Thursday, July 20

सिंह आणि माणूस

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सिंह आणि माणूस यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण यावरून भांडण चालू होते. चर्चेने प्रश्न काही सुटेना. तेव्हा दोघेही लढाईसाठी उतरले.

लढाई बरेच दिवस चालू राहिली. कधी सिंहाचे पारडे जड तर कधी माणसाचे. मात्र दोघेही तुल्यबळ असल्याने निकाल काही लागेना.

पण हळू हळू माणूस थकू लागला. लढाई चालू ठेवणे त्याला अवघड वाटू लागले. काय करावे हे कळेना. अचानक त्याला एक युक्ती सुचली.

दुसर्‍या दिवशी लढाईचा भोंगा झाल्यावर मैदानात उतरण्यापूर्वी माणूस सिंहाच्या तंबूमध्ये गेला. सिंहाला एक चित्र दाखवून तो म्हणाला, "ही लढाई व्यर्थ आहे. आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण याचा निर्णय आधीच झाला आहे. हा बघ पुरावा."

त्या चित्रामध्ये सिंह खाली पडलेला असून माणूस हातात तलवार घेऊन विजयी मुद्रेने त्याच्या अंगावर बसला आहे असे रेखाटले होते.

सिंहाने ते चित्र हिसकावून घेतले आणि दूरवर फेकून दिले आणि तो माणसाला म्हणाला, "हे चित्र माणसाने काढले आहे म्हणून त्यात सिंह खाली आहे, जर सिंहाने काढले असते तर माणूस खाली आणि सिंह विजयी दाखवला असता."

Tuesday, July 11

दिमाख की बत्ती जला दो...

घरी एकदा आलो की हातात रिमोट कंट्रोल घेऊन बसणे हा तर आपला राष्ट्रीय खेळ आहे... आणि या खेळातले आम्ही मोठे पटाईत खेळाडू आहोत... हातात रिमोट कंट्रोल घेऊन या चॅनेल वरून त्या चॅनेल वर उड्या मारणे यात मला हरवणारा है कोई माई का लाल? आजकाल तर कोणताही चॅनेल २ मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाहिला तर आमचा बाब्यादेखील शेजारच्या काकांकडे तुच्छतेने पाहू लागतो... त्यात आता हातात बाटली (शीतपेयाची) घेउन टीव्ही पाहण्याच्या नवनवोन्मेषशालिनी (हुश्श, वापरला बाबा हा शब्द एकदाचा) संकल्पनेमुळे या खेळात का होईना आपण लवकरच ऑलिम्पिकमध्ये एखादे पदक मिळवणार यात शंकाच नाही...

असो तर आपला मूळ मुद्दा आहे जाहिरातींचा... म्हणतात ना ओरडणा~याची बोरं खपतात पण न ओरडणा~याची द्रा़क्षं सुद्धा खपत नाहीत...
आणि जाहिरात तर आता सर्वच प्रसारमाध्यमांचं अविभाज्य अंग झालेलं आहे... जाहिरात हा केवळ माहिती देण्याचाच प्रकार राहिलेला नसून मोठा मनोरंजक कार्यक्रम झाला आहे... नाकापेक्षा मोती जड या उक्तीनुसार काही वेळा तर जाहिराती या मूळ कार्यक्रमापेक्षाही जास्त मनोरंजक असतात... जाहिरात संपून मालिका सुरू झाल्यानंतर हुश्श करणारे लोक नंतर मालिकेपेक्षा आधीची जाहिरातच जास्त बरी होती हे मान्य करतात...

मला स्वत:ला तर जाहिरातीच पाहायला जास्त आवडतात...

काही वर्षांपूर्वी जेव्हा या चॅनेल्स नी उच्छाद मांडला नव्हता तेव्हा काही चांगल्या, निरागस, निरुपद्रवी जाहिराती पाहायला मिळत... "पूरब से सुर्य उगा...." ही "राष्ट्रीय साक्षरता मिशन" ची जाहिरात तर केवळ अप्रतिम... "स्कूल चलें हम" नावाची एक अशीच जाहिरात आजकाल बघायला मिळते... तीदेखील सुंदर आहे... पण "पूरब से" अगदी सहीऽच होती.

टेबलावर ठेवलेल्या नारळाला मोठ्ठी हातोडी वापरून फोडणारा मल्ल पाहिला की आपला ही अपघात झाल्यावर आपलं डोकं अस्संच फुटणार या विचारानं अगदी धस्सं होत असे... मात्र तोच नारळ हेल्मेटखाली झाकून ठेवला की पोटात कसं गार वाटायचं, आता कितीही ठोके मारले तरी तो नारळ काही फुटणार नाही यावर एक वडापावाची पैज मारायला मी तयार असायचो...
गर्द प्रसारबंदी साठी जिन्यावर नाचणारा सापळा... "जा मुन्ना जरा पास की दुकान से नमक तो ले आ" असे मुन्ना ला सांगितल्यावर मधेच भोचकपणे बोलून त्याला आयोडिन युक्त मीठ आणायला सांगणारा उद्धट नातेवाईक यांचा विनाकारणच राग येत असे...

आजकाल जाहिरातींची निरागसता संपली असली तरी त्या फारच मनोरंजक होत आहेत... टेलिशॉपिंग जाहिरातींमध्ये वजन कमी करण्याची साधने पुरवीणा~या जाहिराती तर बेष्टच आहेत. "मेरे दोस्त टोनी ने जब मुझे इस कमाल की चीज के बारे मे बताया तो मुझे बहुत खुशी हुई...." असं हिंदीच्या पुस्तकात देखील वाचायला न मिळणा~या पुस्तकी भाषेत अनुवादित केलेल्या या जाहिराती पाहून हसून हसून पोट दुखतं... या टेलिशॉपिंग प्रकारातील एक नवीनच जाहिरात म्हणजे.. "बहुत प्रयास करने के बावजूद आपको सक्सेस नही मिलती है? इसका एक कारण हो सकता है किसीकी नजर लगना!!" अशी सुरुवात करून पुढे गोल्ड आणि सिल्व्हर पेण्डन्ट घातल्यावर तुमचे शत्रू कसे नामोहरम होतील आणि त्यांच्या "नजरे" पासून तुमचा कसा बचाव होईल हे प्रात्यक्षिकही करून दाखवले जात आहे...
"मजनू ने खायी मिंटो फ्रेस... फिरसे लैला हुई इम्प्रेस... ", "मेन्टॉस.. दिमाख की बत्ती जला दो", "हम क्लोरोमिंट क्यो खाते है?.. दुबारा मत पूछना" या गोळ्यांच्या जाहिराती पाहून हसू न फुटणा~याला तर
हिमेश रेशमियाची सर्व गाणी ऐकण्याची सलग शिक्षा दिली पाहिजे...

त्या मानाने पेप्सी आणि कोकाकोला यांच्या जाहिरातींमधे फारसा दम नाही... नेहमीचेच यशस्वी(!) कलाकार घेउन केलेल्या या जाहिराती फारच बोअरिंग आहेत...

सध्या माझी सर्वात आवडती जाहिरात म्हणजे "दाग अच्छे है..." हे सांगणारी सर्फ एक्सेल ची...
लहान बहीण खड्ड्यात पडली म्हणून खड्ड्यालाच मारणा~या एका मुलाची कल्पना ज्याला सुचली तो खरंच महान... त्या मुलाने देखील या जाहिरातीत अगदी बाप अभिनय केला आहे...

कधीकधी मेल मधून आलेल्या अमेरिकेतील वगैरे जाहिराती पाहायला मिळतात... टेक्निकली फारच चांगल्या असल्या तरी त्या मिळमिळीतच वाटतात...
बरोबर आहे... "क्या आप क्लोजअप करते है?" वगैरे सुंदर गाणी इंग्रजीतून कशी काय लिहिणार ते? आपल्या हिंदी-मराठी भाषेचा ठसका त्यांच्याकडे कुठला... जजबॉं हो अंदर (तभी) तो दिखता है बाहर...

असो... एकूणच नीरस होत चाललेल्या टीव्ही वर थोडी तरी रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न या जाहिराती करतात यात शंकाच नाही.

Friday, July 7

आषाढी एकादशी

आज आषाढी एकादशी...




एकांताचे सुख देई मज देवा ! आघात या जीवा चुकवोनि !! १ !!

ध्यानी रूप वाचे नाम निरंतर ! आपुला विसर पडों नेदीं !! धृ !!

मायबाळा भेटी सुखाची आवडी ! तैशी मज गोडी देईं देवा !! २ !!

कीर्ती ऐकोनिया झालो शरणागत ! दासांचे तूं हित करितोसी !! ३ !!

तुका म्हणे मी तों दीन पापराशी ! घालावें पाठीशी मायबापा !! ४ !!

Thursday, July 6

ब्लॉग वगैरे...

प्रिय संजू,

बरेच दिवस काही तरी वेगळे करावे असे मनात येत होते. "आता जरा घरात लक्ष घाला", असे हिचे म्हणणे पडले. तर मी ब्लॉग वगैरे नवीन गोष्टी सुरु कराव्या असे मुलांचे म्हणणे पडले.

आता ब्लॉग ही काय भानगड आहे हे मी समजून घेण्याचा प्रयत्न केला.

आपल्या शेजारची अनिता नाही का लहानपणी रोज दैनंदिनी वगैरे लिहीत असे... त्याचीच सुधारित आवृत्ती म्हणजे हा ब्लॉग... मला माहित आहे की अनिताच्या उल्लेखाने तुझे मन थोडेसे दुखावले जाणार ते... पण दैवगतीसमोर कोणाचा काय इलाज? तिची दैनंदिनी एकदा चोरून वाचण्याचा प्रयत्न करत असताना आपण पकडले गेलो आणि तिने दोघांनाही जोरदार धपाटे घातले होते हेही आठवले... तेव्हापासून साधे वर्तमानपत्र वाचताना देखील मी हळूच आजूबाजूला पाहून घेतो... कोणी आपल्याला पकडते की काय अशी भीती वाटून जाते... बघ लहानपणी झालेले संस्कार कसे शेवटपर्यंत तसेच राहतात ते... एकूण आपण मराठी माणसं म्हणजे एकदा दुधाने तोंड पोळले की ताकदेखील फुंकून पिणारी... संस्कारावरून आठवलं, आमचा पप्पू म्हणतो की आपण मराठी लोकं फूटबॉलसारख्या खेळात मागं राहायचं कारण म्हणजे कशाला चुकून जरी पाय लागला तरी आपण लगेच त्याच्या पाया पडतो... आजकालच्या मुलांना संस्काराबद्दल प्रेमच राहिलेलं नाही.

तर हा ब्लॉग जरी दैनंदिनी सारखाच असला तरी त्या दैनंदिनी सारखा लपवून मात्र ठेवत नाहीत... उलट इंटरनेट वर प्रसिद्ध करून त्यावर जोर जोरात चर्चा चालू असतात... ह्या नवीन पिढीचे मला तर काही कळत नाही... एक तर privacy च्या नावाखाली आजकालची मुले आपल्याला त्यांच्या कोणत्याही वस्तूला हात लावून देत नाहीत... पण स्वत:च्या अगदी पर्सनल गोष्टी ब्लॉगवर प्रसिद्ध करतात...

अरे पण हा माझा ब्लॉग वाचणार कोण असा मी आमच्या पप्पू ला प्रश्न केला तर तो म्हटला की "आपण फक्त लिहीत जायचे... कोणी वाचो अगर न वाचो... आता हिमेश ची गाणी कोण ऐकतं का? पण तो कसा गाणी म्हणतोच आहे....". कार्ट्याला एकदा चांगला धडा शिकवला पाहिजे... माझी तुलना त्या अनुनासिक हिमेश बरोबर करतो ते... बाकी त्याचंही बरोबरच आहे म्हणा... सर्वव्यापी परमेश्वरासारखा हा हिमेश सर्व चॅनेल्स व्यापून बसला आहे... बरं एखादा न्यूज चॅनेल लावावा म्हटलं तर त्यावर लॅक्मे फॅशन वीक किंवा राखी सावंत प्रकरण चालू असतं... आता मला हे बघायला आवडत नाही असं नाही पण मुलं मोठी झाल्यावर हे बरं दिसत नाही असं हिचं म्हणणं.

तर मी तुला ब्लॉगविषयी सांगत होतो... मला तर वाटते काही दिवसांनी (म्हणजे वर्षांनी) हे ब्लॉग साहित्य मुलांना अभ्यासक्रमात एक नवीन साहित्य प्रकार वगैरे म्हणूनच येईल... आणि आपला ब्लॉग अभ्यासक्रमात लावा म्हणून ब्लॉगचे लेखक विद्यापीठात फिल्डींग वगैरे लावायला सुरुवात करतील... यातही मग प्रस्थापितांचा ब्लॉग... विद्रोहींचा ब्लॉग... दलित ब्लॉग वगैरे वर्गीकरण सुरु होइल... आपण मराठी माणसे एकत्र राहायला शिकणार तो सुदिन... अर्थात हा सर्व प्रकार मराठी भाषा हा अभ्यासक्रमात केवळ एक विषय म्हणून जरी राहिला तरच होईल... आमच्या घरात देखील पप्पू आजकाल मला पॉप्स आणि हिला मा म्हणतो... आणि ई-टीवी मराठी वर "चार दिवस सासूचे" पाहण्यासाठी रोज कार्ट्याबरोबर भांडावे लागते... त्याला अमेरिकेतील मुलं मुली एकत्र राहण्याचे आचरट प्रकार दाखवणारी कोणती तरी "friends" मालिका बघायची असते... एकूणच नवीन पिढीचा आई-बाप यांच्या प्रति आदरभाव कमी होत चालला आहे...

बाकी गावाकडे पाउस वगैरे कसा आहे... इकडे पुण्यात फारच जोरात पाउस सुरु आहे... आपण गावाकडे नाही का ओढ्याला किती पूर आला यावरून पाउस मोजत होतो... पुण्यात मात्र रस्त्यात किती खड्डे पडले यावरून पाउस मोजतात... वर्तमानपत्रामध्ये पावसापेक्षा खड्ड्यांच्याच बातम्या जास्त... इकडे पावसाळा आहे तोपर्यंत काही दिवस गावात येउन राहावे की काय असे वाटते... मात्र मी यायच्या वेळेला तुमचा नेमका दुसराच प्लॅन असल्याचे कळते आणि गावाकडे यायचे राहूनच जाते... मुले मात्र गावाकडे यायला अजिबात तयार नाहीत... त्यांना म्हणे प्रातर्विधीसाठी घराबाहेर शेतात जायला आवडत नाही... आपण नाही का लहानपणी... नको, अशा गोष्टी पत्रात लिहायला आता संकोच वाटतो... शहरात राहायला आल्यापासून इतरांना बरे वाटेल असंच बोलायची आणि वागायची सवय लागली आहे. मात्र आजच्या पिढीला निसर्गाबद्दल प्रेमच राहिले नाही ही गोष्ट मात्रं खरी...

मी एकदा पत्रं लिहायला बसलो की असं खूप लिहीत बसतो... तू जर इथपर्यंत वाचत आला असशील तर पत्रोत्तर नक्की पाठव...

लोभ असावा...

Wednesday, July 5

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

लहानपणापासून पुस्तकं वाचत वाचतंच मोठा झालो.. घरी बघावं तिकडं पुस्तकंच पुस्तकं पडली असतात. घर शिफ़्ट केलं तेव्हा एक छोटा टेम्पो खास पुस्तकांसाठी करावा लागला. पुस्तकांसाठी एक कपाट करावे लागले... आणि आता बघतो तर काय... पुस्तकांनी कपाट तर भरले आहेच... पण मी झोपतो त्या बेडमध्ये देखील एक बाजू पुस्तकांनी भरली आहे. पुस्तकं आवरून आवरून आई वैतागून गेली आहे. निदान तुझी पुस्तकं आवरण्यासाठी एक बाई बघ (कामवाली!!) किंवा आता लग्न तरी कर असा तिनं धोशा लावला आहे.

जे मिळेल ते वाचावे अशी सवयच असल्यामुळे चांगलं वाईट असा विचार न करता अगदी भेळ खायला गेल्यानंतर ज्या कागदावर भेळवाला भेळ देतो तो कागद देखील भेळ खाता खाता वाचत होतो.
तरी काय काय वाचत होतो आणि काय काय वाचायची इच्छा आहे याचा विचार नंदनच्या ह्या ब्लॉग मुळे पहिल्यांदाच केला.

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -
सध्या वाचनात असलेले - अमेरिका (अनिल अवचट )
शेवटचे वाचलेले - कोंडमारा (अनिल अवचट )
विकत घेतलेले - दा विन्सी कोड - मराठी अनुवाद (ले. आठवत नाही.)

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -
'अमेरिका' हे अनिल अवचट यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये लिहीलेले छान पुस्तक आहे. त्यांच्या नजरेला जशी अमेरिका दिसली तशी त्यांनी पुस्तकात उतरवली आहे. अमेरिकन जीवनात असलेले शॉपिंग, टीव्ही यांचे स्तोम. अजूनही असलेले वंशभेद/वर्णभेद, ड्रग्जचे व्यसन, मोडकळीला आलेली कुटुंबव्यवस्था यांचे समर्पक शब्दात चित्रीकरण केले आहे. "मर्फी गो बॅक" या छोटाश्या उतार्‍यात typical अमेरिकन संस्कृतीची झलक मस्त जमून आली आहे.

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके -
अ. कोसला - भालचंद्र नेमाडे
ब. झोंबी - आनंद यादव
ड. पिंगळावेळ - जी. ए. कुलकर्णी
क. काजळमाया - जी. ए. कुलकर्णी
इ. वनवास - प्रकाश नारायण संत

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-
अ. सोनपावले - जी. ए. कुलकर्णी.
आ. एकेक पान गळावया - गौरी देशपांडे (चू.भू.दे.घे.)
इ. पड रे पण्या - र. वा. दिघे
ई. तुंबाडचे खोत - श्री. ना. पेंडसे
उ. जरीला - भालचंद्र नेमाडे

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
वैर्‍याची एक रात्र हे जीएंनी अनुवादित केलेले पुस्तक मला अतिशय प्रिय आहे. हिटलरने ऑश्वित्झ आणि बर्केना येथे उभारलेल्या छळछावण्या. त्यामध्ये लहान मुले आणि स्त्रिया यांच्यावर वैद्यकीय प्रयोगांच्या नावाखाली केलेले अत्याचार. या सर्व प्रसंगांतदेखील जगण्याची दुर्दम्य इच्छा बाळगणारे छळछावण्यातील कैदी यांचे अंगावर अगदी काटा आणणारे वर्णन या पुस्तकात आहे.
जीएंनी इतका सुरेख अनुवाद केला आहे की हे पुस्तक 'तिकडचे' वाटतच नाही.
हे पुस्तक वाचल्यानंतर आपले आयुष्य किती सुरक्षित आहे आणि आपल्या तक्रारी किती लहान आहेत याची प्रथमच जाणीव झाली.

Tuesday, July 4

काही चित्रं

संदीप कडून मिळालेली काही चित्रं...











हम हैं ना... १

जे न देखे रवी... ते देखे कवी असे म्हणतात खरे
पण ह्याच्या सहाय्याने जे कवी देखील पाहू शकत नाही ते तुम्ही पाहू शकता... मी आत्ताच माझ्या गावाचा फेरफटका मारून आलो.

तर मला आलेला एक अनुभव वाचा...
मी नवीन घरी राहायला आल्यानंतर बर्‍याच पेन्डिंग कामांपैकी एक म्हणजे बॅंकेत जाऊन adresss for correspondence चेंज करणे हे होते.
आता शंकराच्या दर्शनाला गेल्यावर आधी नंदीला हात जोडावे लागतात तसे हल्ली बँकेचे काम असले की आधी कॉल सेंटर ला फोन करावा लागतो. आता कॉल सेंटर ही सुविधा की मनस्ताप यावर मोठी चर्चा होऊ शकते. त्यामुळे मी त्यात जास्त शिरत नाही. तर "हम हूँ ना" असे काहिसे ब्रीदवाक्य असणार्‍या बँकेच्या कॉल सेंटरला मी फोन लावला. हे बटण दाबा... ते बटण दाबा... असे करत करत या बँकेच्या नवीन सुविधा, salary slip शिवाय कर्ज मिळण्याची सुवर्णसंधी हे सर्व ऐकल्यानंतर एकदाचा तो मदतनीस फोन वर अवतरला...
प्राथमिक पडताळणी साठी माझी सम्पूर्ण जन्मपत्रिका त्याला ऐकविल्यानंतर त्याने मला माझा माझी अडचण विचारली...
खालील संपूर्ण संवाद इंग्रजी भाषेतून झाला असला तरी मराठी अजूनही वाचणार्‍या पामरांसाठी तो शक्य तेवढा भाषांतर करून सांगत आहे.

मी: "मला माझ्या डी मॅट खात्याचा पत्ता बदलायचा आहे".
तो: "मला माफ़ करा सर पण तुम्हाला तुमचा पत्ता फोन वर बदलता येणार नाही."
मी: "मग मी काय करावे?"
तो: "तुम्ही आमच्या 'कोणत्याही' शाखेमध्ये जाऊन सदर अर्ज भरू शकता..."
मी: "अहो पण मी बँकेच्या साईटवरून पत्ता-बदलाचा अर्ज घेतला आहे... आणि तो भरून १० दिवसांपूर्वीच बँकेच्या ए टी एम मध्ये एका डब्यात टाकला आहे"
तो: "मला क्षमा करा सर पण तुम्हाला प्रत्यक्ष बँकेत जाऊनच हा अर्ज भरावा लागेल...तुम्ही आमच्या 'कोणत्याही' शाखेमध्ये जाऊन सदर अर्ज भरू शकता..."
मी: "ठीक आहे... धन्यवाद..."


शनिवारची सुटी सत्कारणी लावण्याच्या हेतूने मी बँकेच्या घराजवळील शाखेमध्ये सक्काळीच गेलो...
"मला डी मॅट खात्याचा पत्ता बदलायचा आहे"
"माफ करा सर पण या शाखेमध्ये अद्याप डी मॅट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही आपला पत्ता बदल करू शकत नाही.... तुम्हाला शिवाजीनगर शाखेमध्ये जाऊन एक अर्ज भरावा लागेल.."
"पण, cash transfer सुद्धा जर online उपलब्ध आहे तर पत्ता बदल करणे का नाही... "
"बँकेने आपल्या सुरक्षिततेसाठीच ही सुविधा online ठेवलेली नाही!"
"मग मी या शाखेतच हा अर्ज भरून देतो... तुम्ही तो शिवाजीनगर शाखेत पाठवा..."
"तसे करता येणार नाही सर... तुम्हाला प्रत्यक्ष शाखेमध्ये जाऊन हा अर्ज भरावा लागेल..."

आता हा पत्ता बदल करण्यासाठी मला घरापासून २० किमी दूर शिवाजीनगर शाखेत जावे लागणार होते.

Saturday, July 1

Bend it like...

प्रिय संजू,
बरेच दिवस तुला पत्र लिहिले नाही, त्याबद्दल क्षमा मागतो...

इकडे फूटबॉल ज्वर अगदीच वाढला आहे... आपला भारतीय संघ फूटबॉल वर्ल्ड कप साठी पात्रच ठरत नसल्यामुळे कोण जिंकेल याचा विचार न करता आपल्याला इतर संघांच्या सामन्यांचा निखळ आनंद लुटता येतो... Blessings in disguise म्हणतात ते हे असे...

हे सामने बघताना मला आपण लहानपणी खेळत असलेल्या फूटबॉलची आठवण येते आणि हसू अगदी आवरत नाही... छोटा रबरी चेंडू घेऊन खेळलेला तो फूटबॉल विसरणे शक्यच नाही.

इकडे मात्र पाच सहा वर्षांची मुले देखील तो मोठा फूटबॉल घेऊन खेळत असतात... काळ खरेच किती बदलला आहे...
जपान की अमेरिकेतील कोणत्या तरी कंपनीने तर electronically खेळता येणारा फूटबॉल खेळ शोधून काढला आहे...
मला तर वाटते की हा पुढे पुढे हा पायाने खेळण्याचा फूटबॉल तर नामशेष होऊन electronic खेळाचेच विश्वचषक सामने होतील...

रोनाल्डो, बेकहॅम सारखे खेळाडू मैदानावर पळताना पाहून एक विचार सारखा मनात येतो... एवढे पैसे कमाविणारे हे खेळाडू घाम गाळत बॉलमागे का पळत असतात... त्यापेक्षा ह्यांनी रोजंदारीवर एखादा बदली खेळाडू मैदानावर पळवावा व बॉल गोलपोस्ट जवळ आल्यावर आपण तो जाळ्यामध्ये ढकलून गोल करावा.. क्रिकेट मध्ये नाही का सिद्धू, अझर वगैरे खेळाडू स्वत: बॅटने फटके मारीत व त्यांच्या रनरला धावा काढण्यासाठी पळावे लागे...

असो... आपल्या गावची पालखी वारीसाठी पंढरपूरला गेली की नाही? खरे म्हणजे आता मोबाईल फोन सर्वत्र असल्यामुळे कोठेही जाण्याची गरजच राहिलेली नाही... एका प्रसिद्ध दूरदर्शन वाहिनीने अमुक तमुक नंबर वर SMS पाठवा आणि आम्ही तो थेट देवापर्यंत पाठवू असे जाहिर केले आहे... तुझे दादा जर अजून वारी साठी गेले नसतील तर तू तुझ्या मोबाईल वरून SMS करून विठोबाला त्वरित नमस्कार सांग.. अरे माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीचा फायदा आपल्यासारख्यांनी त्वरीत घेतला नाही तर आपण जागतिक स्पर्धेत मागे पडण्याचा मोठा धोका आहे...

चल खूप काही लिहीले... तू पत्रोत्तर पाठवशीलच अशी अपेक्षा.

लोभ असावा.