Tuesday, July 24

तर्कक्रीडा: धन्वंगजाची प्रेमकहाणी

हिंदी महासागरातील अमरद्वीपावर राहणार्‍या धन्वंगजाचे रुधीरसागरातील मृत्यूद्वीपावर राहणार्‍या मृदूभाषिणीवर प्रेम होते. हा विवाह अर्थातच तिच्या वडिलांना मंजूर नव्हता. त्यांचे मन वळवण्यासाठी धन्वंगज द्वीपावर आला तेव्हा तेथील सेवकांनी त्याला पकडून सभास्थानी आणले. सभास्थानी असलेल्या श्वेतवर्णीय ध्वजदंडावरील शंखावर असलेला राजसर्पाची मुद्रा पाहताचा धन्वंगजाच्या हृदयाचा ठोका चुकला.

होय. मृदूभाषिणीचा परिवार हा नरभक्षक होता.

बर्‍याच दिवसांनी रुचकर नरमांसाचा आस्वाद आणि आपल्या आवडत्या उष्ण रक्ताचे प्राशन करावयास मिळणार हे लक्षात आल्यावर यःकश्चित ह्या मृत्यूद्वीपावरील तरुणाने तर बेभान होऊन नृत्यच सुरु केले.

सभास्थानी मृदूभाषिणीचे वडील कृष्णवर्णीय वस्त्र परिधान करुन आले होते. विवाह त्यांना मान्य नसला तरी आपल्या कन्येच्या प्रियकराला एक संधी देणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. अनुभवी अणि बुजुर्ग लोकांना कवडीमोलाचे समजून त्यांचा उर्मटपणे अवमान करण्याच्या नागरी जीवनात असलेल्या प्रथेचा अर्थातच या समाजात अभाव होता. मृदूभाषिणीच्या वडिलांच्या प्रस्तावाला सर्वांची साहजिकच मान्यता मिळाली.

मृदूभाषिणीचे वडील यज्वंधेय यांना तर्कशास्त्रामध्ये थोडीशी गती होती. शिवाय सदैव सत्यकथन करणार्‍या गंधर्वांचे मांस हे तळल्यावर जास्त चविष्ट लागते तर सदैव असत्यकथन करणार्‍या यक्षांचे मांस हे भाजल्यावर जास्त स्वादिष्ट लागते हे सूक्ष्म ज्ञानही त्यांना होते.

धन्वंगजासमोर त्यांचा कूटप्रश्न होता तो असा.

"धन्वंगजा, नीट लक्षपूर्वक ऐक.
तुझी अंतिम इच्छा म्हणून तू केवळ एक आणि एकच विधानार्थी वाक्य करु शकतोस.

ते वाक्य जर सत्यकथन असेल तर तुला आम्ही तळून खाऊ आणि असत्यकथन असेल तर तुला भाजून खाणे आम्हाला आवडेल.

आता तुझ्या मृत्यूची पद्धती स्वीकारणे केवळ तुझ्याच हाती आहे. "

हा कूटप्रश्न ऐकल्यावर हर्षभारित होऊन यःकश्चित आपले रुधिरप्राशनाचे आवडते पात्र आणण्यासाठी धावतच आपल्या कुटिराकडे निघाला आणि परत येऊन पाहतो तो काय. धन्वंगजाने असे एक विधानार्थी वाक्य निवडले होते की स्वतःचे प्राणरक्षण करणे त्याला शक्य झाले.

त्याच्या बुद्धिमत्तेवर प्रसन्न होऊन यज्वंधेयांनी मृदुभाषिणीचा विवाहही राक्षस पद्धतीने धन्वंगजाशी लावला. या विवाहात धन्वंगजाने उपक्रमावरील कोडी सोडवण्याच्या सरावामुळे हा कूटप्रश्न सोडवणे शक्य झाले अशी कृतज्ञता व्यक्त केली आणि ग्राम्य पद्धतीचा एक उखाणाही घेतला.

"शंकराच्या पिंडीला नागोबाचा वेढा
तू माझी म्हैस आणि मी तुझा रेडा"

असो. पुढे काय झाले हे सांगणे नलगे.

तर धन्वंगजाचे प्राणरक्षण करणारे ते विधानार्थी वाक्य कोणते हे तुम्ही ओळखू शकता का?