"चला चला यमायडीशी (MIDC) बसा लौकर" असं आमच्या सर्वांच्या लाडक्या सहा आसनी रिक्षाचालकानं सांगितल्याबरोब्बर मी लगेच मागच्या बाजूला पटकन जागा पटकावून बसलो. इकडेतिकडे थोडी पळापळ झाली आणि "सारे प्रवासी घडीचे" (म्हणजे अंगाची अक्षरश: घडी घालावी लागते हो!) रिक्षाच्या मागे, पुढे आणि जिथे जागा मिळेल तिथे बसले. जरा गोंधळ वगैरे कमी झाल्यावर मी माझ्या सहप्रवाश्यांचे "अवलोकन" करु लागलो. (प्लीज नोट द लॅंगवेज!). मी अगदी दरवाजाच्या बाजूलाच बसलो होतो. (तेवढीच हवा वगैरे लागते.) माझ्या उजव्या बाजूला हिंजवडीला चालू असलेल्या बांधकामांवर काम करणारी मजूर मंडळी आली होती. माझ्या बाजूला नेहमी असेच लोक येतात. जास्त इंटरेस्टिंग लोक येत नाहीत... असो. अजून त्यांची कोणत्या तरी अगम्य भाषेतील चर्चा सुरु झाली नव्हती. मला स्वत:ला ही चर्चा फार आवडते. काही कळत नसलं तरी "निकोप मनोरंजन" होतं. त्यांना चर्चेचा "सूर" अद्याप सापडला नसल्यामुळे प्रवासातील मजा अजून सुरू झाली नव्हती.
आता मी माझ्या समोर कोण आलंय हे बघितलं. तर माझ्या अगदी समोर एक मुलगी आली होती. (नशीब कधी कधी चुकून साथ देतं ते हे असं) :) तिच्या बाजूला जवळच असलेल्या एका कॉलेजमधला १ मुलगा आणि त्याच्या बाजूला हिंजवडीतीलच आमचे २ सहव्यवसायी दिसत होते.
समोर बसलेल्या मुलीला मी कुठंतरी बघितल्यासारखं वाटत होतं. म्हणजे तशी ती दिसायला बरी वगैरे होती. जरा दूर पलीकडच्या फूटपाथवर उभी राहिली असती तर मस्तच दिसली असती. पण आता इतक्या जवळ बसल्यामुळे तितकीशी चांगली दिसत नव्हती. ते जाउ दे... माझ्या डोक्यात भुंगा म्हणजे हिला मी कुठं आणि कधी पाहिलं आहे ते. आता तुम्ही म्हणाल की विचारायचं ना सरळ, "अहो शुक शुक, तुम्ही मला (किंवा मी तुम्हाला) कुठं बघितलंय का? " यात असं विचारल्यावर ती खरंच ओळखीची असली तर ठीक आणि नसली तर मोठीच पंचाईत व्हायची. मुलींचं एक बरं असतं, त्यांना काय कुणालाही असं मध्येच काहीही विचारता येतं. मुलांनी तसं केलं तर आजूबाजूचे लोक नसता संशय घेतात. त्यामुळं मी तिला असं काही विचारायचा विचार बाजूला ठेवला आणि रिक्षाच्या बाहेर बघू लागलो. पण माझं म्हणजे काय आहे, एखादी गोष्ट अशी आठवत नसली की मला अगदी चटके बसल्यासारखं बेचैन व्हायला होतं. ती गोष्ट आठवल्याशिवाय मनाला शांती वगैरे म्हणतात ती लाभतच नाही. त्यामुळं अधून मधून मी तिच्याकडं बघून तिचा चेहरा कुठं बरं पाहिलाय हे आठवण्याचा प्रयत्न करत होतो. एव्हाना तिला देखील माझ्या चुळबुळीची कल्पना आली असावी. तिनं एक-दोनदा त्रासिकपणे माझ्याकडे पाहिलं. तेव्हा मला तिचा पूर्ण चेहरा दिसला. नक्कीच मी हिला कुठंतरी पाहिलं होतं आणि खूप वेळा पाहिलं होतं... कदाचित माझ्या कॉलेजमधलीच मुलगी असावी. तिच्यादेखील चेहऱ्यावर ओळखीचा भाव थोडासा दिसला पण तिने लगेच चेहरा फिरवला आणि ती बाहेर पाहू लागली. रिक्षा थांबल्यावर तिला विचारुया (म्हणजे आजूबाजूला लोक जरा कमी असतात, त्यामुळं पोपट झाला तरी जास्त लोकांसमोर होणार नाही) असा विचार करून मी मनाची हरवलेली शांती परत आणण्याचा प्रयत्न करु लागलो.
माझ्या बाजूला बसलेल्या मजूर लोकांच्या (माझ्या आवडत्या) गप्पा सुरू झाल्या होत्या. त्यांची चर्चा अगदी रंगात आली होती. पण शेजारी शेजारीच बसल्यामुळे त्यांना एकमेकांचे चेहरे दिसत नव्हते. मुख्य drawback म्हणजे त्यांना टाळ्यांचे आदानप्रदान व्यवस्थित करता येत नव्हते. वाकड पोलिस चौकी जवळ आल्यावर समोरच्या आसनावरचा कॉलेजमधला मुलगा उतरला तेव्हा आमच्या शेजाऱ्यांपैकी एकाने त्याची जागा पटकावली. आता त्यांना मोकळेपणाने गप्पा मारायला काही अडचण नव्हती. माझ्या आसनावर देखील आता चार लोकांऐवजी तीनच लोक बसल्यामुळे आता मला अगदी अतुलनीय असा ब्रह्मानंद झाला होता. समोरच्या आसनांवर मात्र चार लोक झाल्यामुळे त्यांची थोडीशी चिडचिड झाली होती. त्यांना आमचा वाटणारा हेवा त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होता. समोरच्या "पब्लिक" ला अजून थोडं चिडवण्यासाठी मी माझी ऑफिसची बॅगदेखील माझ्याशेजारी आसनावर ठेवली. :)
आमची रिक्षा हायवे ओलांडून हिंजवडीच्या रस्त्याला लागल्यावर समोर एका आजीबाईंनी रिक्षाला हात केला. रिक्षावाल्याने माधुरी दीक्षित प्रमाणे रिक्षाला एक छानसा झटका मारुन रिक्षा बाजूला घेतली. मागून येणाऱ्या इतर गाड्यांचा थोडा गोंधळ उडाला. रिक्षावाल्याला शेलक्या शिव्या हासडत ते पुन्हा रस्त्यावर चालू पडले. आजीबाईंना बघितल्यावर मात्र आम्ही सगळे हादरलोच. त्यांच्यासमोर अदनान सामी म्हणजे अगदी पाप्याचं पितर होता. आजीबाईंना सहा आसनी रिक्षा मधली एका बाजूचं पूर्ण आसन मिळालं असतं तरच त्या व्यवस्थित बसणं शक्य होतं. आम्ही अजून थोडे पाय वगैरे पसरुन आजीबाईंना "बसायला जागा नाही" हे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र या आजीबाई हा नेपोलिअनच्या वंशज असाव्यात. "अशक्य" हा शब्द त्याच्या शब्दकोषात नसावा. त्यांनी हळुवारपणे सांगितलं "बाळा, जरा तुझी पिशवी जरा खाली ठेव, म्हणजे मला बसता येईल". मी पिशवी खाली ठेवून बेडकाप्रमाणे अंग थोडं फुगवून परत एकदा आजीबाईंना "जागा नाही" हे सुचवण्याचा प्रयत्न केला. आजीबाई माझ्या बारशाचं जेवण जेवलेल्या असाव्यात. "एकदा बसलं की जागा होतेच बसायला" असं ठणकावून त्या आत शिरल्या आणि एकदाच्या आसनावर टेकल्या.
आजीबाई बसल्यावर मला आणि त्यांच्या पलीकडे बसलेल्या दुसऱ्या प्रवाशाला अगदी ब्रम्हांड आठवलं. आजीबाईंच्या दोन्ही हातांखाली आम्ही दोघं अगदी गुदमरून गेलो. बहुधा खड्ड्यात अडकलेला "प्रिन्सच" आमची भावना समजू शकतो. म्हटलं आता इथं उतरुन दुसऱ्या रिक्षानं यावं, पण तेवढ्यात रिक्षावाल्यानं रिक्षा चालू देखील केली होती. आजीबाई उठल्याशिवाय आम्हाला उतरणंच काय पण कोणालाही जागेवरुन हलणंही शक्य नव्हतं. मी थोडंसं इकडंतिकडं सरकण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ... मात्र माझी धडपड पाहून आजीबाईंनी थोडं अजून हलून त्यांची जागा अगदी फिक्स करून घेतली.
माझ्या मनात आता त्या समोर बसलेल्या मुलीपेक्षा आपण "one piece" ऑफिसमध्ये पोहचू का हाच विचार येत होता. मनातल्या मनात मी माझ्या सर्व हितचिंतकांनी मला शुभेच्छा देण्यासाठी "प्रिन्स" साठी दिलेल्या नंबरवर SMS करावेत अशी मी प्रार्थना करु लागलो.
तेवढ्यात त्या समोर बसलेल्या मुलीने "ए़क्स्क्यूज मी, तुम्ही xyz कंपनीत माझ्याबरोबर होता का?" असं विचारलं. आता मला आठवलं की मी हिला कुठं बघितलं होतं ते... (आधीच सांगितलं ना, मुलींना असं विचारणं शक्य असतं म्हणून!) अचानक मला बसणारे ते अदृश्य चटके गायब झाले आणि मनाची शांती परत आली. पण मी आनंद व्यक्त करण्याच्या परिस्थितीत नव्हतो. किंबहुना मी काहीच करण्याच्या परिस्थितीत नव्हतो. पण उगाच त्या मुलीला मी "अकडू" आहे असं वाटू नये म्हणून मी "हूं हूं" असा आवाज काढण्याचा प्रयत्न केला.
ती: मग आता कुठं काम करता तुम्ही?
मी: (च्यायला एवढा वेळ मी लक्ष देऊन बघत होतो तेव्हा हिला बोलायला सुचलं नाही आणि आता मी अवघड परिस्थितीत सापडल्यावर गप्पा मारायचा मूड आला वाटतं). अबक कंपनीत आहे.
ती: सही! काम कसं आहे.
मी: ( माझे आई जरा आता तू शांत बस. मला जास्त बोलायला लावू नकोस. इथं श्वास घेणंदेखील अवघड झालं आहे) ठीक आहे.
ती: तुम्ही xyz कंपनी सोडल्यावर मी दोनतीन महिन्यानंतर सोडली
मी: हूं
ती: आणि अजून कोण कोण आहे तुमच्या कंपनीत "आपल्या" ओळखीचं
मी: (हा मात्र भयानक प्रश्न होता... एवढा वेळ ही बाई माझ्या ओळखीची आहे की नाही या प्रश्नात गढलो होतो... आता "आपल्या" ओळखीचे लोक सापडणे शक्यच नव्हतं.)
आहेत थोडेसे...
ती: थोडी साईडला घ्या...
शेवटचं वाक्य तिनं रिक्षावाल्याला उद्देशून म्हटलं आहे. तिचा stop आला होता. आमच्या शेजारच्या आजीबाईही ह्या ठिकाणी उतरल्या... आणि मला अगदी सुटल्या सुटल्या सारखं वाटलं... छाती भरून शुद्ध हवा घेउन माझ्या सुटकेसाठी SMS रुपी प्रार्थना करणाऱ्या माझ्या हितचिंतकांचे मी आभार मानले.
Wednesday, September 6
एका प्रवासाची चित्तरकथा
Friday, September 1
अंधेर नगरी
शिपाई: म्हाराजांचा प्रचेंड इजय आसो.
महाराज: काय शिपाई, ही काय येन्याची येळ झाली का तुमची. आमी दरबारात येऊन आरधा तास होऊन गेला. आनी हे काय तुमी येकटेच. प्रधानजी कुठं दिसना ते?
शिपाई: म्हाराज म्या सकाळी घरातून निगताना प्रधानजींना मिस्ड कॉल दिला व्हता... जर ते त्या येळेला निगाले असत्याल तर आत्तापत्तुर यायला पायजे व्हते. ट्रॉफिक जाम मंदी आडाकलेले दिसत्यात.
महाराज: अरे पन जर रस्त्यावर ट्रॉफिक हाये हे तुमाला मायती हाये तर तुमाला लौकर निगाया काय व्हतं.
शिपाई: हे आपन प्रधानजींना सांगाया पायजे म्हाराज.
महाराज: खामोश! आमी बोलत असताना मदी मदी त्वांड घालू नका. तुमचं डोस्कं उडवन्याचा आदेश दिला जाईल.
शिपाई: चुकीची माफी असावी म्हाराज.
महाराज: ठीक हाये... काय हालहवाल आहे?
शिपाई: म्हनजे कसं हाये ते... आमच्या गवळ्याची म्हस गाभान असल्यामुळं थोडा दुदाचा प्रश्न बिकट झाला हाये.
महाराज: खामोश! आमी तुमची घरची आडचन इचारलेली न्हाई. आमी जन्तेची काय हालहवाल हाये हे इचारत आहोत.
शिपाई: पन म्हाराज, आमी पन जन्तेपैकीच एक आहोत ना.
महाराज: तुमी जन्तेपैकी जरी आसले तरी ह्या येळेला तुमी जन्तेचे शेवक आहात हे इसरू नका. जन्तेचे काय प्रश्न हायेत हे जरा आमाला कळू द्या.
प्रधानजी: महाराजांचा विजय असो. महाराज आम्हाला यायला जरा उशीर झाला. त्याबद्दल क्षमा असावी.
महाराज: आमाला? म्हंजे तुमच्या बरुबर आजून कोन कोन उशीरा आलंय?
प्रधानजी: महाराज "आम्ही" म्हणजे मीच... मी ला आम्ही असे म्हणण्याची पद्धत आहे.
महाराज: ठीक हाये... राज्याची परस्त्री कशी काय हाये?
प्रधानजी: परस्त्री नाही महाराज, परिस्थिती.
महाराज: तेच ते.. कशी काय हाये?
प्रधानजी: परिस्थिती एकदम उत्तम आहे महाराज. राज्यात सर्वत्र गणरायाचे आगमन झाल्यामुळे अगदी आनंदाचे वातावरण आहे.
महाराज: "गणरायाचे आगमन", "आनंदाचे वातावरण", खरं म्हंता का काय? आनी प्रधानजी तुमची भाशा यवढी सुदारली कशी काय?
प्रधानजी: महाराज आपल्या कृपेनेच नाही का मी २ आठवड्यांच्या पुणे दौऱ्यावर जाऊन आलो. त्यामुळंच आमची... माफ करा माझी... भाषा सुधारली महाराज.
महाराज: आस्सं म्हनता काय... मंग आमच्याबी पुने मुक्कामाची येवस्था करा लगेच. आमीबी गनेशोस्तव व्हस्तंवर पुन्यातच रानार.
प्रधानजी: पण महाराज जनतेच्या प्रश्नांचं काय?
महाराज: प्रधानजी, सगळ्यांच्या दु:खांचं निवारन करनारे गनपती बाप्पा जर आपल्या राज्यात आता आलेले हायेत तर आमी यवढं काय येगळं करनार आवोत? समद्यांच्या संकटांवर आता बाप्पाच काय तो मार्ग सुचवनार.
शिपाई: म्हाराज, पन माज्या दुदाच्या आडचनीचं काय?
महाराज: ह्ये बगा, तुमच्या गवळ्याची म्हस गाभान राहिली याला आमी जबाबदार नाई. पन आमाला सगळीच कामं गनपतीबाप्पावर टाकून चालनार नाई. आसं करा तुमीबी आमच्या बरुबर पुन्याला चला... तिकडं कात्रजचं सर्कारी दुद तुमाला मिळंल. कसं म्हनता प्रधानजी?
प्रधानजी: अगदी बरोबर महाराज. सर्वांच्या अडीअडचणीमध्ये आपण अगदी जातीने लक्ष घालता. महाराजांचा विजय असो.
शिपाई: म्हाराजांचा प्रचेंड इजय आसो.
