हिंजवडीत असलेल्या आयटी पार्कमधून चिंचवड-स्टेशन परिसरात दुचाकीवर जाण्याचा जर कोणावर प्रसंग आला तर त्याला आधीच शहाणे करुन सोडणे हाच एक उदात्त उद्देश मनी ठेऊन या प्रवासाबद्दल मार्गदर्शनपर लेख लिहिण्याचे धाडस करत आहे. सूज्ञ, शिस्तप्रिय, नियम पाळून गाड्या चालवणाऱ्या इ.इ. पुणेकरांवर टीका करणे हा उद्देश मनात नाही याची जाण ठेवावी. आणि चारचाकी गाडी घेऊन हा प्रवास करण्याचे धाडस करू नये. (नंतर म्हणू नका सांगितले नाही म्हणून)
हिंजवडीतील आयटी पार्कमधून चिंचवड स्टेशन परिसरात जाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी १० मिनिटे व जास्तीत जास्त कितीही तास लागू शकतात. तुमचे दुचाकी वाहन चालविण्याचे कौशल्य इतरांपेक्षा किती चांगले आहे यावर ते अवलंबून आहे. तुमच्या प्रवासात तुम्हाला ५ मैलाचे दगड लागतील. ह्या मैलाच्या दगडांवरच खालील लेख आधारित आहे. (त्यामुळेच यास शिलालेख असे म्हटले आहे)
१. हिंजवडी चौक: याला हिंजवडी पोलीस चौकी किंवा आजकाल "हिंजेवाडी चौक" असेही म्हणतात. ह्या ठिकाणाचे नाव उच्चारताना 'ज' हा "जेम्स" प्रमाणे व 'च' हा 'चेस' प्रमाणे उच्चारणे अतिशय आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही 'इथलेच' आहात हे समोरच्याला लगेच कळेल. पुण्यातील इतर मराठी भाषिकांप्रमाणेच तुम्हीही आपली मराठी ओळख लपवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. चौकाची रचना पुण्यातील कोणत्याही चौकासारखीच आहे. चौकात सर्व बाजूंना भाजीवाले, फळवाले, सहा सीटरवाले दबा धरून बसलेले असतात. आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही. चौकातील रहदारीची स्थिती खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे आहे.
![]()
चित्रात बाणाची दिशा ही या चौकात कोणत्या दिशेने गाड्या चालवल्या जातात हे दाखवते. गाडी सुखरूप पुढे काढण्यासाठी तुम्हाला "इंच इंच लढवू" या बाण्याचा वापर करणे अतिशय आवश्यक आहे. जिथे जागा मिळेल तिथे आणि जशी जागा मिळेल तशी गाडी पुढे काढावी लागते. चित्रात लाल रंगाचे वर्तूळ हे वाहतूक पोलीसाची जागा दर्शवते. हिंजवडी चौकातील वाहतूक पोलीसांना रस्त्यावरील पोरेटोरे आणि गुरेसुद्धा घाबरत नाहीत, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचे काहीही कारण नाही. परवा परवाच या चौकात एक सिग्नल बसवला आहे. पुण्यातील इतर सिग्नलप्रमाणेच हा सिग्नलही केवळ शोभेची वस्तू आहे हे ध्यानात ठेवणे अतिशय आवश्यक आहे. चित्रात दाखवल्याप्रमाणे आयटी पार्क वरून सरळ मुसंडी मारलीत की तुम्ही हा चौक विना-अडथळा पार करू शकाल. हा चौक जर तुम्ही २ मिनिटांत पार केला नाहीत तर पुढचा प्रवास रद्द करावा.
२. वाकड पोलीस चौकी: हिंजवडी चौकातून सरळ पुढे येत जावे. साधारण २-२.५ किमी नंतर वाकड पोलीस चौकीचा चौक लागेल. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या बाह्यवळण रस्त्यावर हा चौक आहे. चौकातील गाड्यांची स्थिती खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे आहे. हे चित्र पाहून तुम्हाला कदाचित कुरुक्षेत्रातील युद्धभूमीवर आल्याचा भास होईल.
मात्र या कुरुक्षेत्रावरील कृष्णाच्या भूमिकेत असलेला वाहतूक पोलीस (लाल वर्तूळ पहा) तोंडात बासरीऐवजी शिटी घेऊन उभा आहे. आणि शिटी वाजवून तो सर्वांना पुढे होणाऱ्या युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहे हे ध्यानात ठेवा. येथे आपण नास्तिक असलात तरी साईबाबांच्या श्रद्धा व सबुरी या तत्त्वांवर विश्वास ठेवून एकदम मुसंडी न मारता हळूहळू गाडी पुढे सरकवत न्यावी. अधूनमधून बाजूला उभ्या असलेल्या आणि प्रामाणिकपणे आपला नंबर येण्याची वाट बघत थांबलेल्या गाड्यांकडे त्रासिक कटाक्ष टाकत त्यांना गाडी चालवण्याची अक्कल कशी नाही हे केवळ नजरेतूनच त्यांच्या ध्यानात आणून द्यावे. जर आपली नजर भेदक नसेल तर तोंडाने शिव्यांसारखे काहीतरी पुटपुटावे. तुमच्याच दिशेने जाणार्या इतरांची साथ लाभली तर हा चौक पार करणे ही अगदीच सोपी गोष्ट आहे.
३. डांगे चौक(थेरगांव): डांगे चौक ही हिंजवडीच्याच चौकाची एक मोठी आवृत्ती आहे. हिंजवडी चौक जर शाहिद कपूर असेल तर डांगे चौक हा शाहरुख खान आहे. मात्र महत्त्वाचा फरक इतकाच की डांगे चौकात वाहतूक पोलीस शक्यतो नसतो. इंच इंच लढवणे, मुसंडी मारणे इ. युक्त्या वापरून हा चौक तुम्ही पार करू शकता. या चौकात पीएमटी व पीसीएमटी बसगाड्यांचीही वर्दळ असल्याने थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी हिंजवडी चौकाचे चित्र पहा. (आठवा शाहिद कपूर-शाहरूख खान या उपमा)
४. चाफेकर चौक(चिंचवडगांव): तुमच्या प्रवासातल्या प्रथमा-द्वितीया-तृतीया तुम्ही पार केल्यात की तुम्ही या चौकात येऊन पोचाल. (अवांतर: याही जागेच्या नावातील प्रत्येक 'च' हा 'चहा' या शब्दातील च प्रमाणे उच्चारणे हे हल्लीच्या प्रथेला अनुसरून होईल.) या चौकात जर तुम्ही प्रथमच येत असाल तर हा चौक पाहून तुम्हाला ब्रह्मदेव (किंवा तुम्ही नास्तिक असाल तर आई) आठवेल.
![]()
या चौकात सिग्नल, वाहतूक पोलीस वगैरे फालतू लाड नाहीत. नागरिकांचे प्रसंगावधान आणि वाहतूक कौशल्यावर प्रशासनाचा असलेला गाढ विश्वासच तुम्हाला दिसतो. मात्र असे घाबरून जाण्याचे कारण नाही. या चौकात तुमच्यावर चारी बाजूंनी वाहनांचा आणि पादचार्यांचा मारा होत असतो. तो चुकवणे आणि आपली गाडी पुढे सरकवत राहणे ह्या युक्त्या लक्षात ठेवल्या की तुम्ही अलगद चिंचवड स्टेशनकडे जाणार्या रस्त्याला येऊन पोचाल.
५. चिंचवड स्टेशन: हा चौक हल्ली हल्लीच जरा आव्हानात्मक झाला आहे. एकदीड वर्षांपूर्वी हा चौक ओलांडणे हे कोणाही दुचाकीस्वारालाही शक्य होते. मात्र ही गोष्ट दयाळू प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी पिंपरी-चिंचवडकरांना natural advantage देण्यासाठी स्टेशनवरील पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले. हे काम अजून दहाएक वर्षे तरी चालेल असा एक प्राथमिक अंदाज आहे. तोपर्यंत पिंचिंकर natural advantage चा फायदा घेऊ शकतील. या चौकाचे वैशिष्ट्य म्हणजे या चौकातील सिग्नल बऱ्याच वेळा चालू असतो. मात्र चालू स्थितीतील सिग्नल पाहण्याची पिंचिंकरांना सवय नसल्यामुळे चालू सिग्नल ही काहीतरी अप्रूप गोष्ट आहे असे वाटून प्रत्येकजण ह्या सिग्नलला हात लावून खात्री करून घेण्यासाठी अगदी आतूर असतो. काही वेळानंतर गुळाला चिकटलेल्या मुंगळ्यांप्रमाणे दुचाकीस्वार सर्व बाजूंनी सिग्नलला चिकटले आहेत की काय असे वाटू लागते. एखाद्या नव्या माणसाला तर राष्ट्रपतींची मिरवणूक निघते तशी ही ही सिग्नलची मिरवणूकच आहे की काय असेही दुरून वाटेल. सिग्नलच्या आसपास असणारे दुचाकीस्वार, मागे असलेले चारचाकीस्वार सर्व जण जणू काही सिग्नलचा जयजयकार करण्यासाठीच हॉर्न वगैरे वाजवत असतात.
हा सिग्नल ओलांडणे हा मात्र केवळ नशीबाचाच भाग आहे. येथे तुमचे वाहनकौशल्य कामास येण्याची शक्यता कमी आहे. जास्त वाहनकौशल्य दाखवाल तर तुम्हीच कामास याल.
असो.. हा शिलालेख आपल्याला मार्गदर्शक ठरावा ही अपेक्षा
Disclaimer: हा लेख वाचून प्रवास केल्यास व प्रवासी व्यक्ती किंवा ते वाहन यांचे नुकसान झाल्यास लेखक जबाबदार नाही. सदर लेखातील प्रवासवर्णन हे त्या क्षेत्रातील expert व्यक्तींनी स्वत: अनुभव घेऊन केले आहे. त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये.
