शिवसेनेचा ४१ वा वर्धापनदिन नेहमीच्याच उत्साहाने साजरा झाला. त्यानिमित्ताने एका गोष्टीची पुन्हा उजळणी झाली की शिवसेनेमध्ये शिवसेना-प्रमुखांना पर्याय नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक प्रभाव असणार्या नेत्यांमध्ये शरद पवारांनंतर आजही बाळासाहेबांचाच नंबर लागेल.
अगदी १८ वर्षाच्या आजच्या मराठी तरुणापासून शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये काम सुरु केलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांबद्दल असलेलं आकर्षण इतक्या दिवसांनंतर बर्यापैकी टिकून आहे हे मुंबई महानगरपालिकेच्या मागे झालेल्या निवडणुकीत दिसून आलं. सर्व वयोगटांमध्ये इतकी लोकप्रियता/आदर/अनादर/तिरस्कार/प्रेम या सर्व भावना असलेला दुसरा राजकारणी महाराष्ट्रात नव्हे तर भारतातही कुठे दिसत नाही.
तुम्ही एक तर बाळासाहेबांचा तिरस्कार करु शकता किंवा त्यांच्यावर आत्यंतिक प्रेम करु शकता. बाळासाहेबांकडे दुर्लक्ष करणे मात्र शक्य नाही.
मात्र शिवसेनेची परिस्थिती काय आहे?
मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी सुरु झालेल्या संघटनेने स्थानीय लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेना यांचा मराठी बाणा सोयीस्कररीत्या फेकून देऊन मतांसाठी हिंदुत्त्वाचे लोढणे गळ्यात कधी अडकवून घेतले ते कळलेही नाही. त्यामुळे शेखावत की प्रतिभा पाटील असा आयडेंटिटी क्रायसिस शिवसेनेला आता झाला आहे. त्यातूनच मग मुकेश पटेल, प्रीतीश नंदी, संजय निरुपम, चंद्रिका केनिया यांना राज्यसभेवर पाठवणार्या पक्षाला प्रतिभाताई मराठी की गुजराती अशा प्रश्नाची चर्चा करणे भाग पडत आहे. अशा गोंधळामुळे व भाजपासारख्या मतलबी पक्षासोबत जाणे स्वत:हून ओढवून घेतल्यामुळे २००९ मध्ये महाराष्ट्रावर एकछत्री अंमल आणण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न हे स्वप्नच राहण्याची शक्यता खूप मोठी आहे.
छगन भुजबळ, दत्ताजी साळवी, नारायण राणे यांच्यासारखे खंदे नेते सोडून गेल्यावरही शिवसेना अजून टिकून आहे याचं आश्चर्य वाटतं तसंच शिवसेनेचा सर्वात मोठा शत्रू आता शिवसेनेतच मोठे झालेले राज ठाकरे आहेत याचं दु:खही. एकमेकांची डोकी फोडण्यात गुंतलेल्या या दोन पक्षांच्या राड्याच्या राजकारणात सर्वात जास्त नुकसान होतंय ते मराठी माणसाचंच.
ओरकुटवर बाळासाहेबांबद्दल बदनामीकारक मजकूर लिहिल्यानंतर बाळासाहेबांची प्रतिमा कलंकित झाली असेल वा नसेल पण त्यानंतर कल्याणच्या सायबर कॅफेवर हल्ला करणार्या शिवसैनिकांमुळं ते ज्या मराठी माणसाच्या नावाने राजकारण करतात त्याची प्रतिमा नक्कीच अधिक कलंकित झाली आहे. मराठी माणसांच्या कोणत्याही गुणाचा लवलेश शिवसैनिकांमध्ये दिसत नाही.
परत शिवसैनिकांनी असा राडा केल्यानंतर मनसैनिकांना मागे राहून चालणारच नाही, त्याल ते तरी काय करणार. त्यामुळं त्यांनीही मराठी शुद्धलेखनाच्या प्रश्नावरुन तसलाच गोंधळ घातला. आता शिवसेना या गोंधळाला काय प्रत्युत्तर देते ते पाहणे केवळ आपल्या हाती आहे.
