Thursday, March 12

मराठी ब्लॉगविश्वकर्त्यांना विनंती

मराठी ब्लॉग विश्व (marathiblogs.net) वर तथाकथित धर्मरक्षण करणार्‍या ब्लॉगांनी वात आणला आहे आणि त्या सुरेख सायटीची अगदी कचराकुंडी करुन टाकली आहे. त्यातच मेलमधून फॉरवर्ड आलेल्या कविता आणि दुसर्‍यांचे ढापलेले पांचट विनोद टाकणार्‍यांचीही भर पडली आहे.

ही वैतागवाडी होण्याचे कारण म्हणजे गेले काही दिवस अनेक आवडीच्या लेखकांनी लिहिलेल्या ब्लॉगांची नोंद marathiblogs.net वर दिसली नाही. जृंभणश्वान हे आंतरजालीय मित्र इतके खुसखुशीत लेखन करत आहेत हे मला जीटॉकवर मित्रांशी गप्पा मारताना समजले. ट्युलिप यांनी स्लमडॉग बाबत अतिशय नेमका लेख लिहिला आहे हे एका मित्राने इमेलीतून कळवले. संवेद आणि मेघना यांनी नवे काहीतरी लिहिले आहे हे समजलेच नाही. नंदनसारखे भिडस्त मित्र स्वतःहून अरे मी हे लिहिले आहे ते वाच असे सांगणार नाहीत. च्यायला मग ह्या सायटीचा उपयोग काय?

ह्या सायटीचे स्वरुप धर्माची राजकीय दुकानदारी करणार्‍यांचे मुखपत्र असे होत आहे याचे दुःख वाटते.रोज सकाळी त्या सायटीवर गेलो की मी हिंदू असल्याने माझ्यावर कसे अन्याय होत आहेत हे वाचून आणखीनच फ्रस्ट्रेशन येते.

पवनरावांनी थोडी चाळणी लावून रोज दहा सनातन नोंदी टाकणार्‍यांवर नियंत्रण आणावे ही कळकळीची विनंती. :)

Sunday, January 4

गंमत



रोहितने गायलेल्या 'अबीर गुलाल' या अभंगाखाली मजेदार चर्चा सुरु आहे. त्यात एका सदस्याने 'जय अर्जुनसिंग'अशी प्रतिक्रिया देऊन चर्चेला आणखीच वेगळेच वळण लावले आहे.

उपरोधाची बाब अशी की चोखामेळ्यांच्या या अभंगात खालील ओळीही आहेत.

उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन
पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग


या ओळी आणि चर्चेतली मतं एकत्र वाचून थोडी गंमत वाटली.

Thursday, December 25

उबुंटू एक अनुभव

काही दिवसांपूर्वी उबुंटू ८.०४ साठी लिहिलेला हा लेख. आता उबुंटू ८.१० उपलब्ध आहे. उबुंटू वापरण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी. www.ubuntu.com वरुन उबुंटू डाऊनलोड करता येईल. किंवा त्याची सीडी (पूर्णपणे फुकट) मागवता येईल.

१. उबुंटू लायनक्स सुरुवातीला लाईव सीडी म्हणून वापरुन पाहा. (इन्स्टॉल न करता सीडीवरूनच वापरता येते. फक्त त्यात वायरलेस नेटवर्क वगैरे कदाचित चालणार नाही. बाकी सगळे व्यवस्थित चालेल).
२. नंतर विंडोजमध्ये एक ऍप्लिकेशन म्हणून टाकून पाहा (ही सोय ८.x नंतर उपलब्ध आहे. पूर्वीच्या वर्जनांमध्ये नव्हती. येथे विंडोजचे प्रोग्रॅमही वापरता येतील.
३. नंतर सवय झाल्यावर उबुंटूला ऑपरेटिंग सिस्टम म्हणून टाकू शकता. विंडोजवर असलेल्या सर्व ऍप्लिकेशनांना उत्तम पर्याय उबुंटूमध्ये उपलब्ध आहेत.

साधारण ८ महिने मी उबुंटू ७.१ वापरले. त्याला प्रचलित नाव म्हणजे गट्सी गिबन. अतिशय आनंददायी अनुभव. माझा ल्यापटॉप ड्युएल बूट आहे. मात्र तरीही उबुंटूमध्ये जीटॉकवर 'बोलता' येणे शक्य नव्हते म्हणूनच नाईलाजाने मी विंडोज एक्सपी मी आठ महिन्यात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत वेळा वापरले असेल.


कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टम मध्ये हव्या त्या सर्व गोष्टी गट्सी गिबन मध्ये होत्या. अर्थात त्यात एक मोठी त्रुटी होती. वायरलेस राऊटरद्वारे, विंडोज एक्सपी मध्ये जितक्या सहजतेने तुम्ही वाय-फाय वापरू शकता तितक्या सहज गट्सी मध्ये वापरू शकत नाही. वायरलेस नेटवर्किंगसाठी आवश्यक असलेले ड्रायव्हर गट्सीमध्ये नव्हते. त्यावर एकच उपाय म्हणजे विंडोज ड्रायव्हर उबुंटुमध्ये घेऊन एनडीआयएसरॅपर वापरणे. अशा द्राविडी प्राणायामामध्ये नेटवर्कचा वेग फार कमी होतो असा मला अनुभव आला. त्यामुळे वायरलेस राऊटर असूनही वायर खोचूनच आंतरजालावरचे अस्तित्त्व सिद्ध करत होतो.


मात्र अचानक एके दिवशी, "तुमच्यासाठी गोड बातमी. तुमचा संगणक 'उर्ध्वश्रेणीकरणाकरता' तयार आहे. ८.०४ एलटीएस उपलब्ध. टिचकी मारा आणि सगळेकाही आपोआप होईल." असा संदेश आला. हार्डीचे सगळे गुण पाहिले आणि मला आवश्यक असलेले सर्व काही त्यात आहे याची खात्री झाली.


गट्सी टाकताना मला एक आणि एकच अप्रिय अनुभव आला होता. मात्र लाईव्ह सीडी वापरून तो त्वरित सोडवला आणि उबुंटू वापरायला सुरुवात केली होती. ( रेडहॅट आणि मँड्रेकच्या तुलनेत हे फारच सोयीचे होते. )

आणि आता तर काय अगदी गट्सीमधून हार्डीमध्ये जाणे हा अगदी माऊसचा खेळ वाटत होता. नाहीतरी दिवसाला १० सेक्युरिटी पॅचेस टाकणे, अँटीव्हायरसमध्ये पॅचेस टाकणे वगैरे 'अपग्रेडेबल' गोष्टींचा विंडोज वापरताना सराव झालाच होता. 'डू यू वॉन्ट टू अपग्रेड' वर डोळे झाकून टिचकी मारली आणि पुन्हा जालावर फेरफटका मारणे सुरु केले. साधारण २८ मिनिटात हार्डीचे पॅकेजेस ल्यापटॉपवर आले. सगळी ऍप्लिकेशनं बंद केली आणि 'अपग्रेड नाऊ' वर टिचकी मारली. साधारण ४० मिनिटात सर्व पॅकेजेस व्यवस्थित टाकून झाली. शेवटचा एक मिनिट राहिला. आणि 'अपडेटिंग लोकेल यूटीएफ ८' या संदेशावर घोडे अडले. गाडी पुढे सरकेचना. पटकन मागे फाफॉ उघडून शोधून पाहिले तर पहिला महत्त्वाचा धडा मिळाला.

गट्सी ते हार्डी प्रवासामध्ये खड्डे. गट्सीमार्गे हार्डीला जाऊ नका. थेट हार्डीचीच गाडी पकडा.


थोडक्यात काय, जुने देऊळ पाडून नवे बांधा. जुन्यालाच रंगरंगोटी करू नका. मात्र इथे माझ्याकडे हार्डीची सीडी नव्हती. आणि एव्हाना उबुंटूच्या अपडेट म्यानेजरने अर्धवट हार्डी टाकून गट्सीचे बूच लावले होते.


ल्यापटॉप पुन्हा चालू करून पाहिला. ड्युअल बूटचा मेनू येत होता. मात्र उबुंटु चालू होत नव्हते. दुसरा उपाय नसल्याने अखेर विंडोज चालू केले. बूट व्हायला २ मिनिट लागले. नंतर अँटीव्हायरस चालू झाला. त्याला मिनिटभर. विंडोजला कुठूनतरी माझा ल्यापटॉप असुरक्षित आहे ही माहिती मिळाली आणि त्याने केबी सतराशे साठ हा प्याच टाकणे आवश्यक आहे हे सांगितले. चूपचाप तो प्याच टाकला. पण तेवढ्यावर साहेब गप्प बसणार नव्हते. ल्यापटॉप पुन्हा चालू करा. केला. बूटलोडरमध्ये उबुंटूचे नाव दिसत असूनही तो मी वापरू शकत नाही हे मनाला फारच बोचत होते. पुन्हा विंडोज, नंतर परत २ प्याच. अँटिव्हायरसने माझी सिस्टीम गेले ५ महिने स्क्यान केलेली नाही हा संदेश दिला. स्क्यान केले. एव्हाना ल्यापटॉपही गरम झाला. शेवटी कंटाळुन बंद केला. आरती, पूजा सगळं करूनही प्रसाद मिळाला नाही की जशी चिडचिड होते तसं झालं.


संध्याकाळी जिममध्ये मित्राने विचारलं. अरे आज ऑनलाईन दिसला नाहीस. सगळी कर्मकहाणी सांगितली. यावर तो म्हणाला, मी पण हार्डीच वापरतो. माझ्याकडे सीडी आहे.


संध्याकाळी पुन्हा बसलो.

सीडी वापरून हार्डी टाकणे म्हणजे 'मक्खन'. मराठी फाँटही टाकले. हार्डीमध्ये फाफॉची तिसरी आवृत्ती मिळते. गट्सीमध्ये फाफॉ सोबत कॉन्कररही देत होते. इथे तो वेगळा टाकावा लागतो.


फाफॉ उघडला. नोस्क्रिप्ट, फायरबग, पद्मा वगरे टाकले. गेले काही दिवस 'सिंहासन' बघत होतो, तो पूर्ण करावा म्हणून युट्यूबवर गेलो. तर तुमच्याकडे ऍडोब प्लेअर नाही असा संदेश आला.

इन्स्टॉल करताना त्या प्लेअरने फाफॉचा पत्ता विचारला. दिला. पण तो घेईना.

मग दुसरा धडा मिळाला

हार्डी मध्ये फाफॉ सोबत 'components' ही डिरेक्टरी आपोआप येत नाही. विशेषतः ऍडोबचे प्लगिन टाकताना ही डिरेक्टरी आवश्यक आहे. ती तयार करा.


असेच काही अनुभव, म्युझिकइंडियाऑनलाईन साठी लागणारा रिअलप्लेअर, ऑनलाईन टीव्ही बघण्यासाठी लागणारा विंडोज मिडिया प्लेअर हे टाकताना आले. मात्र त्यासाठी फारसा त्रास झाला नाही.


काही अडचणी सोडवताना फारच शोधाशोध करावी लागली. त्यात काही अनपेक्षित गोष्टीही हाती लागल्या.

१. हार्डी मध्ये गूगल टॉक मध्ये 'बोलता' येणे शक्य आहे. पिडगिन ऐवजी एम्पथी वापरा.

२. उबुंटूमध्ये म्याकसारखा त्रिमिती डेस्क लाँचर मिळतो. एडब्लूएन वापरा.

३. उबुंटूमध्ये व्हिस्टा आणि म्याकपेक्षाही (हो हो म्याकपेक्षाही) प्रगत ग्राफिक्स इफेक्ट आहेत. कॉम्पिझ म्यानेजर वापरा.

४. उबुंटूमध्ये आयपॉड थेट वापरता येतो (रिदमबॉक्स, अमॅरॉक किंवा जीटीकेपॉड सोबत) ही गोष्ट नवी नाही. मात्र लिसन वापरून आयट्यूनपेक्षाही कितीतरी प्रगत सॉफ्टवेअर वापरल्याचा आनंद तुम्हाला मिळेल.

५. आणि हो हे सगळे फुकट आहे. :)


हार्डी हेरॉनबद्दल सर्व माहिती तुम्हाला इथे आणि इथे मिळेल. काही मदत हवी असल्यास उबुंटू फोरम्स आहेच.


उबुंटूविषयक मराठीतून अधिक चर्चां .

Wednesday, December 24

Marathi Typing in Linux/Ubuntu

खालील लेख हा उबुंटू व तत्सम डेबियन आधारित लायनक्स फ्लेवरसाठी लिहिला आहे. मात्र थोडे बदल करुन या सूचना इतर फ्लेवरांसाठीही चालाव्यात.

अनेक मराठी सायटींवर मराठी टायपिंगची सोय उपलब्ध आहे. मात्र ही सोय इतर ठिकाणी (उदा. गूगल टॉक, इमेल, ब्लॉग वगैरे) वापरणे हे गैरसोयीचे आहे. या ठिकाणी मराठी टायपून पाठवायचे असेल तर गमभन किंवा तत्सम खिडकीत टायपिंग करावे लागते व नंतर तेथून उचलून घ्यावे लागते. जे गूगलटॉक वगैरेसाठी फारच उपद्व्यापी आहे. शिवाय गमभनमध्ये ऑटो सेवसारखी सोय उपलब्ध नाही. त्यामुळे एकदा गमभन लटकले किंवा फायरफॉक्स लटकले किंवा दुसरी काही अडचण आली तर लिहिलेले सगळे पाण्यात जाते. याउलट इमेल/ब्लॉगमध्ये देण्यात येणारी ऑटो सेवची सोय वापरण्यासाठी त्याच खिडकीत मराठी टायपिंग करणे फार उपयुक्त आहे.

विंडोज वापरकर्त्यांना मराठी सायटींव्यतिरिक्त इतर ठिकाणी टायपिंग करण्यासाठी बरहा उपलब्ध आहे. मात्र लायनक्स वापरकर्त्यांना ती सोय नाही. मात्र त्याऐवजी लायनक्स वापरकर्त्यांना खालील पर्याय उपलब्ध आहेत.

१. लायनक्सने दिलेला देवनागरी कीबोर्ड वापरणे

२. बोलनागरी

३. एससीआयएम (स्मार्ट कॉमन इनपुट मेथड)

हे तिन्ही प्रकार फोनेटिक टायपिंगची सोय देतात. मात्र १ आणि २ मधले फोनेटिक टायपिंग हे बरहा/गमभनपेक्षा बरेच वेगळे आहे. त्यामुळे मराठी सायटींवरील किंवा बरहामधील टायपिंगची सवय असेल तर १ आणि २ वापरणे त्रासदायक वाटेल.

मात्र एससीआयएम हा साधा-सोपा-सुबक-ठेंगणा असा एक मस्त प्रकार आहे. लायनक्समध्ये देवनागरी टायपिंगसाठी यापेक्षा दुसरा सोयीस्कर मार्ग मला सापडला नाही.

एससीआयएम-देवनागरीसाठीच्या पूर्ण सूचना मात्र इंटरनेटवर लवकर मिळत नाहीत. ज्या मिळतात त्या बऱ्यापैकी अपुऱ्या आहेत त्यामुळे एससीआयएम टाकूनसुद्धा हवा तो कळफलक न दिसणे वगैरे अडचणी येतात. मराठी टायपिंग ही अनेकांची गरज झाली आहे त्यामुळे मराठी टायपिंग न येणे हे लायनक्सपासून घटस्फोट घेण्यासाठीचे महत्त्वाचे कारण ठरु शकते.

मात्र खालील पायऱ्या वापरल्या तर देवनागरीसाठी इनस्क्रिप्ट व फोनेटिक कीबोर्ड खात्रीने उपलब्ध होतील.

१. सिस्टम->;ऍडमिनिस्ट्रेशन->;सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरमध्ये जा.

२. तुमचा पासवर्ड द्या.

३. सर्च वर क्लिक करा व तिथे scim असे टाईप करा.

४. शोधून आलेल्यांपैकी खालील पॅकेजे निवडाः

scim, scim-m17n, scim-gtk2-immodule, im-switch, libscim8c2a, scim-modules-socket, scim-modules-table, scim-qtimm, scim-tables-additional

५. आता पुन्हा सर्च वर क्लिक करा व तिथे m17n टाईप करा.

६. शोधून आलेल्यांपैकी खालील पॅकेजे निवडा.

m17n-db, libm17n-0

७. आता पुन्हा सर्चवर क्लिक करा व तिथे marathi टाईप करा. त्यातून मराठीसाठी खालील पॅकेजे निवडा

language-support-fonts-mr, language-support-mr, language-support-writing-mr, ttf-devanagari-fonts,

८ आता ऍप्लाय वर क्लिक करा.


एससीआयएमची सर्व पॅकेजे इन्स्टॉल झाल्यावर तुम्ही एससीआयएम वापरु शकता. एससीआयएम चालू करण्यासाठी सिस्टम->;प्रेफरन्सेस मध्ये एससीआयएम इनपुट मेथड सेटप मिळेल. त्यात IMEngine मधील Global Setup मध्ये हिंदीमध्ये जा. तेथे hi-trans, Inscript आणि Phonetic मिळेल. त्यापैकी hi-trans निवडल्यास ते गमभन/बरहा प्रमाणे फोनेटिक टायपिंगसाठी वापरता येईल.

एससीआयएम चालू होते तेव्हा टास्कबारवर छोटे टाईपरायटरचे चित्र दिसते.

एससीआयएम वापरून इंग्लिश टायपिंगही करता येते त्यामुळे प्रत्येक वेळी मराठी टायपिंग करण्यासाठी एससीआयएम चालू करण्याची गरज नाही. एससीआयएम कायम चालू ठेवता येते. सिस्टम चालू होताना एससीआयएम आपोआप चालू होण्यासाठी

सिस्टम->;प्रेफरन्सेस->;सेशन्स उघडा. त्यात स्टार्टप प्रोग्रॅममध्ये scim-d या कमांडसाठी नवा प्रोग्रॅम टाका. आता प्रत्येकवेळी उबुंटू चालू कराल तेव्हा एससीआयएम आपोआप चालू होईल.

एससीआयएम बरोबर थोडे खेळा. त्यात तुम्हाला इंग्लिश-मराठी बदलण्यासाठी ctrl+space किंवा ज्या आवडतील त्या जोड्या ठरवता येतील.

काही अडचणी आल्यास विचारा.

एन्जॉयमाडी.

Tuesday, December 23

अमेरिकन ब्युटी

याजसाठी वनांतरा । जातो सांडुनियां घरां ॥१॥
माझें दिठावेल प्रेम । बुद्धी होइल निष्काम ॥धृ॥
अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥२॥
तुका म्हणे अहंब्रह्म । आड येऊं नेदीं भ्रम ॥३॥

दोन आठवड्यापूर्वी आमच्या ऑफिससमोर चिपोटले सुरु झालं. याचा माझ्यासकट फार लोकांना आनंद झाल्यासारखा दिसला. (हिंजवडीत तमन्ना हॉटेलला पर्याय मिळाल्यावर झाला होता तसाच.) मात्र इतक्या थंडीत अर्धा अर्धा तास लोक लायनीत उभे राहतात हे पाहून आश्चर्य वाटले. मला आधी वाटले उद्घाटनानिमित्त पहिल्या आठवड्यात चिपोटलेवाले फुकट देत आहेत की काय! फुकट नव्हते. जनतेची रेस्टॉरंटवरची निष्ठा पाहून डोळ्यात पाणी आलं. थंडीमुळे त्याचा बर्फ होऊ नये म्हणून लगेच पुसलं.

शनिवारी घरी बसून काय करायचे हा मोठा प्रश्न होता. जिमला आलो. नेहमीप्रमाणेच अतोनात थंडी. पण मेसीज च्या दुकानासमोर ही भली मोठी रांग. देव अक्कल वाटत होता तेव्हाही अमेरिकन लोक शॉपिंगच्या लायनीत उभे होते की काय? काय करतात एवढे कपडे घेऊन. अंगावर तर कमीच असतात बऱ्याचदा. एवढी मरणाची थंडी असूनही पाय उघडे ठेवणारे कपडे कसे काय घालू शकतात देव जाणे.

त्यात इथे हटकून सगळे भारतीय एकजात भाजपाचे सहानुभूतीदार आहेत. विशेषतः मुंबईवरच्या हल्ल्यांनंतर राजकारणावर आणि तशाही गप्पा मारणे अवघड झाले होते. पण लगेचच निवडणुकांचे निकाल अनपेक्षित आल्याने थोडे शांत झाले आणि क्रिकेटवर बोलू लागले. हिंदी चित्रपट आणि क्रिकेटवर माझ्याशी गप्पा अशक्य आहेत. पुस्तकांवर बोलायला कोणालाच आवडत नाही. त्यामुळे तिथेही गोची आहे.

घरी नियमितपणे फोन करुन त्रास देत असल्याने घरचेही कंटाळलेत कदाचित. त्यांनाही माझ्याशी रोज काय बोलावे हा प्रश्न पडतो, त्यात नेमकी माझी फोनची वेळ आणि त्यांची 'चार दिवस सासूचे'ची. आणि इथे तसं रोजच्या आयुष्यात फारसं वेगळं काही नसल्याने चपातीत गुंडाळलेले भात-भाजी-चिकनचे तुकडे ही वर्णने वगैरे ऐकून तेही वैतागले असावेत. फोनवर 'काय म्हणतोस अजून' आणि 'तुम्ही सांगा बाकी काय' हेच सारखे बोलले जाते.

प्रत्येक गोष्टीला असलेल्या विलक्षण कृत्रिमपणामुळे तर फारच वैताग आला आहे. भेटल्यावर म्हटलेले "How are you?" पासून तर प्रत्येकाचे स्मितहास्य हे अगदी प्लॅस्टिक वाटते. पुण्यात प्रत्येक गोष्टीत रसरशीतपणा होता. सहा सीटरमध्ये जागा पकडण्यासाठीची धावपळ, बसमध्ये बसतानाची धक्काबुक्की हे सारे आता फार चैतन्यमय आणि उत्साही वाटू लागले आहे.

भारतात येण्यापूर्वीचा शेवटचा ब्लॅक फ्रायडे म्हणून नागराजूने दणकून खरेदी केली त्याची गोष्ट आठवली. रात्री साडेआठला आरामखुर्ची, ब्लँकेट घेऊन ऑफिस डेपो समोर झोपायला गेला होता. ७९९.९९ डॉलरचा लॅपटॉप ४७९.९९ ला मिळाल्याने त्याला फार आनंद झाला होता. नंतर दोन आठवडे आम्हाला त्याच्या लॅपटॉपचे कॉन्फिग्युरेशन पाठ झाले होते. त्यावेळी मी त्याला मनातून हसलो होतो. पण मी तरी काय वेगळं करतोय इथे. पुण्यात असताना जसं मनात शांत, समाधानी वाटायचं तसं अजिबात वाटत नाही. आधी बोंबाबोंब करुन पैशांसाठी ऑनसाईट मागून घेतली आणि आता पंचतंत्रातील कीलोत्पाटी माकडाप्रमाणे शेपूट अडकल्याने विस्कटलेले मन घेऊन बसलो आहे.

तरीही मागच्या वेळी दोन महिन्यात कंटाळलो होतो. या खेपेला सहा महिने तग धरुन आहे. एकंदर प्रगती आहे म्हणायची.

Monday, December 22

फायरफॉक्समध्ये लोकसत्ता वाचण्यासाठी युक्ती

तुम्हीही माझ्यासारखेच जर कुमार केतकरांचे फ्यान असाल तर सकाळी सकाळी लोकसत्ता वाचल्याशिवाय होत नाही किंवा दिवस चांगला जात नाही हा अनुभव तुम्हालाही आला असेल. :)

मात्र लोकसत्ता युनिकोडित नसल्याने काही अडचणी आहेत. त्यासाठी खालील युक्त्या वापरा.

१. लोकसत्ताचा मिलेनियम वरुण हा फाँट उतरवून घ्या आणि तो इन्स्टॉल करा.

२. लोकसत्ता फायरफॉक्समध्ये वाचताना प्रत्येक पानावर कॅरॅक्टर एनकोडिंग बदलावे लागते, हे थोडे त्रासदायक आहे.

त्यासाठी युक्ती म्हणजे फायरफॉक्स वापरकर्त्यांनी खालील ऍडऑन लावून घ्यावे.

येथून घ्या

नंतर www.loksatta.com उघडून View->Sidebar->Content Preferences सुरु करावे. डाव्या बाजूला उघडलेल्या खिडकीत www.loksatta.com टॅबवर जावे. तिथे कॅरॅक्टर एनकोडिंग मध्ये Western (ISO-8859-1) निवडावे.

लोकसत्ता व्यवस्थित वाचता येईल.

Sunday, December 14

नेमाड्यांची दूरदृष्टी

आजकाल मेघनाद देसाई, शोभा डे, सपत्नीक राजदीप सरदेसाई, सुधींद्र कुलकर्णी, तवलीन सिंग व सुमार केतकरांसकट अनेकांनी मुंबईबाबत कोल्हेकुई सुरु केली आहे. मागे राजदीप सरदेसाईच्या बायकोने (तिचे नावही घ्यावेसे वाटत नाही) आयबीएनमध्ये लिहिलेल्या लेखात असाच एक घाणेरडा दृष्टिकोण थुंकला होता. तिच्या मते मुंबईवर राज्य करणारे ग्रामीण महाराष्ट्राचे नेतृत्त्व हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. त्यांना नव्या युगाचा काही गंध नाही. मुंबईवर राज्य करण्यास ते पूर्ण नालायक आहेत. तिथे राजकारण्यांची गरज नसून सीईओ हवे आहेत. हे धोतर टोपी घालून साखर कारखाने चालवणारे लोक मुंबईला कसे काय सांभाळणार वगैरे वगैरे.

इंग्रजीतून लिहिणाऱ्या मराठी लेखकांबाबत शेलकी शेरेबाजी करणाऱ्या नेमाड्यांच्या झूल मधील उतारा देण्याचा मोह अगदीच आवरत नाहीः (सर्वसमावेशतेसाठी जातीवाचक उल्लेख काढून टाकले आहेत)

तेव्हा बाळासाहेब जाधव म्हणाले, ही अवदसा तुमास कुठून सुचली मित्रहो? कोणी गू खाल्ला तर आपणही गू खावा काय? पेपरात लिहून लिहून काय लिहिणार? हे नंग्या हिजड्यांचे धंदे आपण करावे काय? तुमास माहीत नाही का कोणी श्रीमंत माणूस हिजड्यांना दहा रुपये देऊन गल्लीतल्या कोणाकोणाविरूद्ध लावून देतो. मग हिजडे कोणाचा काष्टा फेडतात, कोणाला घेरून गलिच्छ शिवीगाळ करतात. तसे हे पेपरवाले हिजडे लावून दिलेले असतात आमच्याच लोकांनी. मुंबईतले हे सगळे संपादक हिजड्यांसारखे भाड्याने लावून दिलेले आहेत आपल्या साहेबांनी! हे तुमास ठाऊक नाही का. त्यापाशी ह्या दोन लाखांचा साखर कारखाना काढूया!

शेवटी जिल्ह्यात शिवशक्ती साखर कारखाना सुरू झाला.

Sunday, December 7

व्यवहार

सकाळी कॉफी पिताना आम्ही मुंबईतील घटनेवर जोरदार चर्चा केली. प्रत्येकजण तावातावाने मुद्दे मांडत होता. एक नुकताच भारतातून आलेला सहकारीही होता. त्याने एअरपोर्टवर कस्टम अधिकारी पैसे खाताना बघितल्याचे सांगितले. हे चिरीमिरीचे प्रकार बंद झाल्याशिवाय हे हल्ले करणे अवघड होणार नाही यावर सर्वांचेच एकमत झाले.

दुपारी खाण्यासाठी आणायला चाललो असताना नुकताच भारतातून आलेला सहकारीही सोबत होता. बिल देताना त्याने कोपराने ढोसत मला सांगितले 'रिसीट जरूर लेना'. मला समजले नाही. पण तरीही मी रिसीट घेतली. बिल्डींगच्या बाहेर आल्यावर त्याने इतर दोघातिघांकडूनही त्यांच्या रिसीटी घेतल्या.

"ये बिल कंपनीसे Reimburse कर लेता हूं. I can get my bills rembursed for the first week.", मित्र.

"But it is not your bill!", मी.

"हॅ हॅ हॅ!", सगळेजण.

मला त्याच्या व्यवहारचातुर्याचं कौतुक वाटल्याशिवाय राहिलं नाही!

Friday, December 5

बरखा दत्त

बरखा दत्त बाईंच्या एकंदर पत्रकारितेवर आजकाल बरेच आक्षेप घेतले जात आहेत. कालच कुठेतरी वाचले की या बाईंनी कॅमेऱ्यासमोर कोणालातरी विचारले, "तुमचे नातेवाईक ताज हॉटेलात अडकले आहेत, ते जिवंत असतील असे तुम्हाला वाटते का?" आणि या बाईंबरोबर असलेल्या कोणा पत्रकाराने एका पोलीसाला विचारले "डेड बॉडीज की कंडिशन क्या है?"!!

असो. आता या बातम्यांचे काही वाटत नाही. मी बराच कोडगा आणि निगरगट्ट झालो आहे. त्याचा पुरावा म्हणजे या बाईंच्या पत्रकारितेमुळे "दत्त म्हणून उभे राहणे" या मराठी वाक्प्रचाराला एक वेगळा अर्थ येईल असे मला कालपासून वाटत आहे.

Saturday, November 29

नाही चिरा नाही पणती

अतिप्रिय च्यानेलांनो,

मुंबईमध्ये झालेल्या घृणास्पद दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय सैनिक, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यापेक्षाही जास्त शौर्य कोणी दाखवले असेल तर ते तुमच्या वेगवेगळ्या व्यवसायनिष्ठ वाहिन्यांनी. क्रिकेट कॉमेंट्रीप्रमाणे किती विकेटी पडल्या याचे थेट प्रक्षेपण आणि रनिंग कमेंट्री , प्रत्येक मिनिटाला काय घडत आहे हे दाखवण्याची तळमळ, या दहशतवादी हल्ल्यांच्या 'विश्लेषणा'मुळे आणि एकंदर कव्हरेजमुळे हा हल्ला जितका होता त्यापेक्षा खूप मोठा करून दाखवण्याची कामगिरी, आणि या सर्व प्रकारामुळे एकंदर भारतीयांची हतबल आणि हतधैर्य अशी अवस्था करण्याचे मोठे श्रेय या तुमचेच नाही का... आणि तुम्ही हे सर्व कोणासाठी केले? टीव्हीसमोर बसून फक्त आपले बूड उबवणाऱ्या आमच्यासारख्या प्रेक्षकांसाठीच ना? ही माहिती न मिळते तर आम्हाला घास गोड लागला असता का? आणि हे सर्व दाखवले नाही तर आम्ही काय बघणार? (सास भी कभी बहू थी सुद्धा बंद झालं आहे... आता जमाना रिऍलिटी टीव्हीचा आहे भाऊ). "अगं ए जरा आमटी वाढ थोडी" असं म्हणताना तुमच्या बातम्यांची चटणी तोंडी लावायला बरी असते..

ता. क. शिवाय दुसऱ्या दिवशी मुंबईत न झालेल्या गोळीबाराची बातमी दाखवून तुम्ही प्रेक्षकांची किती काळजी आहे हे देखील सिद्ध केले आहे त्याबद्दल विशेष अभिनंदन. हेमंत करकरे आणि अशोक कामठे यांच्या अंत्यसंस्कारांपासूनही आम्हाला वंचित ठेवले नाही हेदेखील उल्लेखनीय आहे.

तुमची कर्तव्यनिष्ठा, गोळीबार आणि स्फोटांची पर्वा न करता बाईट घेण्यातले अतुलनीय शौर्य, तुमच्या बातम्यांचा प्रेक्षकांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याचा विचार न करण्याची स्थितप्रज्ञता हे सर्व विसरून जाऊ नये अशीच माझी इच्छा आहे. म्हणून हे पत्र लिहीत आहे.

-तुमचाच एक चाहता.

Thursday, November 27

The Ukimwi Road

The Ukimwi Road ह्या पुस्तकाविषयी लिहिण्यापूर्वी मनामध्ये विचार येऊन गेला की मराठीत अशा प्रकारचे लेखन कोणी केले आहे. अनिल अवचटांचे 'पूर्णिया' आणि नंतर सामाजिक प्रश्नांबाबत केलेल्या प्रवासांची वर्णने हे ठळकपणे आठवणारे उदाहरण. दि.बा.मोकाशी यांची 'अठरा लक्ष पावले' आणि 'पालखी', मिलिंद बोकील यांचे 'समुद्रापारचे समाज' ही मला आणखी आठवणारी उदाहरणे . हे लेखन वगळता ज्याला - दुसरा बरा शब्द आठवत नसल्याने - तळागाळातल्या लोकांना भेटण्याची, त्यांची आयुष्ये जवळून बघण्याची आणि त्यावर लिहिण्याची उर्मी असलेले लेखक मराठीत फारच कमी आहेत. अर्थात या पुस्तकांच्या वाचकांची संख्याही इतर साचेबद्ध प्रवासवर्णनांच्या मानाने फारच कमी आहे हेदेखील दुर्लक्षित करता येणार नाही. असो.

The Ukimwi Road हे Dervla Murphy यांचे पुस्तक केनिया-युगांडा-टांझानिया-मालावी-झांबिया-झिंबाब्वे ह्या आफ्रिकेतील देशांत ३००० मैलांच्या सायकलप्रवासाचे वर्णन. मर्फी यांनी १९६४ पासून त्यांच्या जगावेगळ्या -सायकलवरून किंवा पायी केलेल्या - प्रवासांच्या हकीकती पुस्तकांच्या माध्यमातून सांगितल्या आहेत. याव्यतिरिक्त उत्तर आयर्लंडमधील प्रश्न, ब्रिटनमधील वंशवाद, अणुऊर्जा या विषयांवरही लेखन केले आहे. त्यांच्या इतर प्रवासांपेक्षा या प्रवासाचे कारण थोडे वेगळे आहे. जानेवारी १९९२ मध्ये त्यांना थोडासा एकटेपणा हवासा वाटत होता. थोडी विश्रांती घ्यावी असे वाटत होते. अर्थात त्यांची विश्रांतीची कल्पना ही केनिया ते झिंबाब्वे हा प्रदेश सायकलप्रवास करून 'निष्काळजीपणाने भटकणे' अशी आहे! विशेषतः 'संपर्काच्या साधनांचा अभाव असलेल्या या देशांमध्ये हवा तो निवांतपणा मिळेल आणि भटकणेही होईल' हे त्यामागचे एक कारण. याआधी त्यांनी आफ्रिकेतील इथिओपिया, मादागास्कर, कॅमेरून वगैरे देशांना या अगोदर (सायकलवर!) भेट दिली होती. आता विश्रांतीच्या निमित्ताने बाकीच्या देशांनाही भेट देण्यासाठी लेखिकेने वयाच्या साठाव्या वर्षी हा प्रवास केला. (नंतर पुढे वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी सैबेरियात सायकलप्रवासाचा प्रयत्न केला! तिथे अपघात झाल्याने सायकलऐवजी इतर वाहनांनी प्रवास करावा लागला!)

"जगातील इतर मोठे देश चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत- आणि आम्ही अद्याप आमच्याच देशातील गावांपर्यंतही पोचू शकलेलो नाही. काही देश चंद्रापर्यंत जाऊन परतही आले आहेत आणि आता इतर ग्रहांवर प्रवास करण्याच्या योजना करत आहेत. मात्र आम्ही अजूनही गावांपर्यंत पोचण्याचे प्रयत्न करत आहोत. (दिवसेंदिवस बाकीचे जग जवळ येत आहे आणि) आफ्रिकेतील गावे दूर दूर जात आहेत." पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखिकेने हे टांझानियाच्या संस्थापकांचे हे अवतरण दिले आहे. फक्त दळणवळणाच्याच नाही तर संपर्काच्या सर्वच साधनांचा बोजवारा उडालेल्या देशांत एका गोऱ्या-परदेशी, इंग्लिशशिवाय दुसरी भाषा न येणाऱ्या, आजीबाईने पॅंट-शर्ट घालून सायकलप्रवास करणे ही फार धोकादायक गोष्ट आहे असे अनेकांनी प्रवासापूर्वी आणि प्रवासातही बजावले. विशेषतः सायकलवर खाकी रंगाची पॅंटशर्ट घालून जाणारी व्यक्ती ही स्त्री आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. कदाचित परदेशी सैनिक समजून कोणीतरी हल्लाही करील किंवा जिथे थोडीफार वस्ती आहे तिथे सायकल गायब होईल (आणि जिथे कमी वस्ती आहे किंवा अजिबात नाही तिथे सायकलस्वारही कायमचा गायब होण्याची शक्यता आहे) असेही इशारे मिळाले. अर्थातच बाईंनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.

प्रवासाच्या पहिल्याच दिवशी नैरोबीमध्ये प्रचंड दुष्काळ आणि एका स्थानिक आंदोलनाशी लेखिकेची ओळख होते. आंदोलनाचे पुढे दंगलीत रूपांतर होते आणि त्या गडबडीत त्यांनाही थोडा मार लागतो. पुढे बिअर पिण्यासाठी एका गावात थांबल्यावर तिथे आफ्रिकेतील एड्सचे पहिले दर्शन होते आणि देश-संस्कृती कसलेही बंधन न बाळगता या रोगाने सगळा प्रदेश कसा पोखरून काढला आहे याचे विदारक दर्शन होत राहते. प्रवासात भेटलेल्या जवळपास प्रत्येकाचेच नातेवाईक, जवळचे मित्र एड्सने मृत्युमुखी पडलेले आहेत. आफ्रिकेतील लोकांच्या जीवनशैलीला जुळणारी उत्तरे शोधण्याऐवजी केलेल्या पाश्चात्य मलमपट्टीमुळे ही जखम अधिकच चिघळत चालली आहे. आफ्रिकेतील समाजात असलेल्या श्रद्धा-अंधश्रद्धा यांमुळे एड्ससारख्या प्रश्नाने विक्राळ स्वरूप धारण केले आहे. त्यांना प्रवासात भेटलेल्या आफ्रिकेतील काही लोकांच्या मते हा रोग ही आफ्रिकेत छावणी करून राहिलेल्या ब्रिटिश सैनिकांची या भागाला मिळालेली 'देणगी' आहे. तर काहींच्या मते पाश्चात्यांना आफ्रिकी लोकांची भीती वाटत असल्याने त्यांनी केलेल्या जादूटोण्याचा हा एक प्रकार आहे. युरोप अमेरिकेत या रोगावर उपाय मिळाला आहे, मात्र ते लोक मनापासून आफ्रिकेचा द्वेष करत असल्याने ही औषधे आफ्रिकेत येऊ देत नाहीत अशीही काहींची समजूत आहे. ह्या राजकीय-सामाजिक मतमतांतराबरोबरच पारंपरिक अंधश्रद्धांमुळे हा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. पौगंडावस्थेतून बाहेर पडलेल्या पुरुषाने जर लैंगिक संबंध ठेवले नाहीत आणि वापर झाला नाही तर लिंग गळून पडते किंवा खराब होते. तसेच स्त्रियांनी लैंगिक संबंध ठेवले नाहीत तर योनीमार्ग वापराअभावी आपोआप बंद होतो ही समजूत आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर आहे.आफ्रिकेतील मोडकळीस आलेल्या समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेवर टिप्पणी करताना लेखिकेने साम्राज्यवादाला थेट जबाबदार ठरवले आहे. युरोपिअन वसाहतवादामुळे या भागाचे मोठ्या प्रमाणावर झालेले शोषण, स्वतःची वेगळी समृद्ध जीवनपद्धती असणाऱ्या केनियातल्या मसाईसारख्या टोळ्यांनी गोऱ्या आक्रमणाला विरोध केल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले शिरकाण, मसाईंसारख्या शक्तिशाली टोळ्या वरचढ होऊ नयेत म्हणून संख्येने कमी असणाऱ्या टोळ्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे दिल्याने या भागाचा बिघडलेला सामाजिक तोल, विविध टोळ्यांमधील भांडणांचा स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी फायदा करून घेणाऱ्या युरोपियन राष्ट्रांनी उभे केलेले इदि अमीनसारखे भस्मासुर या सर्व घटनांचे संदर्भ पुस्तकात वारंवार येत राहतात. "आफ्रिकेमध्ये संहारक शस्त्रांची निर्मिती होत नाही. जर पाश्चात्यांना आमचा खरंच इतका कळवळा असेल तर तेथील कंपन्यांकडून येणारी विध्वंसक अस्त्रे बंद होण्यासाठी ते प्रयत्न का करत नाहीत. आमचे धनुष्यबाण विषारी असले तरी त्यामुळे होणाऱ्या संहाराला मर्यादा आहे. मात्र या आयात होणाऱ्या आधुनिक हत्यारांमुळे प्रचंड संहार होत आहे." हा एका वृद्धाचा प्रश्न मोठा बोलका आहे.या सर्व प्रकारात पारंपरिक जीवनपद्धतीवर आक्रमण झाल्याने नव्या युगात रूढ अर्थाने जगण्याला नालायक ठरलेल्या या टोळ्यांतील पुरुषांना पोटापाण्यासाठी स्थलांतरे करावी लागली. जोडीदार सोबत नसल्याने दुसरे लैंगिक सोबती शोधावे लागले आणि त्यातून एड्सचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. त्यात भर म्हणजे जनजागृतीसाठी आणि पाश्चिमात्य धर्तीच्या शिक्षणप्रसारासाठी आलेल्या मिशनरी लोकांनी धर्मप्रसार करताना ख्रिश्चन धर्माची काही अत्यंत जुनाट आणि आफ्रिकी जीवनशैलीच्या अगदी उफराटी तत्त्वे येथे रुजवली आहेत. निरोध किंवा तत्सम वस्तूंचा वापर करण्याला प्रतिबंध ही त्यातलीच एक घातक पद्धत. मुले ही देवाची भेट असल्याने त्यांना नाकारू नका त्याऐवजी जीवनशैलीत बदल करा अशी शिकवण ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी दिली. आफ्रिकेत खरे तर बहुपत्नीत्त्वाची पद्धत होती मात्र धर्मप्रसारकांनी प्रचलित केलेल्या ख्रिश्चन धर्मातील एकपत्नीव्रतामुळे बाहेरख्याली व असुरक्षित संबंध जास्त फोफावत आहेत असे लेखिकेचे निरीक्षण आहे.या प्रवासातील आवडलेल्या अनुभवांविषयी कितीही लिहिले तरी कमीच आहे. तरी एक नमुना देण्याचा मोह अनावर होतो.

"दुसऱ्या दिवशी सकाळी माझा रस्ता एका दलदलीसमोर जाऊन संपला तेव्हा मोठीच अडचण आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल असल्याने पुन्हा काही मैल मागे जाऊन एखाद्या वस्तीवर रस्त्याची चौकशी करावी लागणार. मी मागे वळले तर एक म्हातारा माणूस माझ्या मागेच उभा असल्याचे मला दिसले. त्याच्या वेशभूषेवरून तो आफ्रिकेतील एखाद्या जमातींपैकी एक आहे हे स्पष्टपणे कळत होते. त्याने गळ्यात तांब्यांची मोठमोठी कडी घातली होती. त्याच्या उजव्या हातात एक भाला आणि डाव्या हातात चामड्याने मढवलेली ढाल होती. एक परदेशी स्त्री या भागात सायकलवरून फिरत आहे हे त्याला माहीत असावे. त्याने काहीही न बोलता त्याच्या हातातला भाला माझ्याकडे दिला आणि सायकलीचा ताबा घेतला. नंतर माझ्या बुटांकडे बोट दाखवले. मी ते काढून हातात घेतले. समोरच्या घोटाभर चिखलातून चालताना त्या भाल्याचा उपयोग आधारासाठी काठीसारखा करायचा होता. कदाचित फक्त सायकलीने मला ती दलदल ओलांडणेही शक्य झाले नसते. साधारण अर्ध्या मैलभर तो चिखल तुडवल्यावर पायवाट आली. सायकल बाजूला ठेवून त्याने माझ्या हातातून भाला परत घेतला आणि काहीही न बोलता तो आल्या वाटेने मागे परतला. मी या रस्त्याने येत असताना त्याने पाहिले असावे आणि या अनोळखी बाईला इथे नक्कीच मदत लागेल हे पाहून तो माझ्यामागे आला असावा हे स्पष्टपणे कळत होते." रानटी समजल्या जाणाऱ्या टोळ्यांकडून लेखिकेला असे अनेक अनुभव आले आहेत.

असो. आफ्रिकेतील प्रत्येक देशाचे प्रश्न वेगळे आणि तितकेच क्लिष्ट आहेत.मात्र त्या सर्वांना जोडणारा समान धागा आहे तो वसाहतवादी पिळवणुकीमुळे उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था, धर्मप्रचाराच्या नावाखाली समाजरचनेत झालेली ढवळाढवळ, आफ्रिकेतील रूढी परंपरा यांना समजून न घेता शोधलेली पाश्चात्य धाटणीची उत्तरे आणि या सर्वांमुळे गोंधळून गेलेला, आणि आता एड्सने पोखरलेला आफ्रिकी समाज यांचा. या सर्वांचे नेमके चित्रण या पुस्तकात होते.
The Ukimwi Road

"Certainly Economists are the most dangerous animals on earth, skilled at making situations look so complicated that only their own solutions can solve the problems they themselves created" अशी अनेक ठिकाणी लेखिकेची लेखणी विलक्षण बोचरी आहे तर "हॉटेलात झोपताना ढेकणांपासून बचाव करावा की पिसवांपासून याचा विचार करत असताना मला डासही चावत आहेत हे बराच वेळ लक्षातच आले नाही" अशी काही ठिकाणी अतिशय प्रसन्न आणि नर्मविनोदी आहे. मात्र एकंदरीत हे हलकेफुलके प्रवासवर्णन नाही. लेखिकेने वास्तवतेला रंजक भाषेत सादर केले असले तरी विषयाचे गांभीर्य कोठेही कमी होऊ दिलेले नाही. तिने वेळोवेळी दिलेले अनेक पुस्तकांचे दिलेले संदर्भ, निवडक उतारे, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चर्चांनंतर विस्ताराने मांडलेले स्वतःचे मत - फुल टिल्ट या पुस्तकाच्या तुलनेत या पुस्तकात मर्फी यांनी स्थळवर्णनांपेक्षा संवाद आणि स्वतःची मते यावर जास्त भर दिला आहे - यामुळे हे पुस्तक केवळ प्रवासवर्णन न राहता हा प्रदेशाचा एक विश्वासार्ह ताळेबंद झाले आहे. आफ्रिकेतील समाजरचना, शिक्षणव्यवस्था, आरोग्यसेवा, विवाहसंस्था अशा अनेक गोष्टींबाबतची लेखिकेची सगळीच मते पटण्यासारखी नसली तरी ती विचार करायला लावतात. विशेषतः एकंदर विकासाबद्दलची लेखिकेची टोकाची मते आणि आदिवासी किंवा 'अविकसित'जीवनशैलीबाबतचे तिचे रोमॅंटिक वाटावे असे आकर्षण थोडेसे जाणवते मात्र ते पूर्वग्रह गृहीत धरूनही हे पुस्तक फार वाचनीय आहे यात शंका नाही.

पुस्तकाच्या नावाबाबत थोडे अधिक. Ukimwi हा स्वाहिली भाषेतील शब्द एड्स या रोगासाठी वापरला जातो. त्याचा शब्दशः अर्थ आहे Slim Disease असा. या संपूर्ण प्रवासाला 'एड्स रस्ता' असे नाव लेखिकेला द्यावेसे वाटते यावरूनही आफ्रिकेतील या प्रश्नाच्या भयावहतेची कल्पना यावी. पुस्तकाचे बाजूला दाखवलेले मुखपृष्ठ आणि डोक्यावर पाणी घेऊन जाणारे रेखाटन असलेले मलपृष्ठ दोन्ही अप्रतिम.


'वाचलेच पाहिजे' या यादीत हे पुस्तक अवश्य असू द्या.

Wednesday, November 5

Scripting Success



'गमभन'बद्दल आलेली बातमी आणि सोबत ॐकारचा झकास फोटो.