
आपल्याकडे टीव्हीवर लागणार्या 'हीरा है सदा के लिए' छाप जाहिराती वगैरे बघितल्या की कुणालाही वाटेल बायकोला, आई-वडिलांना, प्रेयसीला हीरा दिल्याशिवाय प्रेम खर्या अर्थाने व्यक्त होणारच नाही. त्यातल्या आणखी काही जाहिरातींची थीम तर 'घ्या स्वत:चा शोध, दाखवा जगाला तुम्ही कोण आहात ते' वगैरे छाप असते. जसं काय हीरा वापरल्याशिवाय आपला उजेड जगात पडणारच नाही.
९० च्या दशकातील सिएरा लिओनमधील नागरी युद्ध, या युद्धाला पैसा पुरवणारे हिर्यांचे व्यापारी, हिर्यांची होणारी तस्करी, स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी माणसांच्या जीवाची पर्वा न करणारे तथाकथित क्रांतिकारक, आणि या चमचमणार्या हिर्यांच्या मागं दडलेलं काळंकुट्ट सत्य यांच्यावर आधारित चित्रपट ब्लड डायमंड काल बघितला.
सॅलोमन वॅन्डी (जिमॉन हॉन्सू) हा सिएरा लिओनमधील एका खेड्यातला कोळी. आरयूएफ (रिव्हॉल्युशनरी युनायटेड फ्रंट) च्या हल्ल्यामुळे त्याचं गाव उद्धवस्त होतं. बायको आणि मुलांपासून ताटातूट होते. सॅलोमनला आरयूएफ चे 'स्वातंत्र्यसैनिक' हिर्यांच्या खाणीत काम करण्यासाठी घेऊन जातात. तिथं त्याला एक दुर्मिळ, लालसर गुलाबी रंगाचा हीरा सापडतो. त्याचवेळी सरकारी सैनिक खाणीवर हल्ला करतात. सैनिकांनी पकडण्यापूर्वी खाणीजवळच एका ठिकाणी सॅलोमन तो हीरा जमिनीत पुरून ठेवतो. पुढे तुरुंगात त्याला असा एक दुर्मिळ हीरा सापडला आहे हे डॅनियल आर्चर (लिओनार्डो डी कॅप्रिओ) ला कळतं. आर्चर हा सिएरा लिओनमधून हीर्यांची स्मगलिंग करत असतो. मात्र स्मगलिंग करत असताना एकदा त्याचा हीर्यांचा साठा पकडला गेल्यामुळे मोठ्या संकटात पडतो. तो सॅलोमनला जर तू हीरा मला दिलास तर मी तुला तुझं कुटुंब शोधण्यास मदत करीन असं सांगतो. दोघेही आपल्या वेगवेगळ्या उद्देश्यांसाठी एकत्र कामाला सुरुवात करतात.
पुढे काय होतं हे चित्रपटातच पाहण्यासारखं आहे. चित्रपटातले नागरी युद्धाचे प्रसंग, विस्थापितांच्या छावण्या, हेलिकॉप्टरमधून घेतलेली जंगलांची दृश्य सगळेच विलक्षण प्रभावी आहेत. अनेक ठिकाणी पार्श्वसंगीत म्हणून वापरण्यात आलेलं आफ्रिकन लोकसंगीतही चित्रपटाचा प्रभाव अधिक गडद करतं. लिओ आणि जिमॉन दोघांनी मस्त काम केलं आहे. लिओला भलतीच भावखाऊ भूमिका मिळालेली आहे ज्याचं त्यानं अर्थातच सोनं केलं आहे. बर्याच ठिकाणी साईड ऍंगलने घेतलेले त्याचे शॉट जॅक निकल्सनची आठवण करुन देतात. (ऍक्टींग ऍक्टींग म्हणजे जॅकला कॉपी करण्याशिवाय दुसरं काय?)
याआधी ग्लॅडिएटर मध्ये मॅक्सिमसचा सहकारी म्हणून भेटलेला जिमॉनचा अभिनय एकदम सही आहे. विशेषत: त्याच्या मुलाबरोबरचे त्याचे संवाद, मुलाला आरयूएफच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी चाललेली त्याची तळमळ सगळेच सीन फार सुंदर. त्याला यावेळचा ऑस्कर पुरस्कार नाही मिळाला तर मला प्रचंड दु:ख होईल.
एडिटिंगमध्ये मात्र चित्रपट वाईट गंडला आहे. शेवटचे १५-२० मिनिटं चित्रपटाचा प्रभाव पूर्णपणे पुसून टाकतात. हिंदी चित्रपटाचा वाटावा असा टिपीकल शेवट घेतला आहे. लिओचे अस्थानी आलेले अनेक डायलॉग हे आल्हाददायक आहेत. चित्रपटातील एखादे दृश्य पाहून आपण प्रचंड अस्वस्थ होतो, पुढे काय दाखवणार अशी उत्सुकता लागून राहते आणि अचानक लिओचा विनोदी डायलॉग येतो. मग हुश्श करुन आपण निश्वास सोडतो. चित्रपटाची इन्टेन्सिटी त्यामुळं टिकून राहत नाही. जेनिफर कॉनेलीचं पात्र चित्रपटात नसतं तरी विशेष फरक पडला नसता असं वाटून जातं.
शेवटी विनम्र सूचना या थाटात तुम्ही हीरा घेताना तो Conflict Free आहे अशी खात्री करा वगैरे सूचना फ्लॅश करणं हास्यास्पद आहे. आता दुकानात मिळणारं दूध देखील गायीचं आहे का म्हशीचं आहे हे बर्याच जणांना त्या पिशवीवर वाचल्याशिवाय कळत नाही तिथं हीरा घेताना तो Conflict Free आहे याची खात्री कशी करणार? हिर्यांच्या व्यापार्यांची चित्रपटात दाखवलेली अनैतिकता, अप्रामाणिकपणा पाहून हे लोक सगळ्याच हिर्यांवर Conflict Free चा शिक्का मारतील हे न समजायला प्रेक्षक मूर्ख आहे का?
मात्र ह्या खटकणार्या चुका वगळल्या तर हा चित्रपट नक्कीच २४ कॅरेटचा हीरा आहे.
सर्व चित्रे विकिपीडियाच्या सौजन्याने.

2 प्रतिसाद:
Yet to see this movie!
Like you have mentioned, strong background to the main theme always leaves lasting impression of the movie. Being a hollywood product, I am sure, the story advances with amazingly shot background of the civil war.
That is true. jar chitrpaat thodisa lahan kela asata tar khoop sundar jhala asata
टिप्पणी पोस्ट करा