नाणेघाटाला जाऊन आल्यानंतर पुढच्याच आठवड्यात लगेच एका गटासोबत माळशेजला निसर्गपर्यटनासाठी जाण्याची संधी मिळाली.
नाणेघाटाच्या वेळेस माळशेजचा प्रवास रात्री केला होता. त्यात खूप धुकंही होतं. त्यामुळं माळशेज फारसा दिसला नाही.
त्यामुळं गेलो.
कदाचित खंडाळा घाटाच्याही आधीचा, देशावरच्या लोकांना कोकणात उतरण्यासाठी असलेला हा खूप जुना घाट. पेपरात दरडी कोसळून रस्ता बंद या बातमीमुळे माहिती होणारा.
पुणे-नाशिक रस्त्यावर आळेफाट्यानंतर डावीकडे वळालो तेव्हाच माळशेजची चाहूल लागली होती. आजूबाजूला सगळं हिरवंगार होतं. डोंगरावर दिसणारं धुकं, रस्त्याच्या कडेला साचलेलं पाणी, डोक्यावर इरलं घेऊन लगबगीनं चालणारे लोक, हवेतला सुखद, ओलसर गारवा. मस्त वाटत होतं. खूप दिवसांनी माळशेज दिवसाढवळ्या बघण्याची संधी मिळत होती. लहान असताना कल्याण-ठाणे-मुंबईला ह्याच घाटाने जायचो. टोकावड्याचे बटाटवडे, खारे शेंगदाणे, करवंदं, जांभळं सगळं आठवून गेलं.
प्रत्यक्ष घाट सुरु झाला आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाजवळ आलो तेव्हा मात्र भ्रमनिरास झाला. पुढे बर्याच गाड्या दिसत होत्या. घाटात पर्यटकांची बरीच गर्दी असावी. गटामधले नवीन सदस्य लांब दिसणारे धबधबे, रस्त्यावरचं धुकं बघून उत्तेजित झाले होते. आता इथूनच चालायला सुरुवात करावी या हेतूने सगळेजण खाली उतरले. चालायला सुरुवात केली तेव्हा आजूबाजूला लक्ष गेलं. रस्त्याच्या बाजूला, लहान ओहोळांमध्ये दारुच्या, बिसलेरीच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कुरकुरे, लेज यांचे रॅपर्स पर्यटकांनी मुक्तहस्ताने निसर्गाला भेट दिले होते. निसर्ग आणि दारुडे या पोस्टमध्ये हरेकृष्णाजींनी सांगितल्याप्रमाणे माळशेजमध्येही दारुड्यांचा प्रचंड उपद्रव आहे. कदाचित मुंबई-नाशिक पासून येणेजाणे सोपे असल्यामुळे ताम्हिणी, वरंधा घाटापेक्षा खूपच जास्त.
प्लॅस्टिक आणि काचेच्या या प्रदूषणामुळे सह्याद्रीची माती आणि दगडं धरुन ठेवणार्या वनस्पतींची प्रचंड हानी होत आहे. गेल्या काही वर्षात दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याचं कारण हे या वनस्पतींचा नाश हेच असावं. सह्याद्रीच्या अस्तित्त्वालाच धोका उत्पन्न झाला आहे. दोन घटका धबधब्यात भिजून मद्याचा आस्वाद घेणार्या पर्यटकांना याची कसली काळजी!
रस्त्याने अनेक नवनव्या, चकचकीत गाड्या मोठ्यामोठ्याने संगीत वाजवत आणि हातातल्या बाटल्या नाचवत येत होते. गटातल्या मुलींना पाहताच अधिक चेव येऊन शिट्ट्या मारणे, ओरडणे वगैरे प्रकार चालू होत. माळशेजच्या बोगद्याच्या पुढे आल्यावर एक मोठा धबधबा आहे. तिथं तर चक्क ढोल-ताश्याची पथकं आणून काही धुंद मंडळी शर्ट वगैरे काढून स्वैर नृत्य करत होते. एक दोन पोलीस हातात छत्री धरुन बाजूला उभे होते. कदाचित तिथे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याकडे लक्ष देत असावेत. एवढ्या मोठ्या जमावाला दोन पोलीस कसे काय पुरे पडणार?
बाटल्या घेऊन नाचत असलेल्या पर्यटकांना घेऊन जाणार्या बर्याच गाड्यांवर असलेले UP, BR, GJ, CG, JH चे आरटीओ रजिस्ट्रेशन बघितल्यावर नवाकाळ, सामना, पुण्यनगरी वर पोसलेल्या माझ्या काही पेशींनी परप्रांतीयांविरुद्ध क्षणभर बंड पुकारले. पण थोड्याच वेळाने महा-०१ असे मराठी रजिस्ट्रेशन असलेल्या आणि गाडीच्या मागच्या बाजूवर डरकाळी फोडणार्या वाघाच्या चेहर्यासोबत "राजे" असे भगव्या रंगात रंगवून "जे" च्या मात्रेला तलवारीचा आकार दिलेले चित्र असणार्या एका गाडीतून आलेल्या मराठी बांधवांनी त्यावर पाणी ओतले! त्यांनी रस्त्याच्या बरोबर मध्येच गाडी थांबवून तिथेच बाजूला प्रातर्वैधिक जलोत्सर्जन करुन नंतर जोरात गाणी लावून रस्त्यातच मधोमध नाचायला सुरुवात केली. त्यामुळे झालेल्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेल्या प्रवाशांना थोडा वेळ आपले नृत्यप्रकार दाखवल्यावर बाटल्या काढून जोरात चीअर्स केले आणि मग गाडी निघून गेली.
काही बरे फोटो मिळाले. सूर्यस्नानासाठी पहुडलेला एक सुंदर साप बघायला मिळाला. त्यातच समाधान मानायचं. पुढे हे प्रत्यक्ष पाहायला मिळणार नाही कदाचित.
