Saturday, October 14

बेजान

सध्या मी भारतात नसल्यामुळे आपल्या रंगीबेरंगी दूरदर्शन वाहिन्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं कोणते नवीन चित्रपट प्रदर्शित होतायत, कोणते चित्रपट "डबा" आहेत आणि हिमेश रेशमियाचं कोणतं नवं गाणं हिट झालंय ही मौलिक माहिती मिळवण्यासाठी भयंकर धडपडावं लागतं.

सध्या जुन्या गाण्यांच्या रिमिक्स प्रमाणेच जुन्या चित्रपटांच्या रिमेकचाही जमाना आहे. "शोले" च्या रिमेकची तर किम काकांच्या अणुचाचणीपेक्षाही जोरात चर्चा होत आहे. तसाच उमराव जानचा रिमेकही मोठा चर्चेत आहे.

रेडिफ वर "उमराव जान - २" ची काही चित्रं पाहिली. ऐश्वर्या भयानक कृत्रीम दिसते. अगदी रंगवलेली बाहुली देखील तिच्यापेक्षा जास्त जिवंत दिसेल. नमुन्यादाखल एक चित्रं खाली चिकटवलंय.


या चित्रपटाचं नाव उमराव बेजान हे जास्त चांगलं वाटलं असतं.

Thursday, October 12

As good as it gets...

"As good as it gets" बघायचा म्हणून खूप दिवस मनात होतं... पण कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते असं थोर माणसं म्हणतात ते खोटं नाही. कुणीसं तर लिहून ठेवलंय की साधा सुईत दोरा जरी ओवायचा असला तरी जोपर्यंत त्याची त्याची वेळ येत नाही तोपर्यंत जग इकडचं तिकडं केलं तरी काही होणार नाही.

उ. कोरियाने अणुचाचणी वगैरे केल्यामुळे आता काय होणार असा "चिंता करीतो विश्वाची" मूड मध्ये हातात रिमोट घेऊन चॅनेल सर्फिंग करत असताना अचानक हा चित्रपट हाती लागला...

हेलन हन्ट, क्युबा गुडिंग ज्यु., ग्रेग किनिअर असं तारांगण असलेल्या चित्रपटातील चंद्र म्हणजे जॅक निकोलसन.

"ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर" (ओसीडी) या मानसिक रोगाने ग्रस्त असलेला मेल्विन स्वत:च्या अपार्टमेंट रुपी जगात राहत असतो. दुसर्‍यांविषयी कमालीचा तिरस्कार आणि अतिशय कुजकट बोलणे हे अंगभूत दुर्गूण असलेला मेल्विन स्वत: मात्र प्रेमकथा वगैरे लिहित असतो.

स्वत:च्या नियमात बांधून घेतलेले आणि त्यामुळेच अगदी एकसुरी असणार्‍या मेल्विनच्या आयुष्यात अचानक मोठी उलथापालथ होते.
त्याचा शेजारी सायमनच्या घरात चोरी होते. चोर जाताना सायमनला "जबरी" मारहाण करुन जातात. सायमनला हॉस्पिटल मध्ये दाखल केले जाते आणि प्रश्न उपस्थित होतो तो सायमनच्या कुत्र्याला कुठे ठेवायचे याचा... सायमनचा मित्र फ्रॅंक कुत्र्याला घेऊन सरळ मेल्विनच्या घरी येतो आणि कुत्र्याला तिथे सोडून देतो.

हॉटेल मध्ये खायला जाताना देखील स्वत:चा काटा-चमचा-सुरी घेऊन जाणार्‍या आणि स्वच्छतेच्या बाबतीत विक्षिप्त मेल्विनला कुत्रा हे सुरुवातीला मोठेच संकट वाटते पण हळूहळू त्याला कुत्र्याचा लळा लागतो.

यथावकाश सायमन घरी येतो. आता तो कुत्रा परत मागणार या काळजीत असलेल्या मेल्विनला अजून एका "गंभीर" प्रसंगाला तोंड द्यावे लागते. त्याच्या नेहमीच्या हॉटेलमधली रोज त्याची ऑर्डर घेणारी वेट्रेस कॅरोल दम्याने आजारी असलेल्या तिच्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी नोकरी सोडते.

या बिकट प्रसंगांना "ओसीडी" ग्रस्त मेल्विन कसा तोंड देतो... या अगदी साध्या कथानकावर बेतलेला हा सिनेमा अगदी पटून जातो...

जॅक निकोलसन बद्दल मी पामर काय लिहिणार... पण मी पाहिलेल्या त्याच्या सर्व चित्रपटांपैकी सगळ्यात चांगली भूमिका त्याने ह्यात केली आहे...

पुन्हा पुन्हा बघण्यासारखा आहे हा चित्रपट... नक्की बघा...अर्थात तशी वेळ जमून आली पाहिजे... नाही का?