ही लाल रंगासाठीची गुणसूत्रे तयार झाली तेव्हा मानवाला त्याचा फायदाच झाला होता. या गुणसूत्रांमुळे सूर्यकिरणांपासून व्हिटॅमिन डी बनविण्याची त्या व्यक्तीच्या शरीराची क्षमता वाढली.

मात्र हे गुणसूत्र शरीरात असलेल्या व्यक्तींना त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय उष्णता-थंडी अशा हवामानातल्या बदलांचा अशा व्यक्तींच्या त्वचेवर लगेच परिणाम दिसून येतो.

जगातील सुमारे ४ टक्के लोकांमध्ये ही गुणसूत्रे आढळली आहेत. अर्थात त्यापैकी अर्ध्या लोकांच्या शरीरात ही गुणसूत्रे निद्रावस्थेत नसतात. खरेखुरे लाल केस असणारे लोक फारच थोडे आहेत. त्यामुळे लाल रंगाच्या केसांच्या आकर्षणापोटी अमेरिकेत मागच्या वर्षी १२.३ कोटी डॉलर्स खर्च झाले ही बातमी फारशी आश्चर्यकारक वाटत नाही.