Thursday, August 31

राष्ट्रभक्ती आणि संस्कृती

नेहमीप्रमाणेच यंदाही वंदे मातरम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. वृत्तपत्रांपासून तर "सबसे तेज" वृत्तवाहिन्यांपर्यंत सर्वत्र हा विषय जोरदारपणे चर्चिला जात आहे.

माझं स्वत:च मत असं आहे की वंदे मातरम म्हणणं हा काही राष्ट्रभक्ति "सिद्ध" करण्याचा निकष नाही. किंबहुना कुठल्याही माणसावर त्याच्या इच्छेविरुद्ध देशभक्तीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची सक्ती करणं हेच चुकीचं आहे.

रोजच आम्हाला "आपण" आणि "ते" अशी शिकवण देणारा आणि सार्वजनिक जीवनातील पावित्र्य, "आपली" संस्कृती, यांचे गोडवे गाणारा संघ परिवार या सक्तीसाठी मोठा आग्रही आहे.

या परिवारातील अभाविप या संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी महाविद्यालयीन निवडणुकीच्या वादातून त्यांच्या एका प्राध्यापकाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1933758.cms

मला माहित असलेल्या माझ्या संस्कृतीत तर गुरूला देवापेक्षाही मोठं स्थान दिलं आहे.
संत कबीर यांनी म्हटलंय...

गुरू गोविंद दोनो खडें । कां के लागूं पाय ॥
बलिहारी गुरू आपने । गोविंद दियों बताय़ ॥

(गुरू आणि देव असे दोघेही एकदमच समोर आल्यामुळे प्रथम कोणाला वंदन करावं असा प्रश्न संत कबीराला पडला. तेव्हा स्वत: देवानेच आपल्यापेक्षा गुरू श्रेष्ठ आहे हे स्पष्ट करुन प्रथम गुरुलाच वंदन करावं हे कबीराला सांगितलं)

संघ परिवार आणि अभाविप यांना अभिप्रेत असलेली संस्कृती कदाचित वेगळी असावी.

ब्लॉग दिवस

३१ ऑगस्ट हा "जागतिक ब्लॉग दिन" म्हणून साजरा केला जातो.

याविषयी अधिक माहिती आपण http://www.blogday.org येथे वाचू शकता.

या दिवसानिमित्त मला आवडलेले चित्रकला विषयाचे काही ब्लॉग्स मी खाली देत आहे...
तुम्हालाही आवडतील

http://www.sumeetsurve.blogspot.com/
http://limbolo.blogspot.com/
http://www.idlesiren.blogspot.com/
http://gabrielepennacchioli.blogspot.com/

तुम्हाला आवडलेले असे वेगळे ब्लॉग्स जरूर कळवा....

Tuesday, August 29

नवं नवं ते हवं

प्रसंग म्हटला तर अगदी साधाच...

कोंदिवड्याच्या प्रपात-अवतरणावरुन( waterfall-rappelling ला निखील ने सुचवलेला हा प्रतिशब्द) परत येत होतो. मिनी बस मध्ये बसायला ४० आसनं होती... आणि आम्ही लोक होतो ३९. म्हटलं चला एक एक्स्ट्रॉ सीट आहे तर मस्त पाय पसरुन बसावं... तेवढंच बरं वाटेल. बसमध्ये सगळे लोक बसून झाल्यावर ते रिकामं आसन काही दिसेना. थोडं जास्त बारकाईने बघितलं तेव्हा त्या आसनावर भूमिकानं तिची बॅग ठेवली आहे असं लक्षात आलं. ती बॅग खाली ठेऊन उपलब्ध होणा़ऱ्या दोन आसनांवर पाय पसरून बसायला काय मज्जा येईल असा विचार मनात आला आणि ती बॅग खाली ठेवण्यासाठी मी वर उचलली. बॅगेला हात लावल्याबरोबर मागून जोरदार आवाज आला... "ए योगेश, बॅग खाली ठेवू नकोस रे... नवीन घेतली आहे ती... खराब होईल."

बसमध्ये बसलेल्या सगळ्यांना कोणीतरी बकरा पाहिजेच होता... त्यांना आता भूमिकाच्या रुपात मोठाच चान्स मिळाला. तिची नवीन बॅग जपण्यासाठी चाललेल्या धडपडीवर सगळ्यांनी भयंकर कॉमेंट्स वगैरे मारुन तिला अगदी जेरीस आणलं. (Btw टॉम अँड जेरी या प्रसिद्ध कार्टून मालिकेतील टॉम मांजर जेरी उंदराला ज्या प्रकाराने सतावते बहुधा त्यावरुन "जेरीस येणे" हा वाक्प्रचार मराठीत आला असावा असा माझा अंदाज आहे... असो). भूमिकानं मात्र सगळ्यांच्या कॉमेंट्स शिताफीनं परतवून लावत आपली नवी बॅग शेवटपर्यंत आसनावरच राहील हे पुरेपूर पाहिलं.

खरंच कोणतीही नवी वस्तू कालांतराने जुनी तर होणारच असते. तरी पण तिला नवं ठेवण्यासाठी आपणही भूमिकाच्या भूमिकेत अनेकदा शिरतो. ती गोष्ट आपल्या विशेष आवडीची असेल तर आपले प्रयत्न जास्त असतात. आणि ती आपल्याला विशेष प्रिय नसली तरीही होता होईल तोवर ती नव्यासारखी ठेवण्यावर आपला कटाक्ष असतोच. आपणही आपले ठेवणीतले कपडे, पैसे देऊन विकत आणलेली पुस्तकं( ही वस्तू आजकाल दुर्मिळ झाली आहे म्हणा) या गोष्टी नव्यासारख्या राहाव्यात किती जिवापाड जपत असतो.

बऱ्याच वेळा तर आपली प्रिय असलेली वस्तू सर्वांनी जरूर पहावी पण ती थोडीसुद्धा खराब होऊ नये अशीही आपली अपेक्षा असते.

आमचे एक मित्रवर्य तर अगदी आपल्या खिशात असणाऱ्या सगळ्या नोटा संपणारच आहेत हे माहित असूनसुद्धा आधी खराब, जुन्या दिसणाऱ्या नोटा संपवतात आणि मगच नव्या दिसणाऱ्या नोटा बाहेर काढतात. चेष्टा नाही... प्रत्यक्ष पाहिलेलं आहे... (संजू, हे तुझ्याबद्दल नाही बरं का... :) )

वरकरणी निरुपद्रवी वाटणारा हा नव्याचा सोस प्रसंगी मोठा धक्कादेखील देउन जातो बरंका... नवंनवे हिंदी चित्रपट पाहण्याची आवड जर एखाद्याला असेल तर त्याने नील अँड निक्की सारखे भयावह चित्रपट
थिएटर मध्ये "फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो" बघितले असण्याची दाट शक्यता आहे. आणि यातूनही त्याची नवे चित्रपट पाहण्याची आवड टिकून असलीच तर सलमान खानचा "सावन" हा चित्रपट त्याची पुरती खोड मोडेल यात शंकाच नाही. (माझी खोडही "ढाई अक्षर प्रेम के" या चित्रपटाने चांगलीच मोडली... त्याचा नायक अभिषेक बच्चन नंतर "सोऽऽऽऽऽ हॉट" झाला हा भाग अलहिदा)

मात्र नव्याची ही आवडच खरं तर माणसाच्या प्रगतीचं कारण आहे. जर आपण "जुनं ते सोनं" असं मानून त्यालाच कवटाळून बसलो असतो तर एव्हाना माणूस गुहेतून बाहेरदेखील आला नसता. अवतीभवती दिसणाऱ्या मोबाईल फोन, संगणक, घड्याळ या सगळ्या गोष्टी या नव्याच्या प्रेमापोटीच जन्माला आल्या आहेत ना!

Saturday, August 26

दोस्त बना दुश्मन

थांबा थांबा, हे शीर्षक वाचून तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. तुमची जर अपेक्षा असेल की तुम्हाला एखाद्या पाच आयटम सॉंग्ज आणि नऊ रेप सीन्स असणाऱ्या तुफान हाणामारी युक्त चित्रपटाची "ष्टोरी" पुढे वाचायला मिळेल तर येथे तुमची मोठीच फजिती होईल. असं काहीही इथं वाचायला मिळणार नाही.

माझे मित्र असलेले लोक हळूहळू शत्रू कसे होतात याची ही एक कथा:

माझे जीवन आरामात चालू आहे. दोन वेळा गिळायला मिळत आहे. टीव्ही पाहायला मिळत आहे. केबलवाल्यांचा संप चाललेला नाहीये. लोडशेडिंग बंद आहे. खड्डयांमधून रस्ता शोधण्यात मला यश मिळत आहे. कुणीही मित्र मला करण जोहरचा क्रांतिकारक चित्रपट "कॅंक" पाहायचा आग्रह करत नाहीये. जेवताना पाणी मागितले तर "स्वत: उठून घ्यायला काय झालं" असं न बोलता, आमचा लहान भाऊ हातात ग्लास भरून देत आहे. अगदी कंडक्टर सुद्धा १० रुपये दिल्यावर वस्सकन न ओरडता १ रुपया इमानेइतबारे परत करत आहे.

सुख सुख म्हणतात ते हेच काय या गहन प्रश्नाचा मी तत्त्ववेत्त्यांप्रमाणे विचार करत असताना अचानक Breaking News मिळते की माझ्या एका मित्राने नवीन मोबाईल घेतला आहे. तिसराच कोणीतरी मला ही खबर देतो.

ही Breaking News मिळाल्यावर आम्ही दोघे मित्र जेव्हा प्रथम भेटतो. तेव्हा आमचा संवाद अगदी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच होतो.

मी: काय रे संजू. नवीन मोबाईल घेतलास म्हणे.
संजू: हूं.... (नवीन मोबाईल हातात असल्यामुळे संजूचं माझ्या बोलण्याकडं लक्ष नाही)
मी: कोणता घेतलास रे? बघू ना जरा कसा आहे तो.
संजू: (एकदम सावध होतो) काही नाही रे... असाच घेतलाय... साधाच आहे.... काही विशेष नाही. (संजू एकदम defensive वगैरे म्हणतात तसा.)
मी: पण मला तर पक्या म्हणत होता की तू नोकिया N70 घेतलाय ते.
संजू: (मनातून अतिशय खूश पण वरकरणी पक्याला शिव्या देत) च्यायला या पक्याला काही काम नाही. सगळीकडं सांगत सुटलाय साला.
मी: बघू तर खरं...

शाहरूख खानच्या चित्रपटांप्रमाणे सपक असणारा हा संवाद मात्र पुढच्या अनेक डोकेदुखींचं कारण बनतो आणि माझ्या सुखात मिठाचा खडा पडतो.

आपला मोबाईल हा आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या शोधानंतर लागलेला सर्वात महान गोष्ट आहे असा संजूचा ठाम विश्वास आहे. इथं संजूच्या मोबाईल मध्ये दोन कॅमेरे आहेत! पुढच्या बाजूला एक आणि मागच्या बाजूला एक. त्याच्या कॅमेऱ्याचं Resolution आणि zoom हा देखील मोबाईलमधला एक चमत्कार आहे. संजूबरोबर केव्हाही बाहेर गेलं आणि अजून तिसरा मित्र भेटला की त्याच्या कॅमेऱ्याचं Demonstration करण्यासाठी संजू मला मॉडेल म्हणून वापरतो. फूटपाथच्या एका कडेला मला उभं करून ते दोघं दुसरया बाजूला उभे राहतात. "थोडा इकडं हो", "जऽऽऽऽरा तिकडं", "अरे पलीकडं बघ काय सही डाव उभी आहे" हे ऐकून मी पलीकडं पाहतो तर संजू आणि आमचा मित्र लगेच "तुला नाही रे, तू इकडंच बघ, तिकडं नको बघूस, आता सगळेजण इकडंच बघायला लागलेत" असं चिडून बोलतात.

दुसरा कॅमेरा हा पहिल्या कॅमेऱ्याची "स्टेपनी" म्हणून आहे का असं संजूला विचारलं तर तो न चिडता पहिला कॅमेरा आणि दुसरा कॅमेरा यांच्या मधला फरक शास्त्रोक्त भाषेत मला समजावू पाहतो. पण मला VGA आणि 3x यातलं एक अक्षर कळत नाही. मग मात्र तो चिडून "तुला नको त्या गोष्टी बरोबर समजतात आणि ही सोपी गोष्ट कशी डोक्यात घुसत नाही असं बोलून निघून जातो.

त्याच्या कॅमेऱ्यात असणारी Bluetooth ची सोय ही देखील मला तोंडात बोट घालायला लावते. Mobile Operator ला एकही पैसा न देता दोन मोबाईल्स मध्ये Data (म्हणजे अश्लील साहित्य) पाठवण्याचा हा खेळ संजू आणि माझा अजून एक Tech Savvy मित्र तासनतास खेळत बसतात. या खेळात मी पण एकदा भाग घेउन पाहिला पण रात्री मोबाईल चुकून बाबांच्या हातात पडला. तेव्हापासून आजतागायत बाबा माझ्याकडं "वाया गेलेलं कार्टं" अशाच नजरेने पाहत आहेत.

संजूच्या मोबाईलमधल्या अशा अनेक सोयीसुविधांचं वर्णन करायला आभाळाची कागद आणि समुद्राची शाई केली तरी कमीच पडेल.

मोबाईलच्या नादी लागलेला संजू हळूहळू मला विसरून जातो आणि माझ्या शत्रूंच्या कळपात सामील होतो.

मात्र रोज नवनवीन मोबाईल्स बाजारात येत आहेत आणि माझ्या शत्रूंच्या संख्येत भर पडत आहे हीच काय ती दु:खाची बाब....

Wednesday, August 23

गणपती आला...

गबुराव आणि छबुराव हे दोन गणेश मंडळांचे (अर्थातच) खंदे कार्यकर्ते आहेत.

गबुराव: आवो छबुराव, झाली का नाय तुमची डेकोरेशनची तयारी. आम्हाला सांगा तरी तुमचा डेकोरेशनचा इशय काय हाय ते...


छबुराव: ते आमचं शीक्रेट आहे. ह्या टायमाला तुमाला तर अजाबात सांगनार नाही. मागच्या टायमाला आमी डेकोरेशनमंदी शायिस्तेखानाची बोटं तोडणार ते तुम्हाला आदीच मायती होतं, म्हनुन तुमी पण अफजुलखानाचा मर्डर अरेंज केला आनी आमच्या हातातोंडाशी आल्यालं ऐतिहासिक गटाचं बक्शीस हिसकावून घेतलं.


गबुराव: आवो होतं असं कदी कदी. तुमी काय ते मनाला लावून घेता. ह्या टायमाला आम्ही फकस्त लायटिंग करनार हाये. नारायनगावच्या 'राजेस लायटिंग' ला सुपारी पन दिल्याली हाय. आनी बाकीचा पैसा सांस्क्रुतिक कारेक्रमावर खर्च करनार हाय.


छबुराव: तरी पन म्या तुमास्नी आमचा प्लॅन सांगनार नाय. मागच्या टायमाला दुसर्‍या नंबर मिळाल्यावर तो बक्शीसाचा नारळ पोरांनी आमच्याच डोसक्यात फोडायचा बाकी ठेवला होता. आनी या टायमाला तर विलेक्शन मुळं आमदार सायबांनी जंगी बक्शीस ठेवलेली हायेत... आमाला काय बी चानस घ्यायचा नाय.


गबुराव: आवो नारळ नाय म्हनायचं... आता धा दिवस श्रिफल म्हनायचं. गनपती नाय फकस्त 'श्री' म्हनायचं. कवा शिकनार तुमी? म्हनून म्हनतो मला सांगा तुमी काय करनार हाय ते? कसं हाये आपल्या दोन्हीबी गनेश मंडळांनी जर एकच इशय घेतला तर गावकरी तोंडात शेन घालतील आपल्या. आनी बक्शीस बी मिळनार नाय.

छबुराव: नाई तरी तुमी डेकोरेशन करनारच नाय म्हटल्यावर तुमी त्याचा लई इचार कशापायी करताय? आमी ह्या येळेला सामाजिक इशय घेउन डेकोरेशन करनार हाय. याच्या पुडं आपन येक आक्शर बी सांगनार नाय.


गबुराव: आवं चिडताय कशापायी. म्हनजे बगा आमी सांस्क्रुतिक कारेक्रम करनार आनी तुमी सामाजिक इशय घेउन डेकोरेशन करनार म्हटल्यावर भांडनाचा सवाल येतोच कुठं? सांस्क्रुतिक कारेक्रमाची समदी तयारी आमी कंप्लेट केलेली हाये. पार पोलीसांकडुन रात्री १० नंतर लाउडस्पीकर लावायची पर्मिशन पन काढून ठेवली हाये. परत आपल्याला खिटखिट नाय पायजेल.


छबुराव: म्हनजे अगदी जंक्शन कारेक्रम दिसतोय म्हना की... आनी दर येळेला ठरलेला मंगला नारायनगावकरनीचा तमाशा नाय काय मंग या टायमाला तुमच्या मंडळातर्फे?


गबुराव: मार गोळी त्या नारायनगावकरनीला. आता कसं आपन संस्क्रुती जपाया पायजे. म्हनूनच सांस्क्रुतिक कारेक्रम करन्याची आयड्या शिंदे मास्तरानी सांगितली.

छबुराव: आसं आसं... म्हनजे पयल्याच टायमाला आपल्या दोनीबी मंडळांचे इशय येगयेगळे हायेत म्हनायचं. म्हनजे आपन एकमेकांना आपापलं शीक्रेट सांगायला काय बी हरकत नाय म्हनायची. आसं करा पयलं तुमी आमाला सांगा तुमी असा कोनता सांस्क्रुतिक कारेक्रम आयोजित केलेला हाये ते? "आपला मराठी बाना" वाल्या अशोक हांडेला बोलावताय का "वर्शा उसगावकर नाईट" ला सुपारी दिलीया?


गबुराव: आवो कोनत्या युगात वावरताय तुमी राव. ह्यावेळेला एकदम नवीन कारेक्रम ठरवलाय. आमी राखी सावंतला सुपारी दिली हाये... पोलिसांनी काय बी खिटखिट केली नाय. लगेच पर्मिशन.


छबुराव: आरं तिच्या... आवो आमचा सामाजिक इशय बी राखी सावंतच हाये. राखी सावंतचा मिकाने घेतलेला मुका आपल्या समाजासाठी कसा हानीकारक हाये हेच आमी दाखवनार होतो. पोरं बी लई खुश होती. आता झाली का पंचाईत.


गबुराव: आवो असं काय करताय छबुराव... तुमी सामाजिक मधून एन्ट्री करा आनी आमी सांस्क्रूतिक मधून करतो... म्हनजे दोगांच्याबी गनपतीला बक्शीस मिळंल.... बोला गनपती बाप्पा....

छबुराव: मोरया...

Tuesday, August 22

फरक

प्रसंग पहिला:

सकाळचे ८.०० वाजले आहेत. रेडिओ मिर्ची (इट्स हॉट...You know) वर चाललेली गाणी ऐकत मी ऑफिसला जायची तयारी उरकतो आणि घराजवळच्या बस स्टॉप वर येऊन पीएमटी ची वाट बघत थांबतो.

८.१५: आपल्याला जिकडे जायचे त्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेला जाणार्‍या भरपूर बसेस दिसत आहेत पण मला हवी असलेल्या दिशेला जाणारी बस काही येत नाहीये. थोडा वेळ उजव्या आणि त्याचा कंटाळा आल्यावर डाव्या पायावर भार देत मी उभा आहे.

८.३०: हवी असलेली बस अजूनही आलेली नाहीये... ८.३५ पर्यंत वाट पहावी आणि तरीही बस नाही आली तर पुढच्या चौकातल्या सिग्नल वर जाऊन रिक्षा करावी असा विचार मी करतो.

८.३३: अखेर समोरून मला हवी असलेली बस येताना दिसली. मी लगेच हात वगैरे करून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. आपण प्रपोज केल्यावर नकार दिलेली मुलगी अचानक समोर रस्त्यावर दिसली तर तिचा (अभागी वगैरे) प्रियकर जसा रस्ता बदलेल तसाच बस ड्रायव्हर झटकन लेन बदलतो आणि शक्य तितक्या लांबून बस घेऊन निघून जातो. मी शिव्या देण्याशिवाय दुसरं काही करूच शकत नाही. नवीन शिकलेल्या इंग्रजी शिव्या (शेजारच्या मुलीला ऐकू येतील न येतील अशा रितीने) पुटपुटतो. (उगाच तिला वाटायला नको की मी अगदी "हा" आहे म्हणून.) मनात मात्र लहानपणापासून असंख्य वेळा दिलेल्या अस्सल शिव्या त्या ड्रायव्हरला हासडतो.

८.३५: अरे हे काय... माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही... मला हवी असलेली अजून एक बस मागून येत आहे... आश्चर्य म्हणजे ड्रायव्हरने लेन बदलली नाहीये... आणि तो बस हळूहळू करत (बसस्टॉप सोडून २० फूट पुढे) बस थांबवतो. मला फारच आनंद झाला आहे. रेफ्युजी, ढाई अक्षर प्रेम के वगैरे चित्रपट पडूनदेखील "सरकार" हिट झाल्यावर अभिषेक बच्चन ला जेवढा आनंद झाला असेल त्याच्याशीच याची तुलना होऊ शकेल. पण तो आनंद एन्जॉय वगैरे करत न बसता मी हातातली बॅग सावरत पळत पळत जाऊन बस पकडतो.

८.३७: कंडक्टर (सायेब) माझ्यासमोर उभे आहेत. मी १० रु. ची नोट काढून त्यांना देतो आणि सांगतो "एक डांगे चौक". कंडक्टर नोट घेण्यास नकार देतो त्याला सुट्टे ९ रुपये हवे आहेत. ऑफिस सुटल्यानंतर जंगली महाराज मंदिर किंवा कृषी महाविद्यालयाच्या सिग्नलवर रोज संध्याकाळी २ तास बसण्याचा side business केल्याशिवाय त्याला रोज सुट्टे ९ रुपये देणे मला शक्यच नाही. उरलेल्या १ रुपयावर पाणी सोडून मी शेवटी एका सीटवर "स्थानापन्न" होतो.

प्रसंग दुसरा:
तोच दिवस

८.५७: बस डांगे चौकात मला उतरवते आणि हिंजवडीला जाणार्‍या सहा आसनी रिक्षांच्या घोळक्याकडे मी जातो. रिक्षात बसलेले किंवा रिक्षा शेजारीच उभे असलेले डायवर लोक मला अतिशय प्रेमळ स्वरात बोलवत आहेत. अचानक मला मी "Axe" च्या जाहिरातीत काम करत आहे की काय असा भास होऊ लागतो... एवढं प्रेम मला कुठेही लाभलेलं नाहिये. एक दोन ड्रायव्हर तर अगदी माझा हात खेचून त्यांच्या रिक्षात बसवण्यासाठी अगदी आतुर झाले आहेत. रामाच्या गळ्यात वरमाला घालणार्‍या सीतेच्या थाटात मी एक रिक्षा निवडतो आणि त्यात मागच्या बाजूला बसतो. (तिथे माझ्या आधी ७ सीता येऊन बसल्या आहेत!)

९.२३: सहा आसनी रिक्षा मला हिंजवडी आयटी पार्क मधील हॉटेल तमन्ना समोर सोडते... सहा आसनी चालकाला भाडे देताना त्याची थोडी परिक्षा घेण्यासाठी मी त्याच्यासमोर ५० रू. ची नोट करतो. (सीतेच्या भूमिकेतून अजून बाहेर आलो नाहीये). अजिबात कुरकुर न करता तो मला चक्क ४३ रुपये परत करतो. (शिवाय त्यात एकही नोट फाटकी नाही!). मला माझ्या निवडीचा अगदी अभिमान वाटतो!


खरंच सहा आसनी रिक्षांना महापालिका हद्दीत बंदी घालून पुणेकरांवर महापालिकेने मोठाच अन्याय केला आहे...

Saturday, August 19

Thumbdrive

एका संगणकावरील माहिती दुसर्‍यावर नेण्यासाठी सोयीचे म्हणून सध्या Thumbdrives ची चलती आहे.

इथे दाखवलेला Thumbdrive मात्र खरंच नावाला जागणारा आहे...

चित्रातल्या या वस्तूला मराठीत अंगठेबहाद्दर म्हणूया का?

बघा अजून वेगळा शब्द सुचतोय का कुणाला?

Friday, August 18

कॅन्क

का रे "कॅन्क" ला येणार का?" मित्राने मला विचारले तेव्हा मी उडालोच... म्हटलं हे "कॅन्क" काय प्रकरण आहे? जमलेले सगळेजण खो-खो हसले. " ये PSPO नही जानता" च्या धर्तीवर "ये "कॅन्क" नही जानता" असा माझी अजून थोडीशी खेचण्याचा कार्यक्रम पार पडला. मी नेहमीच्याच खिलाडूवृत्तीने (म्हणजे वरकरणी दात दाखवत पण मनातून शिव्या देत) हा प्रकार सहन केल्यावर "कॅन्क" म्हणजे "कभी अलविदा ना कहना" अशी माझ्या ज्ञानात भर घालण्यात आली. एवढा वेळ "कॅन्क" म्हणजे वॉटर टॅन्क सारखा काही तरी प्रकार असावा अशी मला शंका येत होती.

तर "कॅन्क" (म्ह. "कभी अलविदा ना कहना") हा करन जोहरचा नवीन चित्रपट. मला त्याच्या चित्रपटाबद्दल उत्सुकता असण्याचं काही कारणच नव्हतं. एक तर त्याचे चित्रपट भलतेच प्रेमळ वगैरे असतात आणि माझा आणि (त्याच्या चित्रपटात दाखवण्यात येणार्‍या) प्रेमाचा तितकाच संबंध आहे जितका मल्लिका शेरावतचा कपडयांशी. दुसरी गोष्ट म्हणजे याच्या चित्रपटात बहुधा सगळे कलावंत मध्यांतरानंतर नाट्यपूर्ण वगैरे कलाटणी घेऊन अचानक रडू लागतात. आता टीव्ही वरच्या सगळ्याच वाहिन्यांवर हे असे रडके कार्यक्रम पाहण्याची (फुकटात) सोय असताना तोच प्रकार परत पैसे देऊन सिनेमागृहात कशाला बघायचा असं माझं प्रामाणिक (आणि त्यामुळंच अतिशय अप्रिय) मत आहे.

एका दृष्यात राणी मुखर्जी रडते, दुसर्‍या एका दृष्यात शाहरूख रडतो, तिसर्‍या एकात अमिताभसमोर सगळेजण रडतात हे दाखवणारे "कॅन्क" चे प्रोमोज मात्र मी नाईलाजाने बघितले आहेत. आजतक लावावा तर "हा चित्रपट करताना 'अमितजींनी' मला कशी मदत केली" हे सांगणारी राणी मुखर्जी दिसते, एम टीव्ही लावावा तर "शाहरूख खान कसा fantastic आहे हे सांगणारा करन जोहर दिसतो" आणि NDTV लावावा तर "करन जोहर कसा देशातील सर्वात ज्ञानी, हुशार, हरहुन्नरी आणि प्रतिभावंत दिग्दर्शक आहे" हे पटवण्यात आपलं अभिनयकौशल्य(!) पणाला लावणारा शाहरूख दिसतो शेवटी मी कंटाळून Cartoon Network (किंवा घरात कोण नसेल तर FTV) लावतो.

त्यात परत याच्या चित्रपटांची पाककृती पण ठरलेली असते... तीच पंजाब दा मिट्टी ची (सौंधी सौंधी) खुशबू, सरसों दा साग आणि मक्के दी रोटी, चित्रपटात कधीतरी एकदा वंदे मातरम किंवा सारे जहॉंसे अच्छा, मोठ्ठ्या घरात आजोबांपासून ते नातवांपर्यंत एकत्र नाचणारे सगळे, नेहमी दुसर्‍याच्या बायका किंवा प्रेयसींच्या मागे लागणारा शाहरूख आणि चित्रपट संपत आला की २६ जुलै च्या पावसाला देखील लाजवाणारा सगळ्यांचा अश्रूपात. हे सगळं पाहून मला "पॅरीसमधील रंगीला रसूल" सारखं नवीन जगातच आल्यासारखं वाटतं.

त्यापेक्षा मी सनी देओल चा नक्षा किंवा रामगोपाल वर्माचा शिवा बघेन. आताच टीव्हीवर यांचे प्रोमोज बघितलेत. दोन्हीमध्ये तुफान हाणामारी, गोळीबार, बॉम्बस्फोट आहेत. व्हिलनच्या डोक्यावर पियानो आपटून त्याला मारणारा सनी पाजी आणि दुसर्‍या पो. इन्स्पेक्टर ला टेबलवर पाडून त्याचा हात मोडणारा मोहित हे बघून माझी उत्सुकता भलतीच वाढली आहे. कॅन्क मधल्या अश्रूंच्या टॅन्क मध्ये बुडण्यापेक्षा हे बघितलेलं बरं...

Monday, August 7

कोंदिवडे

सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो की कोंदिवडे हे गावाचं नाव आहे... खाण्याचा पदार्थ नव्हे... तेव्हा कुणी हा पदार्थ तयार करायची "पाककृती" इथे मिळेल या अपेक्षेने पुढे वाचू नये.

भीमाशंकरच्या ट्रेक वरून आल्यावर जाम थकलो होतो. एक दिवस सुटीपण घेतली होती. त्यामुळं केदारने ज्यावेळी waterfall-rappelling ला येणार का असं विचारलं तेव्हा जाऊ की नको असा थोडासा विचार करावा लागला. अर्थात फक्त थकवा हेच कारण नव्हतं. एक म्हणजे भीमाशंकर वरून उतरताना तीन चार वेळा पडल्यामुळे माझा डावा पाय आणि उजव्या हाताची करंगळी दुखावली गेली होती. तशी ही अडचण फारच लहान होती. कारण आमचं "शालेय जीवन" संपून बरीच वर्षं झाल्यामुळं करंगळी वर करून दाखवण्याचा प्रसंग येणार नव्हता. आणि तशीच वेळ आली तर डाव्या हाताच्या करंगळीचा उपयोग करता आला असता. :)


आणि दुसरं म्हणजे भीमाशंकरला इतकं भिजलो होतो की पाण्याचा अक्षरश: कंटाळा आला होता. होस्टेलमध्ये असताना चुकवलेल्या सगळ्या आंघोळींचा backlog भीमाशंकर मध्ये भरून निघाला होता. ;) अजून दोन महिने जरी आंघोळ केली नाही तरी काही फरक पडणार नाही एवढं पाणी तिथं अंगावर घेतलं होतं. तसं धबधब्याचंही फारसं अप्रूप राहिलं नव्हतं. सोसायटीच्या गच्चीच्या पाईपातून खाली येणारं पाणी काही धबधब्यापेक्षा कमी नव्हतं.


पण म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही... त्यामुळं जास्त विचार न करता एका पायावर (दुसरा दुखत असल्यामुळं) मी झटकन तयार झालो.

हा event कर्जत पासनं जवळच असलेल्या कोंदिवडे गावाजवळच्या एका डोंगरात होता. सकाळी ६ वाजता पुण्याहून निघालेली आमची बस साधारण सव्वादहा पर्यंत कोंदिवडे गावात पोचली. तिथल्या जवळच्याच एका गोठ्यात(!) कपडे वगैरे बदलून आम्ही धबधब्याकडे वाटचाल सुरू केली. धबधब्याकडे जाणार्‍या पायवाटेवर सुरुवातीला खूपच चिखल होता. अजून थोडा जरी जास्त चिखल असता तर नायक चित्रपटातल्या अनिल कपूर प्रमाणे आम्ही चिखलाने पूर्ण भरुन निघालो असतो.


४०-४५ मिनिटं चालल्यावर तो धबधबा एकदाचा दृष्टीस पडला.

१५०-२०० फूट उंचीच्या धबधब्याच्या अगदी वर योगेश, मनोज, राणे वगैरे "धुमकेतू मंडळी" उभी होती. खाली असलेल्या २-३ गुहांमध्ये आमच्या बॅगा वगैरे सामान ठेवून आमची १० जणांची पहिली तुकडी rappelling करण्यासाठी वर गेली. वर धुमकेतू मंडळींनी सर्वांना संरक्षक पट्टे (harness) बांधले. मला पट्टा बांधायचं काम केदारने त्याच्या हातात घेतलं होतं.

"समोरुन हात घाल", "नको नको... मागून हात घाल", "अरे चुकलं चुकलं, थांब इकडून घालून पाहू" असं तीन चार वेळा झाल्यावर एकदाचा तो पट्टा माझ्या कंबरेला (केदारच्या मते) व्यवस्थित बसला. मी तो परत एकदा यतिन कडून चेक करून घेतला तर त्याची एक क्लिप लावलीच नव्हती असं लक्षात आलं.

पट्टे लावून सगळेजण आपापला नंबर येण्याची वाट बघत "कतार में" उभे राहिले. आदित्य, प्रीती, शेखर खाली गेल्यानंतर माझा नंबर आला. अतिशय घसरड्या दगडांवरून धडपडत दोरीच्या सहाय्याने एकदाचा निळ्या ताडपत्रीवर जाऊन उभा राहिलो. इथनं अजूनही खाली किती खोल आहे याचा काही अंदाज येत नव्हता. पहिल्यांदाच rappelling करत असल्यामुळं आवश्यक असणार्‍या काही सूचना धुमकेतूंनी दिल्या.

दगडावर पाय आपटू नये म्हणून गुडघ्यात पाय
वाकडे करू नये. सगळं वजन दोरीवर देणे वगैरे सूचना परत परत वदवून घेतल्या आणि खाली उतरायला सुरुवात कर असं सांगितलं.

उतरत असलेल्या दगडाचा आकार इंग्रजी P अक्षरासारखा होता. सुरुवातीला पायाखाली असलेल्या दगडाचा आधार घेत घेत खाली उतरायला सुरुवात केली. धबधब्याचं पाणी डोक्यावर आणि पाठीवर जोरजोरात फटके मारू लागलं होतं. ह्या फटक्यांपासून डोकं वाचवावं म्हणून डोकं खाली वळवलं तर मानेवर पाण्याचा जोरदार फटका बसला आणि डोक्यात झिणझिण्याच आल्या. खाली फक्त शेखरची छोटीशी टोपी सोडली तर काही दिसतच नव्हतं. वरून आणि खालून लोक काहीतरी ओरडत असावेत. पण पाण्याच्या आवाजात काहीच ऐकायला येत नव्हतं. थोडंसं अजून खाली आल्यावर पायाखालचा दगडाचा आधार संपला आणि सगळं काही हातातल्या दोरीवर अवलंबून होतं. इकडंतिकडं पाय हलवून आधारासाठी काही सापडतंय का याचा शोध घेण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. एव्हाना अंगावर जोरजोरात आपटणार्‍या पाण्याची सवय झाली होती म्हणा किंवा अंग बधीर झालं होतं म्हणा, त्याचं काही विशेष वाटत नव्हतं. पण नाकातोंडात पाणी जायला लागल्यामुळं श्वास घ्यायला थोडासा त्रास होत होता. हातातल्या दोरीला ढील देऊन हळूहळू खाली यायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की अरे हे तर सोपं आहे. मग वरुन अंगावर येणार्‍या पाण्याचा मारा चुकवण्याचा प्रयत्न करत करत खाली पोचलो.

खाली पाण्याचा जोर फारच जास्त होता. आणि तोल सांभाळणं थोडं अवघड जात होतं. एकदाचा एक दगड खाली पायाला लागला आणि सुरक्षितपणे खाली उतरलो.

असो... आता पाण्याचा खरंच कंटाळा आला आहे. हॉस्टेल मध्ये असताना आंघोळ चुकवता तरी यायची. आता आईबाबा सोबत असल्यामुळं ती सोय राहिली नाही. सध्या मी "dry ice" प्रमाणे "dry water" आंघोळीसाठी कुठं मिळतंय का याचा शोध घेतो आहे.

तळटीप: waterfall rappelling साठी पर्यायी मराठी शब्द कुणाला सुचतोय का?

Friday, August 4

गोडाऊन

सुमेधानं लिहिलेलं बुचाची फुलं वाचताना शाळेतल्या मित्रांची आठवण झाली. (शाळाव्याकुळ झालो म्हणणं हेच योग्य ठरेल). पुणे-नाशिक रस्त्यावर पुण्यापासनं ६० किमी अंतरावर माझं गाव. पहिली ते चौथी पर्यंतच शिक्षण "पुणे जिल्हा परिषद - शाळा नं. १" मध्ये झालं. गावात जिल्हा परिषदेच्या ४ शाळा होत्या. शाळा नं. १ आणि ४ मुलांसाठी, शाळा नं. २ मुलींसाठी आणि शाळा नं. ३ ही उर्दू शाळा होती. आमच्या मुलींबरोबरच्या "सहशिक्षणाची (Co-Ed)" सुरुवात हायस्कूल मध्ये आठवीत गेल्यावर झाली. (मुली एवढ्या उशीरा आमच्या वर्गात आल्या याचं दु:ख अजूनही मनात सलतं). ;)

निलेश हा शाळेतला खास मित्र.

निलेशचं बारदानाचं (म्ह. Jute Bags) दुकान होतं. नीचे दुकान उपर मकान अशी व्यवस्था असलेलं त्याचं घर म्हणजे आमची चोर पोलिस, अंडर-आर्म क्रिकेट खेळण्याची आवडती जागा. त्याचं घर ही त्यावेळची गावातली सर्वात उंच इमारत. बाहेरून जरी इमारत ४ मजली दिसत असली तरी खालचे ३ मजले एकत्र करून त्यांनी त्याचं मोठं उंच गोडाऊन केलं होतं. अर्थात त्या ३ मजल्यांचे pillars आणि beams वगैरे तसेच होते. गोडाउनच्या बाहेर असणार्‍या व्हरांड्यात त्यांचा "कारखाना" होता. कारखान्यात सोनूबाई, बबन वगैरे ३-४ लोक कामं करत. निलेशचे वडील, भाऊ अक्षरश: रात्रंदिवस काम करत. रोज पहाटे ३ वाजता त्यांच्या मालाची कलकत्त्यावरून delivery येत असे. पहाटे ३ ला सुरू झालेलं काम रात्री ११-१२ पर्यंत चाले.

गोडाऊन मध्ये सगळीकडं पोत्यांची बंडलं ठेवलेली असायची. भिंतीवर ठोकलेल्या खुंट्यांवर सुतळी, काथ्यांची बंडलं टांगून ठेवलेली असत. सगळया वातावरणात ज्यूटचा कुबट वास भरून राहिलेला असे. हवेत लहान लहान तंतू उडत. गावात दिवसा रोजच "लोड शेडिंग" असल्याने आतमध्ये कधीही लाईट नसे.

शनिवारी आमची शाळा अर्धा दिवस असे. दुपारी बारा-साडेबाराला शाळा सुटली की निलेशच्या घरी जाउन गोडाऊन मध्ये क्रिकेट खेळणं किंवा असंच टाईमपास करत गप्पा मारत बसणं हा आवडता उद्योग होता.
काही नाही करायचं म्हटलं तरी पहिल्या, दुसर्‍या मजल्याच्या बीमवर चढून खाली ठेवलेल्या पोत्यांच्या बंडलांवर उड्या मारणे वगैरे कामं चालू असायची. राहुल वगैरे अतिउद्योगी लोक तिसर्‍या मजल्याच्या बीम वरूनही उड्या मारण्याचे पराक्रम करत. सुदैवाने कोणाला काही इजा झाली नाही.
त्यावेळच्या लोकप्रिय हिंदी-मराठी सिनेमांमधल्या हिरोंसारखं "कुत्ते कमीने" अशा व्हिलनला शिव्या देत, हाताची दोन बोटं बंदुकीच्या नळीप्रमाणे रोखून किंवा एकमेकांचा हात धरून सोबत उड्या मारण्याचा हा खेळ १-२ तास तरी चालत असे.

पावसाळा हा त्यांचा ऑफ-सीझन. पावसाळ्यात गोडाऊन अर्ध्याहून जास्त रिकामंच असायचं. बाहेर रस्त्यावर सगळीकडं चिखल साठलेला असायचा. त्यावेळी गोडाऊन मध्ये क्रिकेट खेळायला सुरूवात व्हायची. contribution काढून "सहकारी तत्त्वावर" आणलेला ६ रु. ला मिळणारा प्लॅस्टिकचा चेंडू आणि २५ रु ची लाकडी बॅट वापरून आम्ही खेळत असू. "अंडर-आर्म बॉलिंग" आणि "एक-टप्पा-आऊट", "डायरेक्ट भिंतीवर मारल्यावर आऊट हे दोन-तीन नियम असत. निलेशच्या घरासमोरच्या गटारीवरचा पत्रा काढून घेउन त्याचा स्टंप म्हणून उपयोग व्हायचा. साधारण २-३ तास खेळल्यानंतर काहीतरी क्षुल्लक कारणावरून कडाक्याचं भांडण व्हायचं आणि खेळ बंद केला जायचा. प्रत्येक जण "परत इथे खेळायला येणार नाही" अशी शपथ घेउन घरी चालू लागायचा. मात्र पुढच्या वेळी सगळेजण हजर. गटारीवरचा काढून घेतलेला पत्रा परत तिथं ठेवण्याचं काम निलेशलाच करावं लागायचं.

त्या गोडाउन मध्ये घालवलेले अनेक क्षण अविस्मरणीय झाले आहेत. आजही ज्यूटचा कुठं वास आला तरी मन लगेच परत भूतकाळात जातं. कानात प्लॅस्टिकच्या बॉलचा टप-टप आवाज येऊ लागतो. आणि वाटतं चला उड्या मारायला सुरुवात करूया.

Thursday, August 3

भीमाशंकरचा ट्रेक

दोन आठवड्यांपूर्वी "धुमकेतू ट्रेकर्स" बरोबर भीमाशंकरला गेलो होतो...
त्याबद्दल थोडंसं...

मित्रांना पाठवलेल्या मेल मधलंच खाली चित्र स्वरूपात "upload" केलं आहे...
















Wednesday, August 2

प्रश्न आणि आपण

इंग्रजीत वाचलेल्या एका लेखाचा स्वैर अनुवाद...

आयुष्य खरंच सोपं की अवघड?
आयुष्य अवघड आहे हेच खरं तर अंतिम सत्य आहे. बुद्धाने सांगितलेल्या "Four Noble Truths" मधलं पहिलं सत्य होतं "Life is suffering".

आयुष्य अवघड आहे हे आपण प्रत्येक क्षणाला पाहतो, अनुभवतो. मात्र आयुष्य अवघड आहे याचा एकदा आपण मोकळेपणाने स्वीकार केला तर ते तितकंसं अवघड राहत नाही. किंबहुना आपण ते किती अवघड याची पर्वाच करत नाही.

पण आपल्यापैकी बरेच जण याचा स्वीकार करतच नाहीत. ते लोक आयुष्याबद्दलच्या त्यांच्या तक्रारी उगाळीत बसतात. त्यांना भेडसावणारे प्रश्न किती मोठे, त्यांच्या अडचणी किती बिकट हे ऐकून आपले कान अगदी किटून जातात. त्यांची अपेक्षा असते की "इतरांप्रमाणेच" आपलं आयुष्यही सोपं असावं. पण खरंच जगणं इतकं सोपं आहे का?

आयुष्य ही प्रश्नांची एक शृंखला आहे. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे शिस्त हवी, ज्ञान हवे. ह्या गोष्टी नसतील तर हे प्रश्न सोडवणं अवघड आहे. आणि खरं तर हे प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा वेळ, होणारा त्रास यामुळंच आयुष्य अवघड होतं. हे प्रश्न आपल्या मनात नैराश्य, दु:ख, वेदना, एकटेपणा, न्यूनगंड, पश्चाताप, भीती, राग, अपेक्षाभंग अशा अनेक भावना निर्माण करतात.

ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. कधी कधी तर अगदी शारिरीक वेदनेपेक्षाही जास्त.

मात्र हे प्रश्न सोडवण्याच्या प्रक्रियेमुळेच आयुष्याला अर्थ येतो. हे प्रश्नच यश आणि अपयशाची व्याख्या करतात. हे प्रश्नच आपलं धैर्य, आपलं ज्ञान तपासून बघतात. खरं तर हे प्रश्नच आपल्याला धैर्यवान आणि ज्ञानी बनवतात. आपली मानसिक आणि अध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. बहुधा त्यामुळंच लहानपणापासून शाळेतच मुलांना अभ्यासात प्रश्न दिले जातात.

प्रश्न सोडवताना होणा़ऱया त्रासातून आपण शिकत जातो. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो, त्याच गोष्टी आपल्याला शिकवतात.

हुशार माणसं प्रश्नांना न घाबरता त्यांचं स्वागत करतात ते याच साठी.

मात्र आपण काय करतो. प्रश्न सोडवण्याच्या त्रासाला घाबरून आपण ते टाळण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांना विसरण्याचा प्रयत्न करतो. किंबहुना आपल्याला काही प्रश्न भेडसावत आहेत हेच मान्य करत नाही. प्रश्न सोडवताना होण्यार्‍या त्रासातून काहीतरी शिकण्याऐवजी आपण प्रश्नांपासून दूर पळू पाहतो.

प्रश्न सोडवताना होण्यार्‍या त्रासाची गरज आणि त्याचं महत्त्व याबद्द्ल आपण स्वत:ला कधीतरी शिकवलं पाहिजे. ज्ञान आणि शिस्तीच्या सहाय्याने हे प्रश्न सोडवताना होण्यार्‍या त्रासातून काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. तुम्हीच या जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहात हे तुम्ही सिद्ध केलं पाहिजे. आणि ही गोष्ट जर कोणी मान्य करत नसेल तर तुम्ही तुमच्या कार्यामधूनच ते निर्विवादपणे पटवून दिलं पाहिजे.